आई -"अग कोण म्हणतं तुला स्वप्न बघू नकोस म्हणून? स्वप्न बघण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच असतो. पण ती स्वप्न अगदी शंभर टक्के खरे होतील अशी अपेक्षा मात्र ठेवायची नाही! चल रात्र खूप झाली आहे, उद्या लवकर उठायचं आहे ना! तुझ्या सासरी जाऊन जावईबापू आणि विहीणबाईंना तिळगुळ द्यायचं आहे. झोप आता पटकन."
रमाने हिरमुसून नुसतीच मान हलवली. रमाची आई लगेच निद्रा देवीच्या अधीन झाली. पण रात्री काही केल्या रमाला लवकर झोप येत नव्हती. भूतकाळातल्या अनेक घटना तिच्या डोळ्यासमोर वारंवार फेर धरून नाचत होत्या आणि विचार करता करता ती खूप मागे गेली….
त्या दिवशी रमाचा बारावीचा रिझल्ट टाकला होता. रमाला बारावीला चांगले मार्क्स असूनही घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने, इच्छा असूनही इंजीनियरिंग करता आलं नाही, म्हणून मग तिने ग्रॅज्युएशन नंतर बी.एड. केलं आणि एका प्रायव्हेट शाळेत नोकरी करून घरच्या आर्थिक परिस्थितीला ती थोडा हातभार लावू लागली. एव्हाना तिच्या घरा शेजारच्या आणि कॉलेजमधल्या जवळपास सगळ्याच मैत्रिणींची लग्न झाली होती.
रमा दिसायला सुंदर असूनही तिच्या वडिलांकडून किती हुंडा मिळेल याची नातेवाईकांना आणि स्थळ आणणाऱ्यांना खात्री नसल्याने, कुणी फारसे रमाच्या लग्नासाठी खटपट करत नव्हते. मैत्रिणी मात्र स्वतःच्या लग्नात तिला आवर्जून, आग्रहाने बोलवायच्या आणि लग्नाच्या तेवढ्या धामधुमीतही मैत्रिणींची आई किंवा बहिणी किंवा इतर कोणीतरी तिला हटकून विचारे "काय मग रमा लाडू कधी देणार? माझ्या ओळखीत आहे एक मुलगा! सर्वसाधारण घरातला, ऑटो चालवणारा, काढू का तुझा विषय" किंवा कधी कधी तिचा मामाच तिच्या आईला सुचवे..
मामा -"ताई मी काय म्हणतो! रमाचं लग्न जमवण्यासाठी थोडी तडजोड करणार कर ना! एक स्थळ आहे. अग मुलगा आत्याच्या घरी राहतो. आत्याच घर त्यालाच मिळणार आहे."
आई -" अरे पण शिक्षण, नोकरी, व्यवसाय काय करतो?"
मामा -"म्हणजे बघ तो मुलगा इलेक्ट्रिक फिटिंगचं काम करतो, स्वतःच्या पोटापुरतं कामवतो. रमाचे बी.एड. झालंच आहे, ती ही नोकरी करून संसाराला हातभार लावेलच."
अजून काय काय नि काय काय!
रमाच्या मावस भावाच्या लग्नातली गोष्ट. रमाचा मावस भाऊ रमाच्याच वयाचा. पण इंजीनियरिंग झालेला. जिच्याशी तो लग्न करणार होता ती ही इंजिनीयरच होती. ते लग्न धुमधडाक्यात झालं. नवीन जोडपं देवदर्शनाला म्हणून शेगावला गेले. जाताना सोबत मावस, मामे, चुलत, आत्ते भावंडे अशी सारीच गेली. पण रमाला कोणी साधं सोबत चल म्हणून एका शब्दाने विचारलं नाही.
त्यानंतर दोन महिन्यातच रमाचेही लग्न जमलं! खरंतर तिच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा वरचढ स्थळ मिळालं होतं रमाला. दोन्ही घरात मग कामांची नुसती धामधूम सुरू झाली. खरेदीच्या, कार्यक्रमांच्या, आंदणांच्या, अहेराच्या, माना-पानाच्या कापड-चोपड्यांच्या याद्यांची लगबग आणि गडबड! सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत होता.
खरंतर रमाच्या दोन मोठ्या बहिणींच्या लग्नाच आणि मग पहिल्या- पहिल्या बाळंतपणाच कर्जच अजून संपलं नव्हतं, त्यातच रमाच्या लग्नाचा खर्च! रमाच्या बाबांची तर रात्रीची झोपच उडाली होती. तसं रमाच्या सासरच्या लोकांनी समोरून स्पष्ट काही मागितलं नव्हतं. पण आडून-आडून त्यांच्या एक एक मागण्या वाढतच होत्या.
पुढच्या भागात बघूया काय आहेत रमाच्या सासरच्या लोकांच्या मागण्या. रमाचे लग्न जमतं की नाही?
©® राखी भावसार भांडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा