डार्क हॉर्स भाग २६

राध्या पुढे काय करणार होती?तिला तिची चूक उमगली आहे का?


अरीनने जवळच पार्क केलेली त्याची बाईक घेतली आणि तो निघून गेला. आज देखील राध्याने त्याच्या मनावर वरमी घाव केले होते.त्याला तिने उच्चारलेले शब्द आज पुन्हा जिव्हारी लागले होते. आज त्याने राध्याला कोणते ही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण त्याने किती ही आणि काही ही स्पष्टीकरण दिले तरी काहीच उपयोग होणार नाही. तो फ्लॅटवर आला आणि सरळ त्याने सोफ्यावर स्वतःला झोकून दिले. तो बराच वेळ सोफ्यावर पडून रडत राहिला.

इकडे राध्या तिरिमिरीतच निघाली आणि लांबून सगळं ऐकणार आणि पाहणारी वृद्ध स्त्री तिच्या जवळ आली आणि तिला म्हणाली.

वृद्ध स्त्री,“ थांब पोरी! तुझं नाव राध्या का ग?” तिने राध्याला निहाळत विचारले.

राध्या,“ हो मी राध्याच पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत?” तिने आश्चर्याने विचारले.

वृद्ध स्त्री,“ सांगते सगळं मी तू माझ्या बरोबर चल ना तो बंगला तिथेच राहते मी!” ती अरिन ज्या बंगल्यातून बाहेर निघाला त्याच बंगल्याकडे बोट करत ती म्हणाली.

राध्या,“ नको मला उशीर होत आहे! मी जाते!” राध्या जरा रागानेच म्हणाली.

वृद्ध स्त्री,“प्लिज आज जर तू इथून निघून गेलीस तर तू आयुष्यात खूप काही गमावशील!मी जास्त वेळ घेणार नाही तुझा!” ती बाई अजिजी बोलत होती.


राध्याला तिचे वय आणि विनंती करणे पाहून तिचे मन मोडवले नाही आणि तिने होकारार्थी मान डोलवून त्या वृद्ध स्त्रीच्या मागे तिच्या घरात गेली. ती हॉलमध्ये जाऊन बसली. राध्या हॉल निहाळत होती. हॉलमध्ये असलेली बैठक व्यवस्था, उच्ची कार्पेट,पडदे आणि तिथे असणाऱ्या पेंटिंग्स आणि अँटिनक वस्तू लक्ष वेधून घेत होत्या आणि त्या स्त्रीच्या समृद्धीचे दर्शन घडवत होत्या. तसेच तिथे असलेल्या फोटो फ्रेम वरून त्या स्त्रीला मुलगा-सून नात असावी आणि एका वृद्ध माणसाचा हार घातलेला फोटो पाहून ती व्यक्ती तिचा पती असावा असे वाटत होते.

राध्याला ते सगळं पाहून आश्चर्य वाटत होते की या स्त्रीला कुटुंब असताना ही अरीनला का बोलवत असावी!”ती याच विचारात होती की त्या स्त्रीने मोलकरणीला हाक मारून पाणी आणायला लावले आणि त्या आवाजाने राध्याची तंद्री भंगली.

वृद्ध स्त्री,“पाणी घे राध्या! मी वीणा कारखानीस! तुझ्या मनात काय चालले आहे ते मला कळतंय!” त्या हसून म्हणाल्या

राध्या,“ तुम्ही मला कस ओळखता?” तिने विचारले.

वीणा,“अग मला कोण सांगणार अरीननेच सांगितले मला!”त्या पुन्हा हसून म्हणाल्या.

राध्या,“काय?” ती जवळजवळ ओरडलीच

वीणा,“ अग इतकं ओरडायला काय झालं?राध्या अरीन आणि माझ्यात तू समजतेस तसे कोणते ही संबंध नाहीत! सॉरी पण मी तुमचं बोलणं ऐकलं मघाशी! हो मी त्याची क्लायंट आहे पण वेगळ्या प्रकारची!” त्या म्हणाल्या.

राध्या,“ म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?” तिने विचारले.

वीणा,“ राध्या जिगेलो म्हणजे फक्त सेक्स वर्कर असत नाहीत ग! त्यांना माझ्या सारख्या एकट्या राहणाऱ्या बायका स्वतःचे मानसिक आणि भावनिक एकटेपण दूर करण्यासाठी देखील बोलवत असतात. अरीन माझ्यासाठी माझ्या मुला सारखा आहे. तो फोटो पहा तो माझा मुलगा आणि सून आणि नात आहे ते तिघे काम निमित्त U. K ला असतात!आणि ते माझे मिस्टर दोन वर्षां पूर्वी गेले.त्यांचा आणि माझा सुखाचा संसार होता.मी, ते आणि माझा मुलगा! मुलगा शिक्षणासाठी म्हणून देशाबाहेर गेला आणि तिकडेच स्थायिक झाला! मी आणि माझे मिस्टर इथेच राहिलो आमची छोटीशी कंपनी आहे. ती दोघे सांभाळत होतो! त्यामुळे कधी एकाकीपणा जाणवला नाही! पण दोन वर्षां पूर्वी ते गेले. मुलगा मला म्हणत होता आमच्या बरोबर चल पण मला नव्हता देश सोडायचा जीवनाच्या अंतिम टप्प्यात म्हणून मी नाही गेले! पण इथे मी एकटी पडले. एक वर्ष असच गेलं आणि एकाकीपणा दूर करण्यासाठी मला एका मैत्रिणीने एका एजन्सीचा नंबर दिला. तिथून जिगेलो बोलावून आपण आपला एकाकीपणा दूर करू शकतो असे कळले.तुझ्या सारख मला ही वाटायचं की जिगेलो म्हणजे शारीरिक भूक भागवणारे पुरुष! तरी मी तिथे फोन करायची हिम्मत केली आणि त्यांना मला भावनिक आधाराची आणि मानसिक एकाकीपणा दूर करण्यासाठी माणसाची गरज आहे असे सांगितले आणि दहा महिन्यांपूर्वी अरीन माझ्या आयुष्यात आला. अरीन such a wonderful gay! त्याच्यात आणि माझ्यात एक छान भावनिक बॉण्ड तयार झाला. तो माझ्याकडे येतो माझ्याबरोबर वेळ घालवतो, मला समजून घेतो! त्यातून त्याच्या पर्सनल गोष्टी ही तो शेअर करतो. तो डार्क हॉर्स म्हणून माझ्या आयुष्यात आला आणि अरु बनून माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला!” त्यांच्या डोळ्यात त्याच्या बद्दल बोलताना एक चमक आणि आत्मीयता होती त्या पुढे बोलणार तर राध्याने त्यांना थांबवलं आणि ती बोलू लागली.

राध्या,“कमाल आहे ना एका जिगेलो बद्दल इतकं कौतुक तुम्ही विसारताय मॅडम तो एक मेल एस्कॉर्ट आहे!” ती थोडी चिडून म्हणाली.

वीणा,“ राध्या त्याने हा मार्ग स्वखुशीने नाही स्वीकारला! त्याला त्याच्या परिस्थितीमुळे तो स्वीकारावा लागला! त्याच्या कुटुंबासाठी त्याने तो स्वीकारला आहे! मला कौतुक वाटत त्याच त्याने त्याच्या कुटूंबासाठी स्वतःला स्वतःच्या आयुष्याला पणाला लावले आहे! कोणी ही असले काम हौस म्हणून नक्कीच करत नसते!” त्या तिला समजावत म्हणाल्या.

राध्या,“मग नोकरी करायची कमी पगार मिळाला असता पण कुठे ना कुठे नोकरी मिळाली असतीच की तुम्ही उगीच त्याच्या कृत्यांना ग्लोरिफाय करत आहात!” ती म्हणाली.

