सगळे जण गावाच्या वेशीपाशी जमले. वारीला जाणाऱ्या लोकांच्या पाया पडून त्यांना निरोप देण्यासाठी. अतिशय सानंद आणि सुखद सोहळा होता. पण, घरच्या कामाच्या व्यापात तिला त्यांना निरोप देण्यासाठी जायला जमलेच नाही. मन मात्र अश्रु ढाळत उदास झाले होते. त्या विठ्ठल नामाच्या गजरात ती तल्लीन होऊन काम करीत होती.
तेव्हढ्यात एक वयस्कर जोडपे दाराशी येऊन उभे राहिले. हिरवेकंच नऊवार लुगडे , नाकात नथ, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर लाल मळवट भरलेली बाई उभी होती. तिच्या रूपात मीनाला जणु रखुमाईच दिसली. डोक्यावर घेतलेली तुळस घेतली होती. त्यांच्या सोबत असलेले आजोबा स्वच्छ पांढरेशुभ्र धोतर आणि सदरा , डोक्यावर टोपी..... हातात टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा आणि पंचा , हातात भगवा झेंडा घालून समोर उभे होते.
" बाळा, जरा पाणी देतेस का ?"
आजीने आवाज दिला.
मीनाला त्यांच्या रुपात जणू विठ्ठल रखुमाई दिसले. तिची नजर त्यांच्या वरून दूरच होत नव्हती.
"अगं, बाळा जरा पाणी देतेस का?"
"हो देते की.... या आत या ना".....मीना बोलली.
त्यांना बघताच मीनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. मीनाने पाणी दिले आणि लगेच चहा टाकला. दोघांनीही घोट घोट चहा घेतला आणि लगेचच जाण्यासाठी निघाले.
पोरी तू या वेळी येणार नाही असे कळले. म्हणून तुला भेटायला आलो गं"..... आजीने तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.
साक्षात रखुमाईने हात फिरवल्याचा आनंद झाला आणि डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
"पण, कसे कळले तुम्हांला".... मीना.
ते जाऊ दे....
"आम्हांला आनंदाने निरोप दे. असे जर अश्रू ढाळले तर आमचा पाय निघणार कसा?"
त्या आजोबांच्या मुखातून सतत विठ्ठलाच्या नामाचा गजर होत होता.
बाळा काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होईल. असा आशीर्वाद त्यांनी दिला . मीनाने त्यांचे पाय धुतले. पाटाभोवती रांगोळी काढून त्यांना त्यावर बसविले आणि त्यांचे औक्षण करून हार घातले. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. तिच्या नवऱ्याने आणि सासू सासऱ्यांनीही त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सोबत खाण्यासाठी चटणी भाकरी बांधून दिली. सगळ्यांचा निरोप घेऊन ते निघाले.
ते दोघेही दूर जाई पर्यंत तिची नजर हटतच नव्हती....
कोण होते? कोठून आले ? काहीच माहिती नसतांनाही त्यांची सेवा करण्याचे पुण्य लाभले. घरी बसून विठ्ठल रखुमाईचे दर्शन झाले. हेच समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होते.