देह झाला चंदनाचा

देह झाला चंदनाचा

गोष्ट छोटी डोंगराएवढी.                                                                                                        विषय:- वाचाल तर वाचाल.                                                                                                                                                पुस्तक: देह झाला चंदनाचा.                                                                                                 लेखक:राजेन्द्र खेर                               आदरणीय श्री. पांडुरंग शास्त्री आठवले. यांच्या चरित्रावर आधारीत                                                                                                                                                                     रसग्रहण:- Adv. श्रद्धा मगर.                                                                                            'धर्म निष्क्रिय आणि दुराग्रही बनला आहे. धर्माची जागा शासन, विज्ञान, अर्थकारण आणि व्यापार या सत्तांनी घेतली आहे. आरती आणि प्रसाद यांमध्ये भक्ती अडकून पडली आहे. माझा माणूस कर्मकांड, जातिभेद, वर्णभेद, दारिद्र्य, उच्चनीचता अशा गोष्टींमध्ये हरवून गेला आहे. नैतिकतेचा पायाच ढासळला आहे. धर्मावरची ही जळमटं दूर कशी करायची? Haves आणि Have nots यांना प्रेमानं एकत्र कसं बांधायचं? त्यांच्यात विजिगीषू वृत्ती कशी निर्माण करायची? हे करायचं असेल तर मला प्रबळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहावं लागेल.' - प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले.                                                                                             'देह झाला चंदनाचा' ही स्वाध्याय' प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनप्रवासाबरोबर त्यांचे तत्वज्ञान सामान्यांसाठी मार्गदर्शक असून धर्माबरोबरच सामाजिक आणि नैतिकतेचा वेध घेताना दिसते. धर्माचा वापर होऊ नये, मानवी जगण्याला नैतिकतेचं अधिष्टान असावं, सांस्कृतिक मुल्यांचा जिर्नोद्धार व्हावा, अशी त्यांची तळमळ आहे. हे साधायचा असेल, तर प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस करायला हवं, असं ते म्हणतात. राजेन्द्र खेरांच्या प्रभावी ओघवत्या भाषेतील चरित्र!                                                                                                  सगळ्या लोकांना गीतेचे ज्ञान व्हावे या यामागचा उद्देश.... हे या  पुस्तकातून शिकायला मिळते.                                                                                               थोड्या दडपणाखालीच पांडुरंग शास्त्री बहारिनच्या शेखकडे निघाले होते. आपली मते आणि विचार शेखला निश्चित पटतील असे त्यांना वाटत होते. परंतु तरीही शेखसाहेब आपल्याला प्रवचन करण्यास परवानगी देतील का नाही याविषयी त्यांचे मन साशंक होते. काही दिवसांपूर्वीच स्वामी चिन्मयनंदांना मध्य आशियातील काही ठिकाणांहून अक्षरशः गेल्या पावली परतावे लागले होते. आधी ठरल्याप्रमाणे पांडुरंग शास्त्री बहारिनला येऊन पोहचले होते. तिथे गेल्याबरोबर ते तेथील पोलीस कमिशनरला जाऊन भेटले. कमिशनरने विचारले, "आपल्याला खाजगी कार्यक्रम करायचेत की सार्वजनिक ?" " सार्वजनिक " " सॉरी, मी आपल्याला परवानगी देऊ शकत नाही." " मला कारण समजू शकेल ?" "अहो, तुम्ही हिंदू धर्म सार्वजनिक ठिकाणी सांगणार मग परवानगी कशी देणार ? " "मी हिंदू धर्म सांगणार नाही, तर गीता सांगणार." " गीता म्हणजे हिंदू स्क्रिप्टच ना ?" " नाही ! गीता ही केवळ हिंदूंची नाही." " हे बघा मी तुम्हाला परवानगी दिली तर शेखसाहेब माझी इथून उचलबांगडी करतील." " पण मी कोणत्याही वाईट कामासाठी परवानगी मागत नाही." " हे बघा ते तुम्हाला त्यांच्याकडे