वीणा,“मला असं वाटत नाही की मी त्याच्या कृत्यांना ग्लोरिफाय करते कारण त्याची गरजच नाही!तुला जितक आयुष्य सोप वाटतं तितक ते नसतं. तो ही करत होता ना नोकरी चांगला पगार ही होता त्याला!आर्थिक परिस्थिती चांगलीच होती.वडील ही नोकरी करत होते पण त्यांच्या तब्बेतीच्या कारणामुळे त्यांनी नोकरी सोडली.अरिन नोकरीला आहे म्हणून ते निश्चिंत होते.म्हणूनच त्यांनी फ्लॅट घेतला pfच्या पैशातून आणि थोडे फार पैसे स्वतःसाठी ठेवले.अरिनचे तो काम करत असलेल्या कंपनी बरोबर तीन वर्षांचे काँट्रॅक्ट होते.तीन वर्षे पूर्ण होत आली त्याचे काँट्रॅक्ट रिनिव्ह होणार होते पण दुर्दैवाने कोरोना आला आणि लॉक डाऊन लागले.एका रोगाने सगळ्या जगाला वेठीस धरले.अरिनचे काँट्रॅक्ट कंपनीने रिनिव्ह केले नाही.त्याची नोकरी गेली.त्यातच त्याच्या वडिलांची ओपन हार्ट सर्जरी झाली.त्यात बराच खर्च झाला.सेव्हिंग संपले आता पुढे काय हा प्रश्न होता त्याच्या पुढे!त्याच्या वडील आणि आईच्या औषधांचा खर्चच महिना पंधरा हजार होत होता.बहिणीचे शिक्षण घरातील इतर खर्च!सगळं कसं भागवायच या विवंचनेने त्याला ग्रासले!नोकरी तर मिळतच नव्हती.आणि पैसा तर त्याला लागणारच होता.त्याच्या मित्राने त्याला हा मार्ग दाखवला आणि स्वतःच्या मना विरुद्ध तो या मार्गावर चालत सुटला!गरिबी आणि बेकरीचे चटके तुला बसले नाहीत म्हणून तू हे बोलू शकतेस पण त्याच्या जागेवर जाऊन थोडा विचार कर!” त्या म्हणाल्या.

राध्या,“ बरं एक वेळ मानले की त्याने हे सगळं मजबुरीने केले त्याच्या कुटुंबासाठी केले.पण मला त्याने का फसवले त्याने मला तो काय करतो हे खोटे का सांगितले?त्यात त्याची काय मजबुरी होती मला सांगाल का?” तिने रागानेच विचारले.

वीणा,“राध्या त्याने तुला प्रपोज केले नव्हते आणि तुझे प्रपोजल देखील त्याने नाकारले होते!हे तर तुला मान्य!” त्यांनी विचारले.

राध्या,“मीच त्याला प्रपोज केले होते आणि त्याने नकार दिला होता.पण नंतर तोच माझ्या मागे फिरत होता!” तिने सांगितले.

वीणा,“कारण त्याला तुला फसवायचे नव्हते ग!त्याला माहित होतं की त्याचे सत्य समजल्यावर तू त्याला झिडकारणार! त्याच ही प्रेम होतं तुझ्यावर तरी त्याला तू मैत्रीण म्हणून हवी होतीस पण तू मैत्री ठेवण्यास नकार दिलासा!तो ही माणूस आहे राध्या!त्याला तुझा दुरावा सहन झाला नाही म्हणून मग त्याने तुझ्यावरचे प्रेम स्वीकारले पण सतत तो चुकीचे वागत आहे तुझ्या पासून त्याचे सत्य लपवत आहे याची अपराधी भावना त्याच्या मनात होतीच! त्याने तुला सत्य सांगायचे ठरवले पण त्या आधीच ते तुझ्या समोर चुकीच्या पद्धतीने आले!त्याला तुझी माफी मागायची होती आणि त्याच्या वागणाचे स्पष्टीकरण ही द्यायचे होते! तू त्याला बोलूच दिलं नाहीस आणि नाही नाही ते बोललीस त्यातून तो इतका हर्ट झाला की तो आत्महत्या करायला निघाला होता! ” त्या गांभीर्याने म्हणाल्या.

