देहमुक्ती (भाग ३)

देहाला मुक्ती मिळते
देहमुक्ती (भाग ३)

हे नवीन घर दोघांनाही चांगले लाभले होते. इथे रहायला आल्यावर परत विनयचा पगार वाढला. शिल्पा इतके दिवस गप्प होती, पण तिने यावेळी विनयला गादी आणि दोन उशा घ्यायला लावल्या. सतरंजी वर झोपून तिची पाठ दुखत होती. फरशीचा गारवा विनयला ही सहन होत नव्हता. हळूहळू करत त्यांच्या घरी उपयोगाच्या वस्तू येऊ लागल्या. चार चांगली भांडी, गादी,कपाट, एक छोटस टेबल, कुणी आले तर बसायला दोन खुर्च्या. हळूहळू घर सजू लागले. लग्न झाल्यावर चार वर्षांनी यावर्षी दोघांनी ही दिवाळी साजरी करायचे ठरवले. इतके वर्ष शेजारी पाजारी काही जाणवू न देता त्यांची दिवाळी साजरी होईल हे बघत होते. शेजारच्या लोकांनी कधीच त्यांना काही जाणवू दिले नाही. सगळे त्यांच्यावर आई वडील, भाऊ बहीणी सारखी माया करत होते. शिल्पा आणि विनयही होईल तशी त्याची परत फेड करणार होते. शिल्पाने नोकरी सांभाळून जमेल तसे फराळाचे केले. विनयने सुट्टीच्या दिवशी घर रंगवले. आकाश कंदील लावला. पाडव्याला विनयने शिल्पाला सरप्राईज दिले. पहिल्यांदाच शिल्पाच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र आले. शिल्पाला गहिवरून आले. ती विनय च्या गळ्यात पडून राहिली. शिवाय विनयने तिला साडी ही घेतली होती. आता बरेच दिवसांनी त्यांच्या घरात सुख नांदायला आले होते.

या घरातल्या शेजारच्या लोकांशी पण विनय शिल्पाची चांगलीच गट्टी जमली होती. शेजारची अवनी काका म्हणून विनयच्या गळ्यात येऊन पडायची. तिच्या बोबड्या बोटांनी, अलवार हास्याचे, घरभर बागडण्याने यांच घर आनंदाने भरून जायचं. संध्याकाळी दोघे घरी आले की ती ह्यांच्या घरीच असायची.

हळूहळू शिल्पाला ही बाळाची ओढ लागली. ती विनयला म्हणाली, " विनय, मलाही एक गोंडस बाळ हवयं. "
" मलाही बाळ खूप हवयं. पण अजून योग्य वेळ नाही आली ग. अजून थोडे पैसे थांब. तुझा गर्भारपणाचा खर्च, बाळंतपणाचा खर्च, नंतर बाळाचा खर्च ह्या सगळ्यासाठी पैसे हवेत ना. आता आपण तुझा सगळा पगार बाजूला टाकून पैसे जमा करू. माझ्या पगारात आपण आनंदाने राहू. मग चान्स घेऊ. "
शिल्पा नोकरी शिवाय रोज घरी शिकवण्या घेऊ लागली. विनयही संध्याकाळी एक्सट्राॅचे काम करून जास्त पैसे मिळवू लागला. बघता बघता दोन अडीच वर्ष भूरकन उडून गेली.

एक दिवस सकाळी सकाळी शिल्पाला खूप मळमळायला लागले. तिची पाळी ही चुकली होती. तिला वाटल गोड बातमी असेल. दोघे डॉ. कडे गेले. गोड बातमी ऐकून दोघांचाही आनंद गगनात मावेना. विनय तर हसून हसून ही गोष्ट सर्वांना सांगत सुटला होता. शिल्पाचे डोहाळे थोडे अवघड होते. पण ती स्वतःला सांभाळून नोकरी शिकवण्या करत होती. विनयही घरकामात तिला मदत करत होता. तिची अगदी मनापासून काळजी घेत होता. नऊ महिन्या नंतर एक सोनपरी शिल्पाच्या पोटी जन्माला आली. विनयने आणि शेजारी व मालकीण बाईंनी मिळून शिल्पाचे बाळंतपण नीटनेटके केले. दवाखान्यातून घरी आल्यावर मात्र शिल्पा कामाला उठली पण तरी विनय तिला करू देत नव्हता. पण स्वयंपाकासाठी तिला उठाव लागे.
ह्याच वेळी तिकडे शिल्पाची मोठी बहीण सिंधूचे बाळंतपण लाडाकोडात चालू होते. इतक्या वर्षांनी बाळ झाले म्हणून सगळे जण तिची काळजी घेत होते. ती आईकडेच होती, तरी एकदा हळूच सगळ्यांची नजर चुकवून आई आणि उमेश येऊन शिल्पा आणि बाळाला भेटून गेले. उमेश नी भाचीसाठी छान चांदीचे पैंजण आणले होते. आईने झबले टोपडे आणि लाडू. सध्या उमेशचे चांगले चालले होते. बर्यापैकी नोकरी होती. तिसऱ्या महिन्यात शिल्पाने छान बारसे केले. तिचे नाव "परी" ठेवले. परी म्हणजे आई बाबांच्या गळ्यातील ताईत झाली. तिची प्रत्येक प्रगती त्यांनी लहान होऊन अनुभवली. तीचे वळणे, पालथे पडणे, रांगणे, तिचा प्रत्येक पहिला उच्चार सर्वकाही. बघता बघता परी तीन वर्षांची होऊन शाळेत जाऊ लागली.

