Oct 25, 2020
स्पर्धा

'नैराश्य' की 'आयुष्य'....

Read Later
'नैराश्य' की 'आयुष्य'....

 

डिप्रेशन /नैराश्य... एक अशी गोष्ट.. जी कुणालाच मान्य करायची नसते.  नैराश्य म्हणजे बंद कपाट.. जे बंद असताना सगळं आलबेल वाटते.. शांत वाटते सगळं बाहेरून... पण आत सगळे कपडे कोंबून ठेवलेले असतात... जेव्हा आपण ते उघडतो तेव्हा त्यात बोळा करुन कोंबलेले कपडे धडाधड खाली पडतात... एका क्षणात कपाट रिकामं होतं.. पण खाली त्या कपड्यांचा ढीग लागतो... आपण पुन्हा तो ढीग उचलून तसाच त्या कपाटात कोंबतो... आणि कपाट पुन्हा बंद करुन टाकतो..जगाला दाखवायला.. माझं घर किती सावरलेलं... आवरलेलं आहे.. पण आत... कपाटात... त्या कोंबलेल्या कपड्यांचा गोंधळ चालू राहतो... चढाओढ चालते... आपल्यासाठी जागा करुन ऐसपैस राहण्यासाठी... अखंड द्वंद्व.. जसं मनात चालू असतं.. असंख्य विचारांचं... जे कुणाला दिसु नये म्हणून आपण धडपडत असतो.. वरून सगळं किती आलबेल आहे हे दाखवायला... पण जेवढे आपण लपवायचा प्रयत्न करतो तेवढेच जास्त ते उसळून बाहेर पडतं.. 

समाज काय म्हणेल हा विचार करुन आपला आजार लपवून ठेवायचा. कारण आपल्याकडे नैराश्य म्हणजे 'वेड लागणं'..कुणी डिप्रेशन मध्ये आहे म्हणजे त्याला/तिला वेड लागलेय आणि मेंटल हॉस्पिटल हाच लास्ट ऑपशन आहे असंच सुचवलं जातं. म्हणून घरचे सुद्धा यावर बोलायला तयार नसतात. जेव्हा आपण आजारी असतो ना, तेव्हा शरीर थकतं आणि तेव्हा जितकं लवकर आपण डॉक्टर कडे जाऊ तितक्या लवकर बरं वाटतं. तसंच डिप्रेशनचं. डिप्रेशन मध्ये तुमचं मन थकतं,  आणि जितक्या लवकर यावर उपचार होतील तितक्या लवकर बरं वाटतं.  पण समाजाच्या भीतीपोटी हा आजार लपवून ठेवण्यातच सगळे धन्यता म्हणतात. मग हळूहळू हे नैराश्य जीवावर उठतं.  लोक म्हणतात की व्यक्त व्हा... तुम्हाला बरं वाटेल.. पण नैराश्याने ग्रासलेल्या माणसाला कसं व्यक्त व्हावं हेच कळत नाही.. खरं सांगायचं तर त्याला असं वाटतं की कुणी आपल्याला समजूनच घेणार नाही.. मग बोलायचेच कशाला.  आणि त्यात काही खोटंही नाही.. कुणालाही कुणाचं दुःख ऐकायला आवडत नाही... वेळ नाही. रडगाणं ऐकायला कुणाला आवडेल?  मग कुणी ऐकत नाही म्हणून बोलणं नाही... आणि बोलणं नाही म्हणून मन मोकळं होत नाही... आणि हा सगळा कचरा साठून राहतो... सगळे प्रवाह हळूहळू बंद करुन टाकतो. 

