डार्क हॉर्स भाग ३४

अर्पिता आणि राध्याची मैत्री कायमची संपली होती का?


राध्याने अरीनचे आवडते पदार्थ केले होते.पनीर चिंगारी,पुरी, जीरा राईस, दाल तडका! आम्रखंड मात्र तिने विकत आणले होते. ते सगळं पाहून अरीन खुश झाला. दोघे ही जेवले. अरीनने सगळं आवरायला राध्याला मदत केली. थोड्याच वेळात दोघे ही पुन्हा हॉलमध्ये जाऊन बसले. राध्या अकाराच्या बसने जाणार होती. पुण्यात स्टॅंडवर तिला घेऊन जायला ड्रायव्हर येणार होता. आत्ता तर साडे नऊ झाल्या होत्या.तिला निघायला वेळ होता अजून म्हणून ती ही रिलॅक्स होती. अरीनच्या मनात मात्र अजून एक गोष्ट घोळत होती.

अरीन,“ राध्या अर्पिताला नोकरी मिळाली आहे तुला कळलं का?” त्याने विचारले.

राध्या,“हो आईंचा फोन आला होता. खूप आनंद झाला मला! तिचे अभिनंदन करण्यासाठी फोन करावा असा विचार ही आला मनात पण हिम्मत नाही झाली माझी! ती माझ्याशी बोलतच नाही एक वर्ष होऊन गेले तरी देखील तिचा माझ्यावरचा राग अजून गेला नाही अरीन! मला वाटतंय मी खूप चांगली मैत्रीण कायमची गमावली! ती माझ्याशी पुन्हा कधीच पूर्वी सारखी वागणार नाही का रे?” ती डोळ्यातले पाणी अडवत म्हणाली.

अरीन,“ अग इतक्यात हार मानलिस तू?अप्पी बाबांसारखी एककल्ली आहे! त्यात माझ्यावर तिचा प्रचंड जीव त्यामुळे आणि या सगळ्याला कुठे तरी मीच जबाबदार आहे राध्या! मी तिला भावनेच्या भरात सगळं सांगून बसलो मला खरं तर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे कोणालाच सांगायचे नव्हते पण माझ्या तोंडून अर्धवट ही गोष्ट गेली आणि अप्पीने तिची शपथ घालून माझ्याकडून सगळं काढून घेतलं!” तो स्वतःलाच दोष देत म्हणाला.

राध्या,“ वेडा आहेस का तू अरीन! अरे तुझ्यामुळे काहीच झाले नाही. ती मला हॉटेलमध्ये भेटली तेंव्हा ही मी तिच्याशी कशी वागले कशी बोलले हे आठवून माझी मलाच लाज वाटते! तुझ्या घरात तू काय करत होता हे समजायला देखील मीच कुठे तरी कारणीभूत आहे!या सगळ्याचा परिणाम आहे हा! अर्पिताचे ही बरोबरच आहे! माझ्यामुळे तिने तिचा भाऊ कायमचा गमावला असता! आपल्या सारखपुड्यात देखील ती फटकूनच वागली माझ्याशी पण तुझ्या मात्र मागे पुढे करत होते! हे पाहून ना मला हेवा वाटतो कधी कधी तुझा! मला अशी जीव ओवाळून टाकणारी बहीण किंवा भाऊ नाही!तिची आणि माझी मैत्री तुटायला मीच कारणीभूत आहे!” ती एक दीर्घ श्वास घेत दुख्खी होत म्हणाली.

अरीन,“ होईल सगळं नीट! अर्पिता आणि तुझं नात होईल पुन्हा पहिल्या सारखं! ती खूप दिवस मनात अढी धरून नाही बसणार!” तो म्हणाला.

राध्या,“ I hope so!अरे पण तू काय म्हणत होतास अर्पिताच?” तिने विचारलं.

अरीन,“अग अर्पिताला नोकरी मिळाली ना! म्हणून मी तिच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवावी असा विचार करत होतो.पार्टीत तिच्या मित्र-मैत्रिणी, आपले आप्तेष्ट सगळ्यांना बोलवावे! तुझं काय मत आहे?” त्याने विचारले.

राध्या,“ अरे वा! चांगला विचार आहे की! कधी द्यायची पार्टी तू सांग फक्त मी सगळं ऑर्गनाईझ करेन!” ती उत्साहाने म्हणाली.

अरीन,“ पुढच्या रविवारी!होईल का सगळं मॅनेज इतक्या वेळात?” त्याने विचारले.

राध्या,“ अरे एक आठवड्याचा वेळ आहे की आज सोमवार आहे! तू नको काळजी करुस!” ती म्हणाली.

दोघांनी ही पार्टी कुठे करायची? पार्टीची थीम काय असेल? किती लोक येतील?इंव्हीटेशन कसे पाठवायचे वगैरे वगैरे सगळी चर्चा केली आणि अरीन राध्याला बस स्टॉपवर जाऊन तिला बस मध्ये बसवून आला.
★★★★

अरिन शनिवारी पहाटेच मुंबईला गेला होता.त्याने आणि राध्याने ठरवल्या प्रमाणे उद्या अर्पितासाठी सरप्राईज पार्टी द्यायची होती.राध्याने त्यासाठी व्हेन्यू,खाण्या-पिण्याचा मेन्यू,ड्रेस कोड वगैरे सगळं ठेवलं होतं आणि तीच सगळी व्यवस्था पाहायला तसेच अर्पितासाठी आणि बाकी सगळ्यांसाठी खरेदी करायला अरिन आज लवकरच आला होता.अरिन-राध्यानी शॉपिंग आणि बरेच काही प्लॅन केले होते.

