डार्क हॉर्स भाग ७

Way Arin Reject Radhya's Love?


भाग 7
आज मंगळवार होता आणि राध्या तिने ठरवल्या प्रमाणे आज सकाळीच मुंबईत आली होती.तिने आज मुद्दामच लॉजवर एक रूम बुक केली होती कारण तिला संध्याकाळी तयार होऊन अरीनला भेटायला जायचं होतं. तीच थोडं काम होत तिने ते काम दुपार पर्यंत आवरलं आणि चार वाजता ती लॉजवर आली. तिने थोडावेळ आराम केला आणि अरीनला फोन केला.

राध्या,“अरीन मी मुंबईत आले आहे कामा निमित्त!आज संध्याकाळी सात वाजता एका क्लायंटला भेटायचे आहे! काम पूर्ण व्हायला उशीर होईल तू ये ना माझ्या सोबत मी तुला पत्ता whs up करते!”

अरीन,“बरं मी येतो पण रात्री दहा पर्यंत मी थांबू शकेन तुझ्या बरोबर त्या नंतर नाही मला ही काम आहे!” तो म्हणाला आणि राध्याने बरं म्हणून खुश होतच फोन ठेवला.

ती आता तयारीला लागली. तिने सुंदर फ्लोरल प्रिंटचा अबोली कलरचा अनारकली घातला. केस मोकळे सोडले.लाईट पण सुंदर असा मेकअप केला. कानात लोंबते मॅचिंग कानातले,गळ्यात नाजूक लॉकेट! आधीच सुंदर असणारी ती अजूनच सुंदर दिसत होती. तिने स्वतःचे प्रतिबिंब आरशात पाहिले आणि स्वतःवरच खुश होत ती स्वतःशीच बोलत होती.

“ मिस्टर अरीन इनामदार माझ्या पासून खूप लांब लांब पळता ना तुम्ही? आज पाहते मी तुम्ही कसे पळता ते!आज तुला माझे प्रेम स्वीकारावेच लागेल!”

ती साडे सहा वाजता म्हणजेच अरीनच्या आधीच रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. तिने अरीनचा मोबाईल मधला फोटो दाखवून तिथल्या वेटरला सांगितले की अरीन आला की त्याला प्रायव्हेट एरियामध्ये पाठवा. वेटरने अरीन रेस्टॉरंटमध्ये पोहोचला तर लगेच वेटरने त्याला ओळखून प्रायव्हेट एरियाचा रस्ता अदबीने दाखवला. अरीन प्रायव्हेट एरिया निहाळत जात होता. तिथे मधोमध कारंज्या थूईथुई नाचत होत्या आणि त्याच्याकडेने थोड्या थोड्या अंतरावर गोल आकाराचे सुंदर चबुतरे होते. त्या चुबुतऱ्यांना चार-पाच गोल पिलरच्या साहाय्याने छतं होते. ते चबुतरे सुंदर सजवण्यात आले होते आणि दोन-तीन पायऱ्या चढून गेले की टेबल आणि बसण्याची व्यवस्था होती. तो सगळीकडे पाहत जात होता. त्याला आश्चर्य वाटत होते की राध्याने त्याला अशा ठिकाणी का बोलवले असेल? तो राध्या बसली होती त्या चबुतऱ्याच्या पायऱ्या चढून गेला. तर राध्या त्याला हसत मुखाने पाहत होती. त्याने पिस्ता कलरचा फॉर्मल शर्ट आणि थोडीशी ब्राऊनिश कलरची फॉर्मल पॅन्ट घातली होती. तो अगदी साधा पण फॉर्मल लूक मध्ये छान दिसत होता.

तो राध्याला पाहत टेबल जवळ आला तिला अशी नटलेली पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती दिसतच सुंदर होती.एव्हाना त्याच्या लक्षात आले होते की राध्याच्या मनात नक्कीच आज काही तरी आहे. तो विचार करत होता.

“अरीन तुला हे प्रकरण खूप जड जाणार आहे. कसली कातील दिसत आहे ही! तिने तुला खोटं बोलून येथे बोलावले आहे नक्कीच आज ती तुला प्रपोज करणार पण तू तीच प्रेम नाही स्वीकारू शकत. मनात होकार असून ही तिला नकार देणे! तिच्यावर प्रेम असून ही तीच प्रेम धुडकावून लावणे खूप जड जाणार आहे! तुझी आज जणू परीक्षाच आहे! पण मी तीच प्रेम स्वीकारून तीच आयुष्य बरबाद करू शकत नाही.मी नाही तिच्या लायकीचा!” तो विचार मग्न होता आणि राध्याने त्याच्या समोर चुटकी वाजवली आणि तो भानावर आला.

