देहमुक्ती (भाग २)

देहाला मिळाली मुक्ती

देहमुक्ती (भाग २) 

इकडे सुधाचे लग्न ठरले. ती आनंदात होती. पण ती विचित्र वागत होती. सारखे विनय आणि तिच्या होणाऱ्या नवर्याची कंपॅरिझन करत होती. सिमा आणि शिल्पाला ती त्याच्या समोर सुद्धा येऊ देत नव्हती. सुधाचे लग्न झाले पण विनय तिच्या लग्नाला गेला नाही. त्याच दिवशी त्याचा कॅम्पस इंटरव्ह्यू होता. आणि त्यात त्याला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. तो पेढे घेऊन नानांना पेढे द्यायला आणि नोकरी लागल्याचे सांगायला गेला, पण नानांनी त्याला घरातून हाकलून लावले. त्यानी आणलेले पेढे अंगणात फेकून दिले. शिल्पाने ते पेढे उचलले आणि गुपचूप घरात गेली. तो अपमान सहन करून निघून गेला.
इकडे सिमाचाही टेलीफोन ऑपरेटरचा कोर्स झाला आणि तिला चांगली नोकरी मिळाली. नानांनी सिमा आणि शिल्पा दोघींनाही स्थळ बघायला सुरुवात केली. एका स्थळाकडून शिल्पाला होकार आला आणि नाना लग्न ठरवायच्या तयारीला लागले. शिल्पा परोपरीने नानांना सांगत होती" माझे विनयवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. " पण नानांनी ऐकले नाही. शेवटी विनय आणि शिल्पाला पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घ्यावा लागला.
एक दिवस शिल्पाला घरी यायला उशीर झाला. सगळेजण तिची वाट पहात होते. नानांनी तिचे लग्न ठरवायला पाहुण्यांना बोलावले होते. बराच उशीर झाल्यावर उमेश तिला बघायला गेला. तिचे ऑफिस बंद होते. आणि शेजारच्या ऑफिसमधल्या मुलींनी सांगितले की आज शिल्पाचे ऑफिस उघडले नाही. उमेशला टेन्शन आले. तो घरी जाईपर्यंत शिल्पा विनयसह घरी आली होती. ती दोघे लग्न करून आली होती. नानांचा पारा चढला होता. ते दोघांनाही खूप अध्वातध्वा बोलत होते. स्वतःच्या नशिबाला दोष देऊन कपाळ बडवून घेत होते. आईच्या गळ्यात पडून शिल्पा रडत होती. बाबा आईलाही बोल लावत होते. शेवटी विनयने जवळ जाऊन आईला नमस्कार केला व शिल्पाला घेऊन गेला.

विनयची आई तो लहान असतानाच गेली. बाबांनी दुसरे लग्न केले. ती सावत्र आई विनयला फार त्रास देई. आणि विनयचे बाबा तिच्या आहारी गेले होते. त्यामुळे विनयच्या घरी जायचा काही प्रश्नच नव्हता.

