Jan 27, 2021
माहितीपूर्ण

दातांचे उपचार आणि त्यामागचे गैरसमज

Read Later
दातांचे उपचार आणि त्यामागचे गैरसमज

मी एक डेंटिस्ट आहे. मला माझ्या आजवरच्या अनुभवातून असे आढळून आले की,लोकांमध्ये दातांच्या उपचारांबद्दल खूप गैरसमज निर्माण झाले आहेत. या गैरसमजामुळे लोक डेंटिस्ट कडे जाऊन दातांचे उपचार करायला घाबरतात, टाळाटाळ करतात किंवा पुढे ढकलतात.त्यामुळे दातांचे दुखणे वाढते. गैरसमज आणि त्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे:

1)दात काढल्यावर डोळयांची नजर कमी होते:

अलिकडच्या काळात आपल्या जीवन शैलीमुळे, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे कमी वयातच दातांचे दुखणे सुरु होते आणि दात काढण्याची वेळ येते. पूर्वी दात काढण्याची वेळ सहसा वयस्कर व्यक्तिंवरच यायची. वयस्कर व्यक्तीमध्ये उद्भवलेली दातांचे दुखणे, त्यामुळे दात काढावे लागयचे तर याच वयात डोळ्याला चष्मा लागण्याची ही दाट शक्यता असते. या सगळ्याचा एकत्र परिणाम म्हणजे दात काढल्यावर डोळ्यांची नजर कमी होणे असा समाज रुढ झाला आहे.वास्तविकता अशी आहे की डोळयांच्या व दातांच्या शिरा वेगवेगळ्या असतात त्यामुळे दात काढण्याचा डोळ्याच्या नजरेवर काहीच परिणाम होत नाही.

2)दात स्वच्छ( scaling) केले तर दात सैल होतात:

दातांच्या भोवती असणारी हिरडी आणि हाडांच्या मजबूती वर दातांचा मजबुतपणा अवलंबून असतो. दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास दात व हिरडीभोवती calculus चा म्हणजे जंतूंचा थर जमा होतो, हे जंतू हिरड्या व दातांची झीज करु लागतात आणि दातांमधली फट ही वाढवतात. डेंटिस्ट रुग्णाच्या दातांची स्वच्छता करताना calculus चा थर दूर करतात. दात व हिरड्यांवर जमलेला थर दूर झाला की दातांमधली फट नीट दिसू लागते आणि दात सैल झाले की काय असा रुग्णांचा समज होतो. पण दातांवरील व हिरडी वरील हा थर काढल्यामुळे दातांच्या पुढच्या समस्या टळतात.

3)दातांमधील कीड काढून सिमेंट भरल्यावर दात पुन्हा कीडत नाहीत:

दातांमधील कीड काढून त्यात सिमेंट (restoration) भरले जाते पण त्यानंतर जर तोंडाची व दातांची चांगली स्वच्छता नाही ठेवली तर दात पुन्हा किमी शकतात कारण दातांमध्ये सिमेंट जरी भरलेले असले तरी दातांमधील नसा आणि रक्तवाहिन्या जिवंत असतात त्यामुळे रोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे आवश्यक आहे. 

4) दुधाचे दात आपोआप पडून नवीन येणारच असतात, त्यामुळे दुधाच्या दातांची निगा राखणे आवश्यक नाही

दुधाचे निरोगी दात हा पक्या दातांचा पाया असतो. अलीकडे लहान मुले फास्ट फूड, चॉकलेट अति प्रमाणात खातात त्यामुळे त्यांचे दात लवकर किडतात.दात किडल्यामुळे मुलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात तसेच दात किडल्यामुळे मुलांना नीट जेवणही करता येते नाही. यावर सोपा उपाय म्हणजे दुधाचे दात आल्यावर पालकांनी दातांची व तोंडाची स्वच्छता ठेवण्यासाठी काळजी घ्यावी. मुल थोडेसे मोठे झाल्यावर त्याला सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी ब्रशने दात घासण्याची सवय लावावी. 

5) ब्रश वापरल्यामुळे हिरड्यांमधून रक्त येते:

हिरड्यांमधून रक्त येणे हे पायोरिया या दंतरोगाचे लक्षण असू शकते. दातांची चांगली स्वच्छता न केल्यामुळे दातांभोवती calculus चा थर जमा होतो. पायोरिया होण्यासाठी calculus चा थर कारणीभूत ठरतो. Calculus साचल्यामुळे हिरड्या सुजतात व लालसर आणि सैल होतात, अशा हिरड्यांवर ब्रश फिरविला की रक्त येते, म्हणून रुग्णाला ब्रश वापरणे सोडून द्यावा वाटतो अशावेळी ब्रश ऐवजी बोटांनी दात घासले तर हिरड्यांमधून रक्त येणार नाही पण  calculus चा थर बोटांनी स्वच्छ होत नाही, अशावेळी डेंटिस्ट कडे जाऊन दात व हिरड्यांची तपासणी करून घेऊन गरज असल्यास दातांची स्वच्छता (scaling) करुन घेणे गरजेचे आहे. हिरड्यांवरील calculus चा थर काढून टाकल्यावर ब्रशने दात घासता येतात. 

6) गरोदर स्त्रीने दातांचे उपचार टाळावेत:

गरोदर स्त्रीने गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत दात स्वच्छ करून घेणे, दातात सिमेंट भरणे असे प्राथमिक उपचार करून घेण्यास हरकत नसते. एक्स रे काढणे, दात काढणे तसेच गोळ्या औषधे घेणे शक्यतो टाळावे. गरज असेल तर आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊन ठरवावे. गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या तिमाहीत मात्र दातांमधल  उपचार आणि औषधे टाळावीत. 

 

​​​