राध्या,“ कसला इतका विचार करतो आहेस! किती वेळ उभा राहणार बस ना!” ती हसून म्हणाली आणि अरीन खुर्चीवर बसला.

राध्याने डिनर ऑर्डर केले आणि अरीन बोलू लागला.

अरीन,“ तू तर म्हणाली होतीस की तुझा कोणी क्लायंट येणार आहे? इथे तर कोणीच दिसत नाही!” त्याने विचारले.

राध्या,“ का कामा शिवाय मी तुला बोलवू शकत नाही का?” तिने रोखून पाहत विचारले.

अरीन,“ तसं नाही!” तो गडबडून म्हणाला.


तो पर्यंत वेटर डिनर घेऊन आला.दोघे ही शांतपणे जेवण करत होते पण दोघांच्या ही मनात उलथापालथ सुरू होती.राध्या त्याला चोरट्या नजरेने पाहत विचार करत होती.

“इतका वेडा आहे का हा? की याला मी कशासाठी बोलवले आहे याचा अंदाज अजून ही आला नाही? मी इतकी याच्यासाठी तयार होऊन आले पण याने एकदा ही साधं छान दिसतेस म्हणलं नाही! राध्या तुला प्रेमात पडायला हाच नमुना भेटला होता का? आता जेवण झाल्यावर लगेच प्रपोज करते मग पाहते कसा लांब पाळतो माझ्या पासून!” ती या विचारात जेवत होती आणि अरीन अचानक बोलू लागला आणि तिची विचार शृंखला तुटली.


अरीन,“ आज काय विशेष? म्हणजे इतकी सुंदर तयार वगैरे होऊन आली आहेस ती!” त्याने तिला पाहत विचारले.

राध्या,“ हो आहे तसेच विशेष कारण; कळेलच तुला लवकरच!आणि thanks!” ती हसून म्हणाली.

अरीन,“बरं!” तो म्हणाला.

दोघांचे ही जेवण झाले आणि राध्याने त्याच्या समोर अंगठीचा बॉक्स उघडला आणि त्याच्या समोर अंगठी धरून ती म्हणाली.

राध्या,“ मिस्टर अरीन इनामदार I love you!”

जे घडेल अशी अरीनला भीती होती तेच घडत होते. तिचे बोलणे ऐकून तो मनोमन सुखावला होता पण दुसऱ्या बाजूने तिचे प्रेम तो स्वीकारू शकत नाही याचे दुःख त्याला होते. जेंव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि ती ही आपल्यावर प्रेम करते ती जगातील सगळ्यात मोठी पर्वणी आणि खूपच सुंदर अनुभूती असते पण काही कारणाने जेंव्हा आपण त्या व्यक्तीचे प्रेम मनात असून ही स्वीकारू शकत नाही तेंव्हा त्या व्यक्तीचे प्रेम नाकारणे हे आपल्यासाठी खूप मोठी सत्व परीक्षा असते. कारण आपल्याला त्या व्यक्तीला नकार देऊन दुखवायचे असते आणि त्याच्या दुखावण्याच्या दुप्पट आपण त्यावेळी स्वतःला दुखावत असतो. तीच परीक्षेची वेळ आता अरीन वर आली होती. पण त्याला राध्याला कमीत कमी दुखवायचे होते कारण त्याला राध्या मैत्रीण म्हणून हवी होती. तिचा सहवास त्याला प्रियसी म्हणून स्वीकारायचा नसला तरी मैत्रीण म्हणून हवा होता. कारण त्याचे ही प्रेम तिच्यावर होतेच!
तो या सगळ्या विचारणारे जागीच थिजला होता आणि राध्या त्याचा हात हातात घेऊन त्याच्या रिंग फिंगर मध्ये अंगठी घालत होती. तो तिच्या स्पर्शाने भानावर आला आणि स्वतःचा हात तिच्या हातातून काढून घेत उठून उभा राहत बोलू लागला.

अरीन,“ please stop it! Sorry पण मी नाही स्वीकारू शकत तुझे प्रेम!” तो तिच्या पासून नजर चोरून म्हणाला आणि तिथून निघून जाऊ लागला. तर राध्याने त्याचा हात धरून त्याला थांबवले. खरं तर त्याचा नकार तिच्यासाठी धक्काच होता तरी तो धक्का पचवत ती बोलू लागली.

राध्या,“ पण का अरीन? माझ्यात काय कमी आहे रे?” तिने डोळ्यातले पाणी आडवत विचारले.

