प्रिय सॅन्टा

आपले मोठे, आजी आजोबा, वडीलधारीच आपल्यासाठी सॅन्टा आहेत


(दहा वर्षाच्या मुलाचे सॅन्टाला पत्र )

प्रिय सॅन्टा

कसा आहेस तु? बराच असशील म्हणा. सर्व किती प्रेम करतात तुझ्यावर. आतुरतेने वाट बघतात तुझी. पण मी ना सध्या खूप गोंधळलेला आहे. मला कळतं तेव्हापासून म्हणजे मागील चार पाच वर्षांपासून तु न चुकता ख्रिस्तमसला मी मनोमन इच्छिलेलं मला देतोय. मी भारावून जातो अन सगळीकडे ते गिफ्ट मिरवतो. मित्रांना दाखवतो, आई बाबांना, शेजारीपाजारी मला हवं तेच सॅन्टा नी दिलं असं ओरडत सांगतो. किती मजेदार ना. पण परवा ना आजोबांशी माझं वाजलं. ते ना मोबाईलवर गेम खेळूच नाही देत. टीव्ही बघावं म्हटलं तर अर्धा तास होत नाही तो बस झालं म्हणतात. मैदानी खेळ किंवा मागच्या वर्षी तु ते कार्डबोर्ड गेम दिला तसले खेळ खेळत जा म्हणतात. अगदी मागेच लागतात. पण मला तेच ते कंटाळवाणं वाटतं. मला त्यांचा खूप खूप राग आला. मग मीही कट्टी घेतली त्यांच्याशी. आता परत कधीच बोलणार नाही. आपण जे बोलतो तेच करतो.

तर ते आजोबा बसलेत दुःखी चेहरा करून. काही खात नाहीयेत ना पीत आहेत. आमची आई, मी त्यांच्याशी बोलावं म्हणून मला काय बोलली माहितेय कि दरवर्षी मला ज्या वस्तू ख्रिस्तमसला मिळाल्या त्या देणारा कोणी सॅन्टा नाही तर आजोबाच सॅन्टा बनून येतात मला गिफ्ट द्यायला. ए सॅन्टा खरंच आहे का हे?

आई म्हणते सॅन्टा वगैरे असं कोणी नसतं. आपल्या नातवंडांना आनंदी बघण्यासाठी आजोबा लोकंच सॅन्टा बनतात व मुलांना हव्या असलेल्या वस्तू वाटतात.

मला ना आनंदीही वाटतंय कि माझे आजोबा सॅन्टा आहेत म्हणून पण दुःखही होत आहे कि फक्त मोबाईल वरील गेम साठी मी माझ्या आंबटगोड आजोबा सोबत दोन दिवस झाले बोलत नाहीये.

प्रिय सॅन्टा म्हणजे आजोबा मला यावर्षी तुमच्याकडून म्हणजे सॅन्टा कडून फक्त प्रेम आणि तुमचं निरोगी आरोग्य हवं आहे. हे पत्र वाचल्यावर मला माहितेय तुम्ही लगेच माझ्याजवळ येणार. मी कितीही नाही म्हटलं तरीही माझ्या गालाची पप्पी घेणार. असो चला या मैदानात. आपण खूप खूप मस्ती करून घर डोक्यावर घेऊ.

तुमचाच मस्तीखोर नातू.?♥️"