दशक्रिया (भाग २)

दशक्रिया विधी


दशक्रिया ( भाग 2)


"त्यावेळी नंदू १२ वी पास झाली होती. ( नंदू म्हणजे सदाशिवची सख्खी मावस बहीण.) त्यांच्या गावात
१२वीच्या पुढे शिक्षण नव्हते, म्हणून ती पुढचे शिक्षण घेण्यासाठी आमच्या गावी आली. तिच्या दोन्ही मोठ्या बहीणींची लग्न १२वी झाल्यावर लगेच झाली. पण नंदू हुशार त्यात मावशीचा आईवर खूप विश्वास, आणि नंदूच्या पुढे शिक्षणाचा हट्ट, म्हणून नंदू इकडे आमच्या घरी आली.

मी नंदू आणि आई, आमच्या घरात आम्ही तसेच. ताईचे लग्न झालेले बाबांना जाऊन ८/10 वर्षे झालेली. त्यामुळे आमच्या मोठ्या घरात तिला रहायला कसलीच अडचण नव्हती. सहा महिन्यात ती आमच्या घरी चांगलीच रुळली. आईला स्वयंपाकात मदत करणे, केर वारे, आणि स्वताच्या खर्चाला पैसे मिळवण्यासाठी काही किरकोळ कामेही ती करत असे. सगळं व्यवस्थित चालू असताना गावात मलेरियाची साथ आली. मी पूर्ण आडवा झालो. ४/५ डिग्री पर्यंत मला ताप चढत होता. ताप चढला की थंडी इतकी वाजयची की घरातली सगळी पांघरूण घातली तरी कमी पडायची. जवळ जवळ ८ ते १० दिवस माझे आजारपणात गेले. माझी सेवा आई करायची पण आईलाही तिच्या वयामुळे झेपत नव्हते म्हणून नंदूनी माझी जबाबदारी घेतली. माझी सगळी सेवा नंदू करत होती. ताप चढला की माझ्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या, वेळेवर औषध द्यायची. मला फार अन्न जात नव्हते म्हणून कधी सार, कधी आटवल, कधी पातळ उपीट तर कधी रव्याची खीर खाऊ घालायची. एवढच काल, मला खूप अशक्तपणा आला होता, तर नंदू परसाकडेलाही मला धरुन घेऊन जायची. यासगळ्या प्रकारात मला नंदू विषयी आपलेपणा वाटू लागला. तिचा सहवास मला हवाहवासा वाटू लागला. मग मी तिला मुद्दाम काही वाचलेल्या पुस्तकाविषयी सांगू विचारू लागलो. अभ्यासात काही मदत करू लागलो. तिलाही माझ्याबद्दल वाटू लागले. नकळत आम्ही मनाने जवळ आलो. माझ्या इतकीच तिलाही माझी ओढ आहे मला जाणवले. आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हते. एक दिवस कधी नव्हे ते आम्ही दोघेच घरी होतो. मला रहावेना, मी म्हणालो * नंदू आपण लग्न करूया." ती हो म्हणाली. मी तिला मिठीत घेतले, मी तिच्या ओठांवर ओठ ठेवणार तर तिनेच माझ्या ओठांवर हात ठेवला, * इतक्यात आई आली. आईला सगळचं समजलं. आईने काहीही न ऐकता नंदूला परत पाठवायचे ठरवले. तिने एकाच वाक्यात सांगितले " हे लग्न होणार नाही. हे लग्न झाले तर आभाळ कोसळेल. एकतर तुला ती मिळेल किंवा मी". मी खूप विनवण्या केल्या आईच्या पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने लगेचच नंदू ला गावी परत पाठवले. आणि आमची दोघांचीही भेट होणार नाही याचीही तिने काळजी घेतली. तो काळ घरच्यांचा मनाविरुद्ध लग्न करण्याचा नव्हताच. त्यामुळे आमचे लग्न झाले नाही.

मग नंदू चे लग्न कुठे व कसे झाले? गिरीजा आणि सदाशिव चे लग्न कसे झाले? पाहू पुढच्या भागात.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

🎭 Series Post

View all