दैवगती (भाग - १)

दैवगती ( भाग १)

कथामालिका -  दैवगती  ( भाग - १ )

विषय - कौटुंबिक कथा.


आजी...ए आजी मालू कुठे आहे गं...

\" अव थे गेली शेड्ड्या (बकऱ्या ) घेऊन .त्याईले चाराले न्या...

लागते नां तिले जंगलात \"

अग आजी, शाळेची वेळ झाली बघ. कधी येते ती ?

सुषमा व मालू दोघीही एकाच वर्गात. त्यामुळे दोघीही मैत्रिणी.

सुषमा रोज मालूला शाळेत जाताना बोलवायची. रोजचाच

ठरलेला हा दिनक्रम.

मालू ची आई , मालू अगदी लहान असतानाच वारली.

तिच्या वडिलांनी लगेच दुसरे लग्न केले. पण ही नवीन आई

मालूला खूप त्रास द्यायची. म्हणून तिची आजी तिला आपल्या घरी

घेऊन आली. गरिबीची परिस्थिती. छोटेसे झोपडीवजा घर.

आता तिथेच मालू आपल्या आजी आजोबांसोबत राहू लागली.

आजीच्या घरी चार-पाच शेळ्या होत्या. त्यांना रोज सकाळी..

चरण्यासाठी जंगलात घेऊन जाणे हा मालूचा नित्यक्रम.

तिकडून आली की आंघोळ, जेवण करून ती शाळेत जायची.

सुषमा आणि मालू तेव्हा ना चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या.

सुषमा ज्या रस्त्याने जायची त्या रस्त्यानेच मालू चे घर होते.

मग दोघी मिळून शाळेत जायच्या. कधी कधी तर मालूला

शेळ्या घेऊन यायला उशीर सुद्धा व्हायचा. बिचारी कधी

न जेवता शाळेत यायची.

पण कधी सुषमाला सुद्धा तिने ते माहित पडू दिले नाही.

मग दुसऱ्या दिवशी सुषमाला तिची आजी सांगायची.

\" अव सुषमे, काल तं मालू न जेवताच शायेत गेली वं.\"

काय तर मने उशीर झाला.


सुषमाचं मन मात्र कळवळायचं. मग ती स्वतःच्या खाऊतला..

खाऊ मालूसाठी आणायची. तिला प्रेमाने द्यायची.शाळेतून

घरी आल्या आल्या मालूला शेळ्यांचा चारा आणायला जावे लागे.

कधी कधी तर सुषमा सुद्धा घरी आईला न सांगता मालू सोबत

जायची. मालू तिला  \"सुषमा तू नको येऊ बरं माझ्यासोबत.

उगाच आई रागवेल तुला.\"

सुट्टीच्या दिवशी मग सुषमा मालिशी गप्पा मारत बसायची.

मालू मग सुषमाला मनातल्या गोष्टी सांगायची. \"अग सुषमा..

आईची खुप आठवण येते गं मला.\"कां गं मला एकटीला..

सोडून ती निघून गेली.\"सुषमा तिची एखाद्या मोठ्या मुलीप्रमाणे

समजूत काढायची. अगं माझी आई वारल्यावर बाबांनी दुसरे

लग्न केले. नवीन आई घरात आली. पण ती मला घरातली

सगळी काम करायला लावायची. बरेचदा शाळेत जायला सुद्धा

उशीर व्हायचा.मॅडम रागवायच्या. असंच एक दिवस मी शाळेतून 

घरी आली. शाळेत दिलेला गृहपाठ करण्यासाठी बसली.तर

लगेच आई तिथे आली. \" एक माले फेक ती वही न् पुस्तक

तिकडे. काम काय तुझा बाप करणार काय?\"

खूप रडायला यायचं पण रडताही येत नव्हतं. घरी आल्यावर

बाबांना सांगायचं तर उलट बाबाच मला रागवायचे.

आधी माझ्यावर एवढं प्रेम करणारे माझे बाबा कां गं एवढे..

बदलले असतील. सांगताना मालूचा कंठ दाटून यायचा.

सुषमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी यायचे.


काही महिन्यांनी माझ्या नवीन आईला मुलगा झाला,

मला भाऊ झाला. त्यानंतर तर माझ्या मागची काम आणखीनच

वाढली. सकाळी उठल्यापासून शाळेत जात पर्यंत फक्त काम

आणि कामचं. त्यानंतर घरी आल्यावरही तेच. एक दिवस तर

माझ्या तो तान्हा भाऊ अचानक पाण्यातून पडला. तेव्हा तर

माझ्या आईने मला एवढं मारलं आणि वरून उपाशी सुद्धा ठेवलं.

