डार्क हॉर्स भाग ४९अंतिम

डार्क हॉर्स अंतिम भाग


सगळे लोक अर्पिताचे बोलणे ऐकत होते. राध्या, बाबा,आई आणि अण्णा भरल्या डोळ्याने अरीन आणि अर्पिताकडे पाहत होते. नितीश मात्र खाली मान घालून अपराध्या सारखा उभा होता. इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारा अरीन आता बोलू लागला.

अरीन,“ अप्पे वेड लागले आहे का तुला? अग तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझं नितीशवर प्रेम आहे ना!आणि मी कन्यादान केले काय आणि आई-बाबांनी केले काय! काय फरक पडणार आहे! मला तुझं लग्न होणे महत्त्वाचे आहे! तुझं सुख महत्त्वाचे आहे!” तो डोळे पुसत म्हणाला.

अर्पिता,“तुला काय वाटतं की तुला दुखावून! तुला असं अपमानित करून मी सुखी होईन का? भैय्या या काल माझ्या आयुष्य आलेल्या नितीश पेक्षा तू मला महत्त्वाचा आहेस! या नितीश पेक्षा कैक पटीने जास्त माझं प्रेम तुझ्यावर आहे! या लोकांना तुझा अपमान करण्याचा काही अधिकार नाही! माझा भाऊ माझा मान आहे आणि याच्या शिवाय मी कन्यादानाच काय पण हे लग्न सुद्धा होऊ देणार नाही!” ती अरीनकडे पाहत ठामपणे म्हणाली.

नितीशचे बाबा,“ऐकलेस का नितीश ही तुझी होणारी बायको आमचा भर मांडवात अपमान करत आहे! हिला तर काय दोष यायचा म्हणा तूच आमच्या पासून या अरीन इनामदारचे सत्य लपवलेस! तू फसवलेस आम्हाला! यांनी तर उलट आपले उपकार मानायला हवेत! हा माणूस जिगेलो होता एक पुरुष वैशा अशा माणसाच्या बहिणी बरोबर कोण लग्न करणार आहे? तरी आम्ही तयार होतो लग्नाला! फक्त या माणसाने त्याच्या अपवित्र हातानाने कन्यादान करू ….” ते पुढे बोलणार तर अर्पिता चांगलीच भडकली.


अर्पिता,“ अपवित्र? कोणाला म्हणताय तुम्ही? माझा भाऊ समुद्र आहे ज्याच्यामध्ये अनेक पवित्र नद्या येऊन एकरूप होतात! तो माझ्यासाठी देवा पेक्षा कमी नाही कळले तुम्हाला! नितीश तुझ्या घरच्यांना घेऊन आत्ताच्या आत्ता निघायचे!” ती नितीशला पाहून ओरडली.

अरीन,“ अप्पे जरा शांत हो ना! हे बघा मी तुमची हात जोडून माफी मागतो तुम्ही अर्पिताच बोलणं मनावर घेऊ नका! तिचा माझ्यावर खूप जीव आहे म्हणून ती माझ्या बद्दल वावग बोलणं नाही खपवून घेऊ शकत!” तो हात जोडून बोलत होता.आता इतका वेळ शांत असलेला नितीश बोलू लागला.

