Aug 09, 2022
स्पर्धा

जीवलगा

Read Later
जीवलगा

#जीवलगा

घरात एक नकोशी शांतता होती. नेहमी आपल्याच मस्तीत असणारा,गुणगुणणारा,हसरा बोलका प्रथम अगदी शांत निपचित बेडवर पडला होता. कधी नव्हे ते गोलगोल फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांना बघत होता. कालचक्रही असंच असतं ना! 

प्रथमला कंपनी जॉईंट करुन दहा वर्षे झाली. इमानेइतबारे नोकरी केली त्याने. खूप मेहनत केली,जीव ओतून काम केलं आणि आज त्याने राजिनामा दिला होता नोकरीचा. तिथलं राजकारण असह्य झालं होतं त्याला. 

तो पुढे जात असलेलं काही कलिग्सना बघवत नव्हतं. बॉसने कान त्यांनीच भरले होते आणि बॉस त्याला नाही नाही ते बोलला होता. थेट त्याची जात काढली होती त्याने. प्रथमने ठरवलं सोडायची ही असली नोकरी आणि वेगळी पाऊलवाट शोधायची. सोप्पं का होतं ते! म्हणूनच तो आतून घाबरला होता. 

इतक्यात त्याची बायको, प्रेरणा आली. तिला प्रथमच्या मित्राकडून सारी माहिती मिळालीच होती. ती फ्रेश होऊन आली. प्रथमच्या आवडीचे बटाटेवडे आणलेले तिने येताना. चहा केला व कपात ओतून कप प्रथमसमोर धरला. प्लेटमधे वडे ठेवले. 

"प्रेरणा,मी चुकीचं वागलो का गं?"

"काही चुकीचं वागला नाहीस तू. त्या माणसांची पात्रता नाही तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाच्या सहवासात रहाण्याची. लग्नानंतर दहा वर्ष व लग्नाआधी तर अगदी शाळुमित्र होतो आपण. तुची जिद्द,तुझी चिकाटी जाणून आहे मी म्हणून तर मामाने आणलेलं अमेरिकेतलं स्थळ लाथाडलं तुझ्याकरता."

प्रेरणा प्रथमच्या गळ्यात तिचे गोरे हात गुंफू गाऊ लागली,"तु मेरा जानू है। तु मेरा दिलबर है। मेरी प्रेमकहानी का तु हिरो है।"

प्रथमचं मरगळलेपण आपसूक गळालं. बराच वेळ दोघं एकमेकांच्या बाहुपाशात राहिली. थोड्याच वेळात प्रथमच्या आईचा फोन आला.

"प्रथम कसाएस?"

"मी मजेत,आई तु गं?"

"माझं काय नेहमीचंच. ते जाऊदे. अरे जावयांना थोडी पैशाची मदत हवी होती. घर घेताहेत ते. तू एक लाख तरी दे. तुझे पैसे ठेवणार नाहीत ते. थोडेथोडे परत करतील."

"आई सध्या नाही जमणार. प्लीज रागावू नकोस."

"ही अपेक्षा नव्हती प्रथम तुझ्याकडून. नात्यापेक्षा पैसा महत्त्वाचा केव्हापासून झाला तुला? हेच संस्कार केले मी तुझ्यावर? का बाजुला बसलेली प्रेरणा खुणेने पढवतेय तुला?"

"आई,अगं तिला कशाला मधे ओढतेस? ती असं का सांगेल मला? खरंच जरा तंगी आहे म्हणून म्हणालो मी."

"राहुदे,राहुदे. कळालं तुझं बहिणीवरचं प्रेम." असं म्हणत प्रथमच्या आईने फोन ठेवला.

प्रेरणा सगळं बोलणं ऐकत होती. तिला नेहमीसारखा सासूबाईंच्या तिरसट बोलण्याचा राग आला नाही कारण तिला माहित होतं की ही वेळ त्रागा करण्याची नाही.

 सासुबाईंना प्रथमच्या परिस्थितीची कल्पना असती तर त्यांनी पैसे मागितलेच नसते. आणि त्यांच्या ह्रदयरोगामुळे डॉक्टरांनी त्यांना मानसिक ताण येईल,धक्का बसेल असं काहीही सांगायच नाही असं सांगितलं होतं तेव्हा त्यांच बोलणं ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

प्रेरणाने प्रथमचे दोन्ही हात तिच्या हातात धरले व म्हणाली,"काही झालं तरी हताश व्हायचं नाही आणि आईवर तर मुळीच रागवायचं नाही."

प्रथम कसनुसं हसला. दुसऱ्या दिवसापासून मुलाला शाळेत सोडायची,आणायची जबाबदारी प्रथमने घेतली. तिथेही चारेक दिवस झाल्यावर बायांची कुजबुज सुरु झाली.."पार्थचे बाबा घरीच असतात वाटतं! दुपारीही येतात पार्थला आणायला. काय नोकरीबिकरी सुटली की काय!बिच्चारे." प्रथम हे ऐकून अजुनच नाराज व्हायचा.