 

नैराश्य कधीही जन्माला येऊ शकतं. माझ्या बाबतीत याची सुरवात ८वी पासून झाली.  आमची शाळा १ली ते  १०वी पर्यंत होती.  १ली पासून मी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आले होते. सुंदर हस्ताक्षर,  शुद्धलेखन,  खेळांमध्येही पुढे असल्यानं सगळ्याच शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होते. इंटरस्कूल  कॉम्पीटिशन मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्या होत्या.  शाळेसाठी कितीतरी बक्षिसे आणली होती.  सगळी शाळा ओळखायची मला... मुख्याध्यापकांपासून ते विद्यार्थी  सगळेच.. रक्षा येवले ला न ओळखणारं  शाळेत कुणीच नव्हतं.. अगदी प्युन सुद्धा.. त्या फेम ची मला सवय झाली होती.  व्यसनच म्हणा ना. कायम हवेतच असायची मी.  हळूहळू अहंकार नक्कीच जन्माला येत होता... मला सगळे ओळखतात... सगळे कौतुक करतात.. मी म्हणजे मीच.  एवढे सगळे गुण कुणातच नाहीत. मला महत्व मिळत होतं आणि ते मला सुखावत होतं... हवंहवंसं वाटत होतं.  

शाळेतल्या प्रसिद्धीमुळं घरात सुद्धा वारेमाप कौतुक होत होतं. नातेवाईकांमध्ये मी म्हणजे सेलिब्रेटी झाले होते.  चाचणी परीक्षेचा निकाल लागला.. सहामाही.. वार्षिक... कोणत्याही परीक्षेचा निकाल आला की आई बाबा सगळ्यांना फोन करुन सांगायचे.  मग पुन्हा कौतुक.... निबंध स्पर्धेचा निकाल  लागला.. परत कौतुक.. वक्तृत्व स्पर्धेत नंबर आला... केला फोन.... परत कौतुक.... परत परत कौतुक.. कौतुक.. आणि फक्त कौतुक.. उठता बसता कौतुक.. शाळेत वाढणारा वट... शिक्षकांच्या डोळ्यातला माझ्याबद्दलचा अभिमान... मैत्रिणींमध्ये असलेली असूया... सगळं सगळं हवंहवंसं वाटायला लागलं.. माझ्यासाठी जणु ऑक्सिजनच.. त्याशिवाय मी श्वासच घेत नव्हते.. हे कौतुक थांबलं तर माझा श्वासच थांबेल असं वाटायचं मला.. यात माझ्या घरच्यांनी सुद्धा भर घातलीच होती.. 'रक्षा' चे आईवडील म्हणून त्यांना मिळालेलं महत्व त्यांनाही आवडत होतं... मग ते मला अजून यशस्वी व्हायला प्रोत्साहन द्यायचे.  तेव्हा मोबाईल नव्हते..नाहीतर माझ्या बक्षिसांचे... निकालाचे फोटो सतत त्यांच्या स्टेटस वर झळकले असते.. फेसबुक.. ट्विटर.. इंस्टाग्राम... काय काय आणि किती किती... खरंच आहे एखादी गोष्ट अति झाली की माती होतेच... आयुष्याची.. 

एखादा दिवस शाळेत कौतुक झालं नाही की.. काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं.  चिडचिड व्हायची. सातवीच्या शेवटच्या चाचणी परीक्षेत इतिहासाच्या पेपरला माझ्या मैत्रिणीला सुचिताला माझ्यापेक्षा अर्धा मार्क जास्त मिळाला... फक्त अर्धा.. काय तडफड तडफड झाली माझ्या जिवाची... पाहिला नंबर तेव्हाही माझाच होता... आमच्या दोघींच्या एकूण गुणांत खूपच फरक होता... पण तो 'अर्धा' गुण माझ्या मेंदूला डागण्या देत होता. सतत डिवचत होता.  आई बाबा सुद्धा किती रागावले होते.. कसं  काय तिला जास्त मार्क मिळाले.. असं पुन्हा नाही झालं पाहिजे... हे मला सतत ऐकवत होते.  खरंतर इथेच सुरवात झाली होती.. नैराश्याची बीजे इथेच रुजली होती... त्याला खतपाणी घालायचं काम मी स्वतः.. माझ्या आईबाबांसोबत करत होते.  कारण 'स्पर्धा' हे नैराश्याचं एक महत्वाचे कारण आहे.  त्या अर्ध्या गुणाने माझ्या पुढच्या व्यावहारिक आयुष्यात खरंतर काहीच फरक पडणार नव्हता... पण वैचारिक आयुष्यात मात्र बरंच काही घडणार होतं.. जे तेव्हा आम्हाला कुणालाही कळलं नाही. त्या अर्ध्या गुणासाठी मी सूचिताशी बोलणं टाकलं.  एकटीच राहायला लागले. 

