डार्क हॉर्स भाग ४८

अर्पिताचे लग्न मोडेल का?


अरीन नितीशच्या वडिलांच्या म्हणण्या प्रमाणे लग्नातून निघून गेला तो रिसॉर्ट जवळच असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसला तर राध्या मात्र स्वतःच्या मनात नसताना देखील अरीनच्या सांगण्या वरून पुन्हा अर्पिता जवळ जाऊन उभी राहिली.अर्पिताची नजर मात्र अरीनला शोधत होती.पण तो तिला कुठेच दिसत नव्हता. म्हणून मग न राहवून तिने लग्न विधी करत करत राध्याला बोलवून घेतले आणि विचारले.

अर्पिता,“ राध्या भैय्या कुठे आहे ग? तो दिसत नाही! कन्यादान तोच करणार आहे ना भडजी म्हणत आहेत की त्याला बोलवा!”

राध्या,“ अप्पे अग खूप महत्त्वाचे समान आणायचे राहिले आहे म्हणून तो गेला आहे. कन्यादानाला बाबा-आई बसतील तो पर्यंत! उगीच लग्न विधी मध्ये खोळंबा कशाला?”ती कशी बशी उत्तरली.

अर्पिता,“काय? उगीच काही तरी बोलू नकोस राध्या इतके लोक हाताखाली असताना भैय्या का जाईल ग सामान आणायला? आणि मला भैय्या कडूनच कन्यादान करून घ्यायचे आहे!” ती थोडी रागानेच म्हणाली.

भडजी,“ कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे या!” भडजी म्हणाले.

राध्या,“ अप्पे कसला विचित्र हट्ट आहे तुझा? अरीन बाहेर गेला आहे तो पर्यंत तू आई-बाबा कडून कन्यादान करून घे ना!” ती थोडी अडखळत म्हणाली. अर्पिताला मात्र नक्कीच काही तरी घडले आहे असा संशय आला. म्हणून ती तिथेच उठून उभी राहिली आणि म्हणाली.

अर्पिता,“राध्या खरं खरं सांग भैय्या कुठे आहे ते?आणि नेमकं काय झाले आहे?” तिने चिडून विचारले.

राध्या,“ अग काही नाही झाले अप्पे मुहूर्त टळून जाईल तू घे ना आई-बाबा कडून कन्यादान करून!” ती अर्पिताची समजूत काढत म्हणाली.

अर्पिता,“ ठेव माझ्या डोक्यावर हात आणि सांग आता काय झाले आहे ते?भैय्या कुठे आहे?मला खूप भीती वाटत आहे त्याला काही झालं तर नाही ना सांग ना प्लिज!” ती घाबरून म्हणाली. राध्याने अर्पिताच्या डोक्यावरचा हात काढून घेतला आणि ती तिच्या पासून नजर चोरत डोळ्यातील पाणी लपवत म्हणाली

राध्या,“ काही नाही झाले त्याला उगीच तू मनात भलतं-सलतं अनु नकोस! तू बस बरं शुभ मुहूर्त टळून जाईल!आई-बाबा आहेत ना तुला तोच कशाला हवा ग?” ती आता उसने अवसान आणून चिडून म्हणाली.

अर्पिता,“ भैय्या जेंव्हा येईल तोच शुभ मुहूर्त असेल माझ्यासाठी मी त्याला अधीच सांगितले होते! तो आल्या शिवाय आणि त्याने कन्यादान केल्या शिवाय मी कोणताच विधी करून घेणार नाही!” ती हट्टाने म्हणाली.

राध्या,“ अप्पे तो येणार नाही तू उगीच हट्ट करू नकोस!” ती चिडून म्हणाली आणि आपण रागात खरं बोलून चूक केली हे राध्याच्या लक्षात आले.

अर्पिता,“ म्हणजे काय म्हणायचे आहे तुला? कुठे आहे माझा भैय्या राध्या आता खरं खरं सांग तुला माझी शपथ आहे!” तिने रडत विचारले आणि राध्याला मात्र आता सत्य लपवणे अशक्य झाले

राध्या,“ तुझ्या या होण्याऱ्या सासऱ्यांना विचार! तुझ्या सासऱ्यांना अरीन या शुभ कार्यात नको आहे कारण तो मेल एस्कॉर्ट होता. त्याची अपवित्र सावली त्यांना इथे नको आहे!” ती रडत म्हणाली.

अर्पिता,“ काय? अग हे काय बोलते आहेस तू? या लोकांना तर आधीच सगळं माहीत होते ना मग आत्ता अचानक हा मुद्दा आला कुठून? नितीश तू सांगितले होतेस ना सगळे?” तिने नितीशकडे पाहत विचारले आणि नितीशने मान खाली घातली.

राध्या,“ नाही अप्पे याने याच्या घरी काहीच नाही सांगितले. आज लग्नाला आलेल्या कोणी तरी हे तुझ्या सासऱ्याना सांगितले. त्यांनी…” ती पुढे बोलणार तर अर्पिता मध्येच बोलू लागली.