तिचं म्हणणं होतं की तूच त्याला पाडलं. वाटायचं कुठेतरी

निघून जावं. पण जेव्हा ही गोष्ट आजीला कळली(आईची आई )

तेव्हा ती मला इथे घेऊन आली. आता आजी कडून काही होतं..

नाही. आजोबा तर माझी आई गेल्यापासून आजारीच असतात.

त्यामुळे शेळ्यांना बघणे, तसेच इतरही कामे करावी लागतात.

एवढ्यात मालूच्या आजीने तिला आवाज दिला. \"माले चहा

कर वं. \"तशीच मालू उठून आत गेली.


मालू अभ्यासात हुशार होती. चित्रही छान काढायची. रांगोळी

तर अप्रतिम काढायची. एकदा शाळेत रांगोळी स्पर्धा होती.

सुषमा ने मालूला या स्पर्धेत भाग घेण्यास आग्रह केला.

आणि तिची सुंदर रांगोळी बघून सर्वजण चकित झाले. अर्थातच

रांगोळी स्पर्धेत मालूने प्रथम क्रमांक पटकावला. पण घरी..

कौतुक कोण करणार? आजीला तर यातले काहीच कळत नव्हते.

म्हणतात ना एखाद्याच्या नशिबी वनवासच लिहिलेला असतो.

एक दिवस तिचे आजोबा सुद्धा देवाघरी गेले. आजीचा व..

मालू चा आधारच तुटला. हळूहळू आजीची तब्येतही खंगू..

लागली. ती मनातल्या मनात मालूची चिंता करायची. तसे

बोलून सुद्धा दाखवायची. \"तुह्या बापाले तर तुही काई 

कदरच नाही. \"  \" माह्य तर बाई आता काई खरं नाही.\"

ऐकून मालू आणखीनच रडवेली व्हायची.


अशा रीतीने मालू वर्ग 10 ची परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाली.

सुषमाला सुद्धा चांगली गुण मिळाले. आजीच्या गावात वर्ग १०

पर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावं लागे.

सुषमा तिच्या आत्याकडे शहरात शिकायला गेली. दोघी मैत्रिणी

आता वेगवेगळ्या झाल्या. जाताना सुषमाला रडू आवरेना.

पण इलाज नव्हता. मालू मात्र पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही.

आजीलाही बरं नसायचं आणि परिस्थिती ही नव्हती.


दोन- तीन वर्ष अशीच गेली. आता आजीला मालूच्या लग्नाची

काळजी वाटू लागली. आपल्या नंतर तिचे काय होईल त्यापेक्षा

तिचे लग्न करायचे असे मालूच्या आजीने ठरवले.

खरंच गरीबी हा एक शाप आहे. कारण गरीब घरात जन्म झाला

तर मुलांना गरिबीच्या झळा सोसाव्या लागतात.त्यांचे आयुष्यचं.

जणू कोमेजून जाते. मालू दिसायला देखणी. अभ्यासात हुशार.

इतरही कलेत ती पारंगत. पण म्हणतात ना \" सारी सोंगे..

आणता येतात पण पैशाचे नाही. \" शेवटी एका बऱ्यापैकी

घरात मालू चे लग्न ठरले. गावातील सहृदय मंडळींनीही

आपापल्या परीने त्यांना मदत केली. सुषमा सुद्धा आवर्जून

लग्नाला हजर होती. अशा तऱ्हेने मालूचे लग्न अगदी साध्या

समारंभात पार पडले. आजीचा तर पुन्हा एकदा आधारच तुटला.

आजीच्या गळ्यात पडून मालू हमसून हमसून रडत होती.

ते पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. मालू चे...

वडील तर लग्नालाही हजर नव्हते. काय म्हणावे अशा लोकांना..

लग्नाला आलेला प्रत्येक जण हेच म्हणत होता. पण या क्षणी

फक्त आजीचं तिचा सर्वस्व होती. शेवटी जड अंतकरणाने

तिने आजीचा निरोप घेतला.

अशा तऱ्हेने मालूच्या जीवनाचा एक अध्याय संपला

व दुसरा सुरू झाला.


कथा मालिकेचा दुसरा भाग अवश्य वाचा.

सौ. रेखा देशमुख 

टिम- अमरावती