देर आये दुरुस्त आये-1

देर आये...
"तुझ्या मोठ्या जाउबाईला तुझी ती नवीन साडी देऊन टाक गं.."

सासूबाईंनी आदेश दिला तशी लहान जाऊ पटकन साडी घ्यायला आत धावली.

नेहा आणि प्रतीक्षा. दोन्ही जावा जावा. नेहा मोठी तर प्रतीक्षा धाकली जाऊ. तब्बल 10 वर्षानंतर थोरल्या जाउबाई घरी आल्या होत्या. सासूबाईंना काय करू अन काय नको असं झालेलं. प्रतीक्षाला त्या नुसती धावाधाव करायला सांगत होत्या.

नेहा, थोरली जाऊ. तिने घराकडे एकवार पाहिलं आणि ती गारच पडली. गेले कित्येक वर्षे जे राजकारण करून तिने स्वतःच्या कुटुंबापासून दूर ठेवलं, त्याच कुटुंबाची बरकत बघून ती आतल्या आत खूप जळत होती.

10 वर्षांपूर्वीचा काळ. प्रतीक्षा लग्न करून सासरी आली. लहाण्या दिराचं लग्न म्हणून नेहा आनंदात होती. तिला तिचीच बहीण आपल्या दिरासाठी हवी होती. बहिणीलाही दिर मनोमन आवडत होता. दोघेही बोलायचे. नेहा आणि तिची बहीण स्वप्न बघू लागली होती.

पण दिराच्या मनात मैत्रीशिवाय दुसरी कोणतीही भावना नव्हती. नेहाला जेव्हा हे कळलं तेव्हा तिचं स्वप्नभंग झालं. तिला तिची बहीण तिच्या घरात हवी होती. पण झालं सगळं उलटंच.

तिच्या आनंदावर विरजण पडलं. दिराने गावाकडची एक मुलगी पसंत केली. नेहा शहरात वाढलेली, उच्चशिक्षित आणि कमावती. तिला आपल्याला शोभेल अशी मॉडर्न जाऊ हवी होती जी फक्त तिला तिच्या बहिणीत दिसत होती. पण तिच्या दिराला प्रतीक्षा चं साधेपण, निरागसता भावली. प्रतीक्षा दिसायला साधी पण निरागस आणि मनमिळाऊ होती.

प्रतीक्षाची माहिती काढली तेव्हा सर्वांनी हेच सांगितलं की प्रतिक्षा खूप कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, खऱ्याची कास धरणारी आहे. दिराला हेच हवं होतं. त्याने तिला पसंत केलं.

नेहाची धुसफूस सुरूच होती, दिराला तिने समजावलं,

"अरे आपण शहरात राहतो, इथे आपल्या घराला ती शोभेल का? तुला शोभेल का? माझी बहिण काय वाईट आहे?"

"वहिनी राग मानू नका पण तुमच्या बहिणीकडे मी फक्त मैत्रीच्या नात्याने पाहिलं, माझं जोडीदाराबद्दलची स्वप्न खूप वेगळी आहेत.."
*****

🎭 Series Post

View all