Dec 06, 2021
मनोरंजन

नियती भाग. 2

Read Later
नियती भाग. 2

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नियती
भाग 1 वरून पुढे ..

साइट वरून वापस येतांना मी प्रकाशला म्हणालो की अरे त्यांचं काम झाल्यावर तुझा प्लॉट तुला वापस मिळेल मग काळजी कशाला करतोयस. माझ्या मते तू आता एखादी जास्त पगाराची नोकरी मिळतेय का ते बघ. म्हणजे सर्व
कटकटी संपतील.

हो रे बाबा आता उद्या पासूनच सुरवात करतो. अर्धा पाऊण पगार तर कर्जाचे हप्ते भरण्यातच जातोय. अजून अंगावर जबाबदारी नाहीये म्हणून बरय.

प्रकाशची फरफट तशीच चालू होती. तो नवी नोकरी शोधतच होता पण मिळत नव्हती. तशातच त्याची मुंबईला बदली झाली. दुष्काळात तेरावा महिना. आर्थिक परिस्थिति अजून खड्ड्यात. वैतागून असाच एकदा तो म्हणाला की जागा असती तर ती विकून कर्ज तरी फेडलं असतं. पण ती सुद्धा हातातून गेली. चांगली नोकरी पण गावसत नाहीये, मी फार निराश झालो आहे. मी त्यावेळी त्याला काही बाही बोलून धीर दिला पण मलाही चांगलं माहीत होतं की यात काही अर्थ नाहीये. हे वाढीव पगाराची नोकरी मिळे पर्यन्त असच चालणार.

जवळ जवळ वर्ष उलटलं. आमचं अधून मधून बोलणं व्हायचं पण तेवढच. बायको म्हणाली सुद्धा की बऱ्याच दिवसांत प्रकाश भाऊजी आले नाहीत. त्यांच्या उत्खननाच काम कुठवर आलंय हो ? अस करा परवा रविवारी त्यांना जेवायलाच बोलवा न. मी बर म्हंटलं आणि फोन उचलणार तोच रिंग वाजली. प्रकाशच लाइन वर होता.

आत्ता तुलाच फोन करणार होतो. ही म्हणत होती की तुला रविवारी जेवायला बोलवा म्हणून.
येणारच आहे. तेच तर सांगायला फोन केला. पण माझ्याबरोबर अजून एक मित्र येणार आहे. चालेल ना ?
नो प्रॉब्लेम वेल्कम.

ओके. मग परवा सकाळी येतो.

बायकोला सांगितलं, ती म्हणाली येऊद्या एका माणसाचं काय एवढ.

रविवारी प्रकाश आला, उत्साहाने भारलेला, बरोबर एक तरतरीत हसऱ्या
चेहऱ्याची मुलगी.
नीता हा माझा फास्ट फ्रेंड आणि ह्या वाहिनी. आणि वाहिनी ही नीता.

थोडंसं बोलणं झाल्यावर ही आणि नीता किचन मध्ये गेल्या. मी अधीर, प्रकाशला विचारलं की काय प्रकार आहे ? कोण आहे ही मुलगी ?

मग प्रकाश सुरू झाला त्याचा चेहरा असा काही चमकत होता की बस.

अरे त्या दिवशी मी ऑफिस मधून निघालो. कंटाळून गेलो होतो परिस्थितीला म्हणून घरी जायच्या ऐवजी मरीन ड्राइव वर जाऊन खारे दाणे घेऊन पाळीवर बसलो होतो. एक मुलगी सुसाट धावत येत होती तिच्या मागे कुत्रा लागला होता. ती माझ्या समोर यायला आणि कुत्र्याने झेप टाकायला एकाच गांठ पडली.

अरे बापरे मग ?

