Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

डेड बॉडी .... एक गुरू !

Read Later
डेड बॉडी .... एक गुरू !
अनुभव हाच सगळ्यात मोठा गुरू असतो असं म्हंटलं जातं , जे विशेषतः वैद्यक क्षेत्रासाठी खासकरून अगदी खरं आहे . तुम्ही कितीही थेअरी , प्रॅक्टिकल शिकलात तरी प्रत्येक रुग्ण वेगळा असतो आणि तो नवीन काहीतरी शिकवून जातो . माझ्या आयुष्यात अनेक गुरू आले , छे , माझ्या नशिबाने मी त्यांना भेटले पण मला शांत करणारी , जीवनाचे सार शिकवणारी एक \"डेड बॉडी\" होती. आज मी त्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहे . त्यासाठी आधी पार्श्वभूमी सांगणं, तो प्रसंग शब्दांकित करणं गरजेचं आहे .

तो दिवस मी कधीच विसरणार नाही.…...
माझी कोव्हीड ड्युटी सुरू होती. रोजच्या स्ट्रेस मध्येही मी स्वतःला आणि पेशंटना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मला mild symptoms असणाऱ्या पेशंटच्या वॉर्डमध्ये काम असल्याने रुग्णांचे मनोबल वाढवणे हे गोळ्या औषधां इतकेच महत्वाचे आहे ह्याची मला जाणीव होती.
खरं तर खूप त्रास होत होता मला कारण घरच्यांचं टेन्शन, आपल्यामुळे त्यांना संसर्ग होऊ नये हे आणि त्यापेक्षा जास्त हतबलता.... माझ्या वॉर्डमधून रोज दोन तीन तरी रुग्ण ICU त पाठवावे लागत होते, निम्म्याहून अधिक रुग्णांना ऑक्सिजन लागतच होता, वेगवेगळ्या वयोगटातले आणि आर्थिक स्तरातले अनेक पेशंट, धाप लागलेले, घाबरलेले आणि त्यांना शिताफीने हाताळणारी माझी कोवळ्या वयातली, अती जोखीम उचलणारी residents ची सेना.... मी मात्र, हतबल.... ठोस असं काहीच नाही हातात या भावनेने.

Blessings in disguise म्हणतात तसं, माझ्या नशिबाने त्या आठवड्यात खाटांची टंचाई नुकतीच सुरू झाली होती, त्यामुळे थोड्या प्रयत्नाने बेड arrange करता येत होता. तुरळक अपवाद वगळता ऑक्सिजन, सर्व साधने, औषधे (अर्थात Ramdesivir सोडून ) मिळत होती.

एक आजी ऍडमिट झाल्या, ८२ वर्षांच्या. त्यांना ऑक्सिजन लावताना म्हणाल्या," पोरी तुम्हा डॉक्टरांची कमाल आहे. पण आता ह्या वयात नाही बघवत गं आम्हाला, परवा पुतणी गेली माझी, वय ४० वर्षे. देवाला कसा पाझर फुटेना? आम्हा म्हाताऱ्यांना न्यायचं सोडून लेकरांची माय उचलली....." मी फक्त निःशब्द होते, काहीच चूक नव्हतं त्यांचं, मी फक्त पाठीवर हात ठेवला.
त्या विचारात असतानाच," मॅडम, बेड नंबर १२ च्या पेशंटचे saturation ड्रॉप होतंय, ऑक्सिजन आठ लिटरने चालू आहे. " रेसिडेंटने सांगितलं
"१५ लिटरने कर, तोच पेशंट ना? ४० वर्षांचा, डायबेटीस असलेला, HRCT स्कोर १२? मी म्हंटलेलं ना, ICU बेड arrange करा, तोच ना? Be quick, फोन करा icu बेडसाठी, पटकन" मी पेशंटकडे धावले. ऑक्सिजन लेव्हल ७० होती, श्वास लागत होता, पेशंट हबकत होता.
आता मीही गडबडीत होते, राउंडच्या वेळेलाच त्याला लागलेली धाप बघून वाटलं, कदाचित ह्या पेशंटला व्हेंटिलेटरची गरज पडेल पण ICU त जागा नव्हती आणि त्यावेळेला saturation 90 होते त्यामुळे बेड झाल्यावर कळवा असं मोघम icu त सांगून ठेवलं होतं. माझ्या डोळ्यासमोर कमी होणारी ऑक्सिजन लेव्हल बघून मी स्वतः icu कडे धाव घेतली, "सिस्टर, जागा झाली का? प्लिज पटकन व्हेंटिलेटरवाला बेड हवाय, प्लिज icu incharge शी बोला पटकन."

" मॅडम, एक आजोबा सिरीयस आहेत, सर त्यांच्याजवळ आहेत वीस मिनिटे झाली CPR देताय, थांबा, बोलते त्यांच्याशी....." icu सिस्टरनी सांगितलं. मी तिथेच थांबले. पुढच्या काही सेकंदात सिस्टर आल्या," मॅडम, ते आजोबा expire झालेत, बेड करते, पेशंट शिफ्ट करा....."

