डार्क हॉर्स भाग १६

राध्या अरिनचे सत्य तिला कळल्यावर त्याला स्वीकारेल का?


अरीन आवक होऊन तिच्या वडिलांना पाहत होता. राध्या त्यांची ओळख करून देत म्हणाली.

राध्या,“ हे माझे पप्पा…” ती पुढे बोलणार तर अरीनने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि तो बोलू लागला.

अरीन,“ राध्या यांना कोण ओळखत नाही हे दि ग्रेट समाज सेवक प्रभाकर पवार यांना लोक आदराने अण्णा म्हणतात. यांची बरीच महिला आश्रमं, अनाथ आश्रमं,वृद्धाश्रमं आहेत तसेच अनेक महिलांच्या पुनर्वसनाचे काम करतात हे! तू मला कधीच सांगितले नाहीस हे तुझे पप्पा आहेत?” तो कौतुकाने बोलत होता.

अण्णा,“ बास बास किती ते कौतुक? मी इतका ही मोठा नाही! उलट मीच तुझे धन्यवाद करतो त्या दिवशी तू माझ्या राध्याची मदत केलीस तिने सांगितले आहे मला सगळे! थँक्स!” ते नम्रपणे म्हणाले.

अरीन,“ सर तुम्ही मला आता लाजवत आहात! मी असं काही मोठं केलं नाही!” तो चाचर म्हणाला.

अण्णा,“ ये बाबा मला सर वगैरे म्हणू नकोस! असलं काही ऐकायची सवय नाही मला! एक तर अण्णा म्हण नाही तर राध्या सारख पप्पा म्हणालास तरी चालेल!”ते हसून म्हणाले.अरीनने ते ऐकले आणि राध्याकडे पाहिले. राध्याने फक्त डोळे मिचकावले.

अरीन,“ बरं मी तुम्हाला अण्णा म्हणेन!” तो म्हणाला.

अण्णा,“ that\"s better!” ते म्हणाले.

राध्या,“ पप्पा मी याची ओळख बाकीच्यां बरोबर करून देते.” ती म्हणाली तर त्यांनी तिला इशारा केला आणि तिला थोडं बाजूला घेऊन गेले.अरीन तिथे उभा होता.

अण्णा,“ बच्चा मानलं तुला तूझी पसंत आवडली. चांगला देखणा मुलगा पटवलास की आणि नुसता देखणा नाही तर हुशार ही आहे की, तुझ्यावर कायमच मला भरवसा होता! आणि तुझी पसंत कायमच योग्य असेल हे माहीत होते!” ते कौतुकाने अरीनकडे पाहत बोलत होते. अरीन मात्र तिच्या वडिलांना भेटून अजूनच अवघडला होता.

राध्या,“ thank you पप्पा! मी मुद्दामच त्याला आज बोलवले होते!बरं मी जाते!” ती त्यांना मिठी मारून म्हणाली आणि अरीनकडे वळली.

अरीन,“ राध्या तू का सांगितले नाहीस की तू इतक्या मोठ्या माणसाची मुलगी आहेस ते?” तो नाराज होत म्हणाला.

राध्या,“ त्याने काय फरक पडणार होता? यावर नंतर बोलूयात ना आपण, चल मी तुला बाकी लोकांची ओळख करून देते!” ती म्हणाली आणि त्याचा हात धरून त्याला घेऊन गेली.

तिने त्याची ओळख तिच्या काका-काकू आणि बाकी नातेवाईकांशी करून दिली. तिच्या चुलत भावाची आणि नवीन वहिनीची ओळख करून देण्यासाठी ती त्याला घेऊन स्टेजवर गेली तिथे काही लोक नवरा-नवरी बरोबर फोटो काढत होते आणि त्यांना शुभेच्छा देत होते.

राध्या,“ हा माझा भाऊ कार्तिक आणि त्याची बायको कियारा!” ती म्हणाली आणि अरीनने कार्तिक बरोबर हस्तांदोलन केले आणि त्या दोघांना त्याने आणलेले गिफ्ट दिले.


तो पर्यंत तिथे एक पंचेचाळीशी पार केलेली एक बाई आली. तिने वधू-वरला आशिर्वाद दिले आणि ती वळली तर समोर अरीन आणि राध्या! अरीन आणि तिची नजरानजर झाली. दोघे ही एकमेकांना पाहून चरकले!दोघांचे ही चेहरे खर्रकन उतरले. राध्याच्या दोघे ही एकमेकांना ओळखत असावे हे लक्षात यायला वेळ लागला नाही आणि ती म्हणाली.

राध्या,“ तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का?” ती असं म्हणताच दोघे ही अजूनच गोंधळून गेले आणि दोघांनी ही नकारार्थी मान हलवली. ते पाहून राध्याच पुढे म्हणाली.

“अरीन या नमिता आंटी आमच्या जुन्या स्नेही आहेत आणि आंटी हा अरीन माझा मित्र!”

ते ऐकून दोघे ही कुसनुस हसले. अरीन स्टेजवरून खाली उतरला आता त्याला तिथे थांबणे अशक्य झाले होते. त्याच्या मागे राध्या होतीच.

अरीन,“ राध्या मी निघतो मला खूप अर्जंट काम आहे ग!”

