Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

नवऱ्यावरील परावलंबित्व - ही तर तूच आखलेली चौकट!

Read Later
नवऱ्यावरील परावलंबित्व - ही तर तूच आखलेली चौकट!


     नेहा आणि संपदा अगदी जिवलग मैत्रीणी.पण काळाच्या ओघात त्यांचे एकमेकांशी भेटणे, बोलणे जरा कमी झाले,कारण दोघीही करिअरसाठी वेगवेगळ्या मार्गाने गेल्या आणि त्यांचे लग्नही झाले.पण आज संपदा नेहाला तिच्या घरी एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवते.पाहूया त्यांची चर्चा कशाबद्दल आहे..

"अग नेहा,तुला सांगते हा माझा नवरा सूरज आहे ना ,तो सारखा इतर बायकांकडे बघत असतो.आम्ही कधीही बाहेर पडलो की याची नजर मात्र नेहमी बायकांकडे लागलेली असते."

" हे बघ संपदा हा निव्वळ  तुझा गैरसमज सुद्धा असू शकतो.तू ठामपणे असे कसे बर सांगू शकते,की तुझा नवरा असे करतो? अग जर कुठल्याही बाईकडे असे एकटक बघितले ना तर ती चप्पल घेऊन त्याला बदडून काढेल.मला वाटत की तुझ काहीतरी चुकतंय." 

" नाही ग नेहा ..मी खर बोलतेय.आता आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये एक विधवा बाई राहते. सूरज ऑफिसला निघतो ना तेव्हाच ती बरोबर याला न्याहाळत असते आणि मग काय याला तर हेच हव असतं ..मग दोघे विक्षिप्त नजरेने एकमेकांकडे बघतात."

" अग संपदा काही बायका अशा असतात,मान्य आहे मला.मग तू सूरजलाच याबद्दल जाब का नाही विचारत? "

" अग नेहा,मी केला होता प्रयत्न.पण मी पडले आता अशी अबला स्त्री,त्याच्यावरच माझे सर्वस्व अवलंबून आहे.मला एकतर माहेरचा ही काहीच आधार नाही.मग मी काय करू शकते सांग ना तू? त्याला जर मी जाब विचारायला गेले आणि जर त्याला राग आला तर ? त्याने मला कायमचे सोडून दिले तर ?मी सर्व तऱ्हेने आज त्याच्यावरच अवलंबून आहे .अग आधी मी आमच्याच मेडिकल दुकानात काम करायचे तेव्हा मला सूरज म्हणायचा ,"आजचा गल्ला किती झाला..,बास इतकाच..तू ना तुझे मार्केटिंग कौशल्य विकसित कर. एकदम वाईट आहे ते." मग माझा आत्मविश्वास डळमळीत व्हायचा आणि एकदाचे ते माझे मेडिकल शॉप बंद झाले.मग तेव्हापासून सूरजची माझ्यावरील टोमणे बाजी खूप वाढली. मुलंही आता शाळेत जातात.त्यांचा काय म्हणून खर्च नसतो,तेव्हा काटकसर कर असे मला रोज तो सांगतो.घरात अगदी कमी पैसे देऊन तेल कसे काय लवकर संपते,एवढे लागते का आपल्याला खायला असे तो सतत मला उणे दुणे बोलणे करतो.शिवाय त्याची अशी नजरेची बाहेरख्याली लफडेबाजी सुरूच असते.तरीही मग मला तर  तो मुद्दाम उलट उत्तरे देतो आणि उपहासाने म्हणतो कसा मी तुला सोडून नाही जाणार राणी तू तर माझी खरी गृहमंत्री आहेस.मला तर सूरज चा काहीच भरवसा आता वाटत नाही .त्याचे असे विक्षिप्त वागणे मला खूप खटकते.काय करू ग मी?"

"  संपदा, तू आधी शांत हो.आता मला सांग तुमचे वैवाहिक संबंध असे आहेत?  माफ कर हा एकदम खाजगी प्रश्न मी तुला विचारतेय.कारण मी एक सायकॉलॉजिस्ट आहे."

" हो सर्व ठीक आहे.अग तू माझी जवळची मैत्रीण आहेस म्हणून तर तुझ्याशी हे प्रकरण डिस्कस करतेय ना !"

