काळोख आणि विदिशा (अंतिम)

आता विदिशाची आईच रडायला लागली तिने विदिशाला जवळ घेतलं, अन म्हणाली “मी तुझी खूप मोठी अपराधी आह?

काळोख आणि विदिशा

भाग  २

भाग  १ वरून पुढे वाचा ........

एक दिवस नेहमी प्रमाणे, जेवण झाल्यावर विदिशा झोपण्या साठी बेडरूम मधे जातांना दरवाजातच थबकली. खोलीत मिट्‍ट काळोख होता. पण आता विदिशा सावध होती, खोलीत शिरायच्या आधीच काळोख दिसल्याने ती धावतच हॉल मधे आली आणि पुढचा दरवाजा उघडून लिफ्ट पाशी गेली. लिफ्ट आली, लिफ्टचा दरवाजा उघडला आणि विदिशा जोरात आत मधे ढकलल्या गेली. ती समोर लिफ्ट मधे आरसा होता त्यावर आदळली आरशात तिला दिसलं की काळोख तिचा पाठलाग करत लिफ्ट मधे आला आहे. विदिशा किंचाळली आणि खाली पडली. तिची शुद्ध हरपली.

तळ मजल्यावर कोणी तरी लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट खाली आली, लोकांना आतमध्ये एक महिला आडवी तिडवी पडलेली दिसली. त्यांनी आरडा ओरडा करून वॉचमनला बोलावलं. त्यानी विदिशाला ओळखलं, लोकांच्या मदतीने तिला लिफ्टच्या बाहेर काढलं आणि कावेरीला फोन केला.

कावेरी लगेच खाली आली. तो पर्यन्त लोकांनी पाणी मारून विदिशाला शुद्धीवर आणलं होतं. कावेरीने तिला खुर्चीवर बसवलं. कावेरीने मंगेशला फोन केला, आणि सर्व परिस्थिती विषद केली.

अर्ध्या तासात मंगेश आणि विशाल आले. सर्वांनी विदिशाला कावेरीच्याच घरी नेलं. थोडा वेळ गेल्या नंतर विदिशा सावरली.

“काय झालं विदिशा?” विशालने विचारलं. विदिशा सावरली असली तरी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. विशालने कावेरीला विचारलं, पण तिला सुद्धा विदिशा लिफ्ट मधे का होती आणि तिथे असं काय घडलं की ती बेशुद्ध पडली, याच्या बद्दल काहीच माहीत नव्हतं. खूप विचार करून सुद्धा अंदाज पण बांधता येत नव्हता. तिने नुसतीच काही कळत नाही, या अर्थानी मान हलवली.

थोड्या वेळाने विदिशा बोलण्याच्या मनस्थितीत आली. मग तिने सांगितलं की तिला  बेडरूम काळोखानी भरलेली दिसल्याबरोबर मागच्या पावलीच ती  धावत कावेरीकडे यायला निघाली होती, लिफ्ट मधे शिरता शिरताच तिला जाणवलं की काळोख तिचा पाठलाग करत लिफ्ट पर्यन्त आला आहे आणि त्यानी तिला आत मधे एवढ्या जोरात ढकललं की ती लिफ्ट मधल्या आरशावर जोरात जाऊन आदळली आणि खाली पडली. त्या नंतर काही आठवत नाही. शुद्धीवर आले तेंव्हा कावेरी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारत होती.

कावेरीने सांगितल्यावर सगळेच विचारात पडले. सर्वांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. विदिशा विज्ञानाची पदवीधर होती, हुशार होती, सुशिक्षित होती, असल्या  भाकडकथांवर विश्वास ठेवणार्‍यामधील नव्हती, पण तिच्याच आयुष्यात हे सगळं विपरीत घडत होतं. घडत होतं म्हणण्या पेक्षा ती जगत होती. या कथे मधलं ती एक पात्र होती. खूप उलट सुलट विचार केल्या नंतर विशाल, तिला संध्याकाळी डॉक्टर कडे घेऊन गेला. मंगेश आणि कावेरी सुद्धा या वेळी बरोबर आले होते.

