डार्क हॉर्स भाग ४

This is a love and Social Story


भाग 4
अर्पिता अरीनच्या जवळ बसून होती तर त्याचे आई-बाबा बाहेर होते. साधारण सकाळचे आठ वाजले असतील आणि अरीनला जाग आली.त्याने अर्पिताला पाहिले आणि तो उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

अरीन,“अप्पे तू इथे आणि आपण हॉस्पिटलमध्ये?” तो इकडे तिकडे पाहत म्हणाला.

अर्पिता,“तू उठू नकोस! हो मीच नाही तर आई-बाबा पण आहेत बाहेर आणि आपण हॉस्पिटलमध्ये कसे काय हे तर तूच सांगू शकशील!” ती थोडी रागातच म्हणाली.

अरीन,“ अप्पे ओरडू नकोस! आधीच माझं डोकं खूप जड झालं आहे आणि दुखतंय ही आणि हात पण दुखतोय!(हाताकडे पाहून) प्लास्टर? अरे यार म्हणजे हात फॅक्चर झाला माझा!पण मला हॉस्पिटलमध्ये कोणी आणले ग?” तो वैतागून बोलत होता.

अर्पिता,“तू शांत हो बरं! आणि हालचाल करू नकोस जास्त! मी डॉक्टरांना बोलवून घेते आणि आई-बाबा काळजीत आहेत त्यांना पाठवते भेटायला!आणि तुला हॉस्पिटलमध्ये राध्या पवार घेऊन आली होती. ती सकाळी सहा वाजे पर्यंत इथेच होती. नंतर गेली! बरं मी आले आणि पडून राहा तू गप्प!” ती म्हणाली आणि बाहेर आली. तिने आई-बाबांना अरीन उठला आहे म्हणून आत पाठवून दिले आणि ती डॉक्टरच्या केबिनकडे गेली.डॉक्टरांनी त्याला तपासले


डॉक्टर,“ दुपारून डिशचार्ज देतो पेशंटला.तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता पण आठ दिवसांनी स्टीचेस काढायला यावे लागेल!”

अरीन,“ डॉक्टर माझ्या हाताला किती दिवसाचे प्लास्टर घातले आहे?” त्याने विचारले.

डॉक्टर,“ एक महिन्याचे प्लास्टर आहे कारण हाताच्या हाडाला चांगलंच लागलं आहे!कमीत कमी पंधरा दिवस तरी आराम करावा लागेल!” ते म्हणाले.

अरीन,“ काय? पंधरा दिवस!” तो वैतागून म्हणाला आणि अर्पिताने त्याला रागाने पाहिले तसा तो शांत झाला.

अर्पिताने सगळ्या फॉर्मेलीटी पूर्ण केल्या. बिला बद्दल चौकशी केली तर राध्याने सगळं बिल क्लिअर केलं आहे असं तिला कळले आणि ती अरीन जवळ आली.

अरीन,“ अप्पे हॉस्पिटलचे बिल भरावे लागेल ना माझे व्होलेट कुठे आहे? त्यात A. T. M.कार्ड आहे त्यातून भर!” तो म्हणाला.

अर्पिता,“ तुझं व्होलेट आहे माझ्याकडे!आणि तुझं हॉस्पिटलचे बिल राध्या भरून गेली आहे आत्ता त्याचीच चौकशी करून आले मी!मी कपडे घेऊन येते तुझे आपण पुण्याला जात आहोत!” ती म्हणाली.

अरीन,“ काय?राध्याने भरले बिल किती झाले ग बिल?तिला द्यावं लागेल ना परत!” तो बोलत होता.

अर्पिता,“ भैय्या! तुझं तोंड बंद होत नाही का रे? एक तर डोक्याला लागलं आहे तुझ्या इतकं! डॉक्टरांनी आराम कर म्हणून सांगितलं आहे आणि बिल तिने भरले आहे तर देऊ आपण तिला पुण्यात गेल्यावर तिचा मोबाईल नंबर माझ्याकडे आहे! तुला अपघात झाला हे ऐकून बाबा-आईची अवस्था काय झाली होती माहीत आहे का तुला?मी कसं बस समजावले सांभाळले आहे त्यांना पण मला ही भीती वाटतच होती की!रात्र कशी काढली माझं मला माहित तरी राध्या होती सोबत आणि उठला की लागला लगेच!” ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.

अरीन,“ अप्पे अग काही झालं नाही मला इतकं घाबरण्या सारखं!थोडे दिवस आराम केला की होईल मी पुन्हा ठणठणीत!” तो तिचा गाल ओढत हसून म्हणाला.