" मग तू अगदी सुरक्षित आहेस.तुझा सूरज तुलाच खरच गृहमंत्री मानतो.आता सांग कोणती बाई त्याला शोधत घरी आली आहे का? नाही ना.मग एक काम कर. तू ना त्याला अती महत्त्व देणं जरा कमी कर.म्हणजे तुला हवे ते कर पण जरा तारतम्य बाळगून ! म्हणजे हे बघ तू म्हणतेस ना मला स्वयंपाक करायला खूप आवडतो, मग बाहेर मेस ची पाटी लाव.जरा स्वावलंबी बनायचा प्रयत्न कर .जमेल तुला सगळं.अग लग्नाआधी तू किती डॅशिंग होतीस ! विसरलीस का? सूरजला सतत काय हवे नको ते बघणे, सतत त्याच्या मागे पुढे फिरणे हे जरा कमी कर. एकदम बंद नको करू..म्हणजे जेवणाच फक्त त्याला विचारायचं बाकी मात्र नाही.."

" अग पण नेहा मी कुठला ड्रेस घालायचा,शॉपिंग ला गेल्यावर काय घ्यायचे काय नाही हे तोच ठरवतो! मग असा अबोला,वगैरे कसे जमेल बाई मला?"

" अच्छा ! म्हणजे तुझे हे नवऱ्यावरील परावलंबीत्व म्हणजे तूच आखलेली चौकट आहे..अग तू तुझ्या आवडी निवडी त्याच्या हातात मुळात दिल्यासच का? यामुळेच तर सूरज असा वागतोय! बर जाऊ दे आता फार वाद घालण्यात अर्थ नाही. म्हणजे तू फक्त एकच कर. काहीतरी तुझं नवीन स्टार्टअप चालू कर. मेसच चालू कर. तुला छान जमेल ते! तुझं स्वतःचं स्वावलंबन सिद्ध कर आणि मग बघ सुरज तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि कोणाकडे बघणारही नाही.. असे माझी सायकॉलॉजी सांगते."

"थँक्यू यार नेहा! मी तू सांगितलेला हा उपाय नक्की अंमलात आणेल !"

काही दिवसांनी संपदा नेहाला फोन करते,

"हॅलो, हा नेहा ,मी संपदा बोलतीये !अगं तू सांगितल्याप्रमाणे मी खानावळ चालू केली आहे आणि मला आमच्या परिसरात उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे!मी आज तुझ्यामुळेच खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाली आहे आणि तू सांगितल्याप्रमाणे सुरज देखील माझ्याशी व्यवस्थित वागतो आहे .आता माझी सुरजबद्दल कुठलीच तक्रार नाही! थँक्यू नेहा! तू मला या बिकट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी योग्य मार्ग दाखवलास."

"अग थँक्यू काय त्यात?तू माझी अत्यंत प्रिय मैत्रीण आहेस. असे प्रसंग तर वैवाहिक जीवनात येत असतात.फक्त अशा प्रसंगांना सामोरे कसे जायचे आणि त्यातून कोणाचेही नुकसान न होता बाहेर कसे पडायचे हे जमले पाहिजे. चल आता तू आनंदी आहेस ना?"

"हो मी आता खरंच आनंदी आहे. माझ्या हातची खीर पुरी खायला रविवारी ये ना माझ्या घरी!"

"मग येणार मी नक्की.. आपण मस्त सेलिब्रेशन करूया. ओके!"

"ओके !नक्की ये. मी वाट बघेल. चल बाय बाय!!"

"बाय बाय डियर. मी येईल  नक्की!"


©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे 

कॅटेगरी -लघुकथा 

विषय _स्त्री आणि परावलंबित्व

जिल्हा : नाशिक 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सौ प्रियंका कुणाल शिंदे बोरुडे

Freelance Teacher, Content Writer

I am Mrs Priyanka Kunal Shinde Borude,an Engineering Postgraduate Homemaker.I have a teaching experience of 3 years to Engg students.My Cerebral Palsy Child Explored me by all means.He gave me Vision towards life. Thank U my Little munchkin.

//