त्याला इतक्या सकाळी घरी पाहून आई-बाबा आणि अर्पिताला पहिल्यांदा आश्चर्य वाटले.नंतर त्यांना अरिनची काळजी वाटली.अर्पिताने अरिनच्या हातातील बॅग घेतली आणि त्याला सोफ्यावर बसवत तिने काळजीने त्याला विचारले.

अर्पिता,“ भैय्या तू ठीक आहेस ना?काही झाले आहे का?सगळं ठीक आहे ना?”त्याची काळजी तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती.

अरिन,“ अप्पे अग थांब थांब किती प्रश्न विचारशील किती काळजी करशील?मी ठीक आहे मला काही झालं नाही आणि बाकी सगळं ठीक आहे ग!मला वाटलं आज लवकर यावे जरा जास्त वेळ घालवावा तुमच्या बरोबर म्हणून आलो आज लवकरच!आधीच मला वेळच मिळत नाही मी आज काल घरी ही रविवारी येतो आणि संध्याकाळी लगेच जातो ही म्हणून आज आलो!” तो सहजपणे म्हणाला.

अर्पिता,“ बरं भावना पोहोचल्या!जा आता झोप जा पाच वाजले आहेत आणि असं ही तुला लवकर उठायची सवय आहे!जिमला जातो वजन उचलायला उगीचच पण आम्ही झोपतो ना जरा जास्त वेळ ”ती वैतागून म्हणाली.

अरिन,“अप्पे जास्त बोलू नकोस आ!त्याला वजन उचलणे नाही तर व्यायाम म्हणतात!तुझ्या सारखा आळशी नाही मी!बघ जरा किती जाडी होत आहेस ती!आई हीच वजन याच स्पीडने वाढत राहील तर हिला नवरा शोधायला खूप जड जाईल आपल्याला!” तो तिला चिडवत म्हणाला.

अर्पिता,“आई याला सांग हा उगीच सकाळ सकाळ माझा भांडायचा मूड नाही!मी झोपते मला दहा वाजता कॉलेज आहे अजून!मी जाते!” ती वैतागून म्हणाली.

आई,“तुमच्या दोघांचे झाले असेल तर जा दोघे ही झोपा आता!आम्ही ही झोपतो!” त्या म्हणाल्या.

अर्पिताने होकारार्थी मान हलवली आणि ती जांभई देत निघून गेली.आई-बाबा ही निघून जाणार तर अरिन त्यांना थांबवत म्हणाला.

अरिन,“मला तुमच्या दोघांशी बोलायचे आहे!”

बाबा,“ बोल! काय बोलायचे आहे काही गंभीर आहे का?” त्यांनी काळजीने विचारले.

अरिन,“ नाही ओ बाबा! या वर्ष भरात बरच काही झालं तुम्ही तिघांनी बरेच धक्के पचवले! सगळं सुरळीत झालं!ते म्हणतात ना अंत भला तो सब भला!पण या सगळ्यात आपली छोटीशी अप्पी अचानक मोठी झाली. ती तुमच्यासाठी आधार बनली. माझ्यासाठी तर माझी छोटी अप्पी मोठी बहीण झाली तिने मला खूप सांभळलं!खूप सपोर्ट केला!” हे बोलताना त्याचा आवाज कातर झाला आणि डोळ्यातून पाणी वाहू लागले.ते पाहून बाबांनी त्याचा हात थोपटला आणि ते बोलू लागले.

बाबा,“हो!तू खरं बोलत आहेस अरिन!आपली अर्पिता वया पेक्षा खूप लवकर मोठी झाली!”

अरिन,“ आता सगळं ठीक झाले ना मग आता मला परत त्या छोट्या अप्पीला परत आणायचे आहे!तिच्या आनंदासाठी काही तरी करायचे मी ठरवलं आहे!” तो म्हणाला.

आई,“काय करणार आहेस तू अर्पिताच्या आनंदासाठी!” त्या म्हणाल्या.

अरिन,“ तिला नोकरी मिळाली आहे ना!हीच संधी साधून मी आणि राध्याने तिच्यासाठी सरप्राईज पार्टी अरेंज केली आहे उद्या!म्हणूनच मी आज इतक्या लवकर आलो आहे!ती कॉलेजला गेली की राध्या इथे येईल आपण शॉपिंग करायला जाऊ तिच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी देखील!तसेच उद्याचे अरेंजमेंट बाकी व्यवस्था करू मी तिच्या मित्र-मैत्रिणी,प्रोफेसर्स आणि आपल्या जवळच्या लोकांना निमंत्रण देऊन येईन आज पण हे सगळं तिच्या नकळत करायचे आहे!” तो म्हणाला.

बाबा,“ बरं ती कॉलेजला गेली की राध्याला बोलव आपण लवकरच बाहेर पडू!” ते म्हणाले.

आई,“सगळं बरोबर आहे तुमचं पण राध्या बद्दल अर्पिताच्या मनात असलेली अढी कधी जाईल रे अरिन!” त्या थोड्या नाराजीने म्हणाल्या.

अरिन,“ राध्या बद्दलची तिच्या मनातील अढी ही होईल दूर!” तो समजावत म्हणाला.

सगळं नीट झालं असेलं तरी राध्या आणि अर्पिता मधील मैत्री कुठे तरी हरवली होती.अर्पिताने राध्याला अजून ही माफ केले नव्हते.


©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!













🎭 Series Post

View all