अर्पिता,“ बरं मी तुझे कपडे घेऊन येते मग निघू आपण! आईला सांगितले आहे मी ती नाष्टा घेऊन येईल तुला भरवायला तर नखरे न करता गप्प खायचं आणि आराम करायचा कळल!” ती त्याला दटावत म्हणाली.

अरीन,“ हो माते जशी तुमची आज्ञा!” तो हसून म्हणाला आणि ती ही हसली.

ती अरीनच्या फ्लॅटवर जाऊन त्याचे कपडे घेऊन आली. अरीनने बाबांच्या मदतीने कपडे घातले आणि ते टॅक्सीने पुण्याला गेले. अपघात होऊन दहा दिवस होऊन गेले.अरीनची ट्रीटमेंट पुण्यातच त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरकडून चालू होती. त्याच्या डोक्याचे स्टीचेस ही सात दिवसात काढण्यात आले होते. पण तो मात्र मनातून अस्वस्थ होता. त्याला राध्याला कधी एकदा पैसे देईन असे झाले होते.

राध्यानी ही या दहा दिवसांत मुद्दामच अरीनशी किंवा अर्पिताशी कोणताच संपर्क केला नव्हता. कारण त्या दिवशी अरीनने तिला सपशेल टाळलेले होते हे ती विसरली नव्हती. तिला खूपदा वाटले होते की अर्पिताला फोन करून अरीनच्या तब्बेतीची चौकशी करावी पण तिने स्वतःच्या मनाला आवर घातला होता. ती तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि तिचा मोबाईल वाजला. फोन अर्पिताचा होता.

राध्या,“ बोल अर्पिता! अरीनची तब्बेत कशी आहे?” ती आधीच विचारून मोकळी झाली.

अर्पिता,“ तो ठीक आहे and all because of you!” ती म्हणाली.

राध्या,“ अरे असं काही नाही बरं तू फोन का केला होतास?” तिने विचारले.

अर्पिता,“ उद्या रविवार आहे. तुला सुट्टी असेल ना म्हणून आई म्हणत होती की तुला जेवायला बोलवायचं आहे उद्या आमच्या घरी येशील का?” तिने विचारले.

राध्या थोडी विचारात पडली. तिची मनःस्थिती द्विधा झाली होती. एक मन म्हणत होत की जावं तेवढंच अरीनला भेटायला मिळेल आणि दुसरं मन म्हणत होत की नको तो आपल्याला टाळतो मग कशाला उगीच जा! ती या विचारत अडकली होती आणि अर्पिताच पुन्हा म्हणाली.

“हॅलो!राध्या are you there?” तिने विचारले आणि राध्या भानावर आली.

राध्या,“ हो हो आहे मी!बरं मी येईन उद्या! तू मला पत्ता whs up करून ठेव!” ती म्हणाली.
★★★

अरीनला जेंव्हा अर्पिताने सांगितले की उद्या राध्या लंचला येणार आहे तेंव्हा अरीन मनोमन सुखावला पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःच्या मनाला बजावले.

“अरीन जरी राध्याच्या डोळ्यात तुझ्यासाठी आपुलकी दिसत असली आणि तुला ती आवडत असली तरी तुझं आणि तीच जुळणं केवळ अशक्य आहे. लक्षात ठेव तू तिच्या योग्यतेचा नाहीस!तर ती उद्या आली तर तिच्या पासून दूर राहिलेलंच तुझ्या आणि खास करून तिच्या हिताचे आहे. तिने हॉस्पिटलमध्ये भरलेले पैसे दिले की तिचा आणि तुझा संबंध संपला!”

तो याच विचारात होता की त्याचा फोन वाजला त्याने नाव पाहून फोन उचलला.फोन पुन्हा त्याच बाईचा होता.

बाई,“ काय रे मी तुला त्या दिवशी बोलले म्हणून नाराज झालास की काय?I miss you!आज ये ना! दहा-बारा दिवस होऊन गेले! मला चैन पडत नाही!” ती म्हणाली.

अरीन,“असं काही नाही मॅडम! मी सध्या मुंबईत नाही.माझा छोटासा अपघात झाला होता त्यामुळे मी घरी आलो आहे! मी आज दुसऱ्या कोणाला तरी पाठवतो ना!” तो अदबीने बोलत होता.

बाई,“ओह! मग तू ठीक आहेस ना? आणि मला दुसरं कोणी नको आहे! मी वाट पाहीन get well soon dear!” ती लाडीकपणे म्हणाली.

