डार्क हॉर्स भाग ३०

अरिनला कोणाचा फोन आला असेल?


अरीनचे आई-बाबा आणि अरीन दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे राध्याच्या घरी गेले. राध्या सगळी तयारी करून त्यांचीच वाट पाहत होती. ते तिच्या घरी पोहोचले आणि राध्याने हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. अण्णा ही त्यांना पाहून आतून हॉलमध्ये आले. खरं तर अरीन आणि आई-बाबा थोडे संकोचून तिथे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव आणि संकोच साफ झळकत होता. दहा मिनिटे झाले तरी कोणीच काही बोलत नव्हते.म्हणून मग अण्णांनीच बोलायला सुरुवात केली.

अण्णा,“ इतका संकोच कशासाठी?आणि तणाव कशाचा आला आहे तुम्हाला?रिलॅक्स व्हा!”

अरीन,“ ते राध्याने….” त्याला पुढे ?मात्र शब्द फुटत नव्हता. कुठून आणि कशी सुरुवात करावी त्याला कळत नव्हते.

अण्णा,“ अरीन अरे तुझ्या बद्दल मला सगळं माहीत आहे! इतका संकोच नको करुस आणि किती घाबरला आहेस! मी वाघ आहे का इतकं घाबरायला! अरे या क्षेत्रात मी बरीच वर्षे झाले काम करतो आहे. तुमच्या तिघांच्या ही मनाची अवस्था मला कळत आहे पण इतका ताण नका घेऊ तुम्ही! माझ्या राध्याला तू पसंत आहेस तिने तुला निवडले आहे तिचा लाईफ पार्टनर म्हणून आणि तिच्या निवडीवर मला पूर्ण विश्वास आहे! त्या दिवशी लग्नात आपली पहिली भेट झाली तेंव्हाच तू मला पसंत होतास अरीन!” ते बोलत होते.

अरीन,“ हो तुमचं बरोबर असलं तरी ही त्यावेळी तुम्हाला किंवा राध्याला माझ्या बद्दल माहिती नव्हतं पण आता मी कोण आहे काय काम करतो हे कळल्यावर सगळलंच बदलले आहे अण्णा! पहिल्यांदा तर मी तुमची माफी मागतो मी राध्याला रादर तुम्हाला ही अंधारात ठेवले!तिच्यात आणि माझ्यात या काही दिवसात खूप काही झाले! तिला माझ्याशी लग्न करायचे आहे पण मी म्हणेन की राध्याने अजून ही विचार करावा!कारण माझ्यासारख्या मेल एस्कॉर्ट बरोबर आयुष्य घालवणे इतके सोपे नाही!” तो गांभीर्याने बोलत होता.

राध्या,“ झालं तूच पुन्हा तुणतुणं वाजायला सुरू! अरीन मी माझा निर्णयावर ठाम आहे आणि हे बोलायला मी तुला इथे बोलवले आहे का?” ती थोड्या रागाने म्हणाली.

बाबा,“ राध्या अरीन बरोबर बोलत आहे बेटा! त्याच आयुष्य इतकं सोपं असणार नाही!त्याच्या बरोबर नाते जोडून तुला परत पश्चात्ताप होण्या पेक्षा अजून एकदा विचार कर! अण्णा तुम्ही खूप मोठी माणसं आम्ही तुमच्या समोर खूप लहान आहोत! त्यात माझा अरीन हे असे काम ...तुमचं काय मत आहे अण्णा यावर?” त्यांनी विचारले.

