डार्क हॉर्स भाग ४६

अर्पिताचे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल ना?


त्या दिवशी पासून मात्र अरीनने अर्पिताशी बोलणे टाकले. राध्याने त्याला खूप समजण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्पिताने घडलेला प्रकार आई-बाबांना सांगितला आणि त्यांना अरीन तिच्याशी बोलायला सांगा! ती परत असं वागणार नाही असे विनंती केली पण आईचे आणि बाबांचे ही म्हणणे पडले.

आई,“अप्पे तुझं खूप चुकलं आहे! तू आम्हाला सांगितले नाही ते एक वेळ ठीक होते पण तू अरीन पासून हे लपवून खूप मोठी चूक केली आहेस! तो तुझ्या बाबतीत किती सेन्सिटिव्ह आहे हे तुला माहीत आहे ना! तरी तू अशी वागलीस आम्ही दोघे ही या मध्ये पडणार नाही आणि अरीनला ही समजावणार नाही!” त्या म्हणाल्या आणि अर्पिताच्या उरल्या सुरल्या आशा देखील संपल्या.

आज एक महिना होऊन गेला होता अरीन अर्पिताशी बोलत नव्हता. तो आज लवकरच घरी आला आणि फ्रेश व्हायला निघून जाताना राध्याला सांगून गेला की

“ मला बोलायचे आहे सगळ्यांशी म्हणजे अर्पिताशी देखील तर सगळ्यांना बोलवून घे मी आलोच!”

राध्याने सगळ्यांना त्याच्या सांगण्या प्रमाणे बोलवून घेतले. सगळ्यांना प्रश्न पडला होता की अरीनला काय बोलायचे असेल.तो फ्रेश होऊन आला आणि त्याने बोलायला सुरुवात केली.

अरीन,“ आई उद्या रविवारी आहे! त्यामुळे मी उद्या अर्पिताला पाहायला एक स्थळ बोलवले आहे! सगळं ठीक राहील तर अर्पिताच लग्न उद्याच ठरेल!कोणाला काही बोलायचे आहे किंवा काही सांगायचे असेल तर आत्ताच सांगा म्हणजे मला आत्ताच त्यांना होय नाही कळवायला बरं! ” तो अर्पिताकडे तिरका कटाक्ष टाकत म्हणाला आणि अर्पिताने फक्त नकारार्थी मान हलवली.

आई,“ठीक आहे.मी सगळी तयारी करून ठेवते.” त्या म्हणाल्या.

राध्या,“ पण अरीन अर्पिताच तर..” ती पुढे बोलणार तर अर्पिताने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि म्हणाली.

अर्पिता,“ मी भैय्या ज्या मुलाशी म्हणेल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे!” ती म्हणाली.

अरीन,“ते लोक उद्या अकरा वाजता येतील!त्या आधी सगळी तयारी करा.” तो म्हणाला.

राध्याला मात्र अरीनचे असे वागणे खटकत होते.पण अर्पितानेच तिला बोलायचे थांबवले म्हणून मग ती गप्प बसली पण तिची अरीन वरची नाराजी मात्र कोणाच्या ही नजरेतून सुटली नव्हती.सगळ्यांनी रात्रीचे जेवण केले आणि झोपायला निघून गेले.

दुसऱ्या दिवशी राध्या आणि आईची लगबग सकाळपासूनच सुरू होती.आईने राध्याच्या मदतीने सगळी तयारी करून ठेवली होती.

आई,“ राध्या दहा वाजल्या ग इथलं सगळं झालं आहे तर तू जरा अर्पिताकडे जा ना! तिला तयार करून घेऊन ये!” त्या म्हणाल्या.

राध्या,“ ठीक आहे आई!” असं म्हणून ती अर्पिताच्या रूममध्ये गेली तर अर्पिता आईने काढून ठेवलेली साडी,दागिने उदास नजरेने पाहत होती. तिने राध्याला पाहिले आणि डोळ्यातले पाणी लपवत ती म्हणाली.

अर्पिता,“ बरं झालं वहिनी तू आलीस मला साडी असं ही नेसायला कोणाची तरी मदत लागणारच होती!”

राध्या,“ अर्पिता! का करत आहेस तू हे सगळं तुझ्या मना विरुद्ध? तू फक्त एकदा सांग मी हे सगळं जिथल्या तिथे थांबवते!” ती म्हणाली.

अर्पिता,“ मना विरुद्ध वगैरे काही नाही भैय्या कायमच माझ्या भल्याचाच विचार करणार ना!मी आधीच त्याला खूप दुखावले आहे आता अजून त्याला मला दुखवायचे नाही!” ती म्हणाली आणि राध्याचा नाईलाज झाला.

राध्याने अर्पिताला तयार केले.तो पर्यंत अकरा वाजले. सगळे हॉलमध्ये जमले होते. पाहुणे आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मुलाची चौकशी अण्णांनी आणि बाबांनी केली. चहा नाष्टा झाला आणि राध्या अर्पिताला घेऊन आली. अर्पिता खाली मान घालून खुर्चीवर येऊन बसली आणि मुलाचे वडील मुलाला म्हणाले.

मुलाचे वडील,“ नितीश मुलीला काय विचारायचे असेल तर विचार?”

नितीश नाव ऐकून अर्पिताने वर मान करून पाहिले तर नितीश तिला पाहून हसत होता.तिने भरल्या डोळ्याने अरिनकडे पाहिले अरिन इकडे तिकडे पाहू लागला.पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न कधी करायचे या बाबतीत चर्चा पुढच्या आठवड्यात करायची असे ठरले. पाहुणे निघून गेले.अरिन त्याच्या रूममध्ये त्याला एका ऍडच्या शूटसाठी जायचे म्हणून आवरत होता.राध्या तिथेच काही तरी करत होती आणि अर्पिता तिथे आली.ती पळत येऊन अरिनला बिलगली.

अरिन,“राध्या हिला सांग नसते ड्रामे मला नको आहेत!”तो स्वतःच्या डोळ्यातले पाणी लपवत म्हणाला.

अर्पिता,“ बास ना भैय्या आता अजून किती दिवस मला असं सतवणार आहेस तू?मी किती वेळा सॉरी म्हणू अजून!” ती रडत बोलत होती.

अरीन,“राध्या हिला काय मी व्हिलन वाटलो का? ही त्या नितीशला काय काय बोलली माहीत आहे का?” तो म्हणाला आणि अर्पिताने त्याला आश्चर्याने विचारले.

अर्पिता,“ नितीश तुला कुठे आणि केंव्हा भेटला आणि सगळं?”

अरीन,“ राध्या हिला…..!” तो पुढे बोलणार तर राध्या मध्येच म्हणाली.

राध्या,“ मी काय तुमच्या भावा-बहिणी मधला कबुतर आहे का? की सारखं आपलं राध्या हिला सांग राध्या हिला सांग!” ती वैतागून म्हणाली.अरीन मात्र चिडला आणि म्हणाला.

अरीन,“तुला पण नाही समजून घ्यायच ना मला मग ठीक आहे! असं ही मला हिच्याशी बोलायचे नाही राध्या! काय झाले कसे झाले हिला चौकशा कशाला हव्यात सगळं हिच्या मना प्रमाणे होत आहे ना मग… बरं मला उशीर होत आहे मी जातो!”

राध्या,“ बास झाली आ तुझी नाटकं अरीन!मला मान्य अर्पिता चुकली आहे पण अजून किती दिवस तू ही गोष्ट ताणून धरणार रे? ती थोड्या दिवसात जाईल निघून लग्न करून मग काय करशील?” ती ही आता थोडी चिडून म्हणाली.

