'देव तारी त्याला कोण मारी.'

देव तारी त्याला कोण मारी

विषय -   " काळ आला होता, पण वेळ आली नव्हती."


 आयुष्यात काही घटना अगदी चित्तथरारक अशा घडतात. मात्र अशा प्रसंगातून सुखरूपपणे बाहेर पडल्यावर आपण देवाचे कोणत्या शब्दात आभार मानावेत तेच कळत नाही.

अशीच एक घटना अगदी अलीकडची.

मी व माझे मिस्टर एका कार्यक्रमाला गेलो होतो. सोबत माझी मैत्रीण सुद्धा होती. कार्यक्रम साधारणतः रात्री आठला सुरू होणार होता.  पण तो वेळेवर सुरू न झाल्यामुळे घरी यायला बराच उशीर झाला. रात्रीचे अकरा, साडे अकरा वाजले असतील. आम्हाला माझ्या मैत्रिणीला तिच्या घरी सोडायचे होते. लवकर पोहोचावे म्हणून कार मुख्य रस्त्याने न घेता वळणावळणाने घेतली.


माझ्या मैत्रिणीला आम्ही तिच्या घरी सुखरूप पोहोचवून दिले. येताना सुद्धा त्याच रस्त्याने निघालो. अचानक खूप मोठा आवाज झाला. आगीचा लोळ उठला. लाईट गेले.  आगीच्या लोळा मुळे आमचे डोळे दिपले. व कार साईडला कधी गेली कळलेच नाही. आम्ही दोघेही ओल्ड एज. तरीही आम्ही गाडी काढलीच. कारण आम्हाला कोणतीच कल्पना नव्हती.


आमचे नशीब बलवत्तर म्हणा की" काळ आला होता, पण वेळ आली नव्हती." म्हणा. आमची कार जिथे साईडला गेली तो रिकामा प्लॉट होता. मात्र आमची गाडी जशी समोर आली सर्व लोक आपापल्या घरातून बाहेर आले. जो तो सांगू लागला. तुम्ही जिथून आले तिथेच मिनिटांपूर्वी इलेक्ट्रिकची जिवंत पार पडली आहे. डीपी मध्ये मोठा स्फोट झाला तो आवाज आणि आगीचा लोळ त्याचाच होता. आम्ही सर्व ओरडून तुम्हाला सांगत होतो पण कदाचित उजेडामुळे आम्ही तुम्हाला दिसलो नाही.


अशा तऱ्हेने आगीच्या लोळाने डोळे दिपल्यामुळे आमची कार साईडला गेली व त्या जिवंत तारेचा कारला स्पर्श झाला नाही. त्यामुळेच आम्ही बचावलो. प्रत्येक जण म्हणत होता, बापरे ! केवढा मोठा अनर्थ टळला. खरोखरच "देव तारी त्याला कोण मारी" म्हणतात ना तेच खरे. अशाही परिस्थितीत गर्दीतला एक मुलगा मिश्किलपणे म्हणाला, आजोबा कशाला चालवता हो या वयात कार. या वाक्याने मला मात्र हसू आले. खरंच " काळ आला होता, पण वेळ आली नव्हती."आजही ती घटना आठवली की अंगावर शहारे येतात.

सौ. रेखा देशमुख