Aug 09, 2022
General

दीपस्तंभ

Read Later
दीपस्तंभ

#दीपस्तंभ

 

सीमा हल्ली तिच्या नवऱ्यावर, विशालवर सारखं रागावे.  त्यांच्या लग्नाला अवघी दोन वर्ष झाली होती. विशालने घरासाठी लोन घेतलं होतं. त्यामुळे साहजिकच सीमाला घरखर्चात काटकसर करावी लागत होती. शिवाय विशालच्या आईवडिलांना गावी मनी ऑर्डर पाठवावी लागत होती. 

सीमाच्या वाढदिवसाला  विशालने तिला मोबाईल गीफ्ट दिला तेंव्हापासून हे असं चाललं होतं. आधी सीमा तिच्या संसारात खूष होती पण जेंव्हा तिने मोबाईलवर फेसबुक,व्हॉट्सऍप इनस्टॉल केलं तेंव्हापासून ती तिच्या जुन्या मैत्रिणींना फेसबुकवर शोधू लागली. कोणी अमेरिकेत रहायला गेली होती,कोणी सिंगापूरला.  ज्या भारतात होत्या त्याही शहरात रहात होत्या. चारचाकी गाडी चालवताना फोटो टाकायच्या तर कधी काश्मिरला,केरळला गेलेले नवऱ्यासोबत बागडत असतानाचे फोटो टाकायच्या. कधी मोना म्हणायची,"आज स्वैंपाकाचा कंटाळा आला. निषादला सांगायचा अवकाश. सगळं बाहेरुन मागवलं. पनीरचिली,कश्मिरी पुलाव,नान,डेझर्ट अन् कायकाय.." तर कधी तिच्याच बाजूला बसायची ती चैताली चारेक तोळ्याचा राणीहार, नवीन डिझाईनच्या बांगड्या परिधान करुन फोटो पाठवे व म्हणे माझा नवरा जाम हौशी आहे. मी कित्ती नको म्हंटल तरी दर वाढदिवसाला मला असं सरप्राईज गीफ्ट देत असतो." 

भरपूर तेल लावून दोन वेण्या घालणारी आकांक्षा चक्क बॉयकटमधला व वनपीसमधला तिचा नवऱ्यासोबतचा फोटो पोस्ट करी. या साऱ्यांचे फोटोज पाहून सीमाला वाटे की तीच एकटी गरीब राहिली. तिचंही एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न झालं असतं तर तीही अशीच मुरडली असती. तिनेही भारी भारी फोटो पोस्ट केले असते.

या साऱ्या निराशेतून सीमाच्या मनात विशालबद्दल चीड निर्माण होत होती व ती वेळोवेळी तिच्या खोचक बोलण्यातून..त्याची अवहेलना करुन,नेहमी त्याला त्याच्या कमी पगाराबद्दल टोचून बोलून ती चीड जाणवून देत होती,दर्शवत होती.

 एकदा सीमाचा मोठा भाऊ,संजय चार दिवसांसाठी सीमाकडे रहायला आला. सीमा रहायची त्या भागातच त्याचं काम होतं. सीमाचं तिथे रहाणं संजयच्या पथ्यावर पडलं होतं. सीमाने व विशालने संजयचा छान पाहुणचार केला पण त्या दोघा पतीपत्नीत काहीतरी खटकतय हे संजयदादाच्या चाणाक्ष नजरेने जाणलं.

 त्याच्या ऑफिसचं काम झाल्यावर मुद्दाम एक दिवस तो जास्त थांबला व सीमाकडून त्याने त्यांच्यातल्या धुमसत्या वादाविषयीच कारण जाणून घेतलं.

 संजयदादाला सीमाचा लहानपणापासूनचा दुसऱ्याकडचीच गोष्ट चांगली वाटण्याचा स्वभाव माहित होता.  मोबाईलमुळे तिचा हा दुर्गुण फोफावत चालला होता व विशालसारखा थंड स्वभावाचा माणूस यात हकनाक बळी जात होता हे संजयदादाने ओळखलं. संजयदादाने सीमाला समजावलं," दिसतं तसं नसतं,सीमा. हे जे प्रदर्शन करतात,बडेजाव मारतात ते चूकच व त्यातलं दहा टक्केपण खरं नसतं."

 सतत सोन्याच्या दागिन्यांच प्रदर्शन मांडणाऱ्या चैतालीच्या नवऱ्याला लाच लुचपत खात्याने कालच अटक केली होती,ती न्यूज संजयने सीमाला दाखवली.

 तसंच नेहमी हॉटेलिंगचे फोटो पोस्टणाऱ्या मोनाचा तिच्यापेक्षा वीस वर्षाने मोठा असणारा,दोनशे किलो वजनाचा हॉटेल व्यवसायिक नवरा संजयदादाने तिला दाखवला.

 संजयदादा सीमाला म्हणाला,"सीमा आत्तातरी ही तुझी दुसऱ्याच्या ताटात बघत रहाण्याची सवय सोडून दे. विशाल खूपच साधासरळ मुलगा आहोत. त्याच्या आईवडिलांना तो पैसे नाही पाठवणार तर कोण पाठवणार. त्यावरुन त्याला त्रास देऊ नकोस. उलट तू त्याला हातभार लाव. काही परीक्षा दे व नोकरीसाठी प्रयत्न कर. काल रात्री मी विशालशीही बोललो. तो फारच दु:खी वाटत होता. तुझ्या सगळ्या हौसीमौजी तो पुऱ्या करु शकत नाही याचं त्याला फार वाईट वाटतंय. सीमा अगं पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामी आहे हे तुझं तू ठरवं.

 तुझ्या वहिनीसारखं जीवनाकडे सकारात्मकरीत्या बघ. गेल्या वर्षी सहा महिने, मला ब्रेक होता. पण तुझ्या वहिनीने मला खूप धीर दिला. आपल्या आईवडिलांच सगळं करते. दोन वर्ष झाली तिने स्वतःसाठी चांगली साडी घेऊन पण घरातल्या सगळ्यांच्या हौसीमौजी पुरवते. कोणाला काय हवं आहे हे तिलाच आधी माहिती असतं. 

आपल्या समोरच्या गरीब वस्तीतल्या मुलांना सुट्टीच्या दिवशी गोळा करुन चांगल्या सवयी शिकवते. तेंव्हा सीमा तुही विचार कर वेळीच सावध हो. मी काही फॉर्म आणलैत तुझ्यासाठी ते भर व परीक्षांची तयारी कर.  तुला अभ्यासासाठी हवी ती पुस्तकं ऑनलाईन मागवून घे. तुला नक्की यश मिळेल." 

सीमाला संजयदादाचं म्हणणं पटलं. तिने तीचं वागणं सुधारलं. विशालला टोचून टोचून बोलणं बंद केलं. पुस्तकं आणून अभ्यासाला लागली. विशालनेही तिला मदत केली. घरातली बरीचशी कामं आवरण्यात तिला मदत करु लागला. ती अभ्यासाला बसली की तिला कॉफी करुन देऊ लागला. नोट्स काढण्यात मदत करु लागला. 

सीमाची प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली तेंव्हा विशालला केवढा आनंद झाला! दोघं मिळून संजयदादाला भेटायला गेली. संजयदादाच्या पाया पडून त्याचे आशिर्वाद घेतले. सीमाचे डोळे संजयदादाला न बोलताही बरंच काही सांगत होते. संजयदादा तिच्या भरकटलेल्या जीवननौकेचा दीपस्तंभ झाला होता.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now