ती माझ्यावर कोसळली आणि मी कठडयावरून समुद्रात जे दगड टाकले आहेत त्यावर. बेशुद्ध. डोक्याला मार लागला होता. लोकांनी मला वर काढलं, पाणी मारलं. विशेष काही झालं नव्हतं. लोक पण मग पांगले. पण दोन मुली तिथेच उभ्या होत्या. त्यापैकी एकीच्या शेजारी माणूस होता कुत्र्याचा पट्टा हातात धरून. थोडा वेळ माझी चौकशी केली आणि म्हणाला हे माझं कार्ड. हे ठेवा. जो काही खर्च येईल तो मी देईन मला फोन करा. ते लोक निघून गेले. दुसरी मुलगी होती ती मात्र घाबरली होती. सारखी सारखी सॉरी म्हणत होती. तिने टॅक्सी थांबवली आणि म्हणाली की चला मी तुम्हाला घरी सोडते. मी म्हंटलं की मी लोकल ने जाईन, मला काही झालेलं नाहीये, आणि मी मालाड ला राहतो टॅक्सीला खूप खर्च येईल. आणि माझ्याकडे टॅक्सीवर एवढा खर्च करण्यासाठी पैसे पण नाहीत. पण तिने ऐकलं नाही. आणि हट्टानी मला सोडायला आली. मी तिला म्हंटलं की इतक्या दूर वाकडी वाट करून तुम्ही आलात आता तुम्हाला उलट जायला लागेल उशीर होईल. तर म्हणाली की ती बोरीवलीला राहते. १५ मिनिट लागतील जायला. तीच ही नीता.

हे सगळं कधी घडलं ?

दोन महिन्यांपूर्वी.

आणि तू मला आत्ता सांगतो आहेस ?

अरे या दोन महिन्यात बरंच काही घडलंय. मला सांगायला वेळच झाला नाही.

अस ! आणखी काय काय झालं ?

अरे ज्या माणसांनी मला कार्ड दिलं होतं त्याला मी भेटायला गेलो होतो. just courtesy म्हणून. अरे त्यांची स्वत:ची मोठी ट्रेडिंग कंपनी आहे. त्याला मी सांगितलं की मला काहीही झालेलं नाहीये म्हणून मला काही नको. तो चाटच पडला. म्हणाला साधारणपणे लोक पैसा मिळत असतांना नाही म्हणत नाही. तुम्ही वेगळे आहात. मग थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. म्हणाला की आम्हाला अशाच प्रामाणिक माणसाची आमच्या accounts dept. मध्ये गरज आहे. तुम्ही येता का ? अरे आहेस कुठे भरपूर पगाराची नोकरी मिळाली आहे. आता माझे सर्व प्रश्न सुटतील. मी गेल्या महिन्यायाभर इतका काम केलं की साहेब एकदम खुश झाला. म्हणाला की माझी निवड चुकली नाही.

अरे वा हे तर फारच छान. पण तू मला काही बोलला नाहीस हे मात्र मी माफ करणार नाही.
अरे अजून एक गोष्ट आहे.

अजून बाकी आहे ? सांग सांग वेळ घालवू नकोस. माझी उत्सुकता ताणू नकोस.

तीन चार महिन्यांपूर्वी असाच मरीन ड्राइव वर बसलो होतो. शेजारी एक संन्यासी येऊन बसला. तो माझ्याकडेच बघत होता अगदी टक लाऊन. normally अश्या वेळी आपण काय करतो ? तर उठून दुसरी कडे जाऊन बसतो. मी तेच करायला उठलो. पण त्यांनी मला थांबवलं. म्हणाला की

अजून फक्त चार महीने.

चार महीने काय ? मी मरणार आहे ? बर होईल.

नाही नाही सर्व संकटातून मुक्तता, ऋण मुक्ती होईल. आनंदाचे दिवस येतील. चार महीने कळ काढ.

सगळेच अस म्हणतात, धीर देतात, तुम्ही काय वेगळं सांगितलं. तुमच्या सारखे सगळेच संन्यासी अस बोलतात.

हे मी नाही, तुझ्या मास्तकावरच्या रेषा बोलतात. येत्या चार महिन्यात तुझ्या संपर्कात एक मुलगी अचानक येईल. तीच तुझी जीवन संगिनी बनेल. तीच तुझी भाग्यलक्ष्मी आहे. वाईट दिवस संपलेत आता. जा तुझ् कल्याण होईल. आणि तो उठून चालला गेला.

