डार्क हॉर्स भाग २९

अर्पिता आणि राध्याचे मैत्रीचे सुंदर नाते कायमचे संपले होते का?


आज शनिवार होता आणि अरीन पुण्याला घरी आला होता. तो नेहमी प्रमाणे घरी आला होता खरा पण त्याच्या मागे त्याचा एक हेतू होता. त्याला राध्याच्या वडिलांना भेटायचे होते आणि राध्याची ओळख अर्थात नव्याने त्याच्या कुटुंबाला करून द्यायची होती. तो राध्याच्या घरी रविवारी जाणार होता तर आज राध्या त्याच्या घरी येणार होती. आजचा दिवस तसा सगळ्यांसाठी सामान्यच होता. पण अरीन मात्र मनातून जरा घाबरून होता. कारण त्याला आई-बाबां पेक्षा अर्पिता राध्याला पाहून कशी रियाक्ट होईल याची भीती वाटत होती. अर्पिताने त्याला आधीच सांगितले होते की ती राध्याला कधीच माफ करणार नाही. अर्पिताच्या दृष्टीने राध्या जे अरीनशी वागली होती त्यामुळे अरीन आत्महत्या करायला निघाला होता. पण सुदैवाने त्याला कुटुंबाची आठवण झाली आणि तो थांबला पण जर त्याने खरंच त्या दिवशी काही बरं वाईट करून घेतले असते तर? या विचाराने तिच्या जीवाचा थरकाप होत होता आणि त्याला सर्वस्वी जबाबदार राध्या असली असती म्हणून अर्पिताच्या मनात राध्या विषयी रोष होता.

दोघांचे ठरल्या प्रमाणे राध्या बारा वाजता अरीनच्या घरी आली. तिला पाहून त्याच्या आईने हसत मुखाने तिचे स्वागत केले.

आई,“ राध्या ये ना! अग किती दिवसांनी आलीस? कुठे होती इतके दिवस? अप्पे अग बाहेर ये राध्या आली आहे!” त्या हॉल मधूनच अर्पिताला हाक मारत म्हणाल्या आणि किचनमध्ये राध्यासाठी पाणी आणायला गेल्या.

आईच्या हाके सरशी अरीन बाहेर आला. राध्या थोडी टेन्शनमध्ये दिसत होती कारण अर्पिताशी ती या काळात राध्या बरी वागली नव्हती आणि त्यामुळे अर्पिता आता तिच्याशी कशी वागेल या विचारत ती होती. अरीनच्या लक्षात तिची मनःस्थिती आली आणि त्याने तिला डोळ्यांनीच धीर दिला. तो पर्यंत आई पाणी घेऊन आल्या. बाबा ही बाहेर गेले होते ते ही आले. सगळे बोलत होते पण अर्पिता मात्र तिच्या रूम मधून बाहेर आलीच नव्हती. आईनी पुन्हा तिला हाक मारली तर राध्या त्यांना म्हणाली.

राध्या,“ आई मीच जाते तिच्या रूम मध्ये!”कारण तिला ही अर्पिताशी एकांतात बोलायचे होते आणि तिची माफी देखील मागायची होती.

आई,“ ठीक आहे! हो पण आता जेवण करूनच जा ग! मी स्वयंपाक करत आहे!” त्या म्हणाल्या.

राध्या,“ हो काकू मी आलेच अर्पिताला भेटून मग तुम्हाला स्वयंपाकात मदत करते.” ती म्हणाली.

अरीनला खरं तर राध्याची त्याच्या आई-बाबांना त्यांची भावी सून म्हणून ओळख करून द्यायची होती. दोघांच्या बद्दल सगळं त्यांना सांगायचे होते पण अर्पिताशी बोलल्या शिवाय त्याला कोणता ही निर्णय घ्यायचा नव्हता म्हणून तो शांत होता. राध्याने अरीनला डोळ्यांनी खुणावले आणि ती अर्पिताच्या रूममध्ये गेली.अर्पिता आईच्या बोलवण्याकडे दुर्लक्ष करून पुस्तक उघडून बसली होती. तिच्या डोळ्या समोर पुस्तक होते पण तिचे लक्ष त्यात नव्हते. राध्या तिच्या रूममध्ये आली. तिची चाहूल लागताच अर्पिताने वर पाहिले आणि तोंड फिरवले. अरीन ही राध्याच्या मागोमाग येऊन तिथे उभा राहिला.

राध्या,“ अप्पे माझं चुकलं मी तुझ्याशी खूप वाईट वागले I am sorry!” ती खाली मान घालून म्हणाली.

अर्पिता,“ एक मिनिट पहिले तर मला अप्पे म्हणायचे नाही!अर्पिता म्हणायचे कारण अप्पे मला माझी जवळची माणसं म्हणतात आणि तुम्ही माझ्या जवळच्या नाहीत मॅडम!”ती कठोरपणे म्हणाली आणि राध्याच्या डोळ्यात मात्र आता पाणी साचले.