नितीश,“ नाही अरीन तुम्ही हात जोडू नका! खरं तर आम्हीच तुमची माफी मागायला हवी! तुम्ही इतके मोठे असून ही आमच्या समोर तुमच्या प्रसिद्धीचे,पैशाचे वलय बाजूला ठेवून तुमच्या बहिणीसाठी झुकलात! अर्पिताने मला तुमच्या बद्दल सगळे सांगितले आहे. तुमच्या बद्दल मला खूप आदर आहे! (आणि तो त्याच्या बाबांकडे वळून बोलू लागला) बाबा तुमच्या असल्याचं स्वभावामुळे मी तुम्हाला आणि घरात कोणालाच हे सांगितले नाही आणि तुम्हाला काही हक्क नाही अरीनचा असा अपमान करायचा आज पर्यंत तर मोठ्या फुशारकीने सगळ्यांना सांगत होतात ना की अरीन इनामदार यांची बहीण आमची सून होणार आहे! आणि आज तुम्हाला ते अपवित्र वाटतात का? ही सगळी तयारी! इतका सगळा तामझाम एवढंच काय पण तुमच्या माझ्या अंगावरचे कपडे देखील यांनीच घेतलेले आहेत हे सगळं तुम्हाला चालत हे सगळं अपवित्र नाही आणि ते फक्त अपवित्र आहेत काय? यांनी मनात आणले ना तर आज आपल्याला इथेच धडा शिकवू शकतात पण अर्पितासाठी ते शांत आहे.(आणि त्याच्या बाबांची मान शरमेने खाली गेली)तुम्हाला जायचं तर जा पण माझं अर्पितावर प्रेम आहे आणि तिच्याशी मला लग्न करायचे आहे! आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे. अरीनच अर्पिताचे कन्यादान करतील! अर्पिता मला माफ कर मी घाबरून हे सत्य लपवले आणि अरीनचा अपमान झाला! अरीन मी तुमची ही माफी मागतो!” तो हात जोडून बोलत होता.

अरीन,“ प्लिज नितीश तू हात नको जोडूस! मी समजू शकतो की तू ही गोष्ट घरच्यां पासून का लपवली असेल! बरं अप्पे बस बाई करतो तुझं कन्यादान तू असा तर माझा पिच्छा सोडणारच नाहीस!” तो डोळ्याच्या कडा पुसत हसून म्हणाला आणि अर्पिताने मात्र रडत त्याला मिठी मारली.

राध्या,“ बास की अप्पे मेकअप खराब होईल तुझा!” ती जवळ येत तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली आणि आई-बाबा आणि अण्णानी ही हसायला लागले.

अर्पिता,“भैय्या मला तर तुझ्याशी बोलायचेच नाही! आणि नितीश तू जर आधीच हे तुझ्या घरी सांगितले असतेस तर माझ्या भैय्याचा अपमान झाला नसता! माझ्या भैय्याच्या आधी कोणीच नाही माझ्यासाठी याचा विचार करून मगच लग्नाला तयार हो आता!” ती नितीशला पाहून म्हणाली.

नितीश,“ अर्पिता सॉरी माझं चुकलं मी माझ्या सगळ्या कुटुंबा कडून तुमची माफी मागतो!आणि हो मॅडम मला माहित आहे तुझ्या भैय्या समोर मी पाणी कम चाय आहे! मी किंवा माझ्या घरचे कधीच तुमच्या भावा-बहिणीमध्ये येणार नाहीत! आता तर बसतेस ना कन्यादान करून घेऊ!” तो तिला हात जोडून म्हणाला.

बाबा,“ बघा नितीश विचार करा आमच्या अर्पिता बरोबर संसार करणे इतके सोप्पे नाही आ!” ते हसून म्हणाले.

आणि अरीन-राध्याने अर्पिताचे कन्यादान केले. नितीशच्या घरच्यांना नाईलाजाने का होईना नितीश समोर गप्प बसावे लागले. लग्न पार पडले आणि अर्पिता तिच्या घरी निघून गेली.

★★★
चार वर्षानंतर

एका मोठ्या सभागृहात खूप लगबग सुरू होती.व्यासपीठ सजले होते. राध्या सगळी तयारी झाली का ते पुन्हा पुन्हा पडताळून पाहत होती. अर्पिता आणि नितीश पाहुण्यांनाचे स्वागत करत होते. पत्रकार मंडळी आधीच त्यांचे कॅमेरे आणि बाकी लमजमा घेऊन तयार होते. बाहेर ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन पत्रकार न्यूज कव्हर करायला तयार होते कारण आत मध्ये येण्याची मोजक्याच पत्रकारांना परवानगी दिली गेली होती. आई,बाबा आणि अण्णा स्टेज समोरच्या पहिल्या रो मध्ये बसले होते. कला आणि साहित्य क्षेत्रातील बरेच प्रसिद्ध चेहरे तिथे दिसत होते.