 

सातवीचं वर्ष संपलं.  नेहमीप्रमाणे मीच पहिली आली होते. पण सुचिताशी मैत्री मी संपवली होती.  खरंतर ती एकटीच अशी मैत्रीण उरली होती माझी.. माझ्या गर्विष्ठ स्वभावामुळं.  पण तिला सुद्धा मी सोडलं.  ती खूप प्रयत्न करायची बोलण्याचा पण मी उडवून लावत होते. आठवीपासून सकाळची शाळा सुरु झाली.  आठवीला इतर शाळांतूनही मुलं यायची. पालिकेच्या शाळांमध्ये ७वी पर्यंतच वर्ग असायचे.  मग ८वी साठी तिकडची मुलं आमच्या शाळेत प्रवेश घेत.  त्यातलीच एक होती उज्वला.  नाव उज्वला असलं तरी दिसायला सावळीच होती.  आणि जेव्हा मला तिचे ७वी चे गुण कळाले तेव्हापासून तर ती मला अजूनच सावळी दिसु लागली... मनातली असुया.. दुसरं काय! तिला चक्क माझ्यापेक्षा ३%जास्त होते,  आणि हे मला शाळेच्या पहिल्याच दिवशी ओळखपरेड च्या वेळेस कळालं होतं.  घरी येऊन आईला ही गोष्ट सांगितली तशी ती म्हणाली "सरकारी शाळांमध्ये काय,  मार्क असेच देतात.  आता या शाळेत कळेल तिला मार्क मिळवणं एवढं सोपं नसतं." मलाही तेच पाहायचं होतं.  मी तयार होते,  पुन्हा एकदा 'स्पर्धा' करायला.  एका अशा मुलीशी जी मला भेटून एकच दिवस झाला होता.. आणि तिच्या हे गावीही नव्हतं की मी तिला माझी प्रतिस्पर्धी मानतेय. माझ्यासाठी रेस सुरु झाली होती. 

 

हळूहळू तिच्याबद्दल अजून गोष्टी कळू लागल्या. एका वृत्तपत्राने त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या शाळेत निबंध लेखन आणि  चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. उज्वलाने सुद्धा भाग घेतला होता. दोन्हीही स्पर्धेत.  माझी चित्रकला एवढी खास नव्हती.. आणि नंबर १ सोडून दुसरा कुठलाही नंबर मला मान्य नव्हता. म्हणून मी भागच घेतला नव्हता.  माझा हा नियम होता,  जिथं आपण जिंकू शकत नाही.. तिथं भाग घेण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. स्पर्धांचा निकाल आला... मला पूर्ण खात्री होती.. निबंध लेखन स्पर्धा जिंकणार मीच ! पण..... हाच 'पण'... खूप काही घडवून आणणार होता... उज्वला दोन्हीही स्पर्धेत शाळेतून पहिली आली होती... मी दुसरी. मला न आवडत्या स्थानावर आज मी आले होते. सगळेजण तिचं कौतुक करण्यात व्यस्त होते. माझं दुःख कुणाला दिसलंच नाही... असं मला वाटत होतं. आणि ही सल जास्त त्रास देत होती. स्पर्धा म्हणजे हारजीत आलीच हे मी शिकलेच नव्हते... मग मला ते झेपणार तरी कसं?  वर्गातल्या सगळ्या मुली तिला विश करत होत्या.. सुचिता सुद्धा.  त्या दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या.  त्यादिवशी सारखं असं वाटत होतं की त्या दोघी माझ्याबद्दल काहीतरी कुजबुजतायेत आणि हसत आहेत माझ्यावर.  त्याच कशाला... त्या दिवशी अक्खी शाळा माझ्यावर हसतेय, माझ्याबद्दल काहीतरी कुजबुज करतेय असं वाटत होतं.  आणि हळूहळू हे वाटणं वाढतच गेलं.  रस्त्याने जाताना येताना सगळे लोक माझ्याचबद्दल बोलत आहेत असं वाटायचं.  मी स्वतःला कोशात अजूनच गुरफटून घेतलं.  जे काही थोडेफार बोलत होते शाळेत कुणाशी...ते सुद्धा बंद केलं. अशातच चाचणी परीक्षा आली पाहिली.  माझा अभ्यास सुरूच होता.. पण यावेळी अभ्यासात म्हणावं तसं  लक्ष लागतच नव्हतं...कितीही प्रयत्न केला तरी.  पण तरी पहिलं यायचंच हे पक्क ठरवलं होतंच. नेहमीसारखं... परीक्षा मनासारखी झाली.  