राध्या,“ अरे पण जेवण तरी करून जा चल ना!”

अरीन,“ नको ग! मी निघतो!” तो घाईत म्हणाला.

राध्या,“ इथेच थांब मी जेवण पॅक करून घेऊन येते. तुझं काम करून घरी जाऊन जेव मग!” ती आग्रहाने म्हणाली


आणि तिचा आग्रह अरीनला मोडवला नाही. त्याने होकारार्थी मन डोलावली. तो थांबला.राध्या दोनच मिनिटात जेवण पॅक करून घेऊन आली. तिने त्याच्या हातात पिशवी दिली आणि त्याच्या बरोबर पार्किंग लॉटकडे निघाली.

राध्या,“ अरीन कार्तिकच्या लग्नानंतर कार्यक्रमं आहेत आणि आता लग्न सराई ही सुरू होत आहे. माझ्याकडे बरीच कामे आली आहेत त्यामुळे आता कमीत कमी महिना भर आपली भेट होणार नाही! तुला उद्या शक्य झाल्यास हाफ डे घे ना! मला तुझ्याशी बोलायचे आहे उद्या संध्याकाळी मी निघणार आहे!” ती बोलत होती आणि अरीन मात्र वेगळ्याच विचारात गढला होता. त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद नाही पाहून राध्याने त्याला हलवले आणि तो भानावर आला.


अरीन,“सुट्टी का घेतो की!” बोलत बोलत ते पार्किंग लॉटमध्ये आले होते.

राध्या,“ काय झालंय अरीन तुला तू मघाशी पासून अपसेट दिसत आहेस?” तिने विचारले

अरीन,“असं काही नाही ग बरं मी निघतो उशीर होतोय मला!” असं म्हणून तो निघून गेला.

राध्याच्या मानत मात्र अरीन आणि नमिताच्या अशा वागण्यामुळे शंकेची पाल चुकचुकली! ती नमिता कडून काही माहिती मिळते का पाहावे म्हणून पुन्हा आत गेली तर नमिता ही गायब होती. ती राध्याला कोठेच सापडली नाही. त्यामुळे राध्याच्या मनातील प्रश्नांची छाया आणखीनच गडद झाली.
★★★


दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे राध्या दुपारी अरीनला भेटायला त्याच्या फ्लॅटवर गेली. अरीन अपेक्षे प्रमाणे घरीच होता. तो राध्याला थोडा नाराज दिसत होता.एक तर तिने खोटं बोलून त्याला लग्नाला बोलवले होते दुसरी गोष्ट तिने ती प्रभाकर पवारची मुलगी आहे हे देखील त्याला सांगितले नव्हते. इतक्या मोठ्या व्यक्तीची मुलगी राध्या आहे हे समजल्यावर तो मनोमन आणखीच चरकला होता. कारण राध्या त्याला सत्य कळल्यावर स्वीकारेल ही त्याची वेडी आशा आता तर पूर्णच मावळली होती. राध्या येऊन बसली तरी अरीन एक शब्द ही बोलत नाही हे पाहून राध्या त्याच्या जवळ जाऊन बसली आणि बोलू लागली.

राध्या,“ काय झालं आहे अरीन इतके तोंड फुगवायला?”

अरीन,“ तू मला का सांगितले नाहीस की तू अण्णांची मुलगी आहेस हे?”

राध्या,“ अरीन अरे हे माझा तुझ्या पासून लपण्याचा हेतू नव्हता. सांगण्याचा कधी प्रसंगच आला नाही त्यामुळे राहून गेले सांगायचे आणि सांगितले असते तरी काय फरक पडणार होता आपल्या नात्यात?” तिने विचारले.

अरीन,“तसं नाही ग पण बरं जाऊदे सोड आणि काय ग मला खोटं बोलून बोलवलेस ना लग्नाला?आणि काल काय बोलत होता तुम्ही बाप-लेक माझ्या पासून दूर जाऊन एक मिनिटं तू त्यांना आपल्या बद्दल सांगितले आहेस का?” त्याने रोखून पाहत विचारले.

राध्या,“ खरं सांगितले असते तर तू आला असतास का? आणि माझी आई मी पंधरा वर्षांची असताना गेली त्या नंतर पप्पाच माझे आई-बाबा झाले मी त्यांच्या पासून काहीच लपवून ठेवत नाही. ते समाजसेवा करतात पण ते माझे वडील आहेत. त्याचा तुला काहीच प्रॉब्लेम नसावा! आणि एवढा मोठा बिजनेस त्यांनी गेल्या सात-आठ वर्षा पासून सोपवला आहे तर त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे! त्यांना माझी पसंत पसंत आहे तेच बोलत होते ते!आणि माझ्याशी भांडणारच आहेस का आता?”ती बोलत होती.पण अरीन मात्र वेगळ्याच विचारात अडकला होता.

“ गोष्टी आता वेगळ्याच थराला चालल्या आहेत अरीन!राध्या या प्रेमाच्या प्रवासात तुला गृहीत धरून खूप पुढे निघून गेली आहे आणि यात सर्वस्वी तुझीच चूक आहे! राध्याला आता अजून अंधारात ठेवणे योग्य नाही. आत्