डिटेक्टिव्ह आजी

कथा आजी आणि नातीची


डिटेक्टिव्ह आजी..(चौकट)


"पूर्वा.. अग काय कपडे घातले आहेस हे? अशी कॉलेजला जाणार?"
"आजी चिल.. हे कसले कूल आहेत बघ.."
" बोडक्याचे कूल.. अख्खा गळा, पाठ उघडी.. आणि निदान खाली रोजच्यासारखे तरी काहीतरी घाल.. हे असे घालून घरात फिरतेस ते ठिक आहे.. बाहेर नको घालून जाऊस.." वृंदाताई करवादल्या..
" आजी तुला ना आजकालची फॅशन कळत नाही. आमचा आजचा हा ड्रेसकोड आहे.."
" कॉलेजमध्ये चालते?"
" कॉलेजमध्ये बसणार कोण?" बोलून पूर्वाने जीभ चावली आणि जास्त न बोलता ती तिथून सटकली..
" सुचेता, ए सुचेता.. तुझे पूर्वाकडे आजकाल लक्ष नसते का?" वृंदाताईंनी सुनेला खडसावून विचारले.
" आई, आता ती मोठी झाली आहे.. नाही ऐकत आधीसारखी.. आणि माझे पण ऑफिसचे काम, घरचे काम.. नाही तेवढे लक्ष देता येत." अपराधी स्वरात तिने कबूल केले..
" श्रीधर, तुझे काय?" ऑफिसला जायच्या तयारीत असलेल्या मुलाला त्यांनी विचारले..
" आई, अग मी घरी तरी असतो का? दिवसभर ऑफिस.. दिवसातले दोन तास मुलगी समोर असते.. त्यातही तिला ओरडू का?"
" मी गावातल्या अडचणी सोडवून कंटाळले होते.. वाटले होते चार दिवस लेकाकडे जाईन, तूपरोटी खाईन, जाडजूड होईल.. पण कसले काय? इथे पण हेच करा.. काय करणार मी बिचारी.." वृंदाताईंचा आविर्भाव पाहून दोघेही हसायला लागले..
" पूर्वा, काय करते आहेस?" दुसर्‍या दिवशी लेक आणि सून ऑफिसला गेल्यावर वृंदाताईंनी पूर्वाला विचारले. पूर्वाने पटकन मोबाईल बाजूला ठेवला आणि पुस्तक हातात घेतले..
" आजी मी अभ्यास करते आहे.. मला त्रास देऊ नकोस.."
" मी नाही त्रास देत हो तुला.. तू कर अभ्यास. पण तुमचा मेला तो टिव्ही लागत नाहीये. आणि मला एकटीला कंटाळा आला आहे. म्हणून म्हटले जरा मोबाईल बघीन तुझा. तशीही तू अभ्यास करते आहेस ना.."
" अग पण तुझा मोबाईल?"
" माझा कसला तो जुनापुराणा बाबा आझमच्या जमान्यातला डब्बा.. मला सिरियल बघायची होती.. तुझ्या त्या वूटवर का कशावर तरी.. आता तुला द्यायचे नसेल तर नको देऊस.."
आजीने असे पेचात पकडल्यावर पूर्वाला मोबाईल द्यावाच लागला.
" पण फक्त एकच एपिसोड हं.. नाहीतर माझी बॅटरी आणि डेटा संपवशील.."
" असा कसा संपेल? माझा लेक आहे कि तुला सगळे अनलिमिटेड देणारा.."
त्यावर पूर्वा काही बोलणार तोच बेल वाजली..
" बघ ग कोण आहे ते.."
कधीही आपला मोबाईल बाजूला न ठेवणारी पूर्वा मोबाईलकडे बघत बाहेर गेली.. पाच मिनिटांनी आली तीच तणतणत..
"काय ग, कोण होते?"
" पिझ्झा.. मी सांगते आहे नाही मागवला तरीही देऊन गेला.. म्हणे हाच पत्ता दिला होता. पैसे भरले आहेत.. आजी तू मागवलास?"
" अग मी तर अडाणी.. मला काय आणि कसे जमणार हे सगळे?"
" ते पण आहेच.." पूर्वाचा आजीला काही जमत नाही यावर विश्वास होता..
" आता या पिझ्झाचे काय करायचे?"
" खाऊया.."
" बरं आजी.. आता ना हे सगळे झाले कि मी बाहेर जाणार आहे.. चालेल ना?"
" न चालवून सांगते कोणाला? कुठे जाणार आणि कधी येणार ते सांगून जा फक्त.."
" माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे.. तिथे जाते आणि लवकर येते.."
" बरं.."
संध्याकाळचे आठ वाजले तरी ना पूर्वा घरी आली होती ना आजी.. श्रीधर आणि सुचेता दोघेही टेन्शनमध्ये होते. पूर्वा फोन उचलत नव्हती आणि आजींचा लागत नव्हता.. काय करावे सुचत नव्हते.. तोच बेल वाजली. सुचेता दरवाजाकडे धावली.. पूर्वा होती..
" काय ग? फोन का उचलत नव्हतीस?"