अण्णा,“ मी आत्ताच सांगितले की अरीन मला तेंव्हा ही पसंत होता आणि तो मला हे सत्य कळल्यावर ही पसंत आहे! त्याने जे काही केले जो मार्ग स्वीकारला तो त्याच्या कुटुंबासाठी! तो योग्य होता असे मी म्हणणार नाही! पण तुम्ही त्याच्यावर चांगले संस्कार केले आहेत. म्हणून तर तो आत्ता सुद्धा स्वतःचा नाही तर राध्याचा विचार करत आहे. त्याने आज पर्यंत राध्याचा तिच्या प्रेमाचा कधीच गैरफायदा घेतला नाही.राध्याचे त्याच्यावर आणि त्याचे ही तिच्यावर प्रेम आहे. मी एक समाजसेवक आहे समाजाला दिशा देण्याचे काम करतो आणि मीच केवळ अरीन त्याच्या मजबुरीमुळे वैश्या व्यवसायाच्या दलदलीत फसला आहे म्हणून त्याला नाकारावे! हे माझ्या मन आणि बुद्धीला ही पटत नाही.या दलदलीतून त्याला आपण सगळे बाहेर काढू. मी माझ्या राध्यासाठी तुमच्या अरीनचा हात मागत आहे!”ते स्पष्टपणे म्हणाले आणि अरीनच्या आई-बाबांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.

बाबा,“ राध्या सारखी बायको माझ्या अरिनला मिळाली.तिच्या सारखी सून आमच्या घरात आली तर या पेक्षा आमचे सौभाग्य अजून काय असेल!” ते हात जोडून म्हणाले.

अण्णा,“ मग आता हे नातं पक्के समजायचे का?” त्यांनी हसून विचारले आणि अरीनच्या आई-बाबांनी हसून होकारार्थी मान डोलावली.

अरीन,“ हो पण त्या आधी अण्णा मला काही बोलायचे आहे!” तो म्हणाला.

राध्या,“हेच की अर्पिताचे शिक्षण आणि लग्न झाल्या शिवाय तुला लग्न करायचे नाही. हे मी आधीच पप्पांना सांगितले आहे!मी अजून दोन-तीन वर्षे थांबायला तयार आहे!आणि पप्पा ही!” ती त्याला पाहून म्हणाली.

अरीन,“ हो ते तर आहेच आणि मला हे काम सोडल्यामुळे दुसरे काम शोधावे लागेल.तो ही प्रश्न आहेच!त्यासाठी इतका तर वेळ लागेलच! पण अजून एक गोष्ट आहे राध्या! मी जे काम आज पर्यंत केले त्यात मी प्रिकोशन घेत आलो असलो तरी ही मी H I V टेस्ट करून घेणार आहे आणि त्या टेस्टचा रिझर्टच आपल्या नात्याचे भवितव्य ठरवेल कारण मला कोणती ही रिस्क घेऊन तुझे आयुष्य धोक्यात घालायचे नाही!” तो ठामपणे म्हणाला.

अण्णा,“ राध्या तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे अरीनचे ते ही निस्वार्थ! तुला कोळशाच्या खाणीत हिरा गवसला आहे! खूप पुढचा आणि खोल विचार करतो अरीन! ठीक आहे उद्याच तू राध्या बरोबर जाऊन टेस्ट करून घे! मला खात्री आहे तुझे रिपोर्ट निगेटिव्हच येणार!” ते म्हणाले.

राध्याची होकारार्थी मान हलवली. अरीन आणि त्याचे आई-बाबा चहा- नाष्टा करून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी राध्या अरीनला ठरल्या प्रमाणे एका लॅब जवळ भेटली. पण तिचे तोंड फुगलेले होते. ती नाराज आहे हे अरीनच्या लक्षात आले होते. तरी अरीन शांत होता. दोघं ही लॅबमध्ये गेले आणि अरीनने ब्लड टेस्ट करायला दिले.राध्याने मात्र रिपोर्ट रात्री पर्यंत अर्जंट हवेत असे सांगितले आणि दोघे बाहेर पडले. राध्या अरीनला काहीच न बोलता निघून जाऊ लागली तर अरीनने तिचा हात धरला आणि बोलू लागला.

अरीन,“ कॉफी घेऊ या ना चल!” तो मुद्दामच म्हणाला.

राध्या,“मला नको आहे काही! मी संध्याकाळी रिपोर्ट कलेक्ट करेन!” ती तोंड फुगवून म्हणाली.

