डार्क हॉर्स भाग 36

अरिन आणि राध्याचे वैवाहिक जीवनाच्या सुरवातीलाच खूप मोठा अडथळा निर्माण झाला होता!त्यांचे वैवाहिक जीवन आता कसे असणार होते?


आज रविवारी होता त्यामुळे सगळेच सुस्तावले होते. अरीन देखील नऊ वाजून गेले तरी अजून उठला नव्हता. अर्पिताला ही आज सुट्टीच होती.ती ही उशिराच उठून किचनमध्ये आली तर आईंनी नाष्टा तयार करून ठेवला होता.

अर्पिता,“ बरं झालं आई तू नाष्टा तयार केलास! आज भैय्या बरोबर बाहेर जावे असा विचार आहे माझा! तो अजून झोपला आहे वाटतं मी त्याला उठवून आले!पाहू राध्या बरोबर त्याचा काही प्लॅन नसेल तर आम्ही दोघे जातो आज बाहेर! मला थोडी शॉपिंग ही करायची होती!”

आई,“काय ग त्याला एक दिवसच मिळतो आराम करायला! उगीच तुझी भुणभुण त्याच्या मागे लावू नकोस!” त्या म्हणाल्या कारण अरीन आणि बाबा आजच्या पार्टीची तयारी पाहायला दुपारी बारा वाजताच घरातून बाहेर पडणार होते.

अर्पिता,“ वा वा खूपच काळजी वाटत आहे आज तर लेकाची! आता तर मी त्याला घेऊनच जाणार!”असं म्हणून ती तोंड वाकडं करत अरीनच्या रूमकडे गेली आणि आईंनी डोक्याला हात लावला.


ती त्याच्या रूममध्ये गेली तर अरीन ढाराढुर झोपला होता. अर्पिता त्याच्या बेड जवळ गेली आणि त्याचे पांघरून काढत त्याला म्हणाली.

अर्पिता,“ उठ की भैय्या साडे नऊ वाजून गेले! किती झोपणार अजून!”

अरीन,“ अप्पे जा बरं तू मला झोपू दे! एक तर आठवड्यातून एक दिवस मिळतो निवांत!” तो वैतागत पुन्हा पांघरून घेऊन कुस बदलून झोपू लागला.

अर्पिता,“ उठ आ भैड्या लय भाव नको खाऊस! मला शॉपिंगला जायचं आहे!”ती थोडी रागाने म्हणाली.

अरीन,“ अप्पे तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे! तुझ्या एखाद्या मैत्रिणीला घे आणि जा शॉपिंगला माझं डोकं नको खाऊ!” तो डोळे किलकिले करून तिला पाहत म्हणाला.

अर्पिता,“ ठीक आहे तू नाही येणार ना मग मी पण नाही जाणार कुठे!” ती आता गाल फुगवून म्हणाली. तीच बोलणं ऐकून अरीन उठून बसला. तो पर्यंत तिथे आई आल्या.

आई,“अप्पे! अग लगेच फुगवायला काय झालं! तुझ्या बाबांची आज तब्बेत ठीक नाही! अरीन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल तू आवर आणि एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा ना शॉपिंगला हो पण पाच वाजे पर्यंत ये आपल्याला त्या नीता ताई आहेत ना त्यांच्या कार्यक्रमाला जायचं आहे संध्याकाळी!” त्या म्हणाल्या.

अर्पिता,“ काय झालं बाबांना मी पण जाते त्यांच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये! रुटीन चेकअप तर चार दिवसांपूर्वीच झाले आहे! डॉक्टर म्हणाले सगळं ठीक आहे!” ती काळजीने बोलत होती.तो पर्यंत बाबा तिथे आले आणि ते बोलू लागले.

बाबा,“ अग सिरीअस असं काही नाही थोडं अशक्त वाटत आहे!तू जा मैत्रिणीला घेऊन मी अरीन बरोबर जातो ना!” ते तिला समजावत म्हणाले.

अर्पिता,“ठीक आहे मी जाईन मग मैत्रिणीला घेऊन!” ती नाराजीनेच म्हणाली आणि गेली.

अरीन,“बाबा काय होतंय तुम्हाला?” त्याने काळजीने विचारले.

आई,“अरे काही झालं नाही आम्ही दोघांनी मुद्दाम खोटं सांगितले तिला! तुम्हाला बारा वाजता जायचे आहे ना त्या हॉटेलमध्ये पार्टीची व्यवस्था पाहायला म्हणून!” त्या गालात हसून म्हणाल्या.

अरीन,“ पण ही तर तोंड फुगवून गेली की!” तो डोक्याला हात लावून म्हणाला.

बाबा,“ जाऊदे आत्ता तिला; संध्याकाळी खुश होईल की!”ते हसून म्हणाले.
★★★★
अर्पिता नाष्टा करून शॉपिंगला गेली. अरीन आणि बाबा ठरल्या प्रमाणे हॉटेलमध्ये निघून गेले. ते गेले आणि थोड्याच वेळात तिथे राध्या आणि अण्णा ही पोहोचले. सगळी अरेंजमेंट अरीन-राध्याने मनासारखी करून घेतली.सगळं अर्पिताची आवड लक्षात ठेवून केलं होतं.

अर्पिता तीन वाजे पर्यंत घरी आली. तर बाबा आणि अरीन घरात नव्हेत तिने आईला विचारले तर त्यांनी ते दोघे घरी येऊन बँकेत गेले आहे अशी तिला थाप लावली. चार वाजल्या पासूनच आईची गडबड सुरू झाली.

आई,“ अप्पे हा ड्रेस घाल अरीन मुंबई वरून घेऊन आला आहे येताना.तुला द्यायचा विसरला होता तू गेल्यावर लक्षात आले त्याच्या मग माझ्याकडे दिला!” त्या बॅग देत म्हणाल्या.

अर्पिता,“ वन पीस किती सुंदर आहे ग! पण आई दुसऱ्याच्या कार्यक्रमात असा ड्रेस घालून जाणे कसे वाटते ते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना!” ती हसून म्हणाली.

आई,“ काही होत नाही! तू घाल बर आणि छान तयार हो! त्या निताताईला काय वाटतं आम्ही कमी आहोत का कोणा पेक्षा! लय फुशारक्या मारत असते!” त्या तोंड फुगवून नाटकीपणे म्हणाल्या आणि अर्पिता ही हसली.

दोघी ही ठरलेल्या हॉटेलवर पोहोचल्या.अर्पिता पोहोचण्याच्या आधीच सगळे तिथे पोहोचले होते. आईने मिस कॉल दिला आणि अरीनला समजले की अर्पिता आणि त्या हॉटेलमध्ये पोहोचल्या आहेत. अर्पिता जशी त्या हॉटेलच्या लॉनमध्ये पोहोचली तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. तिथे तिला सगळे ओळखीचे चेहरे दिसत होते. तिचे मित्र-मैत्रिणी, प्राध्यापक,जवळचे नातेवाईक अगदी जवळची सगळी माणसे! अरीन आणि बाबा सगळ्यात पुढे होते. अरीन अर्पिता जवळ गेला आणि त्याने तिचा हात धरून तिला मधोमध आणले. अर्पिता सगळीकडे आ वासून पाहत होती. सजावटी पासून अगदी तिला समोर दिसत असलेला केक देखील तिची आवड लक्षात घेऊन तयार केला गेला होता.

अरीन,“ अप्पे ही तुझी सक्सेस पार्टी आहे! कसे वाटले सरप्राईज?” त्याने हसून विचारले.

अर्पिता मात्र काहीच बोलली नाही तिने अरीनला मिठी मारली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तेच अश्रू आई-बाबा, राध्या आणि अरीनच्या डोळ्यात ही तरळले. पण अरीनने स्वतःला सावरले आणि तो तिला म्हणाला.

अरीन,“ अप्पे रडू नकोस नाही तर तुझा मेकअप खराब होईल आणि मग तुला ओळखणार कसे?” तो खट्याळपणे हसून म्हणाला.

अर्पिता,“ भैय्याss!” ती कमरेवर हात ठेवून लटक्या रागाने म्हणाली.

अरीन,“ बास बास आता केक काप!”

अर्पिताने केक कापला आणि पार्टी सुरू झाली. त्याच पार्टीत अण्णांनी अरीन आणि राध्या लवकरच लग्न बंधनात अडकत आहेत अशी घोषणा केली. अरीनने देखील तो मॉडलींगच्या क्षेत्रात उतरत असल्याचे ही सांगितले.पार्टी छान पार पडली. अर्पिताच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता आणि ते पाहून अरीन समाधानी होता.
★★★

