Oct 27, 2020
स्पर्धा

नैराश्य आणि त्यावर मी केलेली मात

Read Later
नैराश्य आणि त्यावर मी केलेली मात

नैराश्य आणि त्यावर मी केलेली मात  

        नैराश्य हा शब्द तीन अक्षरी असला तरी त्यामध्ये भरपूर अर्थ सामावला आहे . नैराश्य का येते ? कोणत्या कारणामुळे येते ?  हे सांगणे फार अवघड आहे.  पण माझ्या मित्राला एकदा नैराश्याने ग्रासले होते आणि त्यावर त्याने कोणत्या प्रकारे मात केली हे मी तुम्हाला सांगणार आहे .

      माझा मित्र समीर पहिल्यापासूनच हुशार  दहावीला 75 % गुण  मिळाले  म्हणजे एकदम ढ ही नाही आणि एकदम स्कॉलर ही नाही.  घर सोसायटीमध्ये असल्यामुळे भरपूर मित्र दहावीच्या सुट्टी मध्ये भरपूर मित्रांबरोबर खेळणे झाले की फक्त रात्री झोपायला तो घरी यायचा.  घरातल्यांनी ओळखले व पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवायचे ठरवले.  

      गावाकडच्या मुलांना मुंबई म्हणल्यावर असे वाटते की हाय फाय कॉलेज, हाय फाय पोरी , मुंबई म्हणजे मायानगरी . पण तसे काही समीरच्या नशिबात नव्हते. त्याच्या वडिलांचे एक मित्र मुंबईला होते तो त्यांच्याकडेच राहायचा . कॉलेज पण ठीकठाक होते.  समीर फार सिरियसली अभ्यास करायचा. मुलींशी तर तो बोलतही नव्हता. सर्व जरनल तो वेळच्या वेळी पूर्ण करायचा. कॉलेज ते घर  (घर म्हणजे त्याच्या वडिलांच्या मित्राचे घर)   आणि घर ते कॉलेज  कधी दोन-चार आठवड्यांनी सुट्टी मिळाली तर गावी जाऊन यायचा.  आयुष्याच्या या टप्प्यावर त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त अभ्यास एवढेच होते. ना कोणती मैत्रीण ना कोणती गर्लफ्रेंड ! मुलींशी तर तो बोलत ही नव्हता. हा हा म्हणता समीरचा तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण झाला.   डिप्लोमाला फर्स्ट क्लास मिळाला.  पण इंजिनिअरिंग साठी त्याला बाहेर जावे लागणार होते.

     समीरला फर्स्टक्लास असूनसुद्धा  गावी ऍडमिशन नाही मिळाले  एका लांबच्या ठिकाणी  (महाराष्ट्रातल्या एका शहरात) ऍडमिशन मिळाले .समीरचे इंजिनिअरिंग चे दुसरे वर्ष चालू झाले.  पण तिथे ज्युनिअर आणि सीनियर असा वाद असायचा . समीर ने हेच टाळण्यासाठी  होस्टेल सोडून रूम मध्ये राहण्याचा निर्णय घेतला  .पण तिथेही त्याचे व त्याच्या सोबत असलेल्या मित्रांचे  रॅगिंग घेण्यात आले . सीनियर मुलांच्या ड्रॉईंग शिट्स काढायच्या , त्यांची  जरनल लिहून द्यायची . ते जे सांगतील ती कामे करायची . अशी कोणतीही कामे सीनियर सांगायचे  .कधीही रूमवर येणार  ,सिगारेट ओढणार हे नित्याचे झाले होते .समीरला तेव्हा कळले की एवढी किशोरवयीन मुले सुद्धा सिगारेट ओढतात.  समीर चा अभ्यास चालू होता पण मन लागत नव्हते . अभ्यासही मनासारखं होत नव्हता  आणि त्यांच्या सीनियर मुलाशी पटत नव्हते.   त्या मुलांची तक्रार करायची झाल्यास ते म्हणायचे  कॉलेज मध्ये आणि कॉलेजच्या बाहेर ही आमची वट  आहे . तू आमच्या मनासारखे केले नाहीतर तुला पाहून घेऊ. गावी देखील आमच्या  खूप ओळखी आहेत.  तुला मारायला हि आम्ही कमी करणार नाही.  समीर बिचारा साधा मुलगा त्याने घरीही काही सांगितले नाही. पण त्याच्या मनावर परिणाम झाला होता.  एवढा अभ्यास करूनही केवळ सीनियर च्या त्रासामुळे त्याला परीक्षेत नापास व्हावे लागले होते .तो या गोष्टी घरातही सांगायला घाबरायचा . पण त्याच्या वागण्यातील हा बदल  घरातल्यांच्या नजरेतून सुटला नाही.  तो घरी फोन करून सारखा सांगायचा की मला कंटाळा आला आहे  माझे मन  इथे लागत नाही  . त्यानंतर समीर चे वडील तडक त्याला घरी घेऊन आले . समीर घरी सुद्धा शांत असायचा  कुणाशी काहीच बोलत नसायचा . आपण डिप्लोमाला एवढा अभ्यास केला फक्त अभ्यासच !!  इकडे नाही पाहिले की तिकडे नाही पहिले, गर्लफ्रेंड तर नाहीच नाही, एवढे कष्ट करून मार्क मिळवले त्याची ही शिक्षा !! साधी इंजिनीअरिंग ही माझ्या हातून होत नाही .समीर सॉफ्ट मनाचा होता तो इतर मुलांसारखा खंबीर नव्हता. म्हणूनच तो यात  अडकला कधीही व्यसन न करणारा मुलगा त्याने आज माझ्यासमोर  सिगरेट शिलगावली.  मी म्हणालो समीर तू आणि सिगारेट !!  तो म्हणाला  काहीच फरक पडत नाही  अरे  रूमवर  भरपूर जण ओढायची त्याला काय होतंय . असे म्हणत समीरच्या व्यसनाची सुरुवात झाली.  

