राज्यस्तरीय करंडक वादविवाद स्पर्धा भाग-3

व्यवसाय - समाजाचा बॅकबोन


राज्यस्तरीय  करंडक वादविवाद स्पर्धा भाग-३

ईरा  संभाजी नगर संघ
जिल्हा -औरंगाबादसर्वप्रथम अंकिता मॅडमचे विशेष कौतुक की त्यांनी अतिशय उत्तम लेख लिहिला आहे आणि प्रतिस्पर्धी ठाणे संघाचे आभार की त्यांच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली. ईरा प्लॅटफॉर्मने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे त्याबद्दल विशेष कौतुक. असो. आता मुख्य विषयाकडे वळूया.

1. बॅकबोन : नोकरवर्ग हा व्यवसायाचा " बॅकबोन " असला तरी व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा " बॅकबोन " असतो हे लक्षात घ्यायला हवे. ठाणेकर संघांनी एक मुद्दा मांडला आहे की कोरोना काळात लोकांनी घरगुती उद्योग उभारून त्याचा कर भरला नाही आणि त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसला. पण इथे काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. समजा एका नेत्याने स्वतःच एका पक्षाची स्थापना केली. तर त्या पक्षाला लगेच स्वतःचे स्वतंत्र चिन्ह प्राप्त होत नाही. त्यासाठी ठराविक अटींची पूर्तता करावी लागते. उदाहरणार्थ शिवसेना पक्षाला " शिवधनुष्य " हे चिन्ह पक्षस्थापनेच्या काही कालावधीनंतर मान्यताप्राप्त झाले. तसेच घरगुती उद्योग जे सुरू झाले त्यांची उलाढाल ठराविक मर्यादा ओलांडली तरच जीएसटीमध्ये नोंद होते. लॉकडाऊनमध्ये सुरू झालेल्या उद्योगांची उलाढाल तेवढी मोठी निश्चितच नव्हती. आम्ही ते उदाहरण दिले कारण अश्या लघुउद्योगामुळे गृहिणीच्या हातात पैसा आला आणि एकप्रकारे कठीण काळात अर्थसहाय्य मिळाले. व्यवसायाचे दोन प्रकार असतात. एक संघटीत आणि दुसरे असंघटित. भारतात कितीतरी जण असंघटित व्यवसायात गुंतलेले आहेत. सरकारी कागदपत्रांवर त्यांची नोंदणी नाही. ते कर भरत नाहीत. पण म्हणून काही अर्थव्यवस्थेला फटका बसतो का ? नाही. कारण बाजारात पैसा अनेक मार्गाने फिरत राहतो. त्यामुळे कोरोनाकाळात गृहिणीने केक विकले म्हणून अर्थव्यवस्थेला फटका बसला हे विधान आम्ही मान्य करत नाही. कोणताही मोठा व्यवसाय आधी असंघटित असतो मग जसजशी त्याची उलाढाल वाढत जाते तसतसा तो संघटित होत जातो , मगच त्याची नोंदणी होते. अर्थव्यवस्थेचे दोन आधारस्तंभ असतात ते म्हणजे मागणी आणि पुरवठा. कोरोनाकाळात लोकांची बचत वाढली. त्यामुळे मागणी कमी झाली आणि अर्थव्यवस्था गोरठली. आता काही लघुउद्योग सुरू केल्यामुळे जर गृहिणींकडे पैसे आले तर त्यातून मागणी वाढू शकते आणि अर्थव्यवस्थेचे चक्र सुरळीत होऊ शकते. अर्थव्यवस्थेत पैसा नेहमी खेळता रहावा. मंदीत सरकार हेच काम करते. व्याज दर कमी करायला लावते. पैसा ओतते. म्हणून लोकांच्या हातात जास्त पैसा येतो आणि मग मागणी वाढते.

" सोडा नोकरीचा नाद
भाऊ उतरा आता व्यवसायात "

या ओळींचा अर्थ मॅडमने असा घेतला आहे की आम्ही सर्वानाच नोकरी सोडून व्यवसायात उतरायला सांगत आहोत. मग मॅडमने नोकरवर्गाचे महत्व आणि सगळेच व्यवसाय केल्यावर नोकरी कोण करणार हा प्रश्न उपस्थित केला आहे. पण आमचा आशय तसा नव्हता हे सर्वांनी लक्षात घ्यावे. व्यवसाय करणे सर्वानाच जमत नाही. आमचे म्हणणे असे आहे की जर व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर उगाच प्रस्थापित विचारसरणीमुळे कुणी स्वतःची इच्छा दाबून जगू नये. मध्यमवर्गीय लोकांमध्ये " अंथरूण पांघरूण पाय पसरावे " ही वृत्ती फार आहे. " व्यवसाय करावा तो सिंधी , गुजराती आणि मारवाड्यानी. मराठी लोकांनी धंदा करू नये. " हे डायलॉग सिनेमातील असले तरी काही मध्यमवर्गीय लोकांची मनोवृत्ती तंतोतंत झळकवते. आमचा विरोध त्याच मनोवृत्तीविरुद्ध आहे.

