देर आये दुरुस्त आये-2

देर आये
दिराच्या या ठामपणासमोर नेहाचं काही एक चाललं नाही. तिला आता गपगुमान लग्न लावून देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

नेहाच्या सासूबाईंना सुद्धा नेहा ची बहीण या घरात हवी होती, त्यांच्या मते बहिणी बहिणी घरात असल्या की घर बांधलेलं राहील, दोन्ही भावात अंतर पडणार नाही. पण दिरापुढे कुणाचं काही चाललं नाही. संसार शेवटी त्याला करायचा आहे असं म्हणत सासूबाईंनी होकार दिला.

प्रतीक्षा लग्न करून घरी आली. गावाकडे तिला कामाची सवय, त्यामुळे सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करणं आणि लवकर स्वयंपाकाला लागणं हा तिचा दिनक्रम. सोबतच तिला लोकरीचे कपडे विणण्याची भारी आवड. लग्न करून आली तेव्हा तिने ते सगळं साहित्य आधीच जवळ ठेवलेलं.

तिने सर्वांसाठी पोहे केले आणि ते झाकून ती हॉल मध्ये बसली. सकाळचे 7 वाजले होते. सर्वजण एकेक करून उठले. सासूबाई आल्या आणि त्यांनी अंगण पाहिलं. स्वच्छ अंगण, त्यावर सडा मारलेला. त्याचा सुगंध प्रसन्न करत होता आणि त्यावरची कमळाची सुबक रांगोळी. आत आल्यावर पोह्यांचा घमघमाट. घराकडे नजर फिरवताच सगळं घर झाडून स्वच्छ दिसलं, पसारा दिसला नाही. सासूबाई मनोमन सुखावल्या. मुलाची निवड चुकली नाही याची त्यांना हळूहळू खात्री होत होती.


साडेसात वाजता नेहा तिच्या खोलीतून बाहेर आली, बाहेर येताच प्रतीक्षाने तिच्या पुढ्यात चहा चा कप ठेवला. नेहाला आश्चर्य वाटलं. ही इतक्या लवकर कशी उठली?

चहा घेत तिने प्रतीक्षाला फर्मान सोडलं,

"चल आता पटकन मी अंगण झाडून घेते, रांगोळी टाकते. तू पोहे बनवण्याची तयारी कर"

हे ऐकताच सासूबाई हसू लागल्या,

"काय झालं आई?"

"अगं सगळं काम झालंय.."

नेहा ने चहाचा कप बाजूला ठेवला आणि अंगण पाहिलं,

किचनमध्ये पाहिलं..

सगळं तयार होतं...

तिला धक्काच बसला. आजवर इतक्या लवकर आवरायला तिला कधी जमलंच नव्हतं. ते काम प्रतीक्षाने तासाभरात केलेलं पाहून तिचा जळफळाट झाला. उसनं हसू आणत तिने नाईलाजाने कौतुक केलं.

हळूहळू नेहाला समजू लागलं की प्रतीक्षा सर्व कामात तिच्या वरचढ आहे. आजवर तिला गर्व होता की घरातलं सगळं बघून ती नोकरीवर जाई. पण प्रतीक्षा सर्व कामात हुशार होती. नेहाच्या मुलीचा अभ्यासही ती घ्यायची. इंग्रजी, गणित यासारख्या विषयात ती निपुण होती.

एकदा नेहाची बहीण घरी आली. तिने प्रतीक्षाला खालून वर निरखून पाहिलं.तिच्या नजरेत तुसडेपणा स्पष्ट दिसत होता. प्रतीक्षालाही ते लक्षात आलं. पण तिने दुर्लक्ष करत तिचा योग्य पाहुणचार केला.
****

🎭 Series Post

View all