अर्पिता,“ भैय्या तू जो पर्यंत मला सगळं सांगणार नाही तो पर्यंत मी तुला कुठेच जाऊ देणार नाही! आणि तू व्हिलन नाहीस कळलं तुला तू तर हिरो आहेस माझ्यासाठी!आता सांग लवकर हे सगळं काय आहे?” ती रुमचे दार लावत त्याच्या समोर येऊन उभी राहत म्हणाली.

अरीन,“तुम्ही दोघी मिळून मला कोंडीत पकडताय का?”त्याने दोघींना पाहत विचारले.

राध्या,“ तसं समज हवं तर आणि मला ही सगळं ऐकायचे आहे! यातली एक ही गोष्ट तू मला सुध्दा सांगितली नाहीस आता बोलतो का घडा घडा!” ती त्याला दम देत म्हणाली.

अरीन,“ ठीक आहे सांगतो सगळं पण याचा अर्थ असा कोणी ही समजू नये की मी कोणाला तरी माफ केले आहे(तो अर्पिताकडे तिरकस पाहत म्हणाला) अर्पिताने तिच्या आणि नितीश बद्दल सगळं सांगितल्या नंतर मी त्याची चौकशी माझ्या पध्द्तीने केली.त्यातून त्याच्या बद्दल चांगलीच माहिती मिळाली मला! तो हिच्याच कंपनीत कामाला आहे आणि स्वभावाने बाकी सगळ्या गोष्टीत देखील चांगला आहे. घरात आई-वडील असतात बहिणीचे लग्न झाले आहे. चांगल्या सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा आहे! हे सगळं कळल्यावर मी त्याला माझ्या ऑफिसमध्ये बोलवून घेतले! तर त्याने मला सांगितले की या मूर्ख मुलीने त्याच्याशी सगळे संबंध तोडले आहेत का तर म्हणे मला हे सगळं पसंत नाही! आणि ही माझ्या मना विरुद्ध काही करणार नाही म्हणे! मी हिच्यासाठी खूप काही केले आहे आणि हिने मला आधीच दुखावले आहे तर अजून दुखवायचे नाही मला!मी म्हणेन त्या मुलाशी ही लग्न करेल!

ही समजते कोण स्वतःला? नालायक कुठली! आणि मला काय समजते ही की मी हिचा मोठा भाऊ आहे तर तिचे प्रेम मला पसंत नसेल किंवा हिने माझ्या मनाप्रमाणे वागले पाहिजे असे काही मी कधी तरी म्हणालो आहे का? किंवा हिच्या प्रेमाला मी विरोध केला आहे का?मी काय व्हिलन आहे का? हिच्या लव स्टोरीचा मूर्ख कुठली! माझा विरोध हिच्या प्रेमाला कधीच नव्हता पण हिने माझ्या पासून सगळं लपवून ठेवलं याच दुःख आहे मला आणि मी जे काही हिच्यासाठी केले ते माझे कर्तव्य होते. मी कोणावर ही उपकार केलेले नाहीत!आणि हिच्या मना विरुद्ध मी हिचे लग्न करेन का? ही खुश तर मी खुश पण नाही हिला तर मला व्हीलनच बनवायचे होते ना!

म्हणून मग मी नितीशशी बोललो. त्याच्या आई बाबांच्याकडे अण्णा आणि बाबांना पाठवून दिले आणि आज हे सगळे घडवून आणले! ऐकलं दोघींनी सगळं आता जाऊ मी!” तो डोळे पुसत म्हणाला.

अर्पिता,“ भैय्या ऐक ना आत काय करू मी म्हणजे तू मला माफ करशील मी तुझ्या पासून हे लपवायला नको होते चुकले मी! पण या गोष्टीची शिक्षा तू किती दिवस देणार मला! आणि तू माझ्यासाठी कधीच व्हिलन नव्हतास! तू माझ्यासाठी हिरो आहेस!तू माझ्यासाठी रोल मॉडेल आहेस! तू माझ्यासाठी फक्त भाऊ नाहीस तर बाप आणि त्या ही पेक्षा खूप काही आहेस कळलं तुला! आणि काय लावले आहे रे हिला ही! अर्पिता वगैरे! तुझ्या तोंडून अप्पे ऐकायला माझे कान तरसले आहेत!बास कर ना आता ही शिक्षा!” ती रडत बोलत होती. राध्याने त्याला डोळ्यांनीच इशारा केला की माफ कर आता म्हणून आणि अरीन तिच्या जवळ गेला आणि तिच्या जवळ जाऊन तिचे डोळे पुसत म्हणाला.

अरीन,“ बास झाले हे रडणं आता अप्पे आत्तास सगळं रडून डोळ्यातले पाणी संपलीस तर पाठवणीच्या वेळी काय करणार?” आणि हे ऐकून अर्पिता त्याला बिलगली. राध्याने ते पाहिले आणि डोळे पुसत जाऊ लागली तर अरीनने तिचा हात धरला.

थोडा वेळ शांततेत गेला आणि राध्या हसून म्हणाली.

राध्या,“ हुश्शsss मिटले बाबा एकदाचे भावा-बहिणीचे भांडण! आणि मी सुटले नाही तर राध्या हिला सांग ऐकून माझे कान किटले होते!” हे ऐकून अर्पिता अरीन हसायला लागले.

अरीन,“ अप्पे नितीश चांगला मुलगा आहे तुझी निवड योग्य आहे आणि त्याच्याकडून मला हे देखील कळले की तू त्याला माझ्या पूर्वायुष्याबद्दल कल्पना दिली आहे पण त्याच्या आई-वडिलांना ही याची कल्पना देणे गरजेचे आहे. हा तुझ्या आयुष्य भराचा प्रश्न आहे!” तो गंभीर होत म्हणाला.

अर्पिता,“हो नितीश आपल्या बद्दल त्याच्या कुटुंबाला स्वतःच सांगतो म्हणाला होता मला आपल्याला त्यात पडायची गरज नाही!आणि सॉरी भैय्या मी तुला दुखावले!” ती कान धरून म्हणाली.

अरीन,“ बास झाले आता जा! नाही तर तू फटके खाणार बघ अप्पे!” तो म्हणाला आणि अर्पिता हसून निघून गेली.

राध्या ही तिच्या मागे जाणार तर अरीनने तिच्या आधी जाऊन दार लावले आणि तिला जवळ ओढत म्हणाला.

अरीन,“ तू कुठे निघालीस लगेच?”

राध्या,“अरे खूप कामं आहेत मला आणि तुला तर शूटला जायचं होतं ना? उशीर होत नाही का?” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

अरीन,“ हो जायचं तर आहेच मला पण जाता जाता थोडं गुडलक घेऊन जावं म्हणलं!” तो तिला आणखीन जवळ ओढत म्हणाला आणि राध्या त्याला लाजून बिलगली.

आज एक महिन्यापासून अरीन आणि अर्पिता मधील अबोला दूर झाला होता. आपण अनेक वेळा आपल्या जवळच्या माणसांना आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगत नाही किंवा त्यांच्या पासून त्या लपवतो. कारण आपल्या मनात त्यांच्या बद्दल असणारा अविश्वास किंवा ते कसे रियाक्ट होतील याची वाटणारी भीती! अर्पिता पण अरीन पासून नितीश बद्दल लपवून हीच चूक केली होती त्यामुळे अरीन दुखावला गेला होता पण अर्पिताच्या नाजूक भावना ओळखून त्याने हे प्रकरण व्यवस्थित हाताळले आणि त्याच्या बहिणीने निवडलेली व्यक्ती योग्य आहे का त्याची पडताळणी केली आणि तिच्या लग्नाचा निर्णय घेतला.


©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!





🎭 Series Post

View all