अरीन,“ काय झालं राध्या तुला तोंड फुगवायला?” त्याने विचारले.

राध्या,“ जसं काही तुला माहीतच नाही!मला कामं आहेत खूप! जाते मी!” ती असं म्हणाली


आणि निघून गेली. तिला असं जाताना पाहून अरीनच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य होते.तिच्या प्रत्येक कृतीतून अरीन बद्दल प्रेम दिसत होते.त्याने तिचा रुसवा काढण्यासाठी मनोमन काही तरी ठरवले आणि तो निघून गेला.संध्याकाळी सहा वाजता राध्याने अरीनला मुद्दाम फोन न करता अरीनच्या बाबांना फोन केला आणि रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे असे सांगितले. त्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. अरीन राध्याचा फोन आला तेंव्हा तिथेच होता. त्याने त्याच्या बाबांना एका कागदावर लिहून रिपोर्ट घेऊन घरी ये असं राध्याला म्हणा म्हणून सांगितले. राध्याने ही आढेवेढे न घेता येते म्हणून सांगितले. अरीनने अर्पिता बरोबर आई-बाबांना डिनरसाठी बाहेर पाठवून दिले. त्याने त्याच्या रूममध्ये सेंटेड कँडेल्स,गुलाबाच्या पाखळ्या आणि स्वतः बनवलेले जेवण अशी घरीच रोमॅंटिक डेटची तयारी केली.राध्याने बेल वाजवली आणि अरीनने दार उघडले. राध्या आत आली तर घरात तिला कोणीच दिसले नाही. अरीन मात्र तिला हसत पाहत होता. राध्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की अरीनने घरातल्या सगळ्यांना कुठे तरी बाहेर पाठवले आहे

राध्या,“ हे रिपोर्ट! मी निघते!” तिने अरीनच्या हातात रिपोर्ट ठेवले आणि ती जायला निघाली. तर अरीनने तिचा हात धरला आणि तिला स्वतःच्या जवळ ओढले.

अरीन,“तू जा; मी काय तुला इथेच ठेवून नाही घेणार सध्या तरी! पण इतकं तोंड फुगवायला काय झाले ते तरी कळेल का मला?” त्याने तिच्या कानात हळूच विचारले.

राध्या,“ सोड बरं मला! मला तुझ्याशी बोलायचे नाही कळले तुला आणि तुला खरंच माहीत नाही का माझं तोंड का फुगले आहे ते?” तिने स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवून घेत विचारले.

अरीन,“ तू सांगितले तर कळेल ना मला!” तो म्हणाला.

राध्या,“ हो का बरं मग ऐक आपलं सगळं ठरलं होतं आणि माझा हात मागायला तू आला होतास ना पप्पांकडे मग पुन्हा विचार करचे तुणतुणे का वाजवत होतास आणि हे टेस्ट वगैरेचे नवीनच काय होते रे तुझे?म्हणून मी नाराज आहे. कळलं ना तुला मग जाते मी!” ती तोंड फुगवून म्हणाली.

अरीन,“ अच्छा हे कारण आहे तर राध्या मी तुला पुन्हा पुन्हा विचार कर म्हणतोय कारण माझ्या बरोबर तुझे आयुष्य खूप खडतर असेल! आणि टेस्ट तर करायची मी आधीच ठेवले होते कारण मला तुला कोणत्या ही धोक्यात घालायचे नव्हतं! आता नाराजी काढण्याचा एक चान्स तर दे!” तो तिला हाताला धरून त्याच्या रूममध्ये नेत म्हणाला.

तिथली सजावट पाहून राध्या थोडी वरमली पण लगेच म्हणाली.

राध्या,“हे सगळं करून काही उपयोग नाही!”