प्रेरणा सकाळी लवकर उठून पोळीभाजी करुन जायची. दुपारी वरणभात प्रथम लावायचा शिवाय बाजारात जाऊन भाजी आणणं,दळण आणणं,कपडे मशीनला लावणं,वाळत घालणं अशी बरीच कामं करायचा. त्याचबरोबर नोकरीही शोधत होता. 

मुंबईत नातेवाईकाच्या मुलीचं लग्न असल्याकारणाने त्या लग्नास हजर रहाण्याकरता प्रथमची बहीण प्रथमकडे आली होती. तिने हे प्रथमचं घरकाम करणं पाहिलं व आईला फोन करुन सांगितलं की दादाचं काही खरं नाही. प्रेरणावहिनी त्याला घरातली सगळी कामं करायला लावते. 

प्रेरणाच्या सासूने प्रेरणाला ऑफिसमध्ये फोन केला व तिला नको नको ते बोलली. 

प्रथम व प्रेरणा दोघंही तोंड दाबून बुक्क्याचा मार खात होते,तेही आपल्याच सगेसोयऱ्यांकडून.

एक वर्ष असंच गेलं प्रथम नोकरी शोधत होता. जाईल तिथे अपयश हात धुवून मागे लागलेलं पण प्रेरणाची खंबीर सोबत होती पाठीशी. लोन काढून गाडी घेतली. लोकांना कुठे जायचं असेल तिथे सोडू लागला. घरात थोडं उत्पन्न येऊ लागलं. 

याच धंद्यातले काही विश्वासू मित्र लाभले. एकाच्या दोन,दोनाच्या चार गाड्या झाल्या. टुरिझम कंपनी काढली. हाताखाली ड्रायव्हर, गाईड ठेवले. प्रेरणाही प्रथमच्या व्यवसायात दाखल झाली. 'प्रीत टुर्स' नावाची त्यांची कंपनी ठिकठिकाणी केलेल्या जाहिरातींमुळे,त्यांच्यासोबत टुरला गेलेल्या टुरिस्टनी कथन केलेल्या अनुभवांमुळे नावारुपाला आली.

बघता बघता पार्थ मोठा झाला. तोही आईवडिलांच्या बिझनेसला जॉईंट झाला. 'प्रीत टुर्स'चा विसावा वर्धापन दिन होता. प्रथमने त्याच्या आईवडिलांना,बहिणीच्या कुटुंबियांना,बिझनेस मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलं होतं. 

हॉलमधे सुंदर रोषणाई केली होती. जागोजागी विविधरंगी फुलांची सजावट केली होती. सगळा मित्रव्रुंद उपस्थित होता. 

प्रथमने आज प्रथमच सर्वांसमोर कथन केला त्याचा इथपर्यंतचा प्रवास, या प्रवासात त्याला त्याच्या अर्धांगिनी,प्रेरणाने दिलेली खंबीर साथ...त्याची नोकरी गमावणं...नोकरीच्या शोधात वणवण फिरणं...धंद्यात उतरणं...त्यातही एकदोनदा आलेलं अपयश...त्याचं खचणं आणि त्यातुनही प्रेरणाने त्याला पुन्हा उभं करणं,त्याची उर्जा बनणं.
मित्रांनी उभं राहून प्रेरणासाठी टाळ्या वाजवल्या.

 प्रेरणाची सासू म्हणाली,"मलाही थोडं बोलायचं आहे."  ती स्टेजवर आली व बोलू लागली,"नमस्कार,तुम्हा सर्वांच स्वागत. आज एक आई म्हणून, एक सासू म्हणून माझा ऊर अभिमानाने भरुन आला आहे. 
माझ्या लेकाच्या पडत्या काळात माझी सून प्रेरणा,खऱ्या अर्थाने त्याची प्रेरणा ठरली. गेल्या वीस वर्षांत अनेक अडचणी  माझ्या लेकरांच्या आयुष्यात आल्या पण मला मानसिक ताण येऊ नये म्हणून त्यांनी त्या जोडीने झेलल्या. मला अडचणींची झळ लागू दिली नाही. माझ्या मनाला जपत राहिले दोघंही.

काही प्रसंग आठवतात आज,जेव्हा मी या दोघांना टोचून बोलले आणि माझी मलाच लाज वाटते. मला माफ कराल का रे बाळांनो!" असं म्हणून तिने आपले दोन्ही हात फैलावले तशी प्रथम व प्रेरणा तिच्या कुशीत शिरली. 

तो भावुक क्षण पहाताना उपस्थितांचा कंठ दाटून आला व आपसुक डोळे पाझरु लागले.

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now