डार्क हॉर्स भाग ६

What do you think? Arin will accept Radhya's love Proposal?


भाग 6
या सगळ्या घटना घडून तीन महिन्यांचा कालावधी लोटला होता.अरीनच रुटीन सगळं सुरळीत सुरू होतं. राध्या अधून मधूम मुंबईला कामा निमित्त येत होती. ती अधे मधे काम आहे म्हणून अरीनला मुद्दाम तिच्या सोबत येण्यासाठी बोलवत असे. अरीन ही न आढेवेढे घेता तिच्या सोबत जात असे कारण त्याला देखील राध्याचा सहवास आवडत असे. ती सोबत असली की तो मनातून खुश असे. पण वागताना मात्र तो तिच्याशी फटकून वागत असे.

राध्या आणि अर्पिताची ही चांगलीच गट्टी जमली होती. दोघी राध्या पुण्यात असली की एकमेकींना भेटून धमाल करत असत. अर्पिताला राध्याच अरीनवर प्रेम आहे हे माहीत होते.अरीनच्या डोळ्यात देखील तिच्या बद्दल ओढ दिसत होती. त्यामुळे अर्पिता राध्याला भावी वहिनी म्हणून पाहात होती. अर्पिता मुद्दामच अरीन शनिवार रविवार आला की राध्याला घरी बोलवत असे. अरीनच्या आई-बाबांना ही राध्या आवडत होती. पण अरीन मात्र तिच्याशी फटकून वागत असे आणि हे अर्पिता आणि आई-बाबांच्या नजरेतून सुटले नव्हते.

असाच आज शनिवार होता आणि अरीन पुण्याला घरी आला होता. नेहमी प्रमाणे अर्पिताने राध्याला बोलावले होते. राध्या ही तिची सगळी कामे सोडून लवकरच अरीनच्या घरी आली होती. अर्पिता आणि आई बरोबर तिची ही किचनमध्ये सकाळ पासून लुडबुड सुरू होती. अरीन मात्र आता राध्याच्या अशा वागण्याला वैतागला होता. त्याने तिच्या पासून किती ही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी राध्या मात्र त्याच्या जवळ येण्याची एक ही संधी सोडत नव्हती आणि हळूहळू तो देखील तिच्याकडे आकर्षित होऊ लागला होता त्याच्या बुद्धी आणि मनात सतत युद्ध सुरू असे. आज ही राध्या त्याच्या घरी आली होती आणि अरीन मात्र अस्वस्थ झाला होता. तो बेडवर बसून विचारात गढला होता. तेवढ्यात राध्या त्याच्या रूममध्ये त्याला बोलवायला आली.

राध्या,“ अरीन काकू जेवायला बोलवत आहेत!” ती म्हणाली

अरीन,“ मी आलोच!तू जा!” त्याने उत्तर दिले.

तर राध्या त्याच्या जवळ गेली. अरीन तिला जवळ आलेलं पाहून बुचकळ्यात पडला. ती त्याच्या अगदी जवळ गेली आणि हसून तिने त्याच्या शर्टची दुमडलेली कॉलर दोन्ही हाताने सरळ केली आणि ती निघून ही गेली

“काय करावे या राध्याचे ही पोरगी आता माझ्या घरी ही सतत यायला लागली आहे. हिची हिम्मत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे! अरीन स्वतःला आवर नाही तर काही खरं नाही!” तो विचार करत जेवायला गेला.

जेवणं झाली आणि अरीन दहाच मिनिटात तयार होऊन आला आणि काम आहे म्हणून निघून गेला. खरं तर त्याचे कोणतेच काम नव्हते पण त्याला राध्याला टाळायचे होते म्हणून तो घरातून बाहेर पडला होता. ते पाहून राध्या मात्र खट्टू झाली. अर्पिताच्या ते लक्षात आले आणि ती तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली.

राध्या,“ काय ग अप्पे तुझा भाऊ खुळचट आहे का? त्याला किती दिवस झाले मी हिंट देत आहे पण याला काहीच कळत नाही! आज ही माझी सगळी कामं सोडून मी याच्यासाठी आले आणि हा गेला निघून!” ती तोंड वाकडं करत म्हणाली.

अर्पिता,“ ये माझ्या भैय्याला खुळचट नाही म्हणायचे! आणि तो खुळचट नाही तर जबाबदार आहे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याच्यावर माझी,आई-बाबांची जबाबदारी आहे ग त्यामुळे कदाचित तो तुझ्या पासून लांब पळत असेल! त्याला इतक्यात कोणत्या ही बंधनात अडकायचे नाही. गेल्या एक वर्षा पासून आई ही लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागली होती तर त्याने सरळ सरळ नाही म्हणून सांगितले. आई जास्तच फोर्स करायला लागली तर हा घरीच यायचा बंद झाला म्हणून मग शेवटी आईच गप्प बसली!” ती म्हणाली.

राध्या,“ असं आहे तर! अग पण मी काय त्याला लगेच उद्या लग्न कर म्हणत नाही आणि मला त्याची जबाबदारी नाही तर त्याची साथीदार त्याची जीवन संगिनी बनायचे आहे पण त्याला हे कळतच नाही!” ती नाराजीने बोलत होती.