अरीन,“प्लिज ना राध्या सॉरी म्हणतो मी! तोंड फुगवून बसलेली तू ना चार दिवस भिजत घालून टंम फुगलेल्या काबुली चण्या सारखी दिसतेस!” तो म्हणाला आणि राध्या रागाने त्याला मारायला धावली आणि टीपॉयला अडखळली. स्वतःला सावरताना तिचा हात पेटवलेल्या कँडलवर पडणार तर अरीनने त्याचा हात मध्ये घातला आणि त्याला भाजले. भाजल्यामुळे तो हात झटकत होता. राध्याने ते पाहून त्याला बेडवर बसवले आणि ती त्याचा तळवा पाहत म्हणाली.

राध्या,“ मूर्ख! आहेस का अरीन! बघ भाजल ना तुला!” ती काळजीने त्याच्या हात पाहत बोलत होती आणि अरीन गालात हसत तिला पाहत होता.

अरिन,“ इतकं काही भाजल नाही ग मी हात ठेवला आणि कँडल विजली! थोडं तर भाजल आहे!”

राध्या,“ अच्छा ठीक आहे मग मी निघते!” ती म्हणाली आणि निघाली.

अरीन,“ किती दुष्ट आहेस ग तू? मला वाटलं मला म्हणशील की कित्ती भाजल आहे मी ऑईलमेंट लावते वगैरे वगैरे…!” तो तोंड वाकड करत म्हणाला.

राध्या,“ तुला काय वाटलं की ही कोणती तरी सिरीयल किंवा फिल्म आहे का की मी तुला भाजल म्हणून माझी नाराजी विसरून लगेच ऑईलमेंट लावेन?” ती फणकाऱ्याने म्हणाली.

अरीन,“ राध्या प्लिज ना! अजून किती दिवस नाराज राहणार तू? मी इतक्या मेहतीने सगळं प्लॅनिंग केलं. जेवण ही बनवलं स्वतः आणि तू आहेस की तोंड फुगवून चालली निघून!” तो आता रडकुंडीला येऊन बोलत होता.

राध्या,“ हुंम! पण शिक्षा तर तुला मिळायला हवी ना!” विचार करत म्हणाली.

अरीन,“ द्या आता शिक्षा गरिबाला!” तो तोंड पाडून म्हणाला.

राध्या,“नालायक कुठला!love you!” ती हसून त्याच्या गळ्यात दोघी हात घालून त्याच्या गालावर ओठ ठेवत म्हणाली.

अरीन,“ बरं मी ताटं घेऊन येतो! जेवण करू!” असं म्हणून तो किचनकडे निघाला तर राध्याने त्याचा हात धरला आणि त्याला थांबवत म्हणाली.

राध्या,“ ऑईलमेंट कुठे आहे? बघ तळव्याला किती भाजल आहे तुझ्या! लगेच ऑईलमेंट लावलं तर फोड वगैरे येणार नाही आणि ताटं आणते मी!”ती त्याचा तळवा पाहत काळजीने बोलत होती.

अरीन,“ कमाल आहे तूझी मघाशी तर म्हणालीस…..” तो पुढे बोलणार तर राध्याने मध्येच त्याचे बोलणे तोडले आणि ती बोलू लागली.

राध्या,“ जास्त नको बोलू ऑईलमेंट दे!” ती डोळे बारीक करून म्हणाली आणि अरीनने स्टडी टेबलच्या ड्राव्हर मधून ऑईलमेंट काढून तिच्या हातात दिली.

राध्याने त्याच्या तळव्याला ऑईलमेंट लावले आणि तिने किचनमधून दोन ताटे भरून आणली दोघे ही गप्पा मारत जेवले.त्या नंतर बराच वेळ दोघे एकमेकांच्या सहवासात सुखावत होते दोघांच्या ही भविष्या बद्दलच्या गप्पा सुरु होत्या. तेव्हढ्यात अरीनचा फोन वाजला त्याने खरं तर हसून फोन उचलला पण फोनवरचे बोलणे ऐकून त्याचा चेहरा उतरला.

अरीन,“ काय? पण कधी! बरं मी लगेच निघत आहे” तो बोलत होता.

अरीनला कोणाचा फोन आला होता?

©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!







🎭 Series Post

View all