कारण ही तसेच होत अरीनच्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा होता.एका प्रसिद्ध मॉडेल आणि समाजसेवकाच्या चरित्र पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा होता आणि ही मीडियासाठी ब्रेकिंग न्यूज होती. अरीन मात्र स्टेज मागे तीन वर्षांच्या मुलीला खेळवत बसला होता. तितक्यात तिथे राध्या आली आणि वैतागून त्या गोंडस मुलीला कडेवर घेत त्याला म्हणाली.

राध्या,“ अरीन विनीला एक कळत नाही! तिला सतत डॅडू लागतो पण तुला ही कळत नाही का? अरे सगळे लोक आले आहेत. चल आता प्रकाशन सोहळा सुरू करू की पण ज्योत प्रज्वलन कोण करणार आहे आणि पुस्तक ही कोण प्रकाशित करणार आहे हे तू अजून सांगितले नाहीस कोण येणार आहे अरीन?” ती बोलत होती.

अरीन,“ gf कॅटबरी खाताना किती तोंड खराब करते बच्चा!(तो रुमालने वीणाचे तोंड पुसत म्हणाला आणि ती त्याच्याकडे झेपावली तिला कडेवर घेत तो म्हणाला) राध्या किती प्रश्न विचारतेस ग? चल स्टेजवर कळेल तुला सगळं!” तो हसून म्हणाला.तो पर्यंत अर्पिता तिथे आली.

अर्पिता,“ अरे देवा राध्या ही विणी ना पुन्हा चिकटली का याला? आता हिला घेऊन तू सगळं करणार का? बरं चला आता!” ती अरीनकडे पाहत म्हणाली.

अरीन,“ये अप्पे तुझ्या पोटात का दुखतेय ग? माझी gf आहे ती माझ्या जवळच राहणार कळले तुला चला आता!” तो छोट्या विणाला प्रेमाने कुरवाळत म्हणाला आणि सगळे स्टेजवर गेले. राध्या आणि अर्पिता स्टेज वरून खाली उतरू लागल्या तर अरीनने त्यांना थांबवून घेतले आणि त्याच्या आईला स्टेजवर बोलवून घेतले. तो माईक घेऊन बोलू लागला.

“तुम्ही सगळे मान्यवर तुमच्या वेळात वेळ काढून इथे आलात त्या बद्दल मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांनाचे आभार मानतो! खरं तर मी स्वप्नात ही विचार केला नव्हता की मी माझ्या आयुष्यावर आधारित एखादे पुस्तक लिहीन आणि त्याचा असा प्रकाशन सोहळा कधी होईल पण मी पुस्तक देखील लिहले आणि त्याचा प्रकाशन सोहळा आज होत आहे. हे सगळं मला स्वप्नवत वाटत आहे.मी माझी कथा एक काल्पनिक कथा म्हणून ही प्रकाशित करू शकलो असतो पण ती मी माझी बायोपिक म्हणून प्रकाशित करत आहे कारण मी केलेला संघर्ष लोकांच्या पर्यंत पोहोचावा आणि माझ्या सारख्या एखाद्या जरी मेल एस्कॉर्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणाला समाजाने या दलदलीतुन बाहेर पडण्यासाठी मदत केली तर माझ्या या पुस्तक लिहण्याचे मी सार्थक झाले असे समजेन!मी स्वतः ही वीणा कारखानीस फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून अशा तरुणांना या दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत! त्यातून आज बरेच तरुण चांगले आणि सन्मानाचे आयुष्य जगत आहेत तुम्ही ही या चळवळीशी जोडले जावेत ही विनंती!

आता वळू माझ्या बायोपिककडे आणि माझ्या संघर्षाची प्रेरणा बनलेल्या वेळोवेळी मला साथ देऊन आज मी जे काही आहे तो त्यांनामुळेच अशा माझ्या शक्ती स्थानांकडे! आज त्यांच्याच हस्ते दिप प्रज्वलन आणि पुरस्काराचे प्रकाशन होईल ते म्हणजे माझी आई, बहीण अर्पिता आणि बायको राध्या यांच्याकडून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दिप प्रज्वलन करावे!”


