जीवघेण्या क्षणावर मात

Story of a man who defetes thought of suicide with his willpower

"बाळा दुरूनच बघायचं हा पाणी, खाली डोकावायचं नाही ",विजयच मुलांना नेहमीच सांगणं असायचं.शाळेतून परतीच्या वाटेवर लागणाऱ्या नदीवरच्या पुलावर थांबून खळखळणारं पाणी बघणं हा त्याचा आणि मुलांचा आवडीचा छंद.मग तिथेच बाजूला असलेल्या एका काकांच्या गाड्यावर आईसक्रीम खायचा कार्यक्रम ठरलेला असायचा.आज तो एकटाच पाण्याकडे एकटक बघत होता.महामारीमुळे गेलेली नोकरी,डोक्यावर कर्जाचा डोंगर,घरातील मतभेद आणि त्याचं एकटेपण,आजूबाजूला चिटपाखरूही नाही,सुमसाम रस्ते आणि नैराश्याच्या गर्तेत अडकलेला तो.सगळी हिम्मत एकवटून तो उडी मारायला पुलावर चढला.खाली वाकून बघितलं तर जरा बिथरला,मागून आवाज आला,"दुरूनच बघायचं हा पाणी"!त्याचाच आवाज त्याच्या कानात घुमला,त्याच्यासमोर मुलांचे केविलवाणे चेहरे आले.मुलांच्या विचाराने त्याने त्या एका जीवघेण्या क्षणावर यशस्वीरीत्या मात केली आणि नवीन उमेदीने घरी परतला.