दीप अमावस्या

About Deep Amavtsya


\"दिव्या दिव्या दीपत्कार

कानी कुंडल मोतीहार 

दिव्यास पाहून नमस्कार।\"


आपल्याला लहानपणापासून रोज  संध्याकाळी देवासमोर हात जोडून अशी प्रार्थना म्हणण्याची सवय लावली जाते.दिव्यांचे महत्त्व असणारी \"दीप अमावस्या\"

चातुर्मासातील आषाढ महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे आषाढ अमावस्या.या अमावस्येला दीप अमावस्या, दिव्यांची अवस किंवा दिवली अमावस्या असेही म्हणतात.

कोणत्याही शुभ कार्याची,कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली जाते.सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो.या दिवशी घरातील दिवे,समया,निरांजने,

लामन दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात.दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते.पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करून ही दीप पूजा केली जाते.हळद ,कुंकू, फुले,अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते.गोडाचा नैवैद्य दाखविला जातो.

हिंदू संस्कृती मध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी,अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा अशी प्रार्थना करुन दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते.

दीप म्हणजेच दिवा हा अग्नीचा स्त्रोत ! त्यातील तेल म्हणजे मनुष्याच्या अंतर्मनातील वाईट विचार ,वाईट सवयी ,दुर्गुण यांचे प्रतीक ...

आत्मयारुपी कापसाची वात जाळून आपण आपल्या मनातील आणि आजुबाजुचा अंधकार जाळून टाकतो हेच या दिव्याचे महत्त्व!

संध्याकाळी हात पाय धुवून दिवे लागणीच्या वेळेला "शुभं करोती \" म्हणताना आपण याच शत्रुबुद्धीचा विनाश होवो अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो.

\" दिवा पाहुनि लक्ष्मी येते

करू तिची प्रार्थना,करू तिची प्रार्थना।\"