         एक वर्ष झाले समीर काहीच करत नव्हता  फक्त सिगारेट ओढणे  तेही एक, दोन नव्हे  तर दोन पॅकेट सिगरेट समीर ओढू लागला.  त्याच्या वडिलांना आणि आईला काहीच सुचेना  मग त्यांनी एका नामांकित डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली . पहिल्या भेटीच्या वेळी  जेव्हा समीर डॉक्टरांच्या कडे गेला  तेव्हा तो त्या डॉक्टरांच्या जवळ ढसाढसा  रडू लागला.  डॉक्टर माझ्या आयुष्यात असे का घडत आहे ? मी डिप्लोमाला भरपूर अभ्यास केला होता.  मग इंजिनिअरिंगला असे काय झाले  !! असे एक ना अनेक प्रश्न समीरच्या मनात होते . फक्त आपण इंजिनिअरिंग पूर्ण करू शकलो नाही याचे शल्य त्याच्या मनात होते.  डॉक्टरांनी त्याचा आजार बरोबर ओळखला.  त्यांनी  समीरच्या आई-वडिलांना विश्वासात घेतले आणि सांगितले जगात अनेक लोकांना असे आजार होतात आणि त्यावर मात देखील ते करतात.  त्यामुळे  मी ह्या गोळ्या लिहून देतो त्या त्याला न चुकता द्या.  आता समीर घरीच होता फक्त  गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचे  आणि जमले तर सिगारेट ओढायची . त्याच्या या व्यसनामुळे  घरात फार भांडणे व्हायची  .आई-वडील रागवायचे तरी याने सिगारेट सोडली नाही.  तो नैराश्यात होता म्हणून आई आणि वडील त्याला काही बोलत नव्हते . हा हा म्हणता एक वर्ष गेले  समीरच्या प्रकृतीत सुधारणा झाली . डॉक्टरांनी सांगितले की याला एका घराजवळच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन द्या . त्याप्रमाणे समीरच्या आईवडिलांनी जवळच एका कॉलेज  मध्ये ऍडमिशन घेऊन दिले. समीरने भरपूर मेहनत घेतली  तरीही त्याला यावेळी चार केटी लागल्या . कारण परत परीक्षेच्या वेळी त्याच जुन्या आठवणी परत परीक्षेच्या वेळी टेन्शन.  त्याची सिगारेट तर चालूच होती.   परत समीर डॉक्टरांच्या कडे गेला  डॉक्टर म्हणाले काही दिवसांनी परत दुसरा स्लॅब येऊ शकतो.  परत समीरच्या गोळ्या चालू झाल्या सकाळी दोन आणि संध्याकाळी तीन . असेच सहा महिने गेले....

          परत समीरची परीक्षा आली  आपल्या आजारांवर पूर्णपणे मात करून समीरने परीक्षा दिली. या वेळी तो भरपूर सकारात्मक होता.   त्याला इंजिनिअरिंग मध्ये 84%  गुण मिळाले . आई-वडीलही खूष होते . डॉक्टर म्हणाले होते की गोळ्या आयुष्यभर घ्यावे लागतील   पण त्या गोळ्या ही एक दीड वर्षांनी बंद झाल्या  नंतर मी माझ्या जॉब साठी परदेशात गेलो  साधारण  दोन वर्षांनी माझी आणि समीरची भेट झाली  .आम्ही चहाच्या टपरीवर होतो मी म्हणालो समीर कसा आहेस?  समीर मला म्हणाला, मी एकदम मस्त झक्कास. त्याचा आत्मविश्वास पाहून मला बरे वाटले!! समीर म्हणाला  पहा आज मला  14 लाख रुपये पॅकेज ची नोकरी आहे.  हे फक्त माझे आई-वडील ,डॉक्टर  आणि तुमच्या सारख्या चांगल्या मित्रांमुळे.  मी म्हणालो समीर सिगारेट घेणार नाहीस !!!  समीर म्हणाला ती तर मी केव्हाच सोडली.  एवढे जीवनात  अडथळे येऊनही.

     समीरने त्यावर यशस्वी मात केली होती  आणि जीवनात संघर्ष करून  यशस्वी झाला . कठीण प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात  पण त्यामुळे व्यसनाधीन व्हायचे नाही . आपल्या मनात फक्त सकारात्मक विचार ठेवायचे .Just Be Positive !!!  

                                                   राहुल चिंचोळीकर.