Login

ललाटलेख भाग १४ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग १४


रविवारी आई, बाबा, निशा आणि ईशा चौघे जण नचिकेतच्या घरी गेले. त्यांच्या घरातले वातावरण अगदी छान आनंदी होते. त्याचे बाबा पेशाने वकील होते. आईपण खूप शिकलेली म्हणजे डबल ग्रॅज्युएट होती. थोडी माॅडर्न पण होती. श्रीमंती दिसत होती पण त्याचा बढेजाव नव्हता. त्यांनी निशाच्या घरच्यांचा अगदी छान स्वागत केले. चहा पाणी झाल्यावर निशाच्या बाबांनी सरळ विषयाला हात घातला. म्हणाले, “ही दोघ मुले एकमेकांना पसंत आहेत. त्यांना लग्नही करायचे आहे. निशाला नचिकेत पसंत आहे म्हंटल्यावर आमची काही हरकत नाही. तुमचा काय विचार आहे?”
“अहो आमचे काय? मिया बिबी राजी मग आमचे काय. आमची अजिबात हरकत नाही. तसही आम्ही म्हणजे मी निशाला पाहिली नव्हती इतकेच, पण रोज नचिकेत घरी आला की फक्त निशा आणि निशा एवढेच बोलतो. दुसरे विषय सापडतच नाहीत त्याला. पण खरचं निशा खूप आवडली मला.” नचिकेतचे पपा म्हणाले. ममी त्यावर पटकन रागावून म्हणाल्या, “तरीच बापलेकाचे इतके गुलुगुलू चालू असते रोज. माझ्यापासून लपवून. (सगळेच हसतात) निशा अगदी नक्षत्रासारखी आहे. आम्हांला पसंत आहे.” ममी.
“मग लग्न साखरपुडा कधी कसे करायचे? देण घेण्याचे काय करायचे?” निशाच्या बाबांनी विचारले.
“मी बोलू का थोडे?” नचिकेत पटकन म्हणाला. त्याचे म्हणणे उचलून धरत पपा पटकन म्हणाले, “लग्न तुम्हाला करायचे तर तुमचेही मत हवेच.” पपा आणि नचिकेत दोघांना ममी चार स्वभाव चांगला ठाऊक होता.
“ मला वाटते की साधे रजिस्टर लग्न करावे. उगीचच लोकांना गोळा करून अफाट खर्च करण्यापेक्षा ते पैसे पुढे उपयोगी पडतील.” नचिकेत म्हणाला.
“तुझे म्हणणे बरोबर आहे नची, पण महत्त्वाचे चार विधी तरी करुयात. आणि फार नाही पण आपल्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून थोडक्यात लग्न करू.” पपांनी नचीच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
“हो लग्न थोडक्यात करु. पण लग्न एकदाच होते, आणि मुलींना त्यांची हौसमौज पुरवायची ही एकच संधी असते. निशाची ही काही स्वप्न असतीलच ना! काय ग निशा?” ममी म्हणाल्या.
“ नाही. मला नचिकेतचे म्हणणे पटते आहे. रजिस्टर करणे जास्त योग्य होईल. पण तुम्ही आणि आई बाबा ठरवाल ते योग्य असेल.” निशा म्हणाली.
“ बरं, तुम्ही किती तोळे सोने घालणार आहात?” ममी ने थेट निशाच्या आईला विचारले.
“ आम्ही तीन ते चार तोळे देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त नाही.” निशाची आई असे म्हणाल्यावर ममीचा चेहरा पडला, ते बघून नचिकेत पटकन म्हणाला.
“नाही. तुम्ही कुणी निशाला सोने द्यायचे नाही. ती माझी बायको होणार आहे. आता मला फार जमणार नाही, पण जेव्हा जमेल तेव्हा मी तिला तिच्या आवडीचे दागिने करीन.”
“ओ नचिकेतराव, ती तुमची बायको असली तरी आमची सून होणार आहे. हे बघा निशाचे आई बाबा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे द्या. आमची काहीही मागणी नाही. आम्ही तिला मंगळसूत्र आणि आम्हाला जमेल ते देऊ.” नचिकेतचे पपा म्हणाले.
“आणि साखरपुडा?” निशाच्या बाबांनी विचारले.
“साखरपुडा नकोच. दोन तीन महिन्यात चांगला मुहूर्त बघून लग्नच करून टाकू.” नचिकेतच्या पपांनी सरळ निर्णय देऊन टाकला. त्यामुळे ममीना काही बोलता आले नाही. तसही हे बाबांना पटले होते म्हणून तेही गप्प बसले. “आठदहा दिवसांत लग्नाची तारीख ठरवू असे ठरले. नंतर पपांनी नचिकेत आणि निशाला बाहेर फिरायला पाठवले. मानपान ही पपांनी काही करायचे नाहीत म्हणून जाहीर करून टाकले. तरी ममी म्हणाल्याच, “नचीला बहीण नाहीये, एकच भाऊ आणि आम्ही दोघे आमचे तेवढे करा.” यावर पपा लगेच म्हणाले, “आमच्या पसंतीचे आम्ही घेऊ, तुम्ही पुढे करा.” सगळे ठरल्यावर बाबांनी ममीपपाचे हात जोडून आभार मानले. आणि म्हणाले, “माझ्या लेकीला सांमाळा.” हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते ते बघून ईशा आणि आई दोघींनी त्यांना “चला, निघाला आता म्हणून सावरले. आणि सगळे घरी निघाले.