"बरं झालं" म्हणत मी रेसिडेंटला पेशंटला शिफ्ट करायला सांगितलं आणि वॉर्डबॉयला आवाज दिला. पटापट सूत्र हलवून पेशंटला व्हेंटिलेटरवर घेणे एवढंच माझं लक्ष्य होतं. त्या वॉर्डबॉयला ह्यातल्या कशाचीच कल्पना नव्हती आणि मी मात्र किंचाळत होते. "बॉडी लवकर गुंडाळा, उचला, तिकडे खाली ठेवा, नंतर बाहेर काढू आपण, क्लिनिंग करून आधी ह्या पेशंटला बेडवर घ्या. लवकर, पटापट हात उचला..."
अखेरीस, मला यश आलं. Icu incharge सरांनी माझ्या पेशंटला क्षणार्धात व्हेंटिलेटरवर घेतले आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. माझ्या वॉर्डकडे परत जातांना, काहीतरी मिळवल्याची भावना मनात होती पण......
अचानक मनात आलं, आपण इतके बोथट झालोय? आजोबा गेले ह्यावर प्रतिक्रिया होती, बरं झालं? अजुन त्यांचं व्हेंटिलेटर काढताय तोवर माझा पेशंट स्ट्रेचरवर आणला होता, ही काय लग्नातल्या जेवणाची पंगत आहे, जागा धरायला? आजोबा ह्या शब्दाची जागा क्षणात बॉडी ह्या निर्विकार जाणीवेने घेतली? आजोबांचे शव गुंडाळायचीही किती घाई केली..... मनात चर्रर्रर्र झालं....

खिन्न मनाने वॉर्डात परतले. कुरुक्षेत्रात अर्जुनाला उपदेश करावा तसा मला माझ्या सिनिअरने उपदेश करत समजावलं, आजोबा गेले किंवा ते गेलेलेच होते, तू फक्त दुसऱ्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी ही पावलं टाकलीस, तुझं काहीच चुकलं नाही, पण मनातलं वादळ थांबत नव्हतं. एक डॉक्टर म्हणून पेशंट वाचवल्याचा आनंद, बोथट झाल्याच्या दुःखाने कधीच मावळला होता....

खूप दिवस हा प्रसंग मनात घोळत होता आणि त्यातून मी खूप शिकले . एक तर ज्या शरीरावर आपण प्रेम करत राहतो , ते क्षणार्धात बॉडी होऊन जातं आणि त्याची काहीच किंमत उरत नाही . त्याहून मोठी समज मला मिळाली की आयुष्य म्हणजे ह्या क्षणी काय महत्वाचं हे ठरवणं हा खेळ ! हा विचार मला स्पर्शून गेल्यावर मी नेहेमी रुग्णाला किंवा अगदी दैनंदिन जीवनात देखील कुणाशी बोलतांना त्या माणसाची गरज किंवा त्या क्षणाची priority काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करते . तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे , हा तर माझा नेहेमीचा प्रश्न आहे. ह्यातून मला हळूहळू एक लक्षात आलं की बहुतांशी माणसं चुकीची नसतात , चुकीची किंवा वेगळी असते ती परिस्थिती..... आज एका व्यक्तीकडे प्रमोशनची पार्टी चालू असताना दुसऱ्या व्यक्तीकडे संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत असते. पण म्हणून पार्टी करणारा किंवा काम नाही म्हणून भीक मागणारा , दोन्ही चुकीचे नाहीतच !

समोरच्याच्या भूमिकेत जाऊन त्याची priority काय आहे , हे समजून घेऊन वागण्याची प्रगल्भता मला त्या प्रसंगाने , त्या डेड बॉडीने दिली आणि माझं चिडचिड करणं कमी झालं . एक चांगली डॉक्टर , लेखिका ,counsellor , आई , पत्नी , सून , मैत्रीण अशा बहुरंगी भूमिका बजावताना मला ह्या शिकवणीचा खूप खूप उपयोग होतो . हीच शिकवण मी माझ्या बऱ्याचशा लेखातून देण्याचा प्रयत्न करते .

ही शिकवण ना मला कोणत्या पुस्तकातून मिळाली ना कुठल्या व्यक्तीकडून ! तुम्हीच सांगा , अनुभव ह्या गुरूने दिलेलं हे जीवनाचं ज्ञान आणि त्यातून सगळ्यांना समजून घेऊन , आनंदी रहाण्याचा व इतरांना आनंदी ठेवण्याचा घेतलेला वसा तुमच्या सगळ्यांबरोबर वाटणं आवश्यक होतं ना ?

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Shilpa Kshirsagar

Doctor

I am a gynaecologist and love to write and read.

//