अरीन,“ तुझ्यात काहीच कमी नाही राध्या! पण माझं नाही प्रेम तुझ्यावर तू माझी चांगली मैत्रीण आहे आणि हे मैत्रीचे नाते असेच अबाधित राहू दे ना!” तो म्हणाला.

राध्या,“मी जे काही दिवसांपासून तुझ्या डोळ्यात पाहते आहे ते काय आहे? अरीन मी तुझ्या डोळ्यात माझ्या विषयी मैत्री नाही प्रेम पाहिले आहे आणि प्रेम आणि मैत्री मधील फरक मला नक्कीच कळतो!तू का नाही म्हणत आहेस? तुला काय वाटतं की तुझ्या वर काका-काकू, अर्पिता यांची जबाबदारी आहे जर मी तुझ्या आयुष्यात आले तर तुला मी तुझी जबाबदारी पूर्ण करू देणार नाही! असं काही नाही रे! मी तुला तुझ्या जबाबदाऱ्या तुझे कुटुंब या सगळ्या सहित स्वीकारले आहे. उलट मी तुला या तुझ्या जबाबदाऱ्या निभावण्यात मदतच करेन आणि अर्पिताचे शिक्षण तिचे लग्न होई पर्यंत मी थांबायला तयार आहे अरीन! त्या नंतर आपण लग्न करू!” ती त्याचा हात धरून समजावत होती.

अरीन,“ राध्या प्लिज तू समजते तसं काहीच नाही! तुझा गैरसमज होतो आहे! माझं तुझ्यावर प्रेम नाही!” तो पुन्हा तिच्या पासून नजर चोरून बोलत होता.

राध्या,“ गैरसमज? माझे मन मला कधीच चुकीचा कौल देणार नाही! मुलींना कळतं एका नजरेत की मुलगा तुमच्याकडे मैत्रीण म्हणून पाहतो की प्रियसी म्हणून! आणि जर तुझं माझ्यावर प्रेम नाही तर हे असं नजर चोरून तू का बोलत आहेस?” ती रागाने आता त्याच्या समोर उभी राहून बोलत होती.

अरीन,“राध्या तुला एकदा सांगितलेले कळत नाही का?माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हते आणि नाही! प्रेम असे जबरदस्तीने होत नसत!” तो आता तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता पण त्याची नजर त्याच्या ओठांना साथ देत नव्हती हे स्पष्ट कळत होते.

राध्या आता चांगलीच चिडली. तिला वाटू लागले की अरीनला त्याच्या दिसण्याचा गर्व आहे. म्हणून तो आपल्याशी असं वागत आहे. आपले प्रेम नाकारत आहे.त्याने आपल्याशी फक्त टाईम पास केला.

राध्या,“जबरदस्तीने? तुला काय वाटते की मी तुझ्या जबरदस्तीने गळ्यात पडत आहे? काही नाही तुला तुझ्या दिसण्याचा जरा जास्तच गर्व आहे आणि म्हणून तू हे बोलत आहेस कारण तुला वाटतं की तुला माझ्या सारख्या खूप मुली भेटतील! पण मी तुझ्यावर तुझ्या या देखण्या रुपाला पाहून नाही तर तुझा स्वभाव पाहून भाळले! असो तुला माझं प्रेम मान्य नाही ना तर इथून पुढे आपली मैत्री देखील तुटली! मी तुला इथून पुढे कधीच भेटणार नाही कारण प्रेम आणि मैत्री या दोन वेगळ्या भावना आहेत आणि मला दोन्ही भावनांची सरमिसळ करायची नाही गुड बाय!” ती असं म्हणून अंगठी पर्समध्ये ठेवून रागाने तरातरा निघून गेली.

अरीन मात्र तिला हतबलपणे डोळ्यातले पाणी पुसत पाहत राहिला.

राध्याचे अरीन वर प्रेम होते तसेच अरीनचे देखील तिच्यावर प्रेम होते पण त्याला ते स्वीकारायचे नव्हते. अरीन कोणत्या तरी बंधनात अडकून पडला होता. त्यामुळे त्याने आज राध्याचे प्रेम नाकारले होते. पण असे कोणते बंधन होते? अशी कोणती मजबुरी होती की तो मनात असून ही राध्याचे प्रेम स्वीकारू शकत नव्हता?


अरीन आणि राध्या कधी अराध्य होऊ शकतील का? की आता दोघांचे ही मार्ग वेगळे होणार होते?

©स्वामिनी चौगुले

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!




🎭 Series Post

View all