Login

डॅशिंग दांडेकर - भाग ३

कथा एका दबंग मुलीची..

ओवीच्या मोठ्या बहिणीचे म्हणजे सानूचे लग्नं झाले आणि ती सासरी गेली. सानू जरा शांत स्वभावाची होती. खूप सोशिक होती. नव्याचे नऊ दिवस सरले आणि सासरच्यांनी आपले खरे रूप दाखवणे सुरू केले. सानूने याबद्दल कधीही आपल्या माहेरी कळू दिले नाही.

एकदा सानूला ओवीचा फोन आला,
"ताई ऐक नां माझे नां तुमच्या शहरात एक काम आहे."

"काय काम आहे?"

"आहे एक काम. मी कधी येऊ?"

सानू घाबरली. आपले सासरचे लोक कसे आहेत, हे जर ओवीला माहित झाले तर, आई-बाबा आणि आजी उगीच टेन्शन घेतील. म्हणून सानू म्हणाली,

"अं.ऐक नां ते काम तिकडेच नाही का होऊ शकत?"

"म्हणजे?"

"अगं म्हणजे..."

तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि सानू आश्चर्यचकित झाली कारण ओवी दारात उभी होती.

" सरप्राइज!"ओवी म्हणाली.

सानूला खरं तर खूप आनंद झाला.पण तेवढ्यात सासूबाई बाहेर आल्या. म्हणून सानू म्हणाली,

"अगं काय हे? आधी तर सांगायचं ना येणार म्हणून."

ओवी म्हणाली,
"बहिणीच्या घरी यायला परमिशन घ्यावी लागते का?"

तेवढ्यात सानूची सासू म्हणाली,
" घ्या.आता हिचीच उणीव होती घरात. काय गं सानू, हिला काय आमच्याशी हुज्जत घालायला बोलावलस?"

ओवी म्हणाली,
" मी कशाला हुज्जत घालीन तुमच्याशी?"

सानूची सासू म्हणाली,
"हे बघ, सानूला मी सांगितले आहे की, तुझे माहेरचे लोक इथे येता कामा नये. आलेच तर त्यांनी थोडा वेळ थांबून लगेच निघावे."

सानू म्हणाली,
"पण आई तुमचा भाऊ तर आपल्या इथे ४-५ दिवस राहून जातो."

सानूची सासू म्हणाली,
"सानू, बहीण आली तर तुझी जीभ जास्तच चरचर करू लागली काय? काय गं? तुला कपडे धुवायला सांगितले होते. भांडी तशीच पडली आहेत. कोण करेल सगळं? थांब दाखवते तुला."


त्यांनी सानूला मारण्यासाठी हात उगारला. पण ओवीने तो हात मध्येच थांबवला आणि ती म्हणाली,

"जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची मुलगी लग्नं करून आपल्या घरी आणता तेव्हा तिच्याशी असे वागले तर डायरेक्ट ४९८ कलमाअंतर्गत तुम्हाला अटक होऊ शकते. मग तुमच्या भावासकट, जीजाजी आणि तुमचे मिस्टर, मस्त जेलची हवा खात बसा. चालेल का हो आई?"

तेवढ्यात सानूचा नवरा, निशांत मध्ये पडला, "अगं जाऊ दे ना ओवी. कशाला उगीच लोड घेतेस तू?"

ओवी म्हणाली,
"नाही नाही.मी लोड घेणार नाही पण पुन्हा माझ्या बहिणीला असा काही त्रास दिलात नां तर कायद्याची अजून ३/४ कलमे तुमच्यावर लावेन बरं प्रिय जीजाजी! लक्षात ठेवा. माझ्या वाचनामुळे मला सगळी कलमे पाठ आहेत. तेव्हा ताईशी नीट वागायचं. समजलं?"

सानू रडू लागली. ओवी म्हणाली,
"अगं ताई, तू या लोकांचा एवढा छळ सहन का करत आहेस?"

" जाऊ दे ना ओवी. तू जा बरं इथून."

"मी तर जाणारच आहे ताई पण तुझ्याबद्दल एक ब्र शब्द मी कधीच कोणाच्या तोंडातून ऐकू शकत नाही कारण मला माहित आहे. माझी ताई कशी आहे ते!" ओवीचे ते रौद्र रूप पाहून साऱ्यांनाच दरदरून घाम फुटला.

ओवी घरी पोहोचली.

ओवी सानूच्या सासरी जे घडलं ते सारं काही आई, बाबा आणि आजीला सांगणार होती. आपली सानू गरीब गाय म्हणून सारे निमूटपणे सहन करत आहे आणि म्हणून तिला थोडे दिवस आपल्या घरी आणू, हे सर्वांना ओवी निक्षून सांगणार होती पण घरी येताच तिला काहीतरी गडबड जाणवली.

बाबा आणि आई, आजीच्या खोलीत होते. आई आजीला पाणी पाजत होती.
" आई काय झाले गं आजीला?"

" डाव्या बाजूला छातीत जरा दुखतं होतं आजीचं आणि घाम आला होता. आताच डॉक्टर येऊन गेले."

"काय म्हणाले डॉक्टर?"

"अगं आजीला सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता."

"बापरे!" ओवी घाबरली.

तेवढ्यात आजी म्हणाली.
"अगं डॅशिंग दांडेकर, शरीराचं काय घेऊन बसलीस? नाशिवंत आहे ते पण मी तुला सांगितलं नां कधीही रडायचं नाही. आल्या परिस्थितीला तोंड द्यायचं. संकटांचा सामना करायचा. बरं तू सानूकडे गेली होतीस ना? कशी आहे माझी सानू?"

"अं.ठीक आहे आजी ती.सासरचे फार लाड करतात तिचे."

"वाह.ऐकून बरं वाटलं मला. तू आहेस भारी डॅशिंग पण माझी सानू खूप सोशिक. आता माझी चिंता मिटली.आता मी मरायला मोकळी."

तेवढ्यात यश आला अन् म्हणाला,
"हां म्हणजे मग आम्ही कोणाकडे बघणार?"

"अरे मी असे सहजच बोलले बेटा. ही म्हातारी तुझे आणि आमच्या डॅशिंग दांडेकरचे लग्नं झाल्याशिवाय थोडीच डोळे मिटणार आहे?"

सगळे हसायला लागले आणि या आनंदावर ओवीला सानूची सासरची खरी परिस्थिती सांगून विरजण घालायचे नव्हते म्हणून तीही हसू लागली.

काही दिवसांत यशला एका मुलीचे स्थळ आले. तिचे नाव ईशा होते. सारे काही व्यवस्थित होते. म्हणून लवकरच लग्नं करायचं असे दोन्ही घरी ठरले.

क्रमशः

आता पुढे काय होईल? यशचे लग्नं आनंदात पार पडेल?त्यात ओवीची यशला कशी मदत होईल? ओवी स्वतःचे कर्तुत्व कसे काय सिद्ध करणार आहे ? बाबांच्या डोळ्यात तिला तिच्या विषयी प्रेम दिसेल? पाहूया पुढील भागात..
०००

🎭 Series Post

View all