देर आये दुरुस्त आये-3

देर आये
नेहाला तर प्रचंड राग येत होता, प्रतीक्षा मध्ये आली म्हणून, नाहीतर आज माझी धाकली जाऊ म्हणून माझ्या बहिणीला मी मिरवलं असतं.

बहीण निघून गेली. नेहा आणि प्रतीक्षा स्वयंपाकघरात काम करू लागल्या. प्रतीक्षाने बहिणीबद्दल विचारलं,

"त्या ताई काय करतात सध्या?"

"ती इंटेरिअर डिझाइनची कामं बघते.."

नेहाला राहवलं नाही, तिने सगळा राग सौम्य भाषेत बोलून टाकला..

"तुला राग नको येऊ देऊ, पण तुझ्या नवऱ्यासाठी हिलाच करायची होती. तुझ्या नवऱ्यालाही माझी बहिण खूप आवडायची. पण ..."

"पण??" प्रतीक्षाने आवंढा गिळत विचारलं..

"पण माझ्या बहिणीने नकार दिला...तुझ्या नवऱ्याने खूप स्वप्न पाहिली होती, दोघे सोबत फिरायलाही जायचे...पण तिच्या मनात नव्हतं म्हणून नाही झालं लग्न.."

नेहाने धडधडीत खोटं सांगितलं, प्रतीक्षाच्या मनात खळबळ माजली. तिला यातलं काहीही माहीत नव्हतं.

तिला एवढंच माहीत होतं की आपला नवरा आपल्यावर खूप प्रेम करतो.

नेहाच्या या चुगलीमुळे प्रतीक्षा आणि तिच्या नवऱ्यामध्ये खटके उडू लागले. नवरा तिला समजवायचा,

"अगं आम्ही कधी फिरायलाही गेलो नव्हतो, लग्न तर दूरच..."

"मग नेहा ताई खोटं बोलतील का?"

"नेहा वहिनी आम्हाला काही काम असेल ते सोबत बाहेर पाठवायच्या, ते फिरणं नव्हे...आणि तिने लग्नाला नकार दिला की नाही हे मला माहित नाही, कारण मी तिला लग्नाबद्दल कधी विचारलंच नाही.."

दोन्ही नवरा बायकोत धुसफूस चालू होती, पण प्रतीक्षाने आधीच बजावलं होतं, आपल्या दोघात कितीही वाद झाले तरी ते चार भिंतीच्या आतच हवे. बाहेर घरात कुणाला समजू द्यायचे नाही. सर्वांसमोर नॉर्मल वागायचं कायम.

नेहा वाट बघत होती दोघांचं भांडण केव्हा होईल याची. पण दोघेही अगदी नॉर्मल दिसायचे, त्यामुळे तिला अजूनच राग येऊ लागला.

एकदा नेहाच्या माहेरहून फोन आला, त्यांच्या एका नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस होता. सर्वांना आमंत्रण होतं.
सासूबाई म्हणाल्या, "पोरींनो काय साड्या बिड्या घालायच्या आत्ताच ठरवून ठेवा, ऐनवेळी धावपळ करू नका.."

नेहा लगेच म्हणाली,

"अहो आई साड्या काय? मोठे बिझनेसमन आहेत ती लोकं... मॉडर्न लोकं आहेत. सर्वजण वन पीस घालून येतील.."

"हो का? प्रतीक्षा तुझ्याकडे आहे का तसला ड्रेस?"

प्रतीक्षा काही म्हणायच्या आत नेहा म्हणाली,

"तिच्याकडे कसला असेल ड्रेस, गावाकडे थोडी ना असं चालतं, आणि तिला नसेल सवय. ड्रेसची पण नाही आणि मोठया बंगल्यात, मोठया घरात वावरायची पण नाही...बघ बाई, तुला जमलं तर ये.."

प्रतीक्षाला प्रचंड वाईट वाटलं. तिला सतत ती गावाकडची आहे, गावंढळ आहे अशी जणीव करून देण्यात येई. तिने शेवटी न जाण्याचा निर्णय घेतला. पम तिच्या नवऱ्याने ऐकलं नाही.

"मला माझ्या बायकोची लाज वाटत नाही, तुला एक छान साडी घेऊन देतो ती तू नेस, तुला वन पीसवर अवघडत असेल तर.."
****

🎭 Series Post

View all