डार्क हॉर्स भाग ४५

अरिन अर्पिताला माफ करू शकेल का?


अर्पिता तिथून थेट घरी आली. ती बरीच घाबरलेली दिसत होती. तिला नेहमी पेक्षा लवकर घरी पाहून आईने तिला विचारले.

आई,“ काय ग अप्पे आज लवकर घरी आलीस आज ऑफिस लवकर सुटले का तुझे?”

अर्पिता,“हो आई! भैय्या घरी आला का ग?” तिने घाबरून अंदाज घेत विचारले.

आई,“ अप्पे अग हा काय प्रश्न झाला का? तुला माहीतच आहे की त्याला आजकाल ऑफिस,मॉडलिंग आणि ट्रस्ट सगळं पाहून घरी यायला नऊ साडे नऊ तर कधी कधी दहा देखील वाजतात.” त्या म्हणाल्या.

अर्पिता,“ हो!मी विसरलेच बघ” ती असं म्हणून तिच्या रूममध्ये निघून गेली.

अर्पिता खूप जास्त बेचैन होती. तिला अरीनशी कधी बोलेन असे झाले होते पण त्याची वाट पाहण्या शिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय ही नव्हता. राध्या आज एका ठिकाणी दुपारी असणाऱ्या लग्नाचे मॅनेजमेंट करून आठ वाजताच घरी आली होती. ती लवकर घरी आली म्हणून तिने अरीनच्या आवडीचा बेत करायचा ठरवलं.अरीन नेहमी प्रमाणे दहा वाजता घरी आला. तो अपसेट दिसत होता तरी राध्याने त्याला काही विचारले नाही. अर्पिताची ही चुळबूळ सुरू होती पण अरीनने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले.त्याचे आवडीचे सगळ जेवण असून देखील अरीनने नीट जेवण केले नाही. अरीन अपसेट आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते तरी कोणीच काही बोलले नाही. अर्पिताचे ही जेवणात लक्ष नव्हते. तो जेवून सरळ रूममध्ये निघून गेला.राध्या ही नोकरांना सूचना देऊन निघून गेली. अरीन लॅपटॉपमध्ये काही तरी काम करत बेडवर बसला होता. राध्या त्याच्या जवळ जाऊन बसली आणि तिने त्याला काळजीने विचारले.

राध्या,“अरीन काय झाले आहे आज? इतका का अपसेट आहेस? जेवण ही नीट केले नाहीस!”


ती विचारत होती आणि अरीन काही बोलणार तर दारावर कोणी तरी नॉक केले. राध्याने दार उघडले तर समोर अर्पिता होती. तिला पाहून राध्या बाजूला झाली. अर्पिता आत आली. राध्या तिच्या मागोमाग रूममध्ये आली. ती अर्पिताला पाहत होती. डोळे रडून सुजल्या सारखे दिसत होते ती देखील अपसेट होती पण का हे राध्याला कळत नव्हते. अरीनने अर्पिताकडे एकदा पाहिले आणि त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा डोकं लॅपटॉपमध्ये घातले. अर्पिता रडतच त्याला बोलत होती.

अर्पिता,“ भैय्या माझं ऐकून तरी घे ना एकदा प्लिज!” ती विनंती करत म्हणाली.

अरीन,“ राध्या हिला इथून जायला सांग मला हिच्याशी बोलायचे नाही!”तो तिला न पाहताच रुक्षपणे म्हणाला.

अर्पिता,“ भैय्या प्लिज माझं ऐकून तर घे एकदा! मी काय म्हणते ते!” ती पुन्हा रडत म्हणाली.तिला असे रडताना पाहून राध्याला खूप वाईट वाटले म्हणून ती अरीनला समजावत म्हणाली.

राध्या,“ अरीन एकदा ती काय म्हणते ते तरी ऐकून घे!”

अरीन,“ राध्या तुला यातलं काही माहीत नाही तर तू यात न पडलेलं बरं! अर्पिता तू जा इथून मला तुझ्याशी बोलायचे नाही! तू आता मोठी झालीस स्वतः कमावतेस! एका कंपनीत उच्च पदावर काम करतेस! तू आता स्वातंत्र्य आहेस तुझं आयुष्य जगायला! मी कोणीच नाही आता तुझ्यासाठी!” तो रागाने बोलत होता. अर्पिता मात्र नुसती रडत होती. राध्याला दोघा भावा बहिणीचे काय चालले आहे ते कळत नव्हते आणि अरीनला इतकं रागात पाहून तिची विचारायची हिम्मत देखील होत नव्हती ती शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होती.

अर्पिता,“ प्लिज भैय्या असं बोलू नकोस ना? सॉरी ना माझं चुकलं मला माहित आहे! पण एकदा माझं ऐकून तरी घे!” ती बोलत होती तर अरीन तिचे बोलणे मध्येच तोडत चिडून म्हणाला.

अरीन,“ राध्या हिला जायला सांग इथून नाही तर मी जातो आता मला हिच्याकडून कोणतेच स्पष्टीकरण ही नको आहे आणि सॉरी तर त्या हून ही नको मुळात अर्पिता तू मला सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाही! You are mature person!You have your own thoughts! तुला मला कोणते ही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही जा तू!असं ही मी कोण तुला काय विचारणारा!” तो पुन्हा चिडून म्हणाला.

अर्पिता,“ ठीक आहे मी जाते! पण तू चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लिज!” ती हुंदके देत म्हणाली आणि निघाली तर राध्याने तिचा हात धरला आणि तिला थांबवत अरीनला पाहून बोलू लागली.