पुढच्या चार महिन्यात अरीन आणि राध्याचे लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पण थाटात पार पडले.लग्नानंतरचे सगळे सोपस्कार पार पडले. आज अरीन आणि राध्याची पहिली रात्र होती.तो गॅलरीत उभा होता.तो पर्यंत राध्या नववधूच्या वेशात रूममध्ये आली तिने दार लावले आणि तिने अरीन जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला.तिच्या स्पर्शाने अरीन भानावर आला आणि राध्यकडे वळला. राध्या गुलाबी रंगाच्या शालूमध्ये विलक्षण सुंदर दिसत होती. मूर्तिमंत सौंदर्यच जणू! तिला असं पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याने तिला दोन्ही हातवर उचलून घेतले आणि सजवलेल्या बेडवर ठेवले. ती ही त्याच्या स्पर्शाने शहारली! दोघांची ही नजरानजर झाली आणि राध्याने लाजून तिची मान वळवली. अरीनने हसून तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तो तिचे मोहक रूप पाहत होता. संमोहित झाल्या सारखा तिच्या अगदी जवळ गेला आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. बराचवेळ दोघे ही एकमेकांमध्ये विरघळत होते.अरीन हळूहळू कपड्यांचे अडसर दूर करत होता.तिला स्पर्श करत होता. ती मात्र कधी मोहरत होती तर कधी शहारत होती.तो तिच्या अंग प्रत्यागावर चुंबनांचा वर्षाव करत होता आणि ती त्याला प्रतिसाद देत होती. दोघे ही प्रणयाच्या सुखाचा पुरेपूर आनंद घेत होते. आता दोघे एकरूप होण्या पासून काही क्षणच दूर होते की अरीन एकदम अस्वस्थ झाला आणि तो राध्या पासून दूर झाला. राध्याला कळत नव्हते की अरीनला काय झाले.तिने उठून बसत काळजीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले.

राध्या,“ अचानक काय झाले अरीन तुला?”

अरीन,“ राध्या अग मला खूप अस्वस्थ वाटत आहे! मी माझ्या मना विरुद्ध ज्या स्त्रियांशी संग केला ते सगळे मला आता आठवत आहे!मी तुझ्याबरोबर जे करत आहे ते प्रेम आहे की निव्वळ यांत्रिकता की वासना माझं मलाच कळत नाही!मी नाही करू शकणार राध्या I am sorry!मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकेन का? मी म्हणालो होतो ना की नको करुस माझ्याशी लग्न!” तो म्हणाला त्याच्या डोळ्यातून कढ वाहत होते.

राध्या त्याच्या आणखीन जवळ गेली त्याचे डोळे तिने पुसले. त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्याचा हात धरून ती बोलू लागली.

राध्या,“अरीन मूर्खा सारख काही तरी बोलू नकोस! तू ज्या सगळ्यातून गेला आहेस त्याच सगळ्या गोष्टी करतानात तुझं अस्वस्थ होणे साहजिक आहे. तुझ्या मनावर जे आघात झाले ते इतक्या सहजासहजी नाही विसरता येणार आणि तुला वाटतं तसं ही निव्वळ यांत्रिकता किंवा वासना नव्हती आणि नाही! तर हे प्रेम आहे कळलं तुला! एक स्त्री म्हणून स्पर्शातील वासना,यांत्रिकता आणि प्रेम या सगळ्यातील फरक मला कळतो. तुझ्या स्पर्शात प्रेम आहे अरीन! आपण थोडे दिवस थांबू! तुला मदतीची गरज आहे उद्याच आपण समुपदेशकाकडे जाऊ!” ती त्याला समजावत म्हणाली.

अरिन,“I am sorry!” तो पुन्हा भरल्या आवाजात म्हणाला.

राध्या,“पुन्हा तेच!नको म्हणुस सॉरी!आता झोपुयात का?I love you!” ती त्याला मिठी मारत म्हणाली. अरिनने ही तिला मिठीत घेतले.

अरिन एक मेल एस्कॉर्ट असल्याने त्याने अनेक प्रकारच्या स्त्रियांशी संग केला होता. प्रत्येक स्त्रीला तृप्त करण्यासाठी तो स्वतःला स्वतःच्या मना विरुद्ध कधी ओरबाडून घेत होता तर कधी तो ओरबडला जात होता.या सगळ्याचा सखोल परिणाम त्याच्या मनावर झाला होता आणि जेंव्हा खरंच राध्या बरोबर प्रेमाच्या रुपात तेच सगळं करण्याची वेळ आली तेंव्हा त्याला ते सगळं आठवून एक प्रकारची अस्वस्थता आली.तो गोंधळला की हे खरं प्रेम आहे!यांत्रिकता की वासना!त्यातून त्याला मानसिक त्रास होत होता आणि राध्याला तो कळला होता म्हणून तिने त्याला धीर तर दिलाच तसेच त्याला मदतीची गरज आहे हे ओळखून समुपदेशकाकडे घेऊन जाणार होती.

पुढे अरीन-राध्याचे वैवाहिक आयुष्य कसे असणार होते?

©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!











🎭 Series Post

View all