अर्पिता,“ आणि यांनी भैय्याला लग्नात येऊ नकोस असे सांगितले आणि तो ही गेला असेल निमूटपणे निघून! हा भैय्या माझ्यासाठी अजून काय काय करणार आहे काय माहीत! नितीश तू चूक केलीस आणि त्याची शिक्षा माझ्या भैय्याने का भोगावी? तुला आम्ही पूर्ण कल्पना दिली होती! तुला हे देखील म्हणाले होते की वाटले तर मी स्वतः किंवा भैय्या तुझ्या घरच्यांना या सगळ्याची कल्पना देईन तर तू म्हणालास की त्याची काही गरज नाही मी सांगेन!चूक तू केलीस!(नितीश काही बोलण्याचा प्रयत्न करत होता पण तिने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि त्याने आवंढा गिळला. तिने राध्या जवळ जाऊन तिला विचारले) राध्या भैय्या कुठे आहे सांग मला?” तिने रडतच विचारले


राध्या,“ तो शेजारच्या गार्डनमध्ये बसला आहे!”


राध्याने सांगितले आणि अर्पिता धावतच निघाली पण अचानक तिला कसली तरी ओढ लागली मागे पाहिले तर तिच्या शेल्याला नितीशच्या उपरण्याची गाठ बांधली होती. तिने तिचा शेलाच काढून फेकला आणि धावतच गार्डनकडे निघाली तिच्या मागोमाग राध्या,अण्णा आणि आई-बाबा होते. ती गार्डनमध्ये गेली तर तिला अरीन एका बेंचवर शांत बसलेला दिसला. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि रागाने त्याला पाहत म्हणाली.

अर्पिता,“ का करतोस भैय्या तू असे?कायमच तू का माझ्याशी असं वागतोस!” तिला तिथे पाहून अरीन उठून उभा राहिला आणि तिला थोड्या रागानेच विचारले.

अरीन,“ अप्पे तू इथे काय करत आहेस? वेडी आहेस का तू?”


तो पुढे काही बोलणार तर अर्पिताने त्याचा हात धरला आणि त्याला जवळ जवळ ओढतच ती रिसॉर्टमध्ये घेऊन गेली. राध्या आणि बाकी सगळे पुन्हा दोघांच्या मागे होते.ती अरीनला पुन्हा मंडपात घेऊन आली. नितीशचे आई-वडील आणि बहीण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते कारण त्यांना अर्पिताचे असे वागणे अनपेक्षित होते. अर्पिता अरीनचा हात धरून आता बोलू लागली.

अर्पिता,“ हा अरीन इनामदार एक प्रतिष्ठित नागरिक एक सुपर मॉडेल एक समाजसेवक आणि हो एक बिझनेस टायकून देखील!हा माझ्या भाऊ आहे! आणि हो तो कधी काळी एक मेल एस्कॉर्ट होता एक जिगेलो पण त्याने ते काम त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या मर्जीने नाही केले. त्याला तो मार्ग स्वीकारावा लागला कारण त्याची मजबुरी होती. त्याने जे काही केले ते माझ्यासाठी,आई-बाबांसाठी आमच्या कुटुंबासाठी केले.पण आज तो एक सेलिब्रिटी आहे आत्ता आत्ता पर्यंत तुम्ही सगळे त्याला डोक्यावर घेऊन नाचत होतात ना? तुम्ही तर तो तुमचा नातेवाईक होणार म्हणून सगळ्यांना गर्वाने सांगत होता ना? मग आता अचानक तो तुम्हाला नकोसा का झाला?

मी नितीशला सगळ्या गोष्टीची कल्पना दिली होती! त्याने तुम्हाला नाही सांगितले तर त्यात दोष त्याचा आहे आमचा नाही! आणि बाबा(नितीशचे बाबा) तुम्ही माझ्या भैय्याचा असा अपमान करू शकत नाही! तुम्हाला जर त्याला स्वीकारायचे नाही तर मी नितीशची लग्न करणार नाही कारण मला माझ्या भावाचा अभिमान आहे! तो माझ्यासाठी फक्त भाऊ नाही तर खूप काही आहे समज तुम्हाला?” ती रागाने बोलत होती पण डोळ्यातून मात्र कढ वाहत होते.

अरीन,“वेड लागले आहे का अप्पे तुला? काय बोलत आहेस तू! अग तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे! उगीच वेडेपणा करू नकोस!” तो ही चिडूनच म्हणाला.

अर्पिता,“ तू तर एक शब्द ही बोलू नकोस भैय्या! हे लोक जा म्हणाले आणि तू खुशाल निघून गेलास? इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न नाही तर तुझ्या मानाचा प्रश्न आहे! हे लोक जर तुझा मान सन्मान ठेवू शकत नसतील तर मला यांच्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही! नितीश तू निघू शकतोस!” ती कठोरपणे म्हणाली

अर्पिता आज पुन्हा एकदा अरीनच्या बाजूने उभी राहिली होती. तिला अरीनचा झालेला अपमान सहन झाला नाही. म्हणून तिने तिच्या सासरच्या मंडळींना चांगलेच खडसावले होते आणि नितीशला देखील जा असे सांगितले होते.

पण या सगळ्यामुळे अर्पिताचे लग्न मोडेल का? नितीश काय करेल?


©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!






🎭 Series Post

View all