प्रिय आजोबा...

A Letter to the Dearest Grandpa...
प्रिय आजोबा......❤️

पत्रास कारण ---केवळ तुमची आठवण...!

तुम्ही कसे आहात..?असं विचारायची कणभरही हिम्मत उरली नाही.एक महिना होईल तुम्ही आम्हाला कायमचे पोरके करून गेलात.पण तुमची आठवण क्षणाक्षणाला सुन्न करते.घरातील कोपरांकोपरा दिसला की तुमचीच आठवण येते.अगदी सकाळी येणाऱ्या वर्तमानपत्रालाही तुमची चांगलीच सवय लागली होती.वयाच्या ९२व्या वर्षीही तुमची दृष्टी शाबुत होती.

ते वर्तमानपत्र तर अजूनही ठरल्या वेळेत दाराशी येऊन पडतं.पण तुमची ती जागा रोज सकाळी रितीच भासते.वस्तूंनाही इतका लळा लागावा म्हणजे हे नक्कीच काहीतरी वेगळं होतं.खरचं तुम्ही म्हणजे कमालीच अजब रसायनच..!

आजोबा , यंदा सुट्टीत गावी यायच होतं.पण आता घरातून पायच निघत नाही. तरीसुध्दा मन घट्ट करून एकदा तुमच्या लाडक्या रोहिणीला भेटून येईन. तुम्ही गेल्यापासून गोंधळून गेली माझी आजी.तुम्ही वयाची ७२ वर्षे एकत्र घालवली. इतकं प्रेम करायला कसं जमलं..?आमची पिढी ७२ मिनिटही एकत्र राहत नाही. तुमचं प्रेम सहज-सुंदर-सुबक होतं.सलाम तुमच्या प्रेमाला...!

आजोबा तुम्हाला माहित आहे का...?तुम्ही म्हणजे कोकणातील एखादा रानमेवाच जणू...! कितीतरी आठवणींचा खजिना तुमच्याकडे असायचा.त्यादिवशीही तुम्ही गप्पा मारता- मारता सहजपणे १९४० पासूनचा तुमच्या आयुष्याचा सगळा प्रवास सांगितला.त्यावेळी आईच्या आठवणीने तुमचे डोळे अक्षरशः भरून आले होते. आता राहून राहून वाटतं तुमच्या जाण्याने एक रानमेवाच हरवलाय.आठवणींची चव आता बेचव झाली.आमच्याशी तासनतास कोण गप्पा मारणार?घरादाराचे हिस्से नाही तर आठवणींचे किस्से रंगवायचे असतात हे कोण सांगणार? दोन दिवसाची सुट्टी आमची,तिसऱ्या दिवशी निरोप घेताना हक्काने कुणाला बिलगणार...?

आजोबा ऐकताय नं? की तुम्ही मनाची कवाडं कायमची बंद केलीत...? आजोबाsssss...........!
तुमच्यासोबतचा प्रत्येक क्षण हा हळवा नी तितकाच विनोदी होता.हसता-हसता डोळ्यातून केव्हा पाणी यायचं कळायचच नाही.तुमच्या सहवासात बालपण सुखात गेलं.आणि शिंग फुटेपर्यंत सहवास लाभला याचा आनंद आहे. पण अजून गालावर सुरकुत्या येईपर्यंत तरी तुमचा सहवास हवा होता.काही हरकत नाही.आता तुमचा सहवास नसला तरी वाहणारा वारा त्या प्रांजळ स्पर्शाची फुंकर नक्कीच घालून जाईल.


पत्र वाचताय नं.... ?असं मी आता विचारत नाही. कारण मला माहित आहे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून माझं हे पत्र नक्कीच वाचत असणार.आणि हेही माहीत आहे की तुम्ही या पत्राला काही उत्तर पाठवणार नाही. कारण, आता तुमच्या पेनातील शाई विरली आहे नं...! तुम्ही पत्र लिहीणार तरी कसं...?

आयुष्यातील क्षण भराभरा निसटून जातात.आणि निसटून गेलेलं पुन्हा परत येत नाही. अगदी असच तुम्हीही केव्हा निसटून गेलात कळलच नाही. तुम्ही परत कधीच येणार नाहीत तरीही तुम्हाला पत्र लिहीण्याचा हा माझा अट्टाहास...केवळ तुमच्यासाठी...!

सुटल्या गाठी,संपल्या भेटी तुटली सारी ही बंधने...
जसे अलगद अचानक लपते हे ढगाआडचे चांदणे...

आजोबा,कधीतरी ते चांदणं होऊन याल का भेटायला....? मी वाट पाहत उभी असेन तुमचा निसटून गेलेला हात पुन्हा धरण्यासाठी....!

थांबते आता...तुम्ही काळजी घ्या स्वतःची.
तुम्हाला खूप खूप प्रेम...!

तुमची लाडकी नात,
हर्षु.