डॉक्टरांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. म्हणाले “आता माझ्या मते तुम्ही न्यूरोलॉंजिस्ट ला जाऊन भेटा. तेच काय ते सांगू शकतील. हा भास, आभासाचा प्रॉब्लेम आहे, विदिशा ताईंना असले भास होत आहेत, याचा अर्थ, हा प्रॉब्लेम मेंदूशी संबंधित दिसतो आहे.  तेंव्हा तेच काही उपाय करतील.” त्यांनी डॉक्टरांना चिठ्ठी लिहून दिली. त्यांनी फोन करून डॉक्टरांना सांगितलं की पेशंटला पाठवतो आहे म्हणून. “लगेच जा. मी बोललो आहे. वेळ घालवू नका.”

तिथून सगळी वरात न्यूरोलॉंजिस्ट कडे. चिंतेच्या छटा अजूनच गडद झालेल्या. आता हा डॉक्टर काय सांगतो हाच प्रश्न सर्वांना पडला होता. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच होती की, विदिशा आता पूर्णपणे सावरली होती आणि सर्व बाबतीत सहकार्य करत होती.

डॉक्टरांनी सर्व ऐकून घेतलं आणि म्हणाले, CT स्कॅन करून घ्या. उद्या रीपोर्ट घेऊन या. मग काय ते निदान करता येईल.

दुसऱ्या दिवशी मंगेश पण सुट्टी घेणार होता, पण विशालच म्हणाला की आज नको घेऊ, जरूर पडेल तेंव्हा घ्यावीच लागणार आहे. तू जा ऑफिसला, कावेरी असेलच आमच्या बरोबर, तू चिंता करू नकोस.

संध्याकाळी CT स्कॅन चा रीपोर्ट घेऊन विशाल, विदिशा, कावेरी सह न्यूरोलॉंजिस्ट डॉक्टर कडे पोचले. मंगेश डायरेक्ट पोचला होता.

डॉक्टरांनी रीपोर्ट पाहीला, म्हणाले “सगळं ओके आहे, काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये.”

“मग आता?” – विशाल

“विदिशाताईंचे सर्व रीपोर्ट मी बघितले, सर्व नॉर्मल आहेत. यांचा जो आजार आहे, त्याला आमच्या भाषेत शिजोफ्रेनीया म्हणतात. या आजारात मनुष्याला सुरवातीला अनेक भास होत असतात, हा शरीराचा नाही, तर मनाचा आजार आहे. लगेच उपचार झाले, तर हा आजार बऱ्याच अंशी ठीक होऊ शकतो आणि माणूस पुन्हा नॉर्मल जीवन जगू शकतो. तुम्ही यांना वेळ न घालवता एका मानसोपचार तज्ञा कडे घेऊन जा. तुम्हाला चालत असेल, तर मी चिठ्ठी लिहून देतो आणि त्या डॉक्टरांशी बोलतो. तुमच्या कोणी ओळखीचा कोणी असेल तर त्यांना भेटा.

मानसोपचार तज्ञांचा उल्लेख झाल्यावर सगळ्यांचेच चेहरे पडले. विदिशाचा चेहरा तर विदीर्ण झाला होता.

“म मला वेड लागलंय अशी शंका येते आहे का डॉक्टर? विशाल, तू मला सोडून तर जाणार नाहीस न?” आणि विदिशा रडायलाच लागली. कावेरीची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. विशाल हतबुद्ध झाला होता, त्यांनी विदिशाला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला, त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. “बोल ना रे विशाल, मी वेडी आहे का?” विदिशा रडवेल्या आवाजात विचारात होती.

डॉक्टरांना, मानसोपचार तज्ञाचं नाव ऐकल्यावर होणार्‍या, अश्या प्रतिक्रियांची, कल्पना होतीच. ते शांत पणे समजावण्याच्या सुरात म्हणाले “हे  बघा विदिशा ताई, तुमचे सर्व रीपोर्ट नॉर्मल आहेत तेंव्हा तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पण काय आहे, की आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाही. आपलं सुप्त मन काय विचार करतं ते आपल्याला कधीच कळत नाही, म्हणजे असं बघा लहानपणी एखाद्याच्या अंगावर शेजारी असलेला कुत्रा धाऊन आला, तर काही जणांच्या सुप्त मनात ती  भीती कायम घर करून असते आणि कुत्रा दिसला, की तो माणूस, मोठा झाल्यावर सुद्धा घाबरतो. सर्व साधारण पणे सगळे लोकं ही घटना विसरून जातात, पण काही लोकांच्या मनातून ही भीती जात नाही. या गोष्टीचा थांग पत्ता, मानसोपचार तज्ञच लावू शकतात. त्यांची ट्रीटमेंट घेतली, की तुम्हाला होणारे हे भास विरून जातील. अजिबात काळजी करू नका. काही कारणच नाहीये.”

डॉक्टराचं म्हणण ऐकल्यावर सर्वांचं समाधान झालं. विदिशा पण शांत झाली. विशाल म्हणाला, “आमच्या कोणी ओळखीचे मानसोपचार तज्ञ नाहीयेत. तुम्हीच सांगा.”

मग डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली आणि फोन वर बोलले सुद्धा. म्हणाले, ”हा फोन नंबर देतो आहे, यांची वेळ घ्या आणि भेटा. सर्व काही पहिल्या सारखं होईल मुळीच काळजी करू नका.”

क्लिनिक मधून  बाहेर पडल्या पडल्या विशालने फोन केला आणि वेळ घेतली. म्हणाला “परवा दुपारी बारा वाजता जेवण करून यायला सांगितलं आहे.” सर्वांनी माना डोलावल्या.

दुसऱ्या दिवशी विशालने सुट्टीच घेतली होती, दिवसभर दोघं भटकत होते, बाहेरच जेवून रात्री परत आले, औषधं घेऊन विदिशाला, विशाल जवळ असल्याने शांत झोप लागली.

दुसऱ्या दिवशी बारा वाजता विशाल आणि विदिशा, डॉक्टर शशिकांत च्या क्लिनिक मधे पोचले. थोडा वेळ थांबावं लागलं पण नंतर लगेच डॉक्टरांनी आत बोलावलं.

डॉक्टरांनी केस पूर्ण ऐकून घेतली, रीपोर्ट पाहीले, मग विशालला म्हणाले की तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, माझं यांच्याशी बोलणं झाल्यावर तुम्हाला बोलावतो. विशाल बाहेर येऊन बसला.१० मिनिटांनी विशालला आत बोलावले. डॉक्टरांनी आता विशालशी बोलायला सुरवात केली. “तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी अगदी वेळ न गमावता माझ्याकडे पाठवलं. शिजोफ्रेनीया ची ही सुरवात आहे, काळजीचं मुळीच कारण नाहीये. मी काही औषधं लिहून देतो, ती घ्या आणि १५ दिवसांनी मला भेटा. आपल्याला काही सिटिंग कराव्या लागतील. पण हे भास होत आहेत त्याचं कारण समजलं की सर्व ठीक होईल. चिंता करू नका. आधी १५ दिवसांचा हा कोर्स पूर्ण करा. मी तारीख लिहून दिलेली आहे त्या तारखेला या.

विशालला इतके दिवस सुट्टी घेणे शक्य नव्हते, म्हणून त्यानी विदिशाच्या  आई, बाबांना बोलावून घेतलं. आता तो ऑफिसला जायला मोकळा होता. १५ दिवस व्यवस्थित  गेले. आई, बाबा आले असल्याने विदिशा आता बरीच मोकळी झाली होती, आजाराचं  सावट बरचसं दूर झालं होतं. आता डॉक्टरांकडे जायची वेळ आली होती.

विशालला इतके दिवस सुट्टी घेणे शक्य नव्हते, म्हणून त्यानी विदिशाच्या  आई, बाबांना बोलावून घेतलं. आता तो ऑफिसला जायला मोकळा होता. १५ दिवस व्यवस्थित  गेले. आई, बाबा आले असल्याने विदिशा आता बरीच मोकळी झाली होती, आजाराच सावट बरचसं दूर झालं होतं. आता डॉक्टरांकडे जायची वेळ आली होती.

दुपारी १२ वाजता विशाल आणि विदिशा डॉक्टर  शशिकांत च्या क्लिनिकमधे होते, विशाल बाहेर बसला होता. आतमधे डॉक्टर विदिशाशी बोलत होते.

“मग  कशामुळे अंधाराची भीती वाटते ते कळलं का?” – डॉक्टर.

“मला अंधाराची भीती वाटत नाही. मला जो काळोख  दिसतो, आणि तो माझ्या अंगावर येतो, त्याची भीती वाटते.” -विदिशा.

कसा आहे हा काळोख, कसा दिसतो तो? जरा विस्तृतपणे सांगाल का?” – डॉक्टर

विदिशाला काळोखाची आठवण झाली आणि तिच्या अंगावर शहारा आला. मला का विचारता आहात, त्या दिवशी मी सांगितलं की तुम्हाला, आणि तुम्ही औषध द्या. मला  सारखं  तेच तेच विचारू नका.” – विदिशा अत्यंत त्रासिक स्वरात म्हणाली.  

“ओके, अजून कशाची भीती वाटते?” – डॉक्टर.

“तशी मी धीट आहे. भीती वगैरे मला वाटत नाही.” – विदिशा.

“फाइन. तुम्ही जरा आरामशीरपणे टेकून बसा, अवघडून बसू नका. शांत व्हा. मी तुम्हाला आता काळोखाबद्दल काहीच विचारणार नाही. मग तर झालं?” – डॉक्टर

विदिशानी मान डोलावली. आणि ती पाठीमागे रेलून बसली.

“सहज विचारतो, तुम्ही कोणच्या कॉलेज मधे होता हो?” – डॉक्टर.

मग डॉक्टर आणि विदिशाचा संवाद सुरू झाला. विदिशाच बोलत होती. हळू हळू डॉक्टरांनी संवाद चतुराईने शाळेकडे वळवला. मग काय, आता विदिशा पूर्णपणे डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली गेली होती. डोळे मिटले होते आणि शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल भरभरून बोलायला लागली.

“अरे वा, विदिशा ताई  तुम्हाला इतक्या गोष्टी आठवतात हे पाहून मलाच आश्चर्य वाटलं. तुमची स्मरणशक्ती खूपच छान आहे.” – डॉक्टर.

आता विदिशानी डोळे उघडले आणि म्हणाली “काय म्हणालात तुम्ही डॉक्टर?”

“मी म्हंटलं की तुमची स्मरणशक्ती खूपच छान आहे.” – डॉक्टर.

“हो, शाळेत स्पर्धा असायच्या आणि मला बरीच बक्षीसं पण  मिळायची.” – विदिशा.

“छान, आता आपण आज इथेच थांबू.” डॉक्टर उठले आणि विशालला आत बोलावलं.

“छान सेशन झालं. तुम्ही परवा येऊ शकाल का? याच वेळेस?” – डॉक्टर.

“हो येऊ की, फक्त मी नाही येऊ शकणार, मला परवा बॅक टु बॅक मिटिंगा आहेत. हिचे आई, बाबा येतील. चालेल का?” – विशाल.

“चालेल, काही हरकत नाही.” – डॉक्टर

विदिशाचे आई बाबा ठरवूनच आले होते, की कुठेही बाहेर जायचं नाही, २४ तास विदिशाच्या बरोबरच राहायचं म्हणून. त्यामुळे काहीही विपरीत न घडता दिवस आनंदात चालले होते. आज डॉक्टरांशी गप्पा मारून आल्यावर तर विदिशा खूपच खुलली होती. तिच्यातला बदल सर्वांच्या लक्षात आला होता पण कोणीही त्याबद्दल बोललं नाही. तिसर्‍या दिवशी त्यांनीच विदिशा बरोबर जायचं, हे पण ठरलं. विदिशा जरा नाराज झाली, पण विशालने तिला कारण नीट समजावून  सांगितल्यावर, मग ती काही बोलली नाही.

तिसरा दिवस, डॉक्टर शशिकांतचं क्लिनिक,  विदिशा आरामखुर्चीवर बसली होती. आई बाबा बाहेर बसले होते.

“रीलॅक्स विदिशा ताई, परवा तुम्ही शाळेतल्या गमती जमती इतक्या रंगवून सांगितल्या की, मला तर वाटलं की एखादं पुस्तकच काढावं  त्यावर.” – डॉक्टर.

“काहीतरीच काय डॉक्टर!” विदिशा हसली, म्हणाली. “मी खूपच बडबड करत होते का? तुम्हाला कंटाळा आला का?”

“छे, छे” डॉक्टर म्हणाले. “तुमच्यामध्ये ना, गोष्टी रंगवून सांगण्याची फार छान हातोटी आहे. खरं तर माझा एक सल्ला आहे, तुम्ही लहान मुलांसाठी छान छान गोष्टी लिहा. मुलांना खूप आवडतील.”

“विदिशा हसली, खरंच आवडतील? तुम्ही मला बरं वाटावं म्हणून बोलताय ना?” – विदिशा

“अहो, नाही, खरंच मला तसं वाटतंय. बरं ते जाऊ द्या, मला विशाल साहेबाबद्दल काही सांगा ना” – डॉक्टर.

“त्यांच्याबद्दल काय सांगणार? खूप छान स्वभाव आहे त्यांचा.” – विदिशा.

“तुमचं लग्न ठरवून केलेलं आहे, की प्रेम विवाह?” – डॉक्टर.

“दोन्ही” आणि मग विदिशा, विशाल बद्दल अभिमानाने भरभरून बोलत होती. त्यांची हुशारी, मृदु आणि प्रेमळ स्वभाव, कामसू पणा, तिला तिच्या कामात किती मदत करतो तो, वगैरे वगैरे. मग बोलता बोलता अचानक म्हणाली “पण फार मुख दुर्बळ  आहे, पटकन ओपन होत नाही.”

“अहो, आत्ताच तर तुम्ही म्हणाला की खूप प्रेमळ आहे मग मुख दुर्बळ आहे, हे न बोलता कसं कळलं तुम्हाला?” - डॉक्टर

बोलता बोलता विदिशाने डोळे मिटले होते, आणि ती शाळेच्या विश्वात गेली.

“मी ९ वीत असतांना त्याच्या नोट्स मागीतल्या, तो खूपच हुशार होता म्हणून. पण त्यांनी काय करावं? त्यांनी प्रिन्सिपल कडे तक्रार केली. सरांनी मला बोलावलं. मी सांगितलं की हा एवढा हुशार आहे, त्याच्या अभ्यासाची पद्धत कळली तर आम्हाला पण परीक्षेचे टेंशन येणार नाही म्हणून. सरांना पटलं आणि त्यांनी विशालला वही द्यायला सांगितली. मग ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वी चार वर्ष मी त्याच्या वह्या न्यायची, माझ्या अडचणी पण तो सोडवायचा, पण तेवढंच.” – विदिशा थांबली तिच्या ओठांवर स्मित होतं.

“मग?” – डॉक्टर.

“मी शाळेतली सर्वात सुंदर मुलगी होते, आणि तो माझ्याकडे बघायचाच नाही, माझ्याशी अंतर ठेवूनच वागायचा. मला रागच यायचा, पण काय करणार, प्रेमात पडले होते न त्याच्या, त्याचे आई बाबा सुद्धा माझे कौतुक करायचे, पण याला काही फरकच पडत नव्हता. आम्ही एकाच कॉलेज मधे होतो, म्हणजे तो ज्या कॉलेजमधे  होता त्याच कॉलेज मधे मी पण प्रवेश घेतला होता. शेवटी कंटाळून मीच प्रपोज केलं. त्याची ना नव्हती, पण आईला विचारून सांगतो म्हणाला. असा आहे माझा नवरा.”

“म्हणजे हे प्रकरण शाळे पासून आहे म्हणायचं. मस्त. मला जर अशी सुंदर मुलगी भेटली असती न तर मी शाळेत असतांनाच लग्नाची मागणी घातली असती. पण जाऊ द्या, प्रत्येकाचं नशीब कुठे इतकं चांगलं असतं? मला वाटतं की तुमच्या प्राथमिक शाळेत पण तुम्ही अशीच धमाल केली असेल न, मला खूप उत्सुकता आहे, त्याबद्दल सांगा की जरा. आवडेल मला ऐकायला.” – डॉक्टर.

विदिशा आता ट्रान्स मधे गेली होती आणि अखंड बोलत होती, जशी ती बोलत होती तसतसे तिच्या चेहऱ्या वरचे भाव बदलत होते. एका लहान मुलीचा निरागस भाव चेहऱ्यावर आला होता. डॉक्टर भराभर आपल्या नोट पॅड वर लिहित होते. रेकॉर्डर पण चालूच होता.

तिची आई कसे नव नवीन डिझाइन चे फ्रॉक शिवायची, तिचे कसे लाड करायची सगळं विदिशा, अगदी रंगवून सांगत होती. सांगता सांगता, तिची चर्या बदलली. म्हणाली,

“त्या दिवशी माझा पांच वर्षांचा वाढदिवस होता, आईनी मला छान नटवून तयार केलं होतं. माझ्यासाठी आईने खीर केली होती. मला खीर खूप आवडायची. मला आईने औक्षण झाल्यावर खीर खायला वाटीमधे दिली.” आणि अचानक विदिशाचा आवाज बदलला. अत्यंत कर्कश आवाजात ती किंचाळली.

“का फेकलीस खीरीची वाटी? असं अन्न फेकतात का?” – आईचा आवाज असावा

“वाटीत शाकर नाही” रडवेल्या आवाजात, एखादं लहान मूल बोलावं तसं विदिशा बोलली.

“थांब आता तुला शिक्षाच करते पुन्हा करशील असं?” – आईच्या रागीट आवाजात.

“शाकर नाही किरी मदे” रडत रडत विदिशा मधली लहान मुलगी बोलली.

“माज आलाय तुला, मागीतलेलं सगळं मिळतंय न, म्हणून सगळे नखरे आहेत. थांब तुला अंधाऱ्या खोलीतच कोंडते.” अत्यंत चिडून आईच्या भूमिकेत विदिशा बोलत होती.

“नको न आई, मला भीत वाटते” विदिशा रडत रडत बोलली.

“आता त्या खोलीत काळोख असतो, त्या काळोखाचा एक मोठ्ठा अक्राळ विक्राळ ब्रम्हराक्षस होईल, आणि तो तुला पकडून भिंतीवर आपटेल, मग तुझ्या डोक्यावर मोठ्ठं टेंगूळ येईल मग तुला घेऊन तो पळून जाईल. जा, जा तू  राक्षसा कडे, येऊ नको माझ्या कडे” - चिडलेल्या आईच्या आवाजात विदिशा.

आणि मग “आई, नको आई, नको, दार उघड,” अश्या किंचाळ्या मारत विदिशा ताडकन उठली, संपूर्ण कपडे घामाने भिजले होते. तिच्या किंचाळ्या  ऐकून आई बाबा धावत आतमधे आले. विदिशा अजूनही थरथरत होती. विदिशाच्या आई बाबांना काहीच कळत नव्हतं, ते डॉक्टरांच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. डॉक्टरांनी त्यांना हातानेच बसायची खूण केली. ते लोकं बसले पण नजरेत प्रचंड अविश्वास होता.

डॉक्टरांनी विदिशाला पाणी दिलं. पाणी प्यायल्यावर विदिशाला जरा बरं वाटलं.

“कसं वाटतंय  आता?” – डॉक्टर.

विदिशाचा पूर्ण शक्तिपात झाला होता. ती डोळे मिटून शांत पडून राहिली. तिचे आई बाबा मात्र अस्वस्थ झाले होते. त्यांनी डॉक्टरांना जरा जरबेच्या स्वरात विचारलं.

“डॉक्टर काय प्रकार आहे हा?”

“आई, मला आता बरं वाटतंय. तू नको काळजी करू.” – विदिशा.

“विदिशा ताई  तुम्हाला आता उत्तर मिळालं असेल असं धरून चालतो.” – डॉक्टर.

“हो डॉक्टर, कळलं मला. आता मला भीती नाही वाटणार. तुमचे खूप खूप आभार.” – विदिशा म्हणाली. मग विदिशानेच सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या.

आता विदिशाची आईच रडायला लागली तिने विदिशाला जवळ घेतलं, अन  म्हणाली  

“मी तुझी खूप मोठी अपराधी आहे, विदिशा, शिस्त लावण्याच्या हट्टा पायी, तुझं जन्माचं  नुकसान झालं असतं. हे डॉक्टर भेटले म्हणून सर्व ठीक झालं, नाही तर काय झालं असतं यांचा विचारच करवत नाही, आणि त्या ओक्सा बोक्शी रडायला लागल्या. पुन्हा पुन्हा विदिशाची माफी मागत राहिल्या. शेवटी विदिशानीच त्यांना कसं बसं शांत केलं.

संध्याकाळी मंगेश आणि कावेरी सह सर्व जमले आणि एक छोटसं सेलीब्रेशन झालं. सगळेच आनंदात होते, गेले  कित्येक महीने पडलेलं संकटाचं सावट आता पूर्णपणे दूर झालं होतं.

*****समाप्त****

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

🎭 Series Post

View all