 

प्रत्येक विषयाचे शिक्षक येऊन चाचणीचे मार्क्स सांगत पेपर देऊ लागले.  रोल नंबर प्रमाणे पेपर दिले जात होते.  आधी सुचिताचा नंबर आला.  ३० पैकी २७ मिळाले होते तिला.  मग उज्वलाचा पेपर मिळाला... ३०पैकी २९ मिळाले होते. आता माझी खात्री होती मला पैकीच्या पैकीच असणार. एक असुरी हसू ओठांच्या एका कोपऱ्यात झळकत होतं माझ्या.  आणि माझा नंबर आला..... २८मार्क्स..... माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. कशीबशी उठून मी सरांच्या टेबल जवळ गेले, थरथरत्या हाताने माझा पेपर हातात घेतला.. आणि सरांचा आवाज कानावर आला.. "अजून तयारी हवी रक्षा.. आता तुला टफ कॉम्पिटिशन आहे.. उज्वलाचं." कानात कुणीतरी उकळतं तेल टाकल्यासारखं वाटलं. नेहमी "अरे वा... गुड.. व्हेरी गुड.. ' असं ऐकायची सवय होती... 'अजून तयारी हवी' हे वाक्य माझ्यासाठी नव्हतंच.. ते इतरांसाठी होतं... माझ्यासमोरच तर सगळे शिक्षक बोलायचे बाकीच्या मुलांना... पण आज.. मला.... नाही हे मला मान्य नाही.  अजून पेपर बाकी आहेत.. त्यात कळेलच की.. मीच अव्वल आहे. पण जसजसे पेपर मिळत गेले तसतसा माझा भ्रमाचा भोपळा फुटत गेला. उज्वला सगळ्यात पहिली होती. आणि मी दुसरी... माझ्या हातापायांत त्राणच राहिलं नव्हतं.   तंद्रीत घर गाठलं.  आईला रिझल्ट कळला तसं ती रागावली.  "मार्क्स कसं कमी मिळाले?  अजून अभ्यास का नाही केला.  आता मी सगळ्यांना काय सांगू.  यावेळी रक्षा दुसरी आली म्हणून..नाहीतर उद्या मी येतेच शाळेत.. तिला मार्क्स जास्त कसे पडले.  नक्कीच काहीतरी गडबड झाली असेल."

दुसऱ्या दिवशी आई खरंच शाळेत येऊन शिक्षकांना भेटली.  सगळेच जण हेच सांगत होते की उज्वला खरंच हुशार आहे आणि रक्षा ला आता अजून तयारी करावीच लागेल.  आणि यावेळी तिच्याकडून बऱ्याच साध्या साध्या चुका झाल्यात.  तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती.  हुशार विद्यार्थी अशा चुका करु लागले तर कसं चालेल. आईला पहिल्यांदाच माझ्याबद्दल कौतुका ऐवजी तक्रार ऐकायला मिळाली होती. त्यामुळं ती अजूनच चिडली.  मी पुन्हा जोमाने तयारीला लागले. जिंकण्यासाठी नाही तर  उज्वला ला हरवण्यासाठी. अभ्यास करताना माझ्या नजेरेसमोर तिच्यापेक्षा जास्त मार्क्स कसे मिळतील हेच असायचं.  आणि मी कितीही प्रयत्न केले तरी मी मागेच पडत गेले आणि उज्वला पुढे पुढे. ८वी झाली ९वी झाली.. उज्वला पहिली आली.  सगळे शिक्षक आता तिचं गुणगान करत होते. अभ्यास,  खेळ,  इतर स्पर्धा सगळ्यातच उज्वला नंबर वन होती.  आणि एवढं असूनही सगळ्यांशी छान बोलायची.  खूप मैत्रिणी होत्या तिला.  मला मात्र तिच्याबद्दल अजून जास्त असूया वाटत राहिली.  आधी ती माझी प्रतिस्पर्धी होती.... आता शत्रू झाली होती. मी गप्प गप्प राहू लागले.  सगळं जग माझ्यावर सूड उगवतेय असं वाटू लागलं.  माझ्या बाजुला कुणी हसून काही बोललं की माझ्यावरच हसत आहेत असं वाटून उगाचच भांडण करु लागले. घरी सुद्धा कुणी समजुन घेत नव्हतं.  त्यांना फक्त आधीची रक्षा हवी होती.  कौतुक होणारी.  पण तसं होण्यासाठी कुणी मदत करायला मात्र नव्हतं.  

मी खंगत चालले होते... मनानं.. सगळे प्रयत्न कमी पडत होते. शिक्षकांच्या अपेक्षा.. आईवडिलांच्या अपेक्षा... आणि माझ्या स्वतःच्या अपेक्षा.. सगळ्या बाजूने मला जखडून टाकलं होतं जणू....  घुसमट होतं होती.. घुम्यासारखं बसून राहू लागले.  शून्यात पाहत... एकटक.. पापणी ३-४ तास लवत नसायची. शाळेत सुद्धा हिच अवस्था. घरच्यांना बदल जाणवत होता.. पण मान्य करायचा नव्हता.  कुणाला कळू द्यायचा नव्हता. या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. १०वी ला  बोर्डात यायचं स्वप्न पाहणारी मी... शाळेच्या बोर्डवर सुद्धा नाव आलं नाही. 

ज्यादिवशी रिझल्ट लागला त्यादिवशी पार खचले. जगण्याची इच्छाच संपली. घरी गेले तर परत ओरडा खावा लागेल.  कुणी समजुन नाही घेणार. काय करु.. कुठे जाऊ.. या विचारात जागेवरच थिजून उभी राहिले. किती वेळ तशीच होते काय माहित.  भानावर आले तशी रेल्वे ट्रॅक कडे चालू लागले. शरीर जात होतं की मन फरफटत नेत होतं.. काहीच कळत नव्हतं. ट्रॅक जवळ आला तशी मनाची धाकधूक वाढली.  हिंमतच होईना उडी मारायची. घरी तर जायचं नव्हतं. कितीतरी वेळ तिथेच बाजुला बसून राहिले.  कुणाला दिसणार नाही असं.  अंधार पडायला लागला होता.  माझ्या मनात आधीच काळाकुट्ट अंधार होता. मन माझी खिल्ली उडवत होतं.. "रक्षा तू हरलीस... तू आयुष्यात काहीच करु शकत नाहीस... अगं कुठे ती पहिली येणारी रक्षा... आणि कुठे तू. बघ जीव दयायला आली आणि तिथे सुद्धा कच खाल्ली.. तुझ्याच्याने काही नाही होणार..जा घरी जा..." शेवटच्या वाक्याने डोक्यात तिडीक आली आणि आता येणाऱ्या ट्रेन समोर उडी घ्यायचीच अशा पावित्र्यात उभी राहिले.  तेवढ्यात समोरच्या ट्रॅक वर ट्रेन आली.. आणि त्याच्या उजेडात ट्रेन समोर काहीतरी आल्याचं दिसलं... आणि मागोमाग एक जोराची किंकाळी... पिळवटून टाकणारी...धडकी भरवणारी.. पुढे पुढे जाणाऱ्या ट्रेनच्या डब्यांच्या दारातून बाहेर येणाऱ्या प्रकाशात खाली ट्रॅक वर काहीतरी दिसत होतं.. गाडी निघून गेल्यावर जवळ जाऊन पाहिलं.... आणि भूत पाहिल्यासारखं पळत सुटले ते घरी येऊनच थांबले. घरी सगळीकडे शोधाशोध सुरु झाली होती. शेजारीपाजारी बाबांसोबत शोधायला गेले होते आणि आई शेजारच्या बायकांसोबत रडत बसली होती. मला सुखरूप पाहुन सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.  आई डोळे पुसून मला काही विचारणार तोच मी कोसळले. माझं अंग चांगलेच तापलं होतं. आणि थरथरत होतं.  तसंच उचलून बाकीच्या बायकांच्या मदतीने आई,  आमच्याच बिल्डिंग मधल्या आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासून काही औषधं लिहून देत डॉक्टर काकांनी मला बोलतं करायचा प्रयत्न केला पण माझी जणू दातखीळच बसली होती. "आता जी औषधं दिलीत ती द्या तिला.. आणि उद्या परत या तिला घेऊन.  बोलू आपण." म्हणत डॉक्टर काकांनी यायला सांगितलं.  

