प्रिय सांता

माझ्या मनातील द्वंद मी आज सांता जवळ मांडत त्यावर सांताच्याच मदतीने मी काहीतरी तोडगा काढायचा प्रयत्न केला आहे.
प्रिय सांताक्लॉज,

       खर तर बाईच्या पोटात कुठल्याच गोष्टी राहत नाहीत,असे म्हणतात. म्हणून कुठे तरी, कुणाजवळ तरी मन हलकं करून ती तिची सुख दुःखे सांगत असते.आज ना मी तुला निवडलय माझ्या मनातील काही गोष्टी सांगण्यासाठी. ए पण हसू नकोस बर ! किंवा त्रागा ही करू नकोस !आता ही माझं डोकं खाणार की काय असे म्हणून.अरे तूच तर एक असा आहेस जो सगळयांच्या मनातलं ऐकून काही तरी गिफ्ट देवून खुश करतोस हो ना!

      तर मग ऐक! मला ना माझ्या सासू सासऱ्यां सोबत राहायचं नाही.मला ना त्यांच्या मर्जीप्रमाणे सारखं राहावं लागत.म्हणजे एकदम ते काही मला बंधनात वगैरे ठेवतात असे नाही,पण माझ्या मुलाला राहुलला खूप जीव लावतात. हा म्हणजे कोणी आलं तर चहा पाणी ठेव असे सांगतात,पण मी बिझी असेल तर सासूबाई च करून घेतात.म्हणजे तसे ते दोघे चांगलेच आहेत पण कधी कधी उगाच माझा त्यांच्यावर संताप होतो, नाहीतर ते मला रागावतात.पण शेवटी घरच आहे भांड्याला भांड लागतच म्हणत ते सोडून देतात अन् मग मीही सोडून देते.पण त्यांचा माझ्यावर अधिकार गाजवणे मला काही पटत नाही .

      आता माझे दिर आहेत ना ते सारखे माझ्या आणि माझ्या सासूबाईंच्या बोलण्यात ढवळाढवळ करतात.मग माझा पुन्हा संताप होतो.त्यांना काय गरज आहे बायकांमध्ये लुडबुड करायची? त्यांनी त्यांचे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम मध्ये लक्ष द्यावे बरोबर की नाही?ते ना उगीच माझ्या नादी लागतात,आणि मग माझी पुन्हा चिडचीड होते. पण तरीही तेही माझ्या मुलाला खूप जीव लावतात.

     माझा नवराही तसाच! माझ्या घरच्यांच्या कुठल्याही तक्रारी मला चालणार नाहीत आणि तू सुद्धा त्यांच्यावर काही आरोप करायचे नाहीत असे म्हणतो.मग किती चुकीचा वागतो बर माझा नवरा. मान्य आहे की त्याला ही त्याचे आईवडील, बायको यांना बँलेन्स करावे लागते,पण मग मीच का नेहमी पडती बाजू घ्यावी? कदाचित मी त्याची हक्काची व्यक्ती आहे म्हणून तो मला शांत राहायला सांगत असावा.पण तोही मला माझा स्पेस देतो बर का! खरं तर आता तुझ्याशी बोलताना मी खरच कोणाची तक्रार करतेय का तरीही घरच्यांना समजून घेतेय हे समजत नाहीये हो ना तुला? खर तर मलाही कळत नाहीये हे! 

असो! पण मला ना तुझ्याकडे बघून आहे त्या स्थितीत फक्त शांत,आनंदी , संयमी राहून काम करत राहायचा मार्ग सापडलाय.कदाचित असा मार्ग अवलंबून मी नक्कीच माझे हे द्वंद्व सोडवू शकेल.ऐक ना माझी ही धोरणी नसली तरीही सत्य तत्वांवर आधारित बडबड ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, हा नवा मार्ग मला येत्या वर्षात संकल्प म्हणून नक्की अवलंबायचा आहे.

याचा माझ्या व्यक्तीमत्वावर किती आणि कसा परिणाम होईल हे तुला नक्की सांगेन.

तुझीच सखी
प्रियंका 


©® प्रियंका शिंदे बोरुडे

# गोष्ट छोटी डोंगराएवढी