अर्पिता,“ राध्या तू असं कर! तू ना त्याला सरळ प्रपोज करून टाक आणि तुझं म्हणणं देखील त्याला सांग! त्याच्या डोळ्यात तुझ्या बद्दल प्रेम दिसते तो तुला नाही म्हणणार नाही. उगीच हिंट देत बसून काही उपयोग नाही!” ती म्हणाली.

राध्या,“ good idea! मी पुढच्याच आठवड्यात मुंबईमध्ये जाऊन त्याला प्रपोज करते!पाहू मग कसा पाळतो लांब ते!” ती हसून म्हणाली.

अर्पिता,“ that\"s like a good girl!” ती म्हणाली.

राध्या,“ बरं! अप्पे तुझा भाऊ हँडसम आहे हे मान्य पण तुमच्या घरात त्याचेच फोटो दिसतात घर भर! ही काय भानगड आहे?” तिने उत्सुकतेने विचारले.

अर्पिता,“ हो मग आहेच माझा भाऊ हँडसम आणि हे फोटो ना त्यानेच काढून घेतले आहेत. त्याला मॉडलिंग मध्ये करिअर करायचं होतं पण बाबांनी त्याला शिक्षण पूर्ण करायला भाग पाडले. त्याचे हे स्वप्न मागे पडले बघ!आता तर काय आमच्या तिघांची जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडली!” ती थोडी उदास होत म्हणाली.

राध्या,“ दिसतो तो मॉडेल सारखा अजून ही वेळ नाही गेली त्याने मनात आणले तर अजून ही तो करू शकतो मॉडेलिंग!” ती त्याचा फोटो पाहत बोलत होती.

अर्पिता,“ असं का? म्हणूनच तू फिदा झालीस वाटतं!” ती तिला चिडवत म्हणाली.

राध्या,“ अजिबात नाही तो दिसायला सुंदर आहे म्हणून मी नाही पडले त्याच्या प्रेमात तर त्याचे गुण पाहून पडले! जाऊदे तुला नाही कळणार!” ती हसून म्हणाली.

अर्पिता,“ ओ होss! मला नाही कळणार का?” ती हसून तिला कोपराने ढकलत म्हणाली.

राध्या,“ गप ग! बरं मी निघते! माझ्यामुळे कामं खोळंबली असतील ऑफिसमध्ये पप्पा माझ्या नावाने ओरडत असतील! मी निघते ग!” ती म्हणाली आणि आई-बाबांचा निरोप घेऊन निघून गेली.

अरीन संध्याकाळी निवांत घरी आला. राध्या गेलेली त्याच्या लक्षात आले आणि त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.तो रविवारी राहून निघून गेला! राध्याने मात्र अर्पिताने दिलेला सल्ला मनावर घेतला आणि तिने मुंबईत एका रेस्टॉरंटमध्ये एक टेबल बुक केला आणि अरीनला प्रपोज करण्यासाठी अंगठी घेतली. बाकी सगळी तयारी देखील केली. ती पुढच्या मंगळवारी खास त्याला प्रपोज करायला मुंबईला जाणार होती. तिने अरीनला नेहमी प्रमाणे काम आहे म्हणून बोलवायचं आणि डिनरला घेऊन जायचे आणि तिथेच त्याला प्रपोज करायचे असे मनोमन ठरवले होते. स्वतःसाठी देखील तिने सुंदर ड्रेस घेऊन ठेवला होता. तिला खात्री होती की तो तिला नकार देणार नाही. त्याच्या बरोबर भविष्याची सुख स्वप्ने पाहण्यात तिचा पूर्ण आठवडा निघून गेला.

इकडे अरीन मात्र या सगळ्या पासून अनभिज्ञ होता. त्याला राध्याच्या मनात काय चालू आहे याची सुतराम ही कल्पना नव्हती. नाही म्हणायला त्याला माहित होतं की तो राध्याला आवडतो पण राध्या कधी त्याला प्रपोज करेल याचा विचार देखील त्याने केला नव्हता. तो त्याच्या कामात व्यस्त होता.अरीन या विकएन्डला घरी गेला पण नेहमी येणारी राध्या त्याला आज दिसली नाही. त्याला त्यामुळे चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. त्याने न राहवून अर्पिता विचारलेच.

अरीन,“ काय ग अप्पे! तुझी मैत्रीण बरी आली नाही?”

अर्पिता,“ कोण रे?” तिने कळून पण न कळल्याचा आव आणत विचारले.

अरीन,“ राध्या ग!नेहमी येते ना आपल्या घरी!”

अर्पिता,“ ती होय आणि ती माझी मैत्रीण आहे की तुझी? तुझ्याचमुळे तिची माझी ओळख झाली ना! आणि तिला ही काम असतात ती काय रिकामी आहे का?” ती म्हणाली.

अरीन,“ बास बास भावना पोहोचल्या आणि ती रिकाम टेकडी नाही हे नव्याने सांगितल्या बद्दल मंडळ आभारी आहे!” तो हात जोडून म्हणाला आणि दोघे ही हसायला लागले.

राध्या अरीनला प्रपोज करणार होती.अरीन राध्याची प्रेम स्वीकारेल का?
©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!




🎭 Series Post

View all