जाऊनच पटवून द्यावे लागेल." मग पोलीस कमिशनरने फोनवरून शेख साहेबांशी संपर्क साधून सारा प्रकार त्यांच्या कानावर घातला होता. मध्य आशियातील बव्हंशी सत्ता शेखांच्या हातात होती. त्यामुळे कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय करण्याचा अधिकार त्यांचाच असे. स्वतः शेख कायदा- सुव्यवस्थेच्या बाबतीत लक्ष घालून झटपट निर्णय घेत. पांडुरंग शास्त्रींना फक्त १५ मिनिटे भेटीची परवानगी शेखसाहेबांनी दिली. शास्त्रीजींचे आतापर्यंतच्या आयुष्यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठी व्यक्ती समोर असली तरी ते आपल्या तत्त्वांपासून कधी ढळत नसत आणि आपली तत्त्वे छातीठोकपणे सांगत असत.                                                                 यापूर्वीही शास्त्रीजींनी वेळोवेळी आपल्या तेजस्वीततेचे दर्शन घडवले होते. शेखसाहेबांच्या आलिशान महालात त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. थोड्याच वेळात भारदस्त शरीर यष्टीचे रुबाबदार शेखसाहेब आले. दोघांनी हस्तांदोलन केले. " आपण काही कार्यक्रम करू इच्छिता ?" शेखसाहेबांनी इंग्रजीत विचारले. " मी गीतेवर स्पीच देणार आहे." " ओह, ते तर हिंदू स्क्रिप्ट !"                                                                                            " It is not a Hindu script, its a human script."                                                                                                 हिंदूंनी फक्त गीतेला सांभाळली. भगवान कृष्णाने गीता सांगितली. श्रीकृष्णा सारखा राजनीतिज्ञ आजपर्यंत झालाच नाही. आध्यात्मिक जीवनात मार्गदर्शन करणाऱ्यांतही कृष्णाचे स्थान बरच उंचावर आहे. गीतेत कोणत्याही ठिकाणी कोणताच आग्रह नाही किंवा ती कोणा एका संप्रदाया पुरती मर्यादित नाही. हेच गीतेचे वैशिष्ट्य आहे. मग गीता हिंदूंची की मुसलमानांची, ख्रिस्ती लोकांची की पारशांची ? ती कोणाही एकाची नाही." शेखसाहेब मोठ्या उत्सुकतेने शास्त्रीजींचे बोलणे ऐकत होते. " गीता ही कोणाचीच मक्तेदारी नाही. ती प्रत्येक मानव मात्रासाठी आहे. तिच्यावर सर्वांचाच सारखा अधिकार आहे. जो स्वतःला भगवंताचा पुत्र मानतो, त्याच्यासाठी ती आहे. पाच हजार वर्षांनंतर ही उपयोगी पडेल असे, तत्त्वज्ञान पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. आता मला सांगा, पाच हजार वर्षांपूर्वी आपला धर्म होता का ?" " अं, नाही." " दुसरे कोणतेच धर्म नव्हते त्यावेळी. त्यावेळी सांगितलेले तत्त्वज्ञान हे अखिल मानव जातीसाठी होते. म्हणजे तुमच्या पूर्वजां साठी ही होते.मग ते तत्त्वज्ञान तुम्ही वाचले, ऐकले किंवा आचरणात आणले तर बिघडले कुठे ?" शेखसाहेब आदरयुक्त आश्चर्याने शास्त्रीजींचे बोलणे ऐकत होते. पंधरा मिनिटे कधीच उलटून गेली होती. " मी धर्मावर बिलकुल बोलणार नाही. हिंदू धर्म हा तुम्ही समजता तसा नाही, तर हिंदू धर्म हा एक जीवन प्रणाली आहे." " पण तुम्ही मूर्तिपूजा मानता आम्ही आकाशस्थ विश्वनिर्मात्याला मानतो." " आम्ही त्यालाच परब्रह्म म्हणतो. आम्ही सुद्धा त्या परब्रह्मालाच मानतो." तुम्ही मूर्तिपूजा मानत नाही किंवा कोणतेच रूप मानत नाही. मग विना रूपाचे ध्यान कसे होईल ? तुम्ही आकाशाचं ध्यान कसे करणार ? आकाशाला आकार नाही व गुणही नाही. ज्याला आकार म्हणजे form नाही व गुण म्हणजे quality नाही त्याचे ध्यान कसे करणार ? म्हणून ध्यान करावयाचे असेल तर सगुणोपासना हवी. खुदाने जर विविध रूपे निर्माण केली आहेत, तर तो स्वतः मानवी रूप घेऊ शकणार नाही का ? खुदाचे मानवी रूपच आपल्याला जवळचे वाटेल. चित्त एकाग्र करून केलेल्या मूर्तिपूजेत मन मूर्तीचा आकार घेते. मूर्तिपूजा हे एक संपूर्ण शास्त्र आहे, त्यात चित्ताग्रता न तुटता ती अधिक वाढते. त्यातूनच पूर्णतेची अनुभूती मिळते." हे सांगून शास्त्रीजींनी स्वाध्याय चळवळी विषयी थोडक्यात सांगितले.                                                                                           "आमचे हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे. जात-पात, देश-धर्म, असले भेद आम्ही मानत नाही. आम्ही कुणाचा धर्म बदलत नाही. आपापल्या धर्मात राहून जगातला कुणीही माणूस स्वाध्याय करू शकतो. मूर्ति पूजा आवश्यक असल्याने आम्ही योगेश्वर भगवान मानतो. त्या योगेश्वरात विविध धर्मियांचे लोक आपापला देव पाहतात." " मला समजले नाही...?" "श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांच्या गुणविशेषांतून योगेश्वर उभा राहिला आहे. आमच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात त्याचे मंदिर आहे. मला तुमच्या मशिदींची स्वच्छता भावते, चर्च ची भव्यता मानवते आणि आमची मूर्तिपूजा योग्य वाटते. या तिन्ही धर्मस्थळांमधील चांगली वैशिष्ट्ये घेऊन हे मंदिर उभे आहे." " अच्छा, म्हणजे तुम्ही मोहम्मदाला मानता तर ? " "अर्थात, कोट्यवधींना मॉरल ऑर्डर्स देणारा माणूस अवतारच होता असे मी मानतो.श्रीकृष्ण, महंमद, येशू ख्रिस्त, मोझेस या विभूतींनी खरोखरच अफाट कार्य केलेले आहे. केवळ धर्माच्या बॅरिअर्स निर्माण करून त्यांना कमी लेखू नये." जवळ- जवळ दोन तास चर्चा चालली. शेखसाहेबांनी अनेक प्रश्न, शंका उपस्थित केल्या.शास्त्रीजींच्या प्रभावी विवेचनाने त्यांचे समाधान झालेले दिसले. " कृपया, तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेत प्रवचन दिले तर चालेल." शास्त्रीजी म्हणाले," माझा स्वाध्याय - विचार तुमच्यापर्यंत पोचला म्हणजे झाले, भाषा कोणती का असेना !" " तुमची कार्यक्रमाची वेळ कोणती ठरवलीत ?" " संध्याकाळची " " शास्त्रीजी, तेव्हा तर आमची सामुदायिक प्रार्थना असते. लाऊड-स्पीकर वरून म्हटली जाते. अर्धा - पाऊण तास तो कार्यक्रम चालतो. " मग त्यात काय झालं. आम्हांला कोणी परके नाहीत. प्रार्थना सुरू झाली म्हणजे आम्ही आमचा कार्यक्रम थांबवू. शांत बसून राहू." दुसऱ्याच दिवशी पांडुरंग शास्त्रीनी बहारिन मध्ये गीता सांगायला प्रारंभ केला.                                                                                                      लाऊड स्पीकर वरून प्रार्थने ची बांग सुरू झाली की प्रवचन थांबवायचं, हे त्यांनी निश्चित केलंच होतं. ठरल्या प्रमाणे शास्त्रीजींचे प्रवचन सुरू झाले आणि काही वेळातच लाऊड स्पीकर वरून चोहीबाजूंनी बांग ऐकू येऊ लागलो. बांगेच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला. शास्त्रीजीं नी प्रवचन थांबवले. आपल्या जागेवरच ते शांतपणे नेत्र मिटून बसून राहिले. पुढे अर्धा- पाऊण तास त्यांना त्याच अवस्थेत बसावे लागणार होते. पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच ! एरवी अर्धा - पाऊण तास चालणारी बांग त्या दिवशी अवघ्या तीन मिनिटांत संपली ! शास्त्रीजींना आश्चर्य वाटले. त्यांनी आपले प्रवचन पुढे सुरू केले. प्रवचन संपल्यावर त्यांना या गोष्टीचा उलगडा झाला. एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे आजची प्रार्थना लवकर उरकायची आहे, अशी सूचना अगोदरच लाऊड स्पीकरवरून देण्यात आली होती ! ते ऐकून शास्त्रीजी भारावून गेले. मुस्लिम धर्मियांनी त्यांना दिलेलं प्रेम बघून त्यांना गलबलून आले. अखिल विश्वातील मानव जर अंतःकरणा पासून एकत्र आले यर जगातील सर्व समस्या सुटतील असं त्यांना वाटत राहिले. मध्य आशियात आणखी काही प्रवचने केल्यावर निघताना शेख साहेबांनी त्यांचा स्टेट अवॉर्ड व सुवर्ण पदक देऊन सन्मान व गौरव केला.                                                                                                       दोन धर्मांमधील मैत्रीचा पूल बांधण्यात शास्त्रीजी सफल झाले होते. '.                                                                               -देह झाला चंदनाचा ' ग्रंथातून!