Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

दीपावली - पूर्वीची आणि आजची

Read Later
दीपावली - पूर्वीची आणि आजची

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी 
विषय : दीपावली - उत्सव नात्यांचा...
                दीपावली - पूर्वीची आणि आजची 

दीपावली म्हटलं की पणत्यांची आरास अन् रोषणाई, दिमाखात डोलणारा आकाशकंदील, गोड चमचमीत फराळ, फटाके, किल्ले, रांगोळी, इ. गोष्टी आवर्जून डोळ्यांसमोर उभ्या राहतात. दीपावली हा संस्कृत शब्द असून या शब्दाचा अर्थ दिव्यांच्या ओळी असा होतो. आनंदाची लयलूट करणारा हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. दीपावलीचे अनेक पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ दिले जातात. आजच्या घडीला परदेशांतही दीपावली साजरी करण्याचं प्रमाण उल्लेखनीय आहे.
सण म्हटलं की आनंद, उत्साहाला उधाण आलंच पाहिजे नाही का? दीपावली हा सण म्हणजे उत्साहाचा झराच! कितीतरी दिवस आधीपासून तयारीला सुरुवात होते. सजावट असो किंवा मग फराळ, तयारीचा उत्साह काही निराळाच असतो. नवरात्र संपली की दीपावलीच्या तयारीची लगबग सुरू व्हायलाच हवी हे जणू समीकरणच आहे. कपड्यांची खरेदी, फराळाची तयारी, कंदील आणि इतर वस्तूंची खरेदी, या साऱ्या गोष्टी करण्यासाठी एक वेगळीच उत्सुकता लागून राहते. 
वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, भाऊबीज हे सारे सण एकत्रित येऊन प्रत्येकाचा आनंद द्विगुणित करतात. या प्रत्येक सणाचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे सण साजरे करतात. 

या काही वर्षांत मात्र बरेच बदल झाले आहेत. सहजासहजी कोणी मान्य करो अथवा नाही, पण हेच खरं आहे. आताही आपण दीपावली साजरी‌ करतच आहोत. पण खरंच त्यात पूर्वीसारखी मजा उरली आहे का? आपण भलेही साऱ्या गोष्टी मनापासून आणि त्याच उत्साहात करण्याचा प्रयत्न करत असू, पण तरीही ते 'उत्सवाचं' वातावरण टिकून आहे का आज? 

किल्ले बनवण्यासाठीची ती लहानथोरांची गडबड दीपावली जवळ आल्याची जाणीव करून द्यायची. अंगणात सुरू असलेला तो कल्ला, ती मजामस्ती कोणालाही नकोशी वाटायची नाही. कोणाचा किल्ला 'भारी' आहे, याची सुरू असणारी चढाओढ तर उत्साहाची परिसीमा गाठायची. पण हेच जर आज बघितलं तर? किल्ले बनवण्यासाठी आजच्या ऑनलाईन पिढीला वेळच मिळत नाही. आणि जिथे किल्ले बनविले जातात, तिथे ते आधी सारखं वातावरण पहायला मिळतंच असं नाही. पण हे सुद्धा खरं आहे की बऱ्याच ठिकाणी आजही पूर्वीसारखं वातावरण टिकवून ठेवण्याची पूरेपूर काळजी घेतली जाते.
कंदील बनवणं सुद्धा फार सुंदर अनुभव असायचा. आताच्या 'रेडिमेड' जगात त्या स्वतः बनवलेल्या कंदीलांची जागा काहीशी कमीच उरलीय.
फराळाची तयारी म्हणजे पूर्ण घर त्यात व्यस्त होणारच, अशी परिस्थिती असायची. त्यावेळी फराळाचे पदार्थ वर्षभरात अगदी कधीही बनवणं व्हायचं नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन फराळ बनवणं म्हणजे एकमेकांसोबतचं नातं आणि दीपावली सण दोन्हींसाठी एक पर्वणीच असायची. हल्ली तर फराळ घरात बनवणं सुद्धा बऱ्याच ठिकाणी टाळलं जातं.‌ 'हेल्थ कॉन्शियस' पिढीने त्या फराळाची गोडी समजून घेणं अवघडच वाटतं. 
बरं अभ्यंगस्नानाची सुद्धा प्रत्येकाची वेगळी आठवण नक्कीच असणार. पण आज 'स्किन केअर' मध्ये रमलेल्या‌ प्रत्येकालाच त्या उटणं नामक कस्तुरीचं मोल समजेल असं नाही. 
मजा म्हणून असणारे फटाके जेव्हापासून 'शोऑफ' म्हणून वाजायला लागले, तेव्हापासून दीपावलीची रंगत कुठेतरी हरवल्याची जाणीव प्रकर्षाने होते.

दीपावलीची सुट्टी म्हटलं की धमाल मस्ती सोबतच दीपावलीच्या अभ्यासाचीही आठवण व्हायलाच हवी. प्रत्येक विषयाचा तो अभ्यास एका वहीत लिहून, त्या वहीला अगदी मनापासून सजवून पूर्ण करून शाळेत घेऊन जाण्याची मजा काही औरच होती. सोबतीला हस्तकलेच्या वस्तू आणि इतर शोभेच्या वस्तू बनवून घेऊन जाणं म्हणजे शाळेत अगदी कलाप्रदर्शन भरल्यासारखं वाटायचं. आताच्या रोजच 'ॲक्टिव्हिटी' मध्ये गुंतलेल्या मुलांना त्या खास दीपावली अभ्यासाची गोडी क्वचितच कळेल.

पूर्वीच्या आणि आताच्या दीपावली बद्दल बोलण्याचं कारण म्हणजे बदलत्या काळानुसार बदलत असताना सण साजरे करण्यात होणारा बदल! खरंतर या धकाधकीच्या जीवनात निवांत वेळ काढून सण साजरे करणं कठीणच झालं आहे. सण साजरे करणं म्हणजे नात्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठीचा एक बहाणाच आहे. कारण या निमित्ताने आपण कुटुंब, नातलग, शेजारीपाजारी, मैत्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवून त्या सणांचा मनसोक्त आनंद घेत असतो. पण आज या ऑनलाईन जगात मेसेज करून शुभेच्छा देणं सुद्धा खूप आहे, अशा तऱ्हेने वागलं जातं. तंत्रज्ञानाचा वापर करून एकमेकांशी संवाद साधणं सोपं झालं आहे ही खरंच खूप सुखद गोष्ट आहे. कधीतरी दूर असताना या गोष्टीचा वापर करणं योग्यच आहे. परंतु शक्य असताना सुद्धा फक्त ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव करून, वास्तवात मात्र माणसांना टाळून सण साजरे करणं म्हणजे सण - उत्सव संस्कृतीचा ऱ्हास होण्याकडचं एक पाऊल असावं. आधी जो उत्साह छोट्या दिवाळीपासून सुरू होऊन अगदी तुळशी विवाहापर्यंत टिकून असायचा, तो कदाचित आता तीन दिवसही पुरेसा होतो. शेवटी हे कळणं महत्त्वाचं आहे की रेडिमेड जगात सणांचं सामान रेडिमेड मिळेल पण नात्यांमधील ती वीण, ती गंमत रेडिमेड नक्कीच मिळणार नाही. जिव्हाळा, आपुलकी, नातेसंबंध, मनोरंजन, विचार जपण्याचा वारसा हे सणच पुढे सुरू ठेवतात. नात्यांच्या या उत्सवाचं स्वरूप पूर्वीसारखंच टिकून राहूदे हीच सदिच्छा. 
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//