मी गायब होते ही बातमी शाळेत सगळ्यांना समजली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या क्लास टीचर मला भेटायला घरी आल्या.  तब्येतीची चौकशी केली.  आणि मग आईबाबांना समोर ठेऊन बोलू लागल्या. "तुझा चढता आलेख पाहायची सवय होती... उतरता नाही. उज्वला  तिचं बेस्ट देण्याचं ट्राय करतेय आणि तू टाइम वेस्ट करत आहेस. तुम्ही दोघीही सारख्याच आहात.. पण तुझी सगळी शक्ती स्पर्धेत जातेय.. ती स्पर्धा जिंकण्याची तयारी करतेय आणि तू फक्त आणि फक्त तिला हरवण्याची.... तिला तर माहितीपण नाही तुझ्या या तिच्याशी असलेल्या स्पर्धेबद्दल. आणि हे करुन काय  साध्य झालं... स्वतःलाच त्रास झाला ना.." मॅडम बोलत होत्या आणि आम्ही तिघेही फक्त ऐकत होतो. त्यांचं म्हणणं पटत होतं.  "आई वडील म्हणून तुमची जबाबदारी होती.. तिला यातून  बाहेर काढायची.. पण तुम्हीसुद्धा तिला स्पर्धेच्या गर्तेत ढकलत गेलात.." आईबाबांना सुद्धा त्यांचं म्हणणं पटलं. "खरंतर माझी चूकच झाली. मी हे सगळं आधीच सांगायला हवं होतं...समजवायला हवं होतं.  एक शिक्षिका म्हणून माझीही जबाबदारी होती...मला माफ कर रक्षा" म्हणत मॅम ने खरेच हात जोडले. मला खूप वाईट वाटलं आणि स्वतःचा राग ही आला.  डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं.  मॅमनी प्रेमाने जवळ घेत शांत केलं.  तेवढ्यात सुचिता आणि उज्वला दारात हजर.  माझ्याबद्दल कळालं म्हणून भेटायला आल्या होत्या. आत आल्याबरोबर सुचिता ने हात हातात घेऊन प्रेमाने "कशी आहेस? कुठे गेली होतीस.. आम्ही किती घाबरलो होतो माहितेय. असं कुणी जातं का ना सांगता?" म्हणत चौकशी केली.  तिच्या डोळ्यात अश्रू होते.  उज्वला कडे पाहिलं तर ती सुद्धा रडत होती.  दोघींच्या डोळ्यातली काळजी स्पष्ट दिसत होती.  ते नाटक नव्हतं.. खरेच प्रेम होतं. जे मला इतके दिवस दिसलंच नाही... जिंकायची धुंदी होती ना डोळ्यांत.  या दोघी नेहमी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायच्या आणि मी हिडीसफिडीस करायची.  पण तरीदेखील मागचा राग मनात न ठेवता मला भेटायला आल्या होत्या.  क्षणात मला मी कितीतरी लहान आहे असं वाटू लागलं.  आज कितीतरी दिवसांनी इतकी माणसं माझ्या आजूबाजूला होती आणि मला ती हवी होती... माझ्या आजूबाजूला... रडून आज मन हलकं हलकं वाटत होतं..  बराच वेळ गप्पा केल्यांनतर त्या दोघी दुसऱ्या दिवशी परत येतो सांगुन घरी गेल्या.  मॅम सुद्धा काळजी घ्यायला सांगुन गेल्या.  मला बऱ्यापैकी तरतरी आली असली तरी  कालची भीती अजूनही गेली नव्हती. 

