नाजूक विषय

Problems that a girl faces in society

नाजूक विषय

मैत्रेयी ही मनोज व मनिषा या दोघांची एकुलती एक लेक. मनोज व मनिषा दोघेही उच्चशिक्षित व सरकारी नोकरीत क्लास वनच्या पदावर कार्यरत होते.

सगळं आयुष्य कसं साचेबद्ध होतं. मैत्रेयीच्या लहानपणी मैत्रेयीला पाळणाघरात ठेवून ती दोघं ऑफिसला जायची. पाळणाघरातल्या मावशींकडेच तिचा नाश्ता व्हायचा. तिथून ती स्कुलबसने शाळेत जायची. शाळेतून आली की मावशींकडेच जेवण व त्यानंतर मावशीच्या मुलीजवळ ट्युशन. संध्याकाळी मावशीची मुलगी मैत्रेयीला तिच्या घरी सोडून यायची.

 होमी भाभा,शिष्यवृत्ती..अशा सर्वच परीक्षांना मैत्रेयीने बसून त्यात अव्वल आलं पाहिजे हा तिच्या मम्मीपप्पांचा आग्रह होता त्यामुळे संध्याकाळची भाजीपोळीही त्यांची बाई एकदा सकाळीच करून जायची. मनिषा संध्याकाळी आली की मैत्रेयीला अभ्यासाला घेऊन बसायची. अगदी रात्रीपर्यंत अभ्यास..एकच ध्यास..सर्व परीक्षांत अव्वल येणं..बास..निकालाच्या दिवशी मनिषाच्या मैत्रिणींमधे मनिषाची कॉलर टाईट असायची.

मैत्रेयी वयात आल्यापासून तिला तिच्या शारिरीक अवयवांच आकर्षण वाटू लागलं,जे साहजिकच होतं. आरशात पहाणं,स्वतःशीच हसणं,लाजणं,गिरकी घेणं,गुणगुणणं हे इतर मुलींसारखच मैत्रेयीबाबतही घडू लागलं पण त्यामुळे अभ्यासाकडे झालेलं दुर्लक्ष तिच्या मम्मीपप्पांना मान्य नव्हतं. 

मैत्रेयी दहावीत गेली तेव्हा तर तिच्यावरची बंधनं अधिकच वाढली होती. मैत्रेयीलाही आता पहिल्या,दुसऱ्या नंबरची चट लागल्याने तीही जीव तोडून अभ्यास करायची. तिचा दहावीच्या परीक्षेचा निकालही अपेक्षित असाच लागला. मैत्रेयी मनोज मोरे ही १०० पैकी१०० गुण मिळवून शाळेतून पहिली आली होती. मनिषा व मनोजची मेहनत होतीच. तिच्या यशात तिच्या मम्मीपप्पांचा मोलाचा वाटा होता हे तिने सर्व मुलाखतकारांना सांगितल. 

मैत्रेयी आता अकरावी सायन्सला गेली. प्रख्यात महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला. ट्युशनवाल्यांचे तर सतरा फोन..आमच्या ट्युशनमधेच प्रवेश घ्या..मैत्रेयीला ट्युशन फी माफ.. शेवटी एका नावाजलेल्या ट्युशनमधे मैत्रेयीने प्रवेश घेतला. कॉलेजमधेही तिने तिच्याबरोबरीच्या म्हणजे निदान अबोव्ह ९५% वाल्या मुलींशीच मैत्री केली. थोड्याच दिवसांत त्यांचा छान ग्रुप देखील जमला. मनिषा कलाशाखेची पदवीधर होती असल्याने ती आता मैत्रेयीचा अभ्यास घेऊ शकत नव्हती तरी तिच्यावर वॉच मात्र ठेवायची.

मैत्रेयीच्या मैत्रिणी तिला अर्ध्या वाटेपर्यंत सोबत असायच्या. मैत्रेयीचं घर थोडं पुढे असल्याने ती दोन स्टॉप पुढेच उतरे. एकदा असेच भर पावसाचे दिवस होते. मैत्रेयी बसस्टॉपवर आली. पाच दहा मिनटं गेली असतील..तिच्या कॉलेजच्या दिशेला जाणारी बस आली. मैत्रेयी बसमधे चढली. तिकिट काढलं. एक स्टॉप गेल्यावर तिला बसायला जागा मिळाली. ती काही फॉर्म्युले वाचत बसली.

 तिचा स्टॉप जवळ आला तसं ती ड्रायव्हरजवळच्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली. पाठीमागे एकदोघं उतरणारी होती. बस जरा स्लो झाली..आता थांबणार तोच पाठीमागच्या एका छपरी पोराने तिच्या छातीचा गोल उभार जोरात आवळला. मैत्रेयीला क्षणभर काहीच कळले नाही..मात्र त्याने नाजूक अवयवाला काढलेल्या चिमट्याने ती अक्षरशः कळवली.ती काही रिएक्ट व्हायच्या आत तो बसमधून उडी टाकून दिसेनासा झाला.