अरीन,“ thanks! आणि भेटू लवकरच!” असं म्हणून त्याने फोन ठेवला.
★★★

दुसऱ्या दिवशी अर्पिता आणि अरीनच्या आईची सकाळ पासून लगबग सुरू होती. त्या दोघींनी राध्याला अरीनला तिने वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले म्हणून तिचे आभार मानण्यासाठी घरी बोलवले होते. मस्त श्रीखंड-पुरी, पुलाव,कुर्मा, भजी-पापड,कोशिंबीर आणि काहीबाही बेत दोघींनी केला होता.अरीन देखील तिची अधीरतेने वाट पाहत होता. राध्या ठरलेल्या वेळी म्हणजे बारा वाजता अरीनच्या घरी आली. सगळ्यांनी तिचे हसत मुखाने स्वागत केले. अर्पिताने तिला घर दाखवले.राध्या घर निहाळत होती.तो पर्यंत अर्पिताला आईने हाक मारली आणि अर्पिताने अरीनची रूम तिला बाहेरून दाखवली आणि ती गेली. राध्या अरीनच्या रूममध्ये गेली. तिला पाहून लोळत पडलेला अरीन एकदम उठण्याचा प्रयत्न करू लागला पण हात फ्रॅक्चर असल्याने त्याला ते जमत नव्हते शेवटी राध्यानेच त्याला त्याचा हात धरून उठायला मदत केली.

अरीन,“ thanks! तुम्ही बसा ना!” तो खुर्चीकडे हात दाखवत हसून म्हणाला आणि राध्या खुर्चीवर बसली.

राध्या,“कसं वाटतंय आता?” तिने विचारले.

अरीन,“ मी ठीक आहे! तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नातेवाईक म्हणून सही केली आणि पैसे ही भरले खरंच तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही मॅडम!” तो कृतज्ञतेने म्हणाला.

राध्या,“ इतकं ही मोठं मी काही केलं नाही! तुम्ही ही माझी मदत केलीच होती की! आणि मला अहो मॅडम वगैरे काय म्हणताय मी तुमच्या पेक्षा मोठी नाही कदाचित लहानच असेन तुमच्या पेक्षा!” ती वाकडं तोंड करत म्हणाली आणि अरीन तिच्या या बोलण्यावर आणि तिचे तोंड पाहून खळखळून हसला!

अरीन,“ बरं नाही म्हणत मी मॅडम आणि अहो वगैरे! बरं मी तुझ्या पेक्षा मोठा असेन ही पण एक दोन वर्षाने तर मला ही अरीन म्हणाले तर चालेल बरका!” तो हसू दाबत म्हणाला.

राध्या,“ very smart! माझेच शब्द मलाच फिरवले! फ्रेंड्स?” तिने हसून हात पुढे केला आणि अरीनचा हात त्याच्या ही न कळत पुढे आला.

अरीन,“बरं हे चाळीस हजार तू माझं हॉस्पिटलचे बिल भरले त्याचे हे पैसे! तू येणार म्हणून अर्पिताला कालच आणून ठेवायला लावले होते.” तो पैसे देत म्हणाला.

राध्या,“अरे इतकी काय घाई होती! मी कुठे पळून थोडीच चालले आहे!” ती म्हणाली.

तो पर्यंत अर्पिता दोघांना जेवायला बोलवायला आली आणि त्यांचे बोलणे ऐकले.

अर्पिता,“ घे बाई राध्या; हॉस्पिटलमधून आल्या पासून याने माझे डोके खाल्ले आहे! तुला पैसे देऊन ये म्हणून!बरं जेवायला चला!” ती म्हणाली. राध्याने पैसे घेतले आणि तिघे जेवायला गेले.

जेवताना इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्या.अरीन काय करतो.अर्पिता काय करते. राध्याला त्यांची बरीच कौटुंबिक माहिती मिळाली होती.राध्या अरीनच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना आणि खास करून अरीनला भेटून खुश होती. ती तीन-चार तास त्यांच्या बरोबर घालवून घरी गेली.


राध्याचा जीव अरीन वर जडला होता आणि अरीनला ही राध्या आवडत होती. पण अरीनने मात्र राध्या पासून लांब राहायचे असे मनोमन ठरवून टाकले होते. त्याच्या मन आणि बुद्धीमध्ये सतत युद्ध सुरू होते.असे काही तरी होते की जे त्याला राध्याच्या जवळ जाण्या पासून आडवत होते.

मन आणि बुद्धीच्या या युद्धात कोण जिंकणार होते? अरीनला सतत फोन करणारी ती बाई कोण असेल आणि राध्या-अरीनची मैत्री पुढे काय वळण घेणार होती?

©स्वामिनी चौगुले
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेचा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी कोणता ही संबंध नाही. संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.





🎭 Series Post

View all