संध्याकाळी डॉक्टर काकांकडे गेलो.  त्यांनी मला तपासलं आणि विचारलं.  "हम्म.. आता मला सांग काल काय झालं होतं नक्की?  कशाला एवढी घाबरली होतीस?  आणि नक्की कुठे गेली होतीस? " डॉक्टर काकांनी सरळ मुद्यालाच हात घातला.  मी काही न बोलता मान खाली घालून बसून राहिले. त्यांनी पुन्हा प्रेमाने विचारलं,  "बरं ते जाऊदे,  मला सांग,  तुला जेव्हा पहिल्यांदा कमी मार्क्स पडले तेव्हा तुला काय वाटलं रक्षा? " 

मी आईबाबांकडे पाहिलं आणि गप्प बसले.  त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला,  "हे बघ जोपर्यंत तू बोलणार नाहीस,  आम्हाला कळणार नाही. आणि जोपर्यंत आम्हाला कळणार नाही. आम्ही तुला यातून बाहेर पडायला मदत करु शकणार नाही."

"काका,  खरं तर मला खूप राग आला होता. माझ्या पुढे कुणी कसं जाऊ शकेल, असं वाटत राहिलं. खरंतर तेव्हा असं पण वाटत होतं की आईने जवळ घ्यावं आणि म्हणावं काही हरकत नाही. पुढच्या वेळेला अजून छान प्रयत्न करु. पण आईला सुद्धा ते रुचलं नाही. तिनेही माझ्या मनातल्या विस्तवाला हवा दिली." एवढं बोलून मी आईकडे पाहिलं.  माझ्या बोलण्याचं जेवढं आश्चर्य तिला वाटलं होतं त्याहून जास्त अपराधीपणाची भावना तिच्या डोळ्यांत जाणवत होती. 

"तिथून पुढं जेव्हा जेव्हा मी मागे राहिले मला राग येऊ लागला.  मॅम म्हणाल्या तसं मी खरंच स्पर्धा करु लागले. मनाच्या... शरीराच्या... विरुद्ध वागल्यासारखं. या स्पर्धेनेच जीव घेतला. मी अभ्यासात वाईट नव्हते,  योग्य प्रयत्न केले असते तर मी खरेच उज्वला पेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकले असते. पण मी माझी पूर्ण मेहनत भलतीकडेच लावली. मला गरज होती योग्य मार्गदर्शन करणाऱ्याची. पण घरून ते मिळालं नाही.  अजून वाहवत गेले. आणि एका क्षणी असं वाटायला लागलं आपण शून्य आहोत... बिनकामाचे.. आयुष्यात फक्त फक्त हार स्वीकारायला जन्माला आलोय आपण असेल वाटत राहिलं.  खच्चीकरण होत गेले. आत्मविश्वास संपला. वाटायचं आईबाबांना सांगावं मन मोकळं करावं.  पण अर्धा मार्क कमी पडल्यावर आई रागावली होती,  ती हे सगळं समजुन घेईल का?  हेच वाटून गप्प राहिले. मन मोकळं करायला मैत्रिणी नाहीत,  इतर कुणाला सांगू शकत नाही.  घुसमट होत होती. खूप प्रयत्न केले, यातून बाहेर पडायचा.  स्वतःच.  एकटीच लढत राहिले मनातल्या विचारांशी. आणि काल थकले हो काका.  नाही उभारी देऊ शकले मनाला.  अर्ध्या मार्कांचा ओरडा अजूनही ऐकू येत होता. तिथे बोर्ड एक्साम मध्ये शाळेतून ७वर नंबर कसा पटणार होता घरच्यांना?  सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता दमले होते. शिक्षक म्हणायचे 'तयारी अजून हवी.. तुझ्याकडून खुप अपेक्षा आहेत शाळेच्या.. ',  घरी,  नातेवाईकांच्या अपेक्षा... माझ्या स्वतःच्या अपेक्षा... गोंधळ गोंधळ झाला होता नुसता. शांतता हवी होती मला. म्हणुन गेले काल जीव द्यायला.  पण तिथं तो छिन्नविछिन्न मृतदेह पाहिला आणि पायातलं त्राणच गेलं.  पळतच सुटले तिथून." माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आत आईबाबा घाबरून उभे राहिले. त्यांचा त्यांच्या कानावर विश्वास बसेना. आई पटकन उठून माझ्या जवळ आली. घट्ट मिठी मारली.  कितीतरी वेळ मला असंच पकडून ती रडत राहिली. बऱ्याच वेळानं दोघीही शांत झालो. 

