Login

यशाची परिभाषा

यशाची एक सोपी परिभाषा


" अमेय चांगला अभ्यास कर यावेळी.तुझा पहिला क्रमांक आला पाहिजे बरं क्लासमध्ये.पेपर सोडवताना मागील चूक पुन्हा करायची नाही.अभ्यासात कठोर परिश्रम आणि सातत्य असेल तर पहिला क्रमांक ठरलेला असतो.हेच तर यश असतं."

" हो आई.मी यावेळी कुठलीही चूक करणार नाही."

काही दिवसांतच अमेयची वार्षिक सरावपरीक्षा पार पडली.

निकालाचा दिवस उजाडला. अमेय आणि त्याची आई शाळेत पोहोचली. बोर्डावर अमेयचा तिसरा क्रमांक पाहताच आई भडकली.

"अमेय मागच्या वेळी तुझा चौथा क्रमांक होता. तुला बोलले होते ना मी की मागच्या चुका पूर्णतः टाळायच्या म्हणून. मग तुझा पहिला क्रमांक का आला नाही? याचा अर्थ तू अभ्यासात कुठेतरी कमी पडलास. एवढे क्लासेस लावले तरी काय उपयोग झाला? माझंच चुकलं.मीच तुझ्याकडून पहिल्या क्रमांकाची अवास्तव अपेक्षा ठेवली.यश तुझ्या पदरात नाहीच!"

" सॉरी ना गं आई.रागवू नकोस ना माझ्यावर. मी पूर्ण प्रयत्न केला होता. पुढच्या वेळी मी अजून मेहनत करून पहिल्या क्रमांकाचे यश मिळवून दाखवेल!"

अमेयने एवढे समजावले तरीही त्याची आई मात्र नाराजच होती.

क्लासटीचर जोशी मॅडम म्हणाल्या,
" अमेय आईसोबत इकडे ये."

"हो मॅडम."

"नमस्कार ताई.अमेयने यावेळी छान कामगिरी केली."

"कसली छान कामगिरी? यश थोड्यावरून हुलकावणी देऊन गेलं त्याला!"

"माफ करा ताई. तुमची ही यशाची परिभाषा मला बिलकुल पटलेली नाही. मी मघापासून तुमचे आणि अमेयचे बोलणे ऐकत होते. अहो मागच्या वेळी त्याचा चौथा क्रमांक आला आणि यावेळी तिसरा क्रमांक आला, हे यश नाही तर काय आहे? दिवसागणिक होणारी अल्पशी प्रगतीसुद्धा यशच असते.

मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगते. समजा एखाद्या मुलाला भागाकार येत नाही. मग त्याला सहज सोपी असणारी भागाकाराची गणिते आधी समजावून सांगितली पाहिजेत. जेव्हा त्यात तो दुसऱ्या दिवशी पारंगत होतो हे सुद्धा यशच असते की! आता लगेच त्याच दिवशी त्याला तुम्ही भागाकाराची अवघड गणिते सोडवायला दिली आणि ती त्याला जमली नाही तर तो अपयशी आहे असा अर्थ मुळीच होत नाही. प्रगती ही नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा होत असते. हेच तर यश असतं.

समजा तुम्ही ठरवलं की मला अमुक एक काम शिकायचे आहे. त्यातील पहिली स्टेप थोड्या दिवसांत जरी तुम्हाला जमली तरीही ते यशच आहे ना! हीच पहिली स्टेप जमल्याचा आनंद आपल्याला दुसऱ्या स्टेपकडे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो. म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टींमधील यश आपण ओळखले किंबहुना आनंदाने स्वीकारले तर अचूकता आणि आपसूकच मोठं यश आणि प्रगती साध्य होते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा यश मिळते तेव्हा ते सेलिब्रेट व्हायलाच हवे म्हणजे पुढच्या वेळी मोठे यश मिळवताना मनावर कुठलाही ताणतणाव राहत नाही. मग दिलखुलास मन जेव्हा पूर्ण एकाग्रतेने कुठलेही काम करते तेव्हा अनेक बारकावे समजावून घेत अचूक काम आपोआप घडते."

"धन्यवाद मॅडम. तुम्ही मला यशाची परिभाषा फार छान समजून सांगितली. मी यापुढे अमेयला कधीही असे
डीमोटिवेट करणार नाही. तुम्ही सांगितलेली ही यशाची परिभाषा प्रत्येक विद्यार्थ्याने जर समजून घेतली तर नक्कीच पहिल्या क्रमांकासाठी अभ्यास करण्याचा अट्टाहास कुठलेही पालक किंवा विद्यार्थी करणार नाही."

" हो बरोबर म्हणालात तुम्ही.यश हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेले असते. अशाप्रकारचा यशाचा अट्टाहास विद्यार्थ्यांसाठी खूपच घातक ठरू शकतो. यामुळेच तर अनेकदा विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि आत्महत्या करतात."

अमेय लगेच पुढे आला आणि त्याने बोर्डावर लिहिले,

"दिवसागणिक होणारी छोटी छोटी प्रगती हीच यशाची परिभाषा आहे."

आज अमेयला आणि त्याच्या आईला जोशी मॅडमांनी खूप मोठी शिकवण दिली होती.