शिल्पा आणि विनयने आधीच एक घर बघून ठेवले होते. एकच रूम होती, पण आत्ता त्यांना तेच परवडणारे होते. विनय आणि शिल्पा घरी जाईपर्यंत विनय च्या मित्रांनी तिथे थोडे सामान नेऊन ठेवले होते. दोघांचा संसार आता नव्याने सुरू होणार होता. घरी पोचल्यावर सर्व मित्रमंडळींनी त्यांचे स्वागत केले. त्याना चार घास प्रेमाने खायला लावले. व मगच सगळे आपापल्या घरी गेले.
दोघही खूप थकले होते. तरी बराच वेळ गप्पा मारत बसले. घरात एकच सतरंजी होती आणि एक चादर. ती सुद्धा मित्रांनी दिलेली. ती सतरंजी पसरून दोघे त्यावर आडवे झाले. बोलता बोलता दोघांना कधी झोप लागली कळलेच नाही. दुसरे दिवशी उठून दोघांनाही कामावर जाणे भाग होते. रजा मिळणे शक्य नव्हते. कामावर जाताच दोघानीही आपण लग्न केल्याची बातमी ऑफिस मध्ये सांगितली. विनयच्या ऑफिस मधल्या मित्रांनी त्याला भेट म्हणून काही कॅश दिली तर शिल्पाच्या बाॅसने तिला संसार उपयोगी काही भांडी दिली. विनय आणि शिल्पाचा संसार असा सुरू झाला. तोडक्या मोडक्या वस्तू गोळा करत, बुटके कप बशी नाही, जेवायला दोन ताटे आहेत, पण वाटी नाही, पाणी प्यायला एकच भांडे, पाणी साठवायला काहीच नाही ना तांब्या, ना कळशी. फक्त भात आमटी चे पातेल होत. पोलपाट लाटणे, तवा चार डबे सगळे विकत घ्यावे लागणार होते. शिल्पाच्या सरांनी ताटवाट्या, पाणी प्यायची भांडी इतक्या गोष्टी दिल्या पण बाकी सारे विकतच आणणे भाग होते. दुसऱ्या दिवशी परत दोघे एकाच सतरंजी वर झोपले. विनयने शिल्पाला अलगद मिठीत घेतले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तिच्या केसांमध्ये आणि पाठीवर त्याचे हात फिरत होते. दोघही मिलनासाठी आतूर झाले होते. पण संयम ठेवणे दोघांनाही भाग होते. दोघेही पटकन बाजूला झाले. असेच करत सहा महिने निघून गेले. विनयने लग्न केलेले विनयच्या बाबांना समजले. ते विनयला भेटायला आले पण विनय त्यांच्याशी एक शब्दही बोलला नाही. शिल्पा ने त्यांचा मान राखून त्यांना नमस्कार केला व त्यांचे यथायोग्य स्वागत केले. जाताना त्यांनी थोडे पैसे आणि विनयच्या आईचा एक दागिना शिल्पाच्या हातात ठेवला. व तिला म्हणाले "यावर तुझा अधिकार आहे. हे दागिने विनयच्या आईचे आहेत. " तेव्हा विनय इतकच म्हणाला, " ह्यापेक्षा मला योग्य वेळी प्रेम दिले असते तर बरे झाले असते. " विनयने ते पैसे आणि दागिने शिल्पाला वापरायचे नाही म्हणून सांगितले. त्याला हातच लावायचा नाही म्हणून सांगितले.
विनयचे वडील येऊन गेले आणि पाठोपाठ शिल्पाची आई आली. तेव्हा शिल्पा घरी नव्हती. विनयने शिल्पाच्या आईचे स्वागत केले. त्यांनी दोघांनाही घरी यायचे आमंत्रण दिले. इतक्यात शिल्पा आली. शिल्पा आईला म्हणाली, " आई तू केंव्हाही इथे ये पण आम्हाला तिकडे बोलवू नको. तिथे विनयचा अपमान होतो. विनयचा मान तोच माझा मान. म्हणून मी तिथे येणार नाही. " आई हिरमुसली.

आज विनयच्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस होता. त्याला प्रमोशन मिळाले होते आणि ते त्याला सगळ्यात आधी शिल्पाला सांगायचे होते. तो तिला सरप्राईज द्यायला तिच्या ऑफिसात गेला. आणि तिथून दोघेही बाहेर फिरायला गेले. तेव्हा विनयने शिल्पाला सांगितले. शिल्पाला अतिशय आनंद झाला आणि रस्त्यातच तिने त्याला मिठी मारली. नंतर दोघांनी खूप एंजाॅय केले. बाहेर जेवण घेतले आणि घरी गेले. तिच सतरंजी घालून त्यावर दोघे पहुडले. विनयने शिल्पाला कडकडून मिठी मारली. त्याचे ओठ तिच्या ओठांची चव घेऊ लागले. त्याचा हात तिच्या अंगावर फिरू लागला. तीही त्याची व्हायला अधीर झाली. दोन भुकेले, प्रेमासाठी आसुसलेले जीव लग्नानंतर एक सव्वा वर्षांनी एक होऊ लागले. खर्या अर्थाने लग्न उपभोगू लागले. पूर्ण शांत झाल्यावर एकमेकाच्या मिठीत विसावले.

आता जरा दोघांचे आयुष्य चांगले चालले होते. चार पैसे बाजूला पडत होते. सुखाची मीठ भाकरी दोघांच्या तोंडात पडत होती. दोघे एकमेकांच्या तोंडी सुखाचे घास भरवत होते. एकमेकांची काळजी घेत होते. एकमेकांना जपत होते.

मधेच त्यांच्या घर मालकांनी त्यांना जागा सोडायला सांगितली. आता परत जागा शोधणे आले. शिल्पा ने नोकरी बदलल्या मुळे तिला रजा मिळत नव्हती. विनय आणि शिल्पाने संध्याकाळी फिरून एक जागा नक्की केली. भाडे थोडे जास्त होते, पण दोन खोल्या होत्या. बाथरूम आत होती. शिल्पाच्या दृष्टीने ते योग्य होते. चार चांगले शेजारी होते. मालकही तिथेच रहात होते. शिल्पा विनय रहायला आल्या आल्या मालकांनी त्यादिवशी त्यांना जेवायला घातले. मालकीण बाई ही खूप चांगल्या होत्या. सर्व शेजारी आणि मालक सारे मिळून मिसळून रहात होते. एकत्र येऊन सारे सणवार साजरे करत होते.


क्रमशः


सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

मिरज

🎭 Series Post

View all