अदृश्य सांता आजोबास पत्र

letter to invisible santa clause


स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी !
( २५ डिसेंबर ते १ जानेवारी)
विषय - सांताला पत्र - प्रिय सांता

शीर्षक - अदृश्य सांता आजोबास पत्र!


प्रिय अदृश्य सांता आजोबास,
सप्रेम नमस्कार . वि.वि.

मी सहाव्या वर्गात शिकणारा प्रमोद, तुम्ही मला ओळखत नाही पण या सणाच्या निमित्ताने व नव वर्षाच्या निमित्ताने हे पत्र लिहितोय,पत्रावर एक पत्ता असतो पण तो काय लिहावा हे मला कळत नाहीय त्यामुळे मुक्काम पोस्ट ईरा ब्लॉगिंग वर हे पत्र धाडतोय!

दरवर्षी नाताळाचा सण येतो आणि क्रिसमस ट्री व ती गाणी वाजतार. आम्हा मराठी शाळेत किंवा सरकारी शाळेत शिकणार्‍या मुलांना त्यातलं विशेष कळत नाही.
पण एक जाणवतं की हल्ली लोकांनी लाल कपड्यातल्या सांताक्लॉज ला खूप प्रसिद्ध करून टाकलंय. आमच्या मॅडम म्हणतात की व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने ग्रीटिंग कार्ड कंपनीच्या लोकांनी आणि सोशल माध्यमाच्या लोकांनी हे सगळं डोक्यावर घेतलय कारण त्यामुळे त्यांचा बिजनेस होतो .

मला हे सारं काही कळत नाही पण सांताक्लॉज म्हणजे तू लाल कपड्यातला पांढऱ्या गाडीचा म्हातारा म्हणजे सांता आजोबा जे मुलांना भेटवस्तू देतात एवढंच मला समजतं, पण सांताक्लॉज आजोबा तुम्ही मुलांना भेटवस्तू का द्यायचात? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी . . . नाही का? पण ते गिफ्ट समोरासमोर देत नव्हतात ना !

तो आदर्श रूपाने घ्यायला हवा ना , मग का लोक आजकाल त्यांच्यासारखे कपडे घालून प्रदर्शन करतात, फोटो काढतात किंवा तशी टोपी घालून स्वतःला तसा दाखवावे म्हणतात.

पण दाखवल्याने कुणी सांताक्लॉज तर बनू शकत नाही ना , त्यासाठी तसं वागाव लागतं नाही का ? पण म्हणजे आपण जाहिरात कशाची करतो आहेत ?

पण मला एवढं कळतं की मला समजतं तेव्हापासून मी एका अनाथाश्रमात वाढलोय,तरीही मला रोज वेळेवरती खायला प्यायला मिळतं, आवश्यक त्या सगळ्या गोष्टी मिळतात. माझ्या शाळेची फी भरली जाते, माझा गणवेश आणि पुस्तकही वेळेत येतात .

आई वडील नसतानाही सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी मला संघर्ष करावा लागला नाही म्हणजे कोणीतरी दानी लोक जगात आहेत जे हे सगळी मदत करतात.

माझ्यासाठी ती सगळी लोकं सांताक्लॉज आजोबाच आहेत किंवा त्याच्यापेक्षाही खूप महान आहेत , म्हणजे ते अदृश्य सांता क्लॉजच आहेत जे केवळ क्रिसमसला एक भेटवस्तू देऊन शांत बसत नाहीत.

माझा शिक्षणाचा खर्च कोणीतरी घेतलेला आहे, अनाथ आश्रम पाहायला येणारे बरेच लोक आमच्या जेवणाचा एक दिवसाचा खर्च करतात, कोणी आमच्यासाठी त्यांचा वाढदिवस येथे साजरा करतात, कोणी खेळणी आणून देतात आणि कुणी खाऊ !
ह्या सगळ्या अशा अदृश्य सांता आजोबांचे मी यानिमित्ताने सर्व अनाथ व गरजू मुलांकडून मनापासून आभार मानू इच्छितो.

ज्यांना आई-वडील आहेत मुलांना तर सगळ्या गोष्टी मिळतात ,आमच्यासारख्या अनाथ मुलांसाठी स्वतःचे कमावलेला संपत्तीतून दान देणे म्हणजे खूप मोठं मन लागतं .

या सणाच्या निमित्ताने मी सगळ्या अशा लाल कपडे न घालताही किंवा बर्फातून न फिरताही आमच्याच आसपास अदृश्यपणे हजारो अनाथ मुलांसाठी मदत करणाऱ्या महादानी लोकांचे आभार मानू इच्छितो .

मी हे लिहिलं म्हणून तुम्ही राग मानू नये बर का सांताक्लॉज अंकल, तुमचं कार्य तर महानच होतं. असं त्या वयातही त्या बर्फातून तुम्ही केवळ मुलांच्या आनंदासाठी इतकं लांब लांब जावून भेटवस्तू देत होतात.
गुगल वरती शोधलं तर तुमचा पूर्ण इतिहास सापडतो पण तुमचा इतिहास जगाला कळाला तरी. मला फक्त इतकंच सांगायचंय की ज्यांचं कार्य तुमच्यासारखं असलं तरीही लोकांना इतिहास माहीत नाही असे खूप लोक आहेत जगात. त्यांच्या चरणी आदराने प्रणाम करावा वाटला म्हणून हे पत्र लिहिलं

सांता आजोबा तुम्ही तुमचं कार्य सतत चालू ठेवा आणि तुमच्यासारख्या अदृश्य संतांना देखील प्रेरित करा. जग आता जवळ आलंय त्यामुळे तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचू शकता.

सर्व मोठ्यांना सा. नमस्कार आणि लहानास खूप प्रेम!

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

(चूकभूल क्षमा असावी. मनातलं काहीतरी बोलावं वाटलं म्हणून हा पत्रप्रपंच !)

आपलाच प्रमोद
वर्ग सहावी
अभिनव अनाथ आश्रम

समाप्त

©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक -०१.०१ .२०२३

(ता.क. हे पत्र स्पर्धेचा भाग आहे व पूर्णतया काल्पनिक आहे , यात कुणाच्या भावना दुखवायचा उद्देश्य नाही.)