स्टेशन वरून घरी जाताना चालता चालता बाबांनी आईला विचारले “ तू म्हणालीस, पण तीन चार तोळे सोने आणि लग्न करून देणे जमेल का?”
“मी भिशी भरत होते ना, दर महिन्याला, त्याचे मी सोनेच घेऊन ठेवत होते निशा ईशासाठी. सात आठ तोळे आहे. आणि ईशाच्या लग्ना पर्यंत तिच्यासाठी आणखीन जमवू. तुम्ही नका काळजी करू.” निशाची आई म्हणाली.
“अरे हे कधी केलेस, आणि मला बोलली नाहीस कधी?” बाबा डोळे विस्तारून आईकडे बघत म्हणाले. “ग्रेट म्हणजे एक तरी चिंता नाही. आता लग्नाच्या खर्चाचे तेवढे पाहू. होईल काहीतरी.” बाबा अगदी खुशीत म्हणाले.
घरी पोचले तेव्हा नऊ वाजायला आले होते. जेवायची तयारी झाली तरी निशा आली नव्हती. तिला येईपर्यंत पावणे दहा झाले. नचिकेत सोडायला आला होता. त्याच्या समोरच बाबा निशाला म्हणाले, “किती उशीर झाला? लग्न ठरले म्हणून नियमात सूट नाही. नचिकेत बरोबर गेलीस तरी नऊ पेक्षा जास्त उशीर करायचा नाही.”
“साॅरी बाबा, निशा माझ्या सारखी मागे लागली होती घरी जाऊ म्हणून. पण मला काही गोष्टी तिच्याशी क्लिअर बोलायच्या होत्या.” निशाच्या आधी नचिकेतने बाबांची माफी मागितली.
“ओके. तू पण आता लवकर घरी जा. आईबाबा वाट पहात असतील. फार उशीर पर्यंत बाहेर राहू नाही.” बाबांनी नचिकेतच्या पाठीवर हात ठेवून त्याला समजावले.

नचिकेत गेल्यावर जेवण झाल्यावर बाबांच्या मनात आले, “एवढे काय महत्त्वाचे बोलायचे होते.” पण त्यांनी निशाला काही विचारले नाही. तिला वाटत असेल तर ती स्वतःहून सांगेल. निशा दमल्यामुळे पटकन झोपली, पण रात्री उशिरा जेवण झाल्यामुळे बाबांना छातीत जळजळ होत होती. त्यामुळे त्यांना मात्र झोप लागत नव्हती.

क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all