2. कामगारवर्ग : अंकिता मॅडमने कामगाराचे महत्व छानपैकी पटवून दिले आहे. पण इथे लक्षात घ्या की आम्ही कुठेही कामगारांना कमी लेखत नाही आहोत. नोकरवर्ग आणि कामगारवर्ग हा व्यवसायासाठी आवश्यकच आहेत. पण कल्पना करा तुम्ही तुमच्या मुलांना नोकरीसाठी तयार करताय. पण मुले जिथे नोकरी करताय त्या सर्व कंपण्या विदेशी आहेत. जर एखाद्या अर्थव्यवस्थेत केवळ नोकरवर्ग असेल तर नफा एकतर दुसऱ्या देशात जाईल नाहीतर ठराविक लोकांकडे केंद्रीत होईल. व्यवसायिक नसतील तर एखादा देश विकसित कसा होईल ? आज अमेरिकासारखा देश विकसित का आहे ? कारण त्यांनी कितीतरी उद्योगधंदे उभारले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर केला. एकेकाळी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून हिनवली गेलेली धारावी आज " मॅन्युफॅक्चरिंग हब " बनली आहे. हे साध्य झाले केवळ उद्योगामुळे.

3. कन्फ्यूजन : अंकिता मॅडमने प्रश्न उपस्थित केला आहे की एकीकडे आम्ही नोकरी सोडून धंद्यात उतरायला सांगतो तर दुसरीकडे व्यवसाय केल्यावर रोजगारनिर्मिती होऊन समाजसेवा होते असे म्हणतोय. हे कन्फ्यूजन दूर करण्यासाठी इथे एक साधे उदाहरण देतो. राजा छत्रसाल एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटायला आला. " मला आपल्या पदरात घ्या. मी आपली चाकरी करेल. " अशी त्यांनी महाराजांकडे याचना केली. त्यावर महाराज म्हणाले , " तुम्ही आमची चाकरी कराल. शौर्यही गाजवाल. पण नाव आमचेच मोठे होईल. त्यापेक्षा तुम्ही बुंदेलखंडात जाऊन स्वतःचे वेगळे राज्य निर्माण करा. आम्ही सहकार्य करू. " महाराज सहजपणे राजा छत्रसालचा उपयोग करून घेऊ शकले असते पण त्यांनी त्यांना वेगळ्या सार्वभौम राज्यनिर्मितीची प्रेरणा दिली. कारण महाराजांनी राजा छत्रसालमधील क्षमता , नेतृत्वगुण ओळखले होते. इथे तुम्ही म्हणाल सगळेच जर राज्य निर्माण करू लागले तर सरदारसैनिक कोण बनणार ? राज्य निर्माण करणे हे फार कमी लोकांना जमते. इतिहासात खुपजण बंडखोरी करतात पण साम्राज्याचा पाया फार कमी जणांना घालता येतो.  इथे जर महाराजांनी छत्रसालला नोकरी दिली असती तर त्यांचे वेगळे राज्य निर्माण झाले असते का ? आम्ही सर्वांनी सरसकट नोकरी सोडा असे म्हणत नसून ज्यांना आवड आहे , इच्छा आहे त्यांनी व्यवसाय करावा असे म्हणत आहोत.

व्यवसाय का करावा ऐवजी व्यवसाय का करू नये असा प्रश्न असावा. नोकरीत आठ तास राबून महिन्याला ठराविक रक्कम खात्यात आली की आम्ही सुरक्षित आहोत असं वाटतं. ह्या वाटण्यात गैर काहीच नाही पण एक सांगा जर व्यवसाय नसले तर कुठून येणारं नोकरी आणि त्यातून मिळणारी सुरक्षितता ? आमच्या पूर्वजांपासूनच नोकरीला उत्तम समजण्याची मानसिकता तयार करून ठेवली आहे. पण हाताची पाचही बोटं सारखी नसतात.
कोणाच्या तरी अंगी उत्तम नेतृत्व गुण असतो , कोणाच्या अंगी उत्तम प्रशासकीय अधिकारी बनाण्यासाठी जी मेहनत असावी लागते त्याची त्यासाठीची तयारी असते तर कोणी उत्तम व्यवसाय करू शकतो. फक्त स्वतःतील तो गुण किंवा आपण काय करू शकतो , आपली आवड काय आहे हे ज्याला कळले तो त्या संबंधित कार्यक्षेत्रात प्रगती करतो. शिक्षक जरी असले तरीही काही लोकांच्या अंगी व्यवसायाचा गुण असल्याने ते क्लासेस सुरू करून व्यवसाय सोबतच ज्ञानदानाचे कार्य करीत आहेतच ना. एक विचार करा झोपेतून उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू लागतात त्या सगळ्या ह्याच व्यवसायातून तयार होतात. साधं ब्रश घेतला दात घासण्यासाठी तो ही एक व्यवसाय नाही का ? असो. तर मुद्दा असा आहे की व्यवसायाला कमी लेखण्याची मानसिकता बदलल्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही.
ज्या नोकरीची स्वप्न तुम्ही पाहता ती देण्याची धमक एक व्यवसायिकाकडेच असते. व्यवसाय म्हणजे चढउतार आलेच, नेहमीच फायद्याचा असतो असे नाही पण तोट्याच्या काळातही मानसिक संतुलन न ढळू देणारा व्यावसायिक असतो. नाहीतर परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी असणारेसुध्दा निराशेच्या गर्तेत जाताना दिसतात. लॉकडाऊननंतर नैराश्य आणि आत्महत्या यांनी समाजाला घेरल पण ह्यात नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.
व्यावसायिकांना संयम आणि अविरत कष्ट करण्याचं गमक कळून चुकलेले असल्याने आहे त्या परिस्थितीतदेखील अनेकांनी व्यवसाय नुसता सुरूच ठेवले नाही तर कासव गतीने का होत नाही प्रगती करत राहिले. व्यावसायिक लोकांना संधीचे सोने करता येते, म्हणूनच घराघरात बनणारी पुरणपोळी फक्त एका व्यावसायिकाने परदेशात पाठवली आणि तिकडे नोकरी निमित्त असणाऱ्यांनीच पुढे अनेक वेळा मागणी करून ह्या व्यवसायाचे महत्त्व वाढविले.
कोणतीही संधी चालून येत नाही तर प्रत्येक व्यवसायिक संधी निर्माण करत असतो. समाजाची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि बाळगलेला संयम ह्यातूनच अगदी घरगुती व्यवसायाने ही भरारी मारलेली दिसते. महिन्याला मिळणाऱ्या ठराविक रकमेत आनंदी तर कोणीही राहील पण व्यवसायिक तो होतो जो इतरांना हे पगार देण्याचे स्वप्न बाळगतो. " हजारो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये" अशी म्हण त्यामुळेच पडली असावी. अनेकांचे संसार चालवणारे व्यवसाय वाईट कसे असु शकतील ?
मान्य आहे अगदी की सगळेच व्यावसायिक नाही होऊ शकत पण पुन्हा तेच सांगेन की अंगीभूत गुणांना वेळीच ओळखून खतपाणी घातले तर कामगार न राहता तिथेही प्रगती करू शकतो.
पालक आपल्या इच्छा आणि अपूर्ण स्वप्न पाल्या वर लादतात, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेच आपल्या मुलामुलींना नोकरी कडे वळवतात, त्यातून अनेक ठिकाणी क्षमता असून देखील असे मुलं किंवा मुली नोकरीला लागतात. पण त्यातून मानसिक समाधान न मिळाल्याने निराशेच्या गर्तेत जातात.
तीच मळलेली वाट सोडून थोड्या कष्टांची तयारी आणि थोडा संयम ठेवला तर उत्तम संधी तुमच्या समोर उभ्या राहतील. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात मनुष्यबळ अधिक आहे आणि व्यवसाय करणारे ह्याचा योग्य उपयोग करून घेत आहेत.
जितकी लोकसंख्या जास्त तितक्या गरजा जास्त त्यासाठी व्यवसाय हे लागणारच. पूर्वीसारखे आता काही ठराविक व्यवसाय नाहीत त्यातही भरपूर व्याप्ती झाली आहेच. अगदी कमी खर्चात सुद्धा व्यवसाय सुरू करता येतो माझं स्वतःच उदाहरण देते. पतीचे प्रिंटिंग प्रेस होत लॉकडाऊनमध्ये आणि नंतर डिजिटल मार्केटिंग प्रकाराने जोर धरलाय. प्रिंटिंगपेक्षा लोक आता अश्या मार्केटिंगला अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला. पण अंगात व्यवसायाचे असणारे किडे स्वस्थ बसू देईना. पण गुंतवणूक करण्यासाठी पैसा ही नाही. मुलीचं शिक्षण आहे पुढे आणि ह्या विचारातून आम्ही हॅन्डवॉश आणि भांड्याचा लिक्वीड साबण हे व्यवसाय शोधून काढले आणि त्यात यश पण मिळालं. व्यवसाय म्हणजे केवळ मोठी गुंतवणूक नाही. छोट्या गुंतवणुकीतून मोठा नफा कमावून मग त्यातून दुसरा व्यवसाय सुरू करू शकतो.
शेवटी तुमचे ध्येय आणि उद्दिष्ट असायला हवे. कामगार बनणे कोणाचेही स्वप्न असु शकत नाही पण छोटा व्यवसाय असला तरी त्यातूनही एखाद्या कुटुंबाला आपण नक्कीच मदत करण्याचे स्वप्न पाहू शकतो.

5. भ्रष्टाचार :

ही तर प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. व्यवसायिक किंवा नोकरदार कोणीही असो ,  भ्रष्टाचाराला विरोध करणे ही समाजाप्रती असलेली प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ह्यात अमुक एक स्तर किंवा व्यवसाय किंवा नोकरदार असा भेदभाव नसतो. अंकिता मॅडमने बिल्डर लोक लाच देऊन कशी कामे करवून घेतात याचे उदाहरण दिले आहे. हे काही अंशी खरेही असेल. पण ही लाच कुणाला दिली जाते तर सरकारी नोकरवर्गालाच ना ? लाच देणारा आणि लाच घेणारा दोघेही समानच दोषी आहेत. सरकारी नोकरीचे तरुणांमध्ये इतके आकर्षण का असते यामागे एक कारण भ्रष्टाचारमधून मिळणारा पैसा हेदेखील आहे.
एकीकडे आपण झुकेरबर्ग , इलॉन मस्क यांची कर्तुत्वगीते गाऊन थकत नाही मात्र दुसरीकडे अंबानी , अदानी यांच्यावर मात्र कितीतरी आरोप सहज लावतो. मुळात एखादा व्यक्ती श्रीमंत आहे म्हणजे तो गैरमार्गानेच श्रीमंत बनला आहे ही मानसिकता बदलायला हवी.

डोळ्यात स्वप्न आणि मनात ध्येय असेल तर चहावाला देखील नेता होतो आणि अंगी जिद्द नसेल तर चांदीचा चमचा तोंडात घेऊन येणारे देखील शेवटी नोकरीचा मार्ग निवडतात. इच्छा तेथे मार्ग असतो.

निष्कर्ष : भारतातील लोकसंख्येचे सध्याचे आणि भविष्यातील वर्गीकरण पाहता त्यात तरुण कार्यक्षम वर्ग जास्त आहे. 2036 पर्यंत लोकसंख्येत सर्वात जास्त वाटा तरुण वर्गाचाच असेल. ही फार मोठी संधी आहे. जर भविष्यात भारताला महासत्ताक राष्ट्र बनायचे असेल तर या तरुणवर्गाचा सुयोग्य वापर करायला हवा. भविष्यात जर भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय उभे केले तर भारतीयांसाठी रोजगारनिर्मिती तर होईलच शिवाय भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. भारतीय युवापिढीत जग जिंकण्याची ताकद आहे. आपण त्यांच्या स्वप्नावर विश्वास ठेवला तर कुणास ठाऊक कदाचित भविष्यात वेगवेगळ्या मोठ्या उद्योगधंद्यांची कार्यालये भारतात असतील. एकेकाळी भारताचा व्यापार रोमपर्यंत चालायचा. तेव्हा भारताला सोन्याची चिमणी म्हणले जायचे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. आता युवापिढीच या भरतभूमीला परत सोन्याची चिमणी बनवू शकतो. भारत जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यावर राज्य करणारे व्यवसायिकही भारतीयच असावेत.

धन्यवाद

लेखिका- रश्मी बंगाळे
  संभाजीनगर