आता मला सांग नीता माझ्या आयुष्यात अचानकच आली. आता फक्त लग्नाची औपचारिकता राहिली आहे. ती आल्यावरच किंवा तिच्यामुळेच मला नवी नोकरी मिळाली. भविष्य, ज्योतिष वर माझा विश्वास नाही पण तो
संन्यासी जे बोलला ते खरं होतंय. माझी तर मतीच गुंग झाली आहे.

नंतर दिवसभर अशाच गप्पा चालल्या होत्या. बायकोची आणि निताची तर गट्टीच जमली होती. बालपणीच्या मैत्रिणी असल्यासारख्या त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मला फार बर वाटलं. एकूण माझा मित्र निराशेच्या गऱ्तेतून बाहेर पडला याचाच मला खूप आनंद झाला होता.

निताच्या घरच्यांना प्रकाश पसंत होता. दोन महिन्यात त्यांचं लग्न झालं. प्रकाश कडून आम्हीच बसलो होतो. लग्न छान पार पडलं. महाबळेश्वरला पण ते जाऊन आले. नेहमीचं रुटीन सुरू झालं.

महिन्यायाभरानी प्रकाश चा फोन आला की ते रविवारी येताएत म्हणून. मला समजेना की काय झालं असाव ? काही प्रॉब्लेम तर नसेल ?

काय रे काय झालं. काही प्रॉब्लेम आहे का ? नाही म्हणजे तू ये पुण्याला, पण काही प्रॉब्लेम आहे का ?

अरे नाही, पण यावसं वाटतंय. तुझ्याशीवाय मला कोण आहे ? एक बातमी द्यायची आहे म्हणून.

इतक्यात ? जेमतेम एक महिना झालाय लग्नाला.

नाही नाही तू समजतो तसं काही नाहीये. वेगळंच आहे. आल्यावरच सांगतो.

रविवारी ते दोघेही आले. खूप आनंदात दिसत होते, बायको म्हणालीच की आनंदात दिसताहेत म्हणजे सगळं ठीकच आहे. आल्या आल्याच प्रकाशनी बोलायलाच सुरवात केली.

अरे एक चूक झाली. त्या संन्यासाचं नाव गांव पत्ता विचारायला हवा होता.

का ? आता संन्यासी कुठे मध्येच आला ? मी म्हणालो.

अरे त्यांनी जे काही सांगितलं त सर्व खरं होत आहे म्हणून. पण आता काय करणार मी त्यावेळी काही विचारलच नाही. anyway आमच्या प्लॉट मध्ये जे उत्खनन झालं ते आमच्या कडे ज्या पोथ्या होत्या त्या अनुसार झालं.

हे माहीत आहे. त्या संशोधकांनीच सांगितलं होतं. नवीन काय आहे त्यात ?

नवीन हे आहे की पोथीत लिहिल्या प्रमाणे अनेक पुरातन आणि मौल्यवान वस्तु सापडल्या. आणि आमच्या पूर्वजांनी राज्यावर परचक्र आलं म्हणून राज्याचा खजिना गुप्त पणे लपवून ठेवला होता. आणि ते पोथीत सांकेतिक भाषेत लिहिलं होत. ती भाषा उलगडून त्या प्रमाणे उत्खनन झाल. आणि तो खजिना सापडला.

अस आहे होय. आता संदर्भ लागला की एवढी security का होती ते. पण मग आता तुझा प्लॉट तुला मिळणार की नाही ?

अरे प्लॉटचं काय घेऊन बसला आहेस. परवाच सरकारचं पत्र आलं आहे की मला 50 कोटींच reward देणार आहेत म्हणून. आणि प्लॉट पण मिळणार आहे. आणि म्हणून धावत धावत तुला भेटायला आलो. आणि आम्ही ठरवलं आहे की अर्धी रक्कम तुला द्यायची. आणि ती तुला घ्यावीच लागणार आहे. आणि ही निताचीच कल्पना आहे. आता संगळ्यांचाच सुखाचा काळ आला आहे.


समाप्त

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired