देर आये दुरुस्त आये-4

देर आये
प्रतीक्षा शेवटी नवऱ्याने दिलेली साडी नेसून वाढदिवसाला गेली. नेहा तिच्याजवळ थांबत नसे, तिला लाज वाटत असायची. आपल्या बहिणीसोबतच ती असायची.

वाढदिवसाला सर्व बायका वन पीस अन मॉडर्न कपड्यात होते, पण सर्वात जास्त उठून फक्त प्रतीक्षा दिसत होती. भडक लाल रंगाची साडी आणि त्याला डायमंडचे काठ..एक दोन बायकांनी तर जवळ येऊन साडी कुठून घेतली? म्हणून चौकशी सुद्धा केली..

प्रतीक्षाचा नवरा म्हणाला,

"पाहिलं... ड्रेस वर काही नसतं.. तो घालणारा जर सुंदर असेल तर त्याला काहीही सुंदरच दिसतं.."

नेहाचा जळफळाट होत होता. सर्वजण प्रतीक्षाजवळ जाऊन बोलायचे, प्रतीक्षा सुद्धा माणसं जोडायची सवय असल्याने प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करायची.

सहा महिने झाले, नेहाला वाटायचं आपलं वेगळं कुटुंब असावं. एवढ्या मोठ्या कुटुंबात नाही म्हटलं तरी बऱ्याच गोष्टींवर मर्यादा येतात, सगळीकडे प्रतीक्षाला धरून काहो करावं लागतं.

तिने नवऱ्याला सांगून त्याला दुसरीकडे नोकरी शोधायला लावली. नवऱ्याने नाही ऐकलं, त्याला एकत्र कुटुंबातच राहायचं होतं.
तिची एक मैत्रीण HR मध्ये होती, तिच्या मदतीने नवऱ्याला एका दूरवरच्या शहरात नोकरी मिळेल अशी व्यवस्था केली.
बरीच नाटकं करून नवऱ्याला शेवटी राजी केलं आणि दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचं त्यांचं ठरलं. ते शहरही तिने असं निवडलं की प्रवासाला खूप वेळ जाईल आणि सतत घरी येणं जाणं होणार नाही. सासूबाई म्हणाल्या, "मला तिथलं हवामान मानवेल की नाही?"

नेहाला धस्स झालं, म्हणजे सासूबाई आपल्यासोबत येणार? नको नको, त्या आल्या म्हणजे त्यांचं सगळं बघावं लागणार. आम्हाला प्रायव्हसी मिळणार नाही. ती म्हणाली,

"अहो आई आता या वयात कशाला तुम्हाला त्रास? इथे तुमचा दवाखाना आहे, सगळं जवळ आहे...आम्ही जिथे जातोय तिथे प्रदूषण, ट्राफिक, गर्दी..तुम्हाला नको नको होईल.मला तर फार वाटतं तुम्ही आमच्यासोबत असावं...जाऊद्या आपण बघून घेऊ पुढचं पुढे, तुम्ही आवरायला घ्या, जाऊयात आपण.."

प्रतीक्षा पुढे येऊन म्हणाली,

"आई तुम्ही इथेच रहा, ताई बरोबर बोलताय...दुसऱ्या शहरात हवामान मानवेल की नाही माहीत नाही, आणि हे दोघे नोकरीवर जाणार, तुम्ही दिवसभर घरात काय करणार? त्यापेक्षा इथे मी आहे, आपलं शेजार आहे, नातेवाईक जवळ आहेत.."

दोघेही दुसऱ्या शहरात गेले, प्रतीक्षा आणि तिच्या दिराने मनापासून आईचा सांभाळ केला. नेहाने सुस्कारा टाकला

दहा वर्षे गेली. या ना त्या कारणाने नेहा आपल्या मूळ घरी यायचं टाळायची. नव्या शहरात तिने तिचा संसार थाटला. दिवसभर नोकरी आणि वीकेंडला पार्टी. कसलंही बंधन नाही की कसली आडकाठी नाही. सासूबाईंचा फोन आला की "आम्ही फार धावपळीत जगतोय, पैशाची चणचण असते, घरची फार आठवण येते" असं गोडगोड बोलायची. सासूबाईंनाही मोठी सून म्हणून तिच्याबद्दल जिव्हाळा होता, तिचं म्हणणं त्यांना खरं वाटायचं. सासूबाई सुद्धा घराबद्दल सांगायच्या, की घराचं बांधकाम काढलंय, प्रतीक्षा ने काहीतरी काम सुरू केलं वगैरे. पण नेहाला त्यात इंटरेस्ट नसे. त्याच मनाची समजूत घालायच्या की जाऊद्या, मुलं कष्ट करताय, त्यांना वेळ नाही. घरासाठी पैसेही त्या कधी मागायचा नाहीत.

दहा वर्षांनी मात्र सासूबाईंनी हट्ट धरला. त्यांची तब्येतही वरखाली होत असायची. त्यांनी भेटून जावं असा हट्ट धरला. शेवटी नेहा आणि तिच्या नवऱ्यानेचार दिवस घरी यायचं ठरवलं.

त्यांचं आगमन झालं तसं सासूबाईंना काय करू अन काय नको असं झालं. नेहाला त्या नुसत्या पळवायच्या. हे आण ते आण. हे बनव ते बनव. प्रतीक्षा आनंदाने करत होती. पण नेहाला घराचं बदललेलं स्वरूप बघून धक्काच बसला. घर अगदी महालासारखं बांधलं होतं. तिच्या दिराने नवीन व्यवसाय सुरू केला होता आणि त्याचा लाखोंत करोडोत टर्नओव्हर होता. प्रतीक्षा ने तिचे लोकरीचे कपडे ऑनलाइन विकायला सुरवात केलेली, त्यात इतकी बरकत आलेली की तिने त्या कपड्यांचं ब्रँड सुरू केलं, स्वतःचं ऑफिस टाकलं.
******

🎭 Series Post

View all