शिल्पाने नोकरी कधीच सोडली होती. शिकवण्या मात्र घेत होती. आता विनयची परिस्थिती ही मजबूत होती. विनयच्या डोक्यात स्वतःचे घर घ्यायचे विचार घोळत होते. पण कर्जाचा हप्ता परवडेल की नाही हा मोठा प्रश्न होता. शिल्पाने त्याचे विचार उचलून धरले. " मी आणखीन शिकवण्या घेईन. पहिल्या सारखी आपल्या दोघांपुरती काटकसर करू. पण घेऊया स्वतःचे घर. " शिल्पा म्हणाली. सर्व प्रोसिजर होऊन घराचे सगळ फायनल होईपर्यंत पाचसहा महीने निघून गेले. एका काम चालू असलेल्या अपार्टमेंट मधे त्यांनी घर बूक केले होते. एक वर्षांनी ताबा मिळणार होता. दोघे जण नवीन घरात रहायला जायची स्वप्न पहात होते.

एक दिवस अचानक शिल्पा घरात चक्कर येऊन पडली. दोन तीन दिवस तिची डोकेदुखीची तक्रार होती. नेमकी परी आणि ती दोघीच घरात होत्या. परीने घाबरून रडत जाऊन शेजारच्या आजीना बोलवून आणले. शेजार्यांनीच डॉ. ना बोलवले. डॉ. नी तपासले. पण ते म्हणाले काय नक्की सांगता येत नाहीये. B. P. Pulse सगळे नाॅर्मल आहे. पण एकदा तपासणी करून घ्या सगळी म्हणाले. विनय नेमका ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता.
त्याला यायला अजून चार दिवस होते. शिल्पाने त्याला काहीच कळू दिले नाही. गावाहून आल्यावर पण तिने स्वतः हून काहीच सांगितले नाही. जेव्हा परीने सांगितले, " बाबा, आई पडली. मी खूप घाबरले. तेव्हा तिने सर्व सांगितले. विनयने लगेच दुसऱ्या दिवशी डॉ. अपाॅंईंटमेंट घेतली. आठ दिवसात सर्व चाचण्या झाल्या. आणि त्यांच्या नशिबाने त्यांना इथेही साथ दिली नाही. शिल्पाला ब्रेन कॅन्सर डिटेक्ट झाला. ती आता थोड्याच दिवसांची सोबती होती. विनयच्या आयुष्यात आणखी एक वादळ आले पण हे काहीच तो कुणालाच सांगू शकत नव्हता. त्याने खूप विचार केला. त्याला आता शिल्पाला जास्तीत जास्त आनंदात ठेवायचे होते. तो रोज तसा प्रयत्न करी. एक दिवस विचार करून तिच्या सर्व मैत्रिणींना घरी बोलवले. त्यांचा दिवस फार आनंदात गेला. मग तो परी आणि शिल्पाला घेऊन पिकनिकला गेला. एकदिवस तो तिच्या आईवडिलांना भेटायला गेला. ठरल्याप्रमाणे तिथे त्याचा अपमान झाला. पण तरीही तो थांबला. उमेश आणि नाना व आईंना त्याने सर्व काही सांगितले. म्हणाला, " तिला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तुम्ही घरी आलात तर तिला आनंद होईल. " दुसऱ्या दिवशी आई, नाना उमेश सगळेच आले. शिल्पाला आनंद झाला पण कमालीचे आश्चर्य वाटले. नाना आले म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. नाना असे येणार नाहीत. सगळे तिला भेटले. खूप गप्पा मारल्या. आईचे डोळे सारखे भरून येत होते. नानांचा चेहराही उदास होता. उमेश हसत होता पण त्याच्या हास्यातली कारूण्याची किनार तिला जाणवत होती. त्यात सगळे परत जाताना तिने" काळजी घे तिची" हे आईचे वाक्य ऐकले. आणि तिने विनयला विचारले. " नक्की काय आहे विनय, काय झालं आहे मला? " विनय सांगत नव्हता पण तिने परी ची शपथ घातली. आणि त्याला सांगावेच लागले. आधी तिला वाटलं विनय आपली चेष्टा करतोय पण मग तिने स्वतःला सावरले आणि विनयला ही. पण केमो, रेडिएशन काही घ्यायला तिने नकार दिला. ती विनयला म्हणाली, " केमो, रेडीएशनमुळे माझी अवस्था आणखी बिकट होईल ते तुलाही बघवणार नाही आणि आपली परी तर अजून खूप लहान आहे. फक्त तू एकच कर विनय, माझ्यानंतर आपल्या परीला नीट सांभाळ. तिला आईची उणीव भासू देऊ नकोस. आणि स्वतःला जप, काळजी घे. " विनय तिच्या कुशीत शिरून खूप रडला. म्हणाला, " मला साताजन्माची सोबत करणार होतीस ना? मग इतक्या लवकर का निघालीस मला सोडून? मी कुणाकडे बघून जगू कसा राहू तुझ्याशिवाय? इतक प्रेम दिवस तू मला. माझ्या सख्ख्याबापाने सुद्धा मला कधी विचारले नाही. तू मात्र तुझे अख्ख आयुष्य माझ्यासाठी वेचलसं. नको ना जाऊ शिल्पा प्लीज. "

काही दिवसांनी तिची तब्येत खूपच बिघडली आणि एकदिवस विनय जवळ असताना आणि परीचा हात हातात घेऊन ती हे जग सोडून गेली.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all