राध्या,“अरीन तुमच्या दोघात नेमके काय झाले आहे मला माहित नाही पण एकदा अर्पिताला काय म्हणायचे ते तरी ऐकून घे! उगीच चिडचिड करून काही साध्य होणार नाही!”

अरीन,“ तुला माहीत आहे का राध्या हिने आज काय केले आहे ते? ही माझ्याशी आज खोटं बोलली आहे! ही आज एका रेस्टॉरंटमध्ये होती एका मुला बरोबर! मी योगायोगाने तिथे गेलो हिला तिथे पाहून मी हिला फोन केला की कुठे आहेस? खरं तर अचानक हिच्या समोर जाऊन मला हिला सरप्राईज द्यायचे होते! तर याच मॅडमनी मला सरप्राईज दिले मी ऑफिसमध्ये आहे असं खोटं बोलून! हिला विचार मी कधी तरी हिच्यावर कोणती बंधने लादली आहेत का?हिला मुलांशी मैत्री करू नकोस असं सांगितलं आहे का?मग ही माझ्याशी खोटं का बोलली विचार हिला? मला हिचा राग नाही आला राध्या तर मला वाईट वाटले हिच्या खोटं बोलण्याचे! कदाचित मीच कुठे तरी कमी पडलो असेन म्हणून तर ही अशी वागली आज!” तो रागाने बोलत होता पण त्याच्या डोळ्यातून कढ वाहत होते.त्याच बोलणे ऐकून अर्पिता त्याच्या जवळ गेली त्याचा हात तिने धरला तर अरीनने त्याच्या हात तिच्या हातातून काढून घेतला.

अर्पिता,“भैय्या I am sorry! मी तुझ्याशी खोटं बोलले! माझं चुकलं! आणि तू कधीच माझ्यावर कोणतीच बंधने काही लादलीस!पण मी घाबरले होते थोडी तुझा असा अचानक फोन आला त्यामुळे! म्हणून खोटं बोलले! आणि तू कधीच कुठेच कमी नाही पडलास!तू माझ्यासाठी काय काय केले हे मी कधीच विसरणार नाही आणि असं नको म्हणुस की तू कोणी नाहीस मला काही विचारणारा तुला हक्क आहे मला प्रश्न विचारण्याचा तू माझा मोठा भाऊ आहेस कळलं तुला!” ती रडत बोलत होती.

अरीन,“तू घाबरली होतीस?पण का?काय गरज ग तुला मला घाबरण्याची?” त्याने आश्चर्याने विचारले.

अर्पिता,“ कारण नितीश माझ्या बरोबर होता आणि मी ऑफिस मधून हाफ डे घेऊन त्याच्या बरोबर रेस्टॉरंटमध्ये गेले होते!” ती म्हणाली.

अरीन,“ कोण आहे हा नितीश अप्पे?की तू आमच्याशी खोटं बोलून त्याच्याशी भेटतेस?” तो चिडून ओरडला आणि त्याच्या आवाजाने अर्पिता दचकली.

अर्पिता,“ नितीश दळवी माझ्या बरोबर माझ्या कंपनीत काम करतो!आम्ही दोघे एकदाच कंपनीत जॉईन झालो होतो! आमच्या दोघांच्यात आधी मैत्री होती. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्याने सहा महिन्यांपूर्वी मला प्रपोज केले!मी ही त्याला हो म्हणाले आणि….” ती पुढे बोलणार तर अरीन चिडून तिला म्हणाला.

अरीन,“ आणि काय अप्पे इतकं सगळं घडत होते! आणि तू आज मला सांगत आहेस? ते देखील मी तुला आज रेस्टॉरंटमध्ये पाहिल्यावर? का ग? माझ्यावर तुला विश्वास नव्हता का? तुला काय वाटलं की मी तुझ्या प्रेमाला विरोध करेन! की अजून काही….” तो पुन्हा चिडून म्हणाला.

अर्पिता,“नाही भैय्या मी तुला सांगणार होते! तो त्याचे आई वडील आपल्या घरी येणार आहेत!”ती म्हणाली.

अरीन,“ कधी सांगणार होतीस मला? अच्छा म्हणजे गोष्टी या थरला गेल्या आहेत तर ठीक आहे तुझं आयुष्य तुला कसं जगायचं काय करायचं ते तुझं तू ठरव! मी काहीच बोलणार नाही! पण आज तू माझा विश्वास कायमचा गमावलास! मला खूप अभिमान होता आपल्या नात्या बद्दल माझी बहिण कधीच माझ्यापासून काही लपवणार नाही असे वाटायचे मला! पण तो माझा भ्रम तू दूर केलास बरं झालं!” असं म्हणून तो उठून निघून गेला.

अर्पिता मात्र त्याच्या या बोलण्याने अजूनच रडायला लागली. तिला कळून चुकलं की तिने खूप मोठी चूक केली आहे. तिने आज अरीनचा विश्वास तोडला आहे. त्याला खूप जास्त दुखावले आहे.

बऱ्याच वेळा आपण नात्यात आशा चुका करत असतो. आपल्या जवळच्या माणसांशी खोटं बोलतो त्यांच्या पासून गोष्टी लपवतो आणि या सगळ्यात आपण आपल्या माणसांना दुखवतो. तीच चूक आज अर्पिताने केली होती. तिने आज अरीनचा विश्वास तर गमावलाच होता पण त्याला दुखावले देखील होते.

अरीन अर्पिताला माफ करेल का?

©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!


🎭 Series Post

View all