"रक्षा, तुला खरंच वाटतं तुझ्या अशा करण्याने सगळे प्रश्न सुटले असते? " काकांनी विचारलं. 

"मला नाही माहित काका,  पण एवढं नक्की मी सुटले असते या सगळ्यातून. माझ्या मनाच्या कोंडमाऱ्यातून. असह्य झालंय सगळंच.  नाही हो सहन होत आता. "

"हे बघ,  अशाने प्रश्न सुटत नाहीत.  किचकट होतात. जाणारा जातो... पण मागे राहणाऱ्याला जिवंतपणी मरणयातना सहन कराव्या लागतात. याला पळपुटेपणा म्हणतात.  मी ज्या रक्षा ला ओळखतो ती अशी नक्कीच नाही. ती प्रयत्न करणारी आहे.  काही झालं तरी हार न मानणारी. तिचं एकच चुकलं.. ती स्पर्धेच्या मागे लागली." काकांनी समजावलं. मग आईबाबांकडं वळून म्हणाले, "यातून बाहेर पडायला तुमची मदत लागेल तिला.  शाळेच्या परीक्षेत किती टक्के पडलेत, यापेक्षा आयुष्याच्या परीक्षेला ती कशी सामोरी जाते हे महत्वाचे आहे. अहो नापास झालेली मुलं सुद्धा यशस्वी होतात. योग्य दिशा दिली की भरकेलेलं वारू सुद्धा किनाऱ्याला लागतं. ८०-९०%म्हणजेच हुशार असं नाही. आज तुमच्या या हव्यासापायी मुलगी गमावून बसला असतात. अहो तुमच्या स्वप्नांची ओझी त्यांच्या खांद्यावर का देताय? जगू द्या त्यांना.  अपेक्षा ठेवणं चूक नाही. पण अवास्तव अपेक्षा ठेवणं गुन्हाच आहे. त्यामुळं इथून पुढं तिला यातून बाहेर पडायला मदत करा."

आईबाबांनाही त्यांचं काय चुकलं हे कळालं होतं. आईबाबा.... डॉक्टर काका, माझ्या मैत्रिणी  या सगळ्यांनी मिळून मला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायला प्रयत्न केले. वेळ लागला... पण सावरले मी. माझ्या माणसांची साथ लाभली म्हणुन मी हे करु शकले. नाहीतर काय झालं असतं माझं?  

एवढंच सांगेल.. स्पर्धेच्या मागे लागू नका. आपलं मन वेळेवर मोकळं करायला शिका. हे सोपं नक्कीच नाही पण प्रयत्न करा. शाळेत अव्वल येणं म्हणजे आयुष्यात अव्वल येणं नाही. प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यापेक्षा समजुतीचा आलेख चढता ठेवा. गणितातले प्रॉब्लेम्स सोडवता नाही आले तरी चालतील.. पण आयुष्यातले प्रॉब्लेम्स हाताळायला शिका. 

 

टीप -गोष्ट काल्पनिक आहे... पण सत्य घटनांवर आधारित आहे. अशा कितीतरी रक्षा दिसतील आजूबाजूला. बोर्ड एक्झाम चे रिझल्ट आले की कितीतरी गोष्टी ऐकायला, पाहायला मिळतात. नैराश्य मुळासकट उपटून काढायचं असेल तर त्याची पाळंमुळं रुजण्याच्या आधीच त्याला आवर घालणं योग्य. नाहीतर आधुनिक ययाति होऊ आपण. त्या ययातीने मुलाचं तारुण्य घेतलं.. आणि आधुनिक ययाति,  मुलांना तारुण्य यायच्या आधीच वार्धक्य देतात. आपल्या अपेक्षांच्या ओझ्याचं दडपण देऊन.