" आई.. चिल.. आम्ही सगळे गप्पा मारत होतो. आणि घरीच यायचे मग कशाला फोन करायचा?"
" आपण या विषयावर नंतर बोलू.. आजी कुठे आहे?"
" मला काय माहित? मी घरी असताना तर होती इथेच.."
" मला ना कळतच नाही.. कोणाला काय बोलायचे? हि लहान म्हणून ऐकणार नाही.. त्या मोठ्या म्हणून काही बोलायचे नाही.. फक्त टेन्शन घ्यायचे." बोलता बोलता सुचेता रडायला लागली.. ते बघून पूर्वा थोडी घाबरली.
" आई सॉरी. काळजी नको करूस. येईल आजी घरी." खूप दिवसांनी मग पूर्वाने आईसाठी गरम कॉफी केली आणि पूर्ण कपडे घालून आली. तेवढ्यात आजी आल्याच..
" आई.. काय हे? किती तो उशीर. आणि तुझा फोन का बंद होता?" श्रीधरने विचारले..
" अरे हो.. म्हातारीला श्वास तर घेऊ दे. सुचेता जरा पाणी दे ग.. अग बाई हि पूर्वा आहे का? ओळखलंच नाही हिला पूर्ण कपड्यात.."
" आजी पुरे झाले.. घे पाणी पी.. आणि कुठे गेली होतीस ते सांग.."
" बसा.. गंमत दाखवते.." म्हणत आजीने पर्समधून एक मोबाईल बाहेर काढला.. ते लेटेस्ट मॉडेल बघून तिघांचे डोळे बाहेर आले.. आजीने टिव्ही लावला.. समोर पूर्वा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बोलत होती..
"आपणना एकदा तरी ती पार्टी करूयातच. मी खूप एक्सायटेड आहे." पूर्वाची मैत्रीण सांगत होती.
" मी करतो अरेंज या शनिवारी. तुम्ही येणार का?" एका मुलाने विचारले.
हो नाही करता करता बाकी सगळ्यांनी पण होकार दिला.. त्या मुली तिथून गेल्यावरही मुले थांबली होती..
" काय म्हणतोस पार्टी अरेंज करायची. पैसे कुठून आणणार?"
" अरे या पोरी आहेत ना. थोडेसे औषध देऊ त्यांना. मस्त व्हिडिओ काढू. भरपूर पैसा मिळेल. फ्रेश चेहरे आहेत ना.."
हे व्हिडिओ बघून पूर्वाने मान खाली घातली. सुचेताने परत रडायला सुरुवात केली. आणि श्रीधर रागाने पूर्वाला मारायला हात उगारला. आजींनी तो हात धरला.
" आई, तू बाजूला हो. हिला आम्ही एवढी मोकळीक दिली ना तिथेच चुकले आमचे.."
"शांत हो.. चूक जशी तिची आहे तशीच तुमचीही आहे. ती नादान आहे. भोळी म्हणणार नाही. पण तिला जगाचा अनुभव नाही. अशावेळेस तिला पैसे द्यायचे कि प्रेम आणि वेळ?"
" आणि पूर्वा तू हि.. मान्य आहे तू नव्या पिढीची आहेस. पण याचा अर्थ जुने जाऊ द्या मरणालागुनी असा होत नाही.. जग कितीही पुढारले तरी काही चौकटीत रहावेच लागते. विचार कर उद्या त्या मुलांनी तुझे, तुझ्या मैत्रिणींचे काही व्हिडिओज बनवले असते, वायरल केले असते, तर काय केले असतेस? आवडले असते तुला? "
पूर्वाच्या डोळ्यात पाणी आले..
" पण ते माझे मित्र होते."
" जे ड्रगच्या जाळ्यात अडकले आहेत."
" तुला काय माहित?"
" काल ते फोटो पाहिले. माझे काही सोर्स वापरले आणि त्यांची माहिती काढली. मगच मी तुझ्या आज पाठी आले. आता हे जे व्हिडिओ आहेत त्यामुळे ते जेलमध्ये आहेत.."
" माझी चूक झाली आईबाबा आणि आजी.."
" चूक सुधारता येते.. पण याच्यापुढे होऊ नको देऊस.."


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आजीचे सोर्स नक्की होते तरी काय? तर हे आपल्या मध्येच राहू दे.. आजी हि गुप्तहेर होती.. व्यवसायातून ऑफिशियल निवृत्त झाल्यानंतर पूर्वाचा जन्म झाल्यामुळे हे पूर्वाला माहित नव्हते.. आणि आईबाबा पण विसरले होते.. पण आजीचे काम अजून थांबले नव्हते. त्यामुळे आजीला माहिती लगेच मिळाली.. पण अशी आजी आपल्याकडे असेल नसेल.. त्यामुळे काही चौकटी आखून त्यात राहणेच योग्य नाही का?

कथा कशी वाटली, नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई