कशी सुरुवात करु, कुठून सुरुवात करु, काहीच कळेना. तुम्ही आम्हांला जिथून सोडून गेलात तिथूनच सुरुवात करावी म्हणतेय.
तारीख 9-2-2013, पहाटेच तुम्ही तुमचा शेवटचा श्वास घेतला. अगदी कुणाच्याही नकळत. आई, मोठा भाऊ आणि हे.. तुमच्या जवळच होते हॉस्पिटलमध्ये. पण त्यांना देखील हे समजले नाही. आई जीवाच्या आकांताने रडत होती.. घरी आम्हांला हे लगेच कोणालाही सांगण्यात आले नव्हते कारण घरी लहान भाऊ, बहीण, मी माझी तीन वर्षांची मुलगी आणि माझे नुकतेच एक महिन्याचे झालेले बाळ, आम्ही एव्हढेच होतो. त्या सकाळी आई जेव्हा घरी आली तेव्हा ती खुप शांत एका कोपऱ्यात बसून रडत होती. तेव्हा वाटले की तुम्हांला आता बरे वाटतेय आणि तुम्ही सुद्धा बरे होऊन घरी याल पण.. पण सगळे संपले होते तेव्हा. तुम्ही गेल्याचे समजले.. आणि तुम्ही घरी आले ते शेवटचेच.. पुन्हा कधीही न दिसण्यासाठी.
त्यादिवशी एका बाईचा नवरा, निरागस मुलांचे वडिल, एका भावाचा आणि एका बहिणीचा वडिलांप्रमाणे असणारा मोठा भाऊ गेला होता.. सगळ्यांना पोरक करून.
तुमचे नंतरचे सगळे सोपस्कार पार पाडण्यात आले. काकांनी आणि ह्यांनी ते सगळे व्यवस्थित पार पाडले आणि नंतर सगळ्यांना सावरले देखील. आईकडे तर बघवत नव्हते. तिचं मोकळं कपाळं आणि रडून रडून निस्तेज झालेला सुकलेला तिचा चेहरा. घरी बरीच लोकं यायची सांत्वनासाठी आणि विचारायची, असे कसे झाले, तेव्हा भाऊ आणि बहीण सगळे सांगायचे.. पण मला जेव्हा विचारायचे तेव्हा काहीच समजायचे नाही, मी अगदी शुन्यात नजर लावून बसायचे, डोळ्यातील आसवे आपोआप गालांवरुन ओघळायचे पण बोलता यायचे नाही. कित्येक दिवस मी अशीच होते. सगळे ओरडायचे मला समजावून सांगायचे.. नको करु असे, नको वागू असे, तुझ्या तब्ब्येतीवर परिणाम होईल याचा, बोलत जा ग! मनात असे धरून बसायचे नसते, त्रास होईल तुला.. आणि जो त्रास व्हायचा तो झालाच होता माझ्या मनावर. आई मुद्दामहून माझ्या समोर माझे बाळ सोडून जायची, की निदान त्याला बघून तरी मी भानावर येईल. माझं बाळ.. नुकतच सव्वा महिन्याच झालेल. दुपट्यात गुंडाळलेली माझी छोटी बाहुली, भुकेने जेव्हा रडायची.. रडून रडून अगदी घसा बसायचा तिचा पण माझ लक्षच नसायच तिच्याकडे. तेव्हा आईचं त्या इवल्याश्या बाळाला माझ्या छातीला लावायची आणि तेव्हा ते बाळ शांत निजायचे मांडीवर. माझे स्वतःचे देखील खाण्यापिण्यात लक्ष नसायचे म्हणून माझ्याजवळ सतत कोणीतरी असायचेच. यातून बाहेर पडायला आणि सत्य स्वीकारायला बराच वेळ लागला मला, पण सावरले नंतर हळूहळू.
तुमचा लाडका जावई.. अगदी भक्कमपणे सगळे घर सांभाळून घेणारा, सगळ्यांना समजावून सांगणारा, पण ते देखील त्याचे अश्रू थांबवू शकले नाही. तुम्ही गेल्यानंतर अगदी मोठ्या मुलाप्रमाणे सगळे केले त्यांनी.
तुम्ही जीथे काम करायचात "चलार्थ पत्र मुद्रणालय" तिथले तुमचे सहकारी देखील खुप हळहळ व्यक्त करायचे आणि बोलायचे "इतका चांगला देव माणूस, काहीही होणार नाही त्यांना असे वाटले होते पण अचानक असे कसे होऊ शकते त्यांच्याबाबतीत." आमच्यासोबत त्यांच्या ही डोळ्यात पाणी यायचे. तुम्ही सगळ्यांना मदत करायचे अगदी आर्थिक मानसिक सगळ्याच प्रकारची, तुमच्यामुळे आज कित्येक लोकांची मुलं चांगली शिकली, कित्येकांची घरं उभी राहिली. त्यामुळे अनेक लोकं तुमचे आभार मानताना थकत नव्हते. खुप माणसे जोडली तुम्ही पप्पा, तुमच्या अशा मनमिळाऊ आणि चांगल्या स्वभावाने. खुप काही शिकवून गेलात तुम्ही.
सगळेच खुप दु:खात होते. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना तुम्ही असे अचानक आम्हांला मधेच सोडून गेलात. किती स्वप्न पाहिली होती तुम्ही आणि ती सगळी स्वप्न तुम्हांला, जेव्हा तुम्ही रीटायर व्हाल तेव्हा पूर्ण करायची होती. पण सगळे तसेच अर्ध्यावर सोडून तुम्ही निघून गेलात. तुमच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली, कधीही भरून न निघणारी. मोठ्या भावाचा बिझनेस वाढताना बघायचा होता, बहिणीचे लग्न करायचे होते, लहान भावाला इंजिनिअर बनवायचे होते. हे सगळे घडताना बघायचे होते तुम्हांला प्रत्यक्षात. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पण एक सांगावेसे वाटते तुम्हांला, तुम्ही गेल्यानंतर आम्ही सगळेच खुप खचलो होतो. पण वेळेनुसार सगळ्यांना पुढे जावेच लागते ना!
असे म्हणतात की ज्या घरात माणूस गेलाय त्या घरात लग्न करायचे असेल तर वर्षभरातच करावे लागते किंवा मग तीन वर्षानंतर करावे लागते. म्हणून बहिणीचे लग्न त्याच वर्षी लावण्यात आले. आज तिला पाच वर्षांचा मुलगा आहे आणि खुप सुखात संसार सुरु आहे तिचा. मोठ्याच लग्न देखील त्यानंतर तीन वर्षांनी झाल, आता त्यालाही दोन वर्षांचा एक छोटा मुलगा आहे. आणि आपले छोटे सुपुत्र.. सगळ्यात लाडके आणि खुप हट्टी. त्याने तुमचे स्वप्न पूर्ण केले पप्पा.. तो इंजिनिअर झाला. जेव्हा त्याच्या हातात डिग्री आली तेव्हा खुप रडला असेल तो कारण त्याच्याही पेक्षा तुम्हांला जास्त आनंद झाला असता त्याचा आणि तुम्ही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती.
आज तो एका चांगल्या कंपनीत कामाला आहे आणि घरातही व्यवस्थित लक्ष देतो, अगदी मोठा झाल्या सारखा वागतो. त्याचेही लग्न गेल्यावर्षीच पार पडले आणि मुलगी कोण आहे माहितीये का तुम्हांला? ओळखतात तुम्ही पप्पा तिला, तिच ओ त्याची मैत्रीण \"जागो\" आणि नेहेमीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा त्याने मलाच हे आधी सांगितले होते. गोड मुलगी, घरात आल्याबरोबर तिने सगळ्यांना आपलेसे केले. सगळ्यांचे संसार अगदी सुखात सुरु आहे. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचे सांगून झाले पण आई.. आईची काळजी करु नका पप्पा. कारण तिच्यातच आता आम्ही तुम्हांला देखील बघतो आणि खुप काळजी घेतो तिची. ती सध्या तिच्या नातवाला खेळवण्यात खुप बिजी असते.
आणि मी पप्पा, मी अजूनही तशीच आहे. तुम्ही जायच्या आठ दिवस आधी माझा वाढदिवस होता आणि तुम्ही त्या दिवशी आय सी यू मध्ये असतांना देखील डॉक्टरांकडून परवानगी घेऊन आईला सांगून मला फोन लावून घेतलात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आजही येणाऱ्या माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ते आठवून डोळे पाणावतात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात त्यामुळे घरी कोणाचे लक्षच लागायचे नाही. तुमची लाडकी नात, तुम्ही गेलात तेव्हा ती फक्त तीनच वर्षांची होती. पण आजही तिला विचारले की बाबा आठवतात का ग तुला? तर झटक्यात हो म्हणते, आणि सगळे सांगते की, कसे तुम्ही रोज ऑफिस मधून घरी येतांना तिच्यासाठी खाऊ आणि खेळणी घेऊन यायचात, तिचे लाड करायचात, फिरायला घेऊन जायचात. पण लहान मुलगी, ती तर तुम्ही गेलात तेव्हा नुकतीच महिनाभराची झाली होती. त्यामुळे तिला तुमच्या आठवणी आम्ही तुमचा फोटो दाखवूनच सांगत असतो.
माझ्या मोबाईलमध्ये तुमचा फोन नंबर अजूनही तुमच्याच नावाने सेव्ह होता, पण नंतर ह्यांनी तो नंबर "पप्पा" हे नाव काढून "मम्मी" या नावाने सेव्ह केला. कारण मला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून ह्यांनी नाव बदलले आणि आता मम्मी तुमचा फोन वापरते. पण अजूनही मी त्या फोन नंबरला बघितले की आधी "पप्पा" हेच नाव दिसते आणि फोन लावला की पुन्हा "मम्मी" हे नाव येते. हे म्हणतात की फोनमध्ये काहीतरी घोळ झालाय पण माझे मनं मानत नाही. नेहेमी फोन लावतांना असे वाटते की तुम्हांलाच फोन लावतेय. कोण जाणे कदाचित पलिकडून तुम्हींच बोलाल माझ्याशी आणि म्हणाल "बोल बेटा काय करतीये" असे. किती छान झाले असते ना, जी व्यक्ती आपल्यात नाहीये निदान त्यांच्याशी फोनवर तरी बोलता यायला हवे होते आपल्याला. किती गप्पा मारायचो आपण आधी, तासनतास बोलत असायचो. तुम्ही तर एखादी वस्तू जरी घ्यायची असेल तर आधी माझ्याशी बोलायचे किंवा सांगायचे मला फोन करून. आजही मम्मी काहीही घेताना विचारतेच मला तसे.
तुमचे एक खुप मोठे स्वप्न, तुम्ही जी जागा घेऊन ठेवली होती त्या जागेवर छानस घर बांधायच आणि बाजूला मोकळ्या जागेत मस्त फळझाडे फुलझाडांची बाग तयार करायची. हे स्वप्न तर तुम्ही किती उत्साहाने रंगवून सांगायचे आम्हांला, आज ते सुद्धा पूर्ण केलेय पप्पा. त्या जागेत छानस घर बांधलेय आणि त्याला घराला तुमचेच नाव दिलेय. तुमची सगळी स्वप्न पूर्ण केली पप्पा आम्ही, फक्त ते बघायला तुम्ही हवे होतात.
तुम्ही सगळे करून ठेवले होते आमच्यासाठी, पण आता आमची वेळ होती तुमच्यासाठी काहीतरी करण्याची. पण ती संधी तुम्ही दिलीच नाही आम्हांला. आम्हांला लहानपणापासूनच तुम्ही जे जे हवे ते न मागता अगदी सगळे दिले आणि आता आम्ही तुमच्यासाठी काही करायच्या आधीच तुम्ही आम्हांला सोडून खुप दुर निघून गेलात. तुम्हांला जाऊन आता सात वर्ष होऊन गेलेत पण अजूनही हे खरे वाटत नाही, असे वाटते की, आहात तुम्ही अजून पण घरी आणि मला फोन करून विचाराल "कधी येतेय ताई माहेरी."
तुम्ही आज आमच्यात नाहीये पण तुम्ही लावलेली शिस्त, तुम्ही दिलेली शिकवण, तुम्ही केलेले संस्कार, तुमचे स्वप्न, हे सगळे आम्ही आजही जगत आहोत. तुमच्या आठवणींच्या रुपात, ते आजही आमच्यात जीवंत आहेत आणि कायम राहतील.
खुप आठवण येते पप्पा तुमची, एकही दिवस असा जात नाही कि तुमची आठवण येत नाही. अजुन खुप खुप बोलावेसे वाटते तुमच्यासोबत, जसे आपण आधी फोनवर बोलायचो. आजही हे पत्र लिहितांना कंठ दाटून येतोय माझा. ते सगळे दिवस असे झरझर डोळ्यासमोर येतात. पण मला आजही कोणाला हे सांगता येत नाही. नेहेमीप्रमाणे शांत असणारी मी, तुमच्यावरच तर गेलीये शांत स्वभावाची, कधीही लवकर न बोलणारी, सगळ्यांचे ऐकून घेणारी, मनातच सगळे साठवून ठेवणारी. सगळे म्हणतात मी म्हणजे अगदी तुमचीच डुप्लिकेट कॉपी आहे. दिसण्यात आणि वागण्यात देखील. तुमचे सगळे कलागुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय.
तुम्ही सगळे करून ठेवले होते आमच्यासाठी, पण आता आमची वेळ होती तुमच्यासाठी काहीतरी करण्याची. पण ती संधी तुम्ही दिलीच नाही आम्हांला. आम्हांला लहानपणापासूनच तुम्ही जे जे हवे ते न मागता अगदी सगळे दिले आणि आता आम्ही तुमच्यासाठी काही करायच्या आधीच तुम्ही आम्हांला सोडून खुप दुर निघून गेलात. तुम्हांला जाऊन आता सात वर्ष होऊन गेलेत पण अजूनही हे खरे वाटत नाही, असे वाटते की, आहात तुम्ही अजून पण घरी आणि मला फोन करून विचाराल "कधी येतेय ताई माहेरी."
तुम्ही आज आमच्यात नाहीये पण तुम्ही लावलेली शिस्त, तुम्ही दिलेली शिकवण, तुम्ही केलेले संस्कार, तुमचे स्वप्न, हे सगळे आम्ही आजही जगत आहोत. तुमच्या आठवणींच्या रुपात, ते आजही आमच्यात जीवंत आहेत आणि कायम राहतील.
खुप आठवण येते पप्पा तुमची, एकही दिवस असा जात नाही कि तुमची आठवण येत नाही. अजुन खुप खुप बोलावेसे वाटते तुमच्यासोबत, जसे आपण आधी फोनवर बोलायचो. आजही हे पत्र लिहितांना कंठ दाटून येतोय माझा. ते सगळे दिवस असे झरझर डोळ्यासमोर येतात. पण मला आजही कोणाला हे सांगता येत नाही. नेहेमीप्रमाणे शांत असणारी मी, तुमच्यावरच तर गेलीये शांत स्वभावाची, कधीही लवकर न बोलणारी, सगळ्यांचे ऐकून घेणारी, मनातच सगळे साठवून ठेवणारी. सगळे म्हणतात मी म्हणजे अगदी तुमचीच डुप्लिकेट कॉपी आहे. दिसण्यात आणि वागण्यात देखील. तुमचे सगळे कलागुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय.
सगळे म्हणतात बोलून मोकळी होत जा, पण तेच तर लवकर जमत नाही मला. पत्र तर लिहिलेय मी, पण पत्ता कुठला टाकू कळत नाहीये, तरीही हे पत्र लिहिण्याचा अट्टहास. तुम्ही जिथे कुठे असाल पप्पा, हे पत्र नक्कीच तुमच्या पर्यंत पोहोचेल ही आशा करते आणि इथेच थांबते.