राध्या,“ काय?आत्महत्या!” तिने भेदरलेल्या नजरेने पाहत विचारले.

वीणा,“हो!कारण राध्या तो ही माणूस आहे ग त्याला तू बोललेले शब्द जिव्हारी लागले असणार!” त्या म्हणाल्या.

राध्या,“ बाप रे! त्याच्या बाजूने मी हा विचारच केला नाही!मी बोललेल्या शब्दांचा त्याच्यावर इतका परिणाम होईल की तो आत्महत्या करण्याचा विचार करेल असे वाटलंच नाही मला!” ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.

वीणा,“राध्या शब्द म्हणजे शस्त्र असतात.शरीरावर होणाऱ्या घावा पेक्षा मनावर होणारे घाव खूप वरमी असतात! तुला राग येणे साहजिक आहे पण रागाच्या भरात आपण काय बोलतो याचे भान आपल्याला असायला हवे! जर त्याने त्याच दिवशी स्वतःचे बरे वाईट करून घेतले असते तर तू स्वतःला माफ करू शकली असतीस का?”त्यांनी रोखून पाहत तिला विचारले.

त्यांनी तिला राखून पाहत विचारले आणि तिने फक्त नकारार्थी मान हलवली कारण तिचा कंठ दाटून आला होता तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.

वीणा,“राध्या अरीनचा अर्थ माहीत आहे का तुला? अरीन म्हणजे पर्वत! अरीन म्हणजे शांतता आणि अरीन म्हणजे सूर्य किरण! आणि कुठे तरी त्याच्या नावाचे त्याने सार्थक केले आहे. कारण तो स्वभावाने शांत आहेच तो पर्वता सारखा त्याच्या कुटुंबासाठी उभा राहिला आणि त्यांच्यासाठी तो सूर्य किरणां पेक्षा कमी नाही!राध्या एक सांगू का?” त्या बोलत होत्या. राध्या त्यांचे बोलणे ऐकून विचारात पडली होती.

राध्या,“सांगा ना!” ती विचारातून बाहेर येत म्हणाली.

वीणा,“तू अरीनला त्याच म्हणणं मांडण्याची एक संधी दे! राध्या कमळ हे चिखलातच उगवते पण त्याचे स्थान कायम देवाच्या पाया जवळ असते! अरीन देखील असेच दलदलीत उमललेले कमळ आहे! तू जर त्याला साथ दिलीस तर त्याचे आयुष्य सुधारेल! माझ्या अनुभवी नजरेतून तुझ्या डोळ्यातील त्याच्या बद्दलचे प्रेम नाही सुटले आणि तू ज्या हक्काने त्याला मघाशी बोलत होतीस आणि त्याने तुला उलट उत्तर न देता तुला तो गाजवू दिला ना त्यावरून मी सांगते तुमच्यातील नाते खूप घट्ट आहे. फक्त त्याला गाठ पडली आहे ती गाठ अलगद कोणता ही गुंता न होऊ देता सोडवणे फक्त तुझ्या हातात आहे! बघ विचार कर!ही बघ कॉफी आणलीच मंदाने आणि हा पास्ता अरीनने केला आहे घे!” त्या मंदाच्या हातातून ट्रे घेत म्हणाल्या.राध्याने आवंढा गिळत डोळे पुसले. कॉफी आणि पास्ता घेतला.

प्रत्येक नात वेगळं त्याची कहाणी आणि ती निभावनारी पात्रे देखील वेगळी असतात. अरीन-राध्याचे नाते देखील वेगळे होते.अरीनने राध्या पासून त्याचे सत्य लपवून चूक केलीच होती पण राध्याने ही त्याला बोलण्याची संधी न देता त्याचा तिरस्कार करून बरोबर केले नव्हते. शेवटी नात्यांमध्ये कोण चूक कोण बरोबर हे पाहण्यापेक्षा नात्याची गरज दोघांना आहे का हे महत्वाचे असते.

वीणाला भेटल्यानंतर आता राध्याचे पुढचे पाऊल काय असेल?
©स्वामिनी चौगुले

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!






🎭 Series Post

View all