आणि तिघींनी ही त्याच्याकडे अश्रू पूर्ण डोळ्यांनी पाहिले आणि अरीनने त्यांच्या हातात मेणबत्ती दिली.तिघींनी दीप प्रज्वलीत केला आणि टाळ्यांनाचा कडकडाट झाला. त्या नंतर त्याने सोनेरी वेस्टन असलेले पुस्तक तिघींच्या हातात दिले आणि तो पुढे बोलू लागला.


“ हे पुस्तक मी वीणा कारखानीस मॅडमच्या पवित्र स्मृतीला अर्पण करत आहे कारण मी आज जो काही आहे त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे!” तो हे बोलत होता आणि त्याच्या कडेवर बसलेल्या छोट्या विणाने त्याच्या गालाचा पापा घेतला. ते पाहून त्याला भरून आले आणि त्याने छोट्या विणीला मिठीत घेतले.

राध्या,आई आणि अर्पिताने पुस्तकावरील गोल्डन कव्हर बाजूला केले आणि

“डार्क हॉर्स”


नाव असलेले आणि अरीनचा फोटो असलेले पुस्तक प्रकाशित झाले. त्या बरोबर टाळ्यांनाच्या कडकडाटा सह फोटोंचे फ्लॅश ही पडू लागले.अरीन मात्र छोट्या वीणाचे पापे घेत स्टेजच्या एका कोपऱ्यात उभा होता. त्याच्या मुलीच्या रुपात वीणा त्याची gfच परत आली आहे असा त्याचा ठाम विश्वास होता.
★★★★


नमस्कार वाचक हो!

तुम्ही या कथेला जो प्रतिसाद दिलात त्या बद्दल मी तुमची ऋणी आहे.

ही कथा तशी खूप वेगळी आणि वेगळ्याच सामाजिक विषयावर भाष्य करणारी होती. ज्या विषयी आपल्या समाजात बोलले जात नाही किंवा जो विषय निशीब्ध मानला जातो किंवा काही लोकांना तर समाजात असं काही चालतं; असं काही आहे हे देखील माहीत नाही त्या विषयावर ही कथा आधारित आहे. आणि तो विषय म्हणजे मेल एस्कॉर्ट पुरुष वैशावृत्ती! अशा पुरुषांना आपला समाज जिगेलो म्हणून ही ओळखतो! खरं तर हा विषय मांडणे आणि लिहणे माझ्यासाठी देखील सोपं नव्हतं. मनात कुठे तरी भीती होती की वाचक कसे रिस्पॉन्स देतील आणि मी स्त्री असल्या कारणाने आशा पुरुष प्रधान विषयाला न्याय देऊ शकेन का?

पण हे धाडस मी केले आणि या सेन्सिटिव्ह विषयाला वाचकांनी तितकाच सिंसीअरली प्रतिसाद दिला. पाहता पाहता या कथेचे ४९ भाग झाले. तसं पाहायला गेलं तर स्त्री वैशावृत्ती बद्दल खूप लिहले गेले आहे.या व्यवसायातील स्त्रियांना कुठे तरी सहानुभूती देखील मिळते कारण त्या स्वखुशीने या व्यवसायात उतरत नसतात. खरं तर त्यांच्यासाठी देखील आयुष्य सोपं नसतं.

पण पुरुष वैशाचे काय? ते देखील या व्यवसायात त्यांच्या खुशीने नक्कीच येत नाहीत. त्यांच्या ही अनेक व्यथा असतात अनेक कथा असतात आणि त्यांच्याशी आपला समाज कसा वागतो? त्यांच्या याच व्यथा मी अरीनच्या रुपात डार्क हॉर्स या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला. आता तो प्रयत्न कितपत यशस्वी ठरला हे मात्र तुम्हीच ठरवू शकता!


(कथेला डार्क हॉर्स हे नाव राधिका कुलकर्णी यांनी सुचवले आहे! डार्क हॉर्स म्हणजे धावण्याच्या शर्यतीत मागे असलेला घोडा जो हारणार आहे असे गृहीत धरले जाते पण तो अनपेक्षितपणे शेवटच्या क्षणाला पुढे येतो आणि शर्यत जिंकतो तसेच डार्क हॉर्स हे शक्तीचे देखील प्रतिक आहे)


©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!









🎭 Series Post

View all