 पाठच्या व्यक्तीने पाहिलं असावं पण तो किंवा ती काहीच रिएक्ट झाली नाही कारण मैत्रेयी त्यांची कोणच नव्हती(उगाच कशाला लोकांच्या भानगडीत पडा अशी प्रव्रुत्ती) 

मैत्रेयी कशीबशी बसमधून उतरली. तिच्या उरोजाचा ठणका थांबला पण तिच्या कोवळ्या मनाला फार मोठी जखम झाली होती. ती कॉलेजच्या वॉशरुममधे जाऊन खूप रडली. मैत्रिणी सगळ्याच अभ्यासू..त्यात कसलीतरी टेस्ट असल्याने मैत्रेयीची नाराजी कोणाच्याही लक्षात आली नाही. 

मनिषाशी मैत्रेयीचं नातं आताशा केवळ अभ्यासापुरतच होतं. आज कोणता पेपर होता??उद्या कोणता आहे??चल अभ्यासाला उठ..किती मार्क्स मिळाले??हाययेस्ट कोणाला??तुला तिच्यापेक्षा कमी का??तुझं काय चुकलं??कसं चुकलं??लक्ष कुठं असतं?चुका करुन चालणार नाही..पुढच्या वर्षी नीट द्यायचीय,स्कोर चांगलाच आला पाहिजे..तुला मेडीकलला एडमिशन मिळालं की आम्ही सुटलो..बास यापलिकडेही जग असतं,मुलांना वेगळं भावनिक मन असतं,त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतात,त्यासाठी आधी त्यांच्याशी भावनिक नातं तयार करावं लागतं हे मैत्रेयीच्या मम्मीपप्पांच्या गावीही नव्हतं. 

मैत्रेयीला त्या रात्री स्वतःचीच फार घ्रुणा वाटली. फारच दुर्बल,अगतिक,असहाय्य वाटलं तिला. अजून काही दिवसात ती तो प्रसंग विसरुन गेली,विसरुन गेली म्हणण्यापेक्षा तो प्रसंग तिच्या मन:पटलावर कोरला गेला पण त्यातून ती सावरली व नेटाने अभ्यासाला लागली.

 अकरावीच्या पहिल्या सत्रात ती वर्गात दुसरी आली. मनिषा व मनोजने तिला अजून अभ्यास वाढवायला हवा असं सांगितल.  ती एकदा  कॉलेजला जाताना नेमकं तिच्या सँडलचा पट्टा तुटला. तो पट्टा ती मोचीकाकांकडू न नीट टाचून घेईस्तोवर बस निघून गेली. प्रेक्टीकल असल्यामुळे वेळेवर पोहोचणं गरजेचं होतं.

 तिने रिक्षा पकडली. रिक्षेत तिच्या बाजूला एक छपरी पोरगा गोवा खात बसला होता. रिक्षा कॉलेजच्या दिशेने जाऊ लागली तसा त्या पोराने एक हात पाठीमागे मैत्रेयीच्या खांद्यांना स्पर्श करेल असा ठेवला. मैत्रेयी तिथून बाजुलाही सरकू शकत नव्हती. तो तिच्या अगदी जवळ बसला होता.

 मैत्रेयी प्रतिकार करण्यास असमर्थ असल्याचं जाणवताच त्याची हिंमत अजुन वाढली. त्याने हाताचा पंजा तिच्या उजव्या वक्षस्थळाकडे न्हेला व तिच्या ओढणीआडल्या उरोजाला किळसवाणे स्पर्श करु लागला. 

मैत्रेयीने रिक्षावाल्याला रिक्षा थांबवण्यास स़ागितलं व अर्ध्या वाटेतच उतरली. घामाने ओलिचिंब झाली होती ती. तिला तिच्याच देहाचा किळस येत होता. ती डोळे पुसत चालत होती तोच तिच्या जवळ तिच्याच वर्गातली दिव्या आली.

"का गं,मैत्रेयी काही झालंय का? अशी उदास का बरं? चल कॉफी घेऊ आपण."
मैत्रेयी खरंतर दिव्याशी कधी जास्त बोलायची नाही कारण मम्मीने वळणच तसं लावलेलं तिला,हुशार मुलींशीच मैत्री करायचं.

 दिव्या एक सामान्य बुद्धिमत्त्तेची विद्यार्थिनी होती.. पण आज मैत्रेयीला ती फार जवळची वाटली. कॉलेजच्या कँटीनजवळ कॉफी घेऊन त्या तिथल्याच गार्डनमधल्या बेंचवर बसल्या. अर्थातच पहिला पिरियड बंक मारला.

"दिव्या,ही मुलं असं का करतात गं? मुलींच्या अवयवांना नको तिथे हात लावतात येताजाताना."
दिव्या म्हणाली,"एक सणकन मुस्काटीत मारायची,कॉलर पकडायची साल्याची. कोण तो***नाव सांग मला. लोळवते त्याला."
"अगं दिव्या,कोणतरी एक असेन तर सांगेन. येताजाताना असे कितीतरी लांडगे भेटतात गं ज्यांना स्त्रीदेह म्हणजे सावज वाटतो. त्यांच्या विखारी नजरा,अचकट विचकट शेरे,किळसवाणे स्पर्श..असह्य होतय मला हे सारं. बरं कोण माझ्याशी असे बिभस्त चाळे करु लागलं तर मला जाम भीती वाटते,माझ्या तोंडातून शब्दही फुटत नाही. माझा देह तिथल्या तिथे थिजतो."

"दिव्या,माझं ऐकशील. आमच्या कॉलनीत बेसमेंटमधे एक सामाजिक संघटना मुलींना स्वसंरक्षणासाठीचे खास धडे देते. त्यांच्यामधला आत्मविश्वास जाग्रुत करते,कोणी अंगाला हात लावायला आलं तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्या पोराच्या नेमक्या कोणत्या जागी मारायचं याचं प्रशिक्षण देते तेही विनामूल्य. तू नक्की ये."
"थँक्स दिव्या,मी मम्मीपप्पांना सांगून रोज संध्याकाळी येत जाईन," मैत्रेयी म्हणाली
मग दोघी क्लासरुमकडे वळल्या.

 संध्याकाळी मैत्रेयी मम्मीपप्पांना दिव्याबद्दल व त्यांच्या कॉलनीत एनजीओ देत असलेल्या प्रशिक्षणाबाबत बोलली पण दोघंही संमती देईनात. शेवटी वैतागून ती तिच्या खोलीत गेली व तिला लहानपणी सांभाळणाऱ्या मावशीला तिने फोन करुन रडतरडत सारी कहाणी सांगितली.

मावशीने दुसऱ्यादिवशी मैत्रेयीच्या मम्मीपप्पांना जरा घरी येऊन जाण्यास सांगितलं. अर्थात मावशीचे त्यांच्यावर उपकार होते कारण मैत्रेयीला मावशींनी त्यांच्या पोटच्या लेकीसारखं सांभाळलं होतं.  मनोज व मनिषा संध्याकाळी मावशीकडे गेले. मावशीने त्यांना मैत्रेयीबाबत घडलेल्या साऱ्या घटना सांगितल्या.

मनिषा म्हणाली,"एकाच छताखाली रहातो आम्ही पण पोर कधी बोलली नाही हो हे सगळं आम्हाला. आम्ही का वैरी आहोत तिचे!"
मावशी म्हणाल्या,"मी अर्धशिक्षित बाई पण अनुभवाच्या शाळेतून तावूनसलाखून निघालेय हो. मुलीचा अभ्यास घ्याच तुम्ही पण त्याचबरोबर या जगात असणाऱ्या विक्रुतींशी वेळ आल्यास दोन हात करण्याचं शिक्षण देणंही तितकच निकडीचं आहे.  अभ्यास तिचा ती करेलच पण तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की ती प्रसंगी स्वदेहाचं तसंच तिच्या सोबतच्या मैत्रीणींचही रक्षण करु शकेल. हावरट लांडगे जवळ येताक्षणी तिच्या नजरेतल्या आगीनेच त्यांची फाटली पाहिजे. 

मनिषाने मावशींना गच्च मिठी मारली. दोघांनीही मावशीचे धन्यवाद मानले.
मैत्रेयी रात्री झोपायला आली तसं मनिषाने तिला जवळ बोलावलं व म्हणाली,"मनू,मी चुकले गं. तुझ्या मनात चाललेली खळबळ ओळखू नाही शकले पण यापुढे नाही असं होऊ देणार आम्ही. तुला काहीही अडचण आली तर आमच्याशी शेअर करत जा. उद्या आम्ही दोघंही तुला त्या प्रशिक्षण संस्थेत सोडायला येऊ.
मैत्रेयीने मनिषाला कधी नव्हे ती गच्च मिठी मारली.

*********
नमस्कार, या कथेतील मैत्रेयी ही प्रातिनिधिक आहे. 
अशा कितीएक मैत्रेयी आहेत कि ज्यांना दिव्यासारखी मैत्रीण मिळत नाही. आपल्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या विखारी नजरा या मुली मुकपणे सहन करतात. 
मुलींना पुस्तकीशिक्षणाच्या जोडीनेच स्वसंरक्षणासाठी ट्रेनिंग दिलं पाहिजे..भले त्यासाठी थोडा वेळ खर्ची होवो..थोडे टक्के मागेपुढे होवोत पण तिला स्वत:चा बचाव करता आला पाहिजे.
परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मुलांनाही(बॉइज) स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आपल्याला मुलगा आहे म्हणून आपण निर्धास्त असं म्हणायचे दिवस गेले. मुलांमधे मुलींबद्दल आदर हा निर्माण करण्यासाठी तसे संस्कार हे केले गेले पाहिजेत. आपली मतेही अवश्य कमेंटमधे लिहा.

------सौ.गीता गजानन गरुड