अरीन,“ अप्पे मला तुझ्याशी बोलायचे आहे! राध्या विषयी! ती आपल्याशी जे वागली त्याचा तिला पश्चात्ताप आहे! आणि मी देखील चुकलोच आहे की मी तिला माफ केले आहे आणि तिने मला! पण अंतिम निर्णय तुझा असेल अप्पे जर तुला राध्या आपल्यात नको असेल तर मी ही तिच्याशी कोणताच संबंध नाही ठेवणार!” तो म्हणाला.

अर्पिता,“ भैय्या तुझ्यात आणि हिच्यात जर सगळे ठीक झाले असेल तर माझी काहीच हरकत नाही! मी तुझ्या सुखाच्या आड कधीच येणार नाही पण मी हिला कधीच माफ नाही करू शकणार कारण ही जे तुझ्याशी वागली त्यातून तू आत्महत्या…” ती पुढे बोलणार तर अरीनने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि तो म्हणाला.

अरीन,“ अप्पे नको ना तो विषय प्लिज!”

राध्या,“ नाही अरीन तिला बोलू दे!” ती म्हणाली.

अर्पिता,“ राध्या मॅडम आमच्या भावा-बहिणीच्यामध्ये बोलण्याचा हक्क तुम्हाला मी दिलेला नाही आणि मी माझ्या भावाशी बोलते आहे तर तुम्ही जरा शांत राहिलात तर बरं होईल! आणि भैय्या का नको तो विषय? कळू दे ना या श्रीमंत so cold प्रतिष्ठित लोकांना की मन भावना फक्त यांनाच नसतात त्या आपल्या सारख्या सामान्य लोकांना ही असतात. ते दुखावल्या गेल्यावर त्यांना दुःख होतं तसं आपल्याला देखील होतं!मला मान्य की तू हिच्या पासून तुझे सत्य लपवून चूक केली पण याचा अर्थ असा नाही की हिने तुला इतके जिव्हारी लागणारे शब्द बोलावेत की तू स्वतःला संपवण्याचा विचार करावा. आमचं दैव बलवत्तर म्हणून तू त्या दिवशी थांबलास! नाही तर काय झालं असत अरे? आम्ही तुला मुकलो असतो कायमचे! हिला काय अजून मुलं मिळाली असती की पण आमचं काय रे आम्ही काय करायचं होतं सांग ना? मी नाही माफ करू शकत हिला! हा हिला तुझी गर्ल फ्रेंड म्हणून मी मान्य करते! पुढे जाऊन ही तुझी बायको होईल तर ही तुझी बायको म्हणजेच माझी वहिनी असेल माझ्यासाठी फक्त! त्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि हिने ही हिची सीमा पार करण्याचा प्रयत्न करू नये समजलं!मी जाते आई एकटीच स्वयंपाक करत असेल तिला मदत करते मी!” ती कठोरपणे म्हणाली आणि निघून गेली.

तिच्या अशा बोलण्याने राध्या मात्र दुखावली गेली. ती तिथेच खुर्चीवर बसून रडायला लागली. अरीन तिच्या जवळ गेला आणि तिचे अश्रू पुसत म्हणाला.

अरीन,“ माझं पुन्हा चुकलं राध्या मी तुला सांगितले नाही की मी त्या दिवशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मला हे तुझ्या पासून लपवायचे नव्हते पण तुला वाईट वाटलं म्हणून…!” तो पुढे बोलणार तर राध्या मध्येच बोलू लागली.

राध्या,“ प्लिज अरीन तुझं काही नाही चुकलं!आणि ही गोष्ट मला आधीच वीणा आंटी कडून कळली होती. मीच मुद्दाम हा विषय काढला नाही कारण मला तुझ्या जखमेवरची खपली नव्हती काढायची! मान्य मला तुझा राग आला होता तू मला फसवले माझ्याशी खोटे बोलला असे मला वाटत होते पण मी माझ्या बोलण्यावर ताबा ठेवायला हवा होता. तुझ्याशी बोलताना त्या शब्दांचा तुझ्यावर काय परिणाम होईल हा विचार न करता इतक्या जहाल आणि विखारी शब्दांचा वापर करायला नको होता.अर्पिताच काहीच चुकलं नाही ती बरोबर बोलत आहे अरीन! त्या दिवशी जर खरंच तू काही बरं वाईट करून घेतलं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते मग अर्पिता तर तुझी बहीण आहे. तुझं-तीच नात रक्ताच आहे तिने मला माफ करावं ही अपेक्षा मी का करावी? तिने दिलेली शिक्षा मला मान्य आहे!” ती असं म्हणून रडू लागली.

अरीन तिला यावर काहीच बोलला नाही.त्याने तिला रडू दिले तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत राहिला. थोड्या वेळाने ती शांत झाली आणि फ्रेश होऊन दोघे ही बाहेर आले. तो पर्यंत आई आणि अर्पिताचा स्वयंपाक तयार झाला होता. सगळे मिळून जेवले आणि अरीनने हळूच विषयाला हात घातला.

अरीन,“आई-बाबा मला तुमच्याशी बोलायचे आहे!”

बाबा,“ बोल ना मग ही प्रस्थावना कशासाठी?”

अरीन,“ बाबा राध्या आणि मी आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला पुढे जाऊन लग्न ही करायचे आहे!” तो संकोचून बोलत होता.

आई,“ ही गोष्ट आमच्यासाठी आनंदाचीच आहे बेटा! आणि राध्या सारखी सून कोणाला नको असेल पण तिला आणि तिच्या घरी तुझ्या बद्दल सगळं माहीत आहे का? ही एक वेळ तयार ही होईल तुझ्या प्रेमा पोटी तुझ्याशी लग्न करायला पण हिच्या घरच्यांचे काय?” त्या काळजीने म्हणाल्या.

राध्या,“काकू मला अरीन बद्दल सगळं माहीत आहे आणि मी त्याला त्याच्या सत्या सहित स्वीकारले आहे. मी त्याला या दलदलीतून बाहेर काढेन!” ती म्हणाली.

बाबा,“ पण बेटा तुझ्या घरच्यांचं काय?ते तयार होतील का अशा मुलाशी तुझं लग्न करून द्यायला?” त्यांनी गंभीरपणे विचारले.

राध्या,“ तुम्ही त्याची काळजी करू नका! माझ्या घरी फक्त पप्पा आहेत आणि ते तयार आहेत अरीनला स्वीकारायला!” ती म्हणाली.

आई,“ मग तर देवच पावला! मला माझ्या अरुची खूप काळजी लागून राहिली होती. आता माझ्या पोराचे कसे होणार? त्याचे आयुष्य कसे जाणार? पण माझी सगळी चिंता मिटली बघ तुझ्यासारख्या खंबीर मुलीची साथ त्याला लाभली तर माझा अरीन लवकर या सगळ्यातून बाहेर पडेल!मी देवा पुढे साखर ठेवून येते!” त्या आनंदाने म्हणाल्या आणि उठून गेल्या.

बाबा,“हे सगळं ठीक आहे अरीन पण राध्या कोणाची मुलगी आहे म्हणजे तिचे घरदार कळले असते तर मी आणि तुझी आई तिला मागणी घालायला गेलो असतो!” ते म्हणाले.

राध्या,“मी राध्या प्रभाकर पवार!” ती म्हणाली.

बाबा,“ म्हणजे तू समाजसेवक प्रभाकर पवार म्हणजेच अण्णांची मुलगी?” त्यांनी आश्चर्याने विचारले.

राध्या,“हो मी त्यांचीच मुलगी काका!आणि त्यांना अरीन बद्दल सगळं माहीत आहे. ते तयार आहेत अरीनला स्वीकारायला!” ती म्हणाली.

बाबा,“ मग तर माझी सगळीच चिंता मिटली! मी त्यांना ओळखतो त्यांनी समाजासाठी बरच काही केलं आहे खास करून एस्कॉर्ट सर्व्हिसेस देणाऱ्या महिलांसाठी ते काम करतात!माझा अरीन त्यांच्या सानिध्यात आला तर माझ्या अरीनच्या आयुष्याचे सोने होईल!” ते डोळ्यातले पाणी पुसत म्हणाले.

थोड्या वेळ शांततेत गेला आणि अरीन म्हणाला.

अरीन,“ मी उद्या त्यांना भेटायला जाणार आहे बाबा!” तो म्हणाला.

बाबा,“ ठीक आहे मी आणि तुझी आई ही येतो तुझ्या सोबत!”

अरीन,“ ठीक आहे.”

या सगळ्यात संभाषणात अर्पिता मात्र एक शब्द ही बोलली नाही आणि हे आई-बाबांच्या लक्षात आले म्हणून आई अर्पिताला म्हणाल्या.

आई,“ काय ग अप्पे तू का इतकी शांत? राध्या तुझी चांगली मैत्रीण आहे ना! हे ऐकून तुला आनंद झाला नाही का?”

अर्पिता,“तुम्ही सगळे मोठे बोलत असताना मी कशाला मध्ये बोलावं म्हणून शांत बसले आई! आणि भैय्यासाठी मी खूप खुश आहे! बरं मी जाते माझी परीक्षा तोंडावर आली आहे मला अभ्यास करायचा आहे!” असं म्हणून तिने तिथून काढता पाय घेतला.

तिची नाराजी आई-बाबांच्या लक्षात आली नसली तरी अरीन-राध्याच्या लक्षात आली होती. राध्या थोड्याच वेळात उद्या मी वाट पाहते म्हणून निघून गेली.

अर्पिता आणि राध्या मधले मैत्रीचे सुंदर नाते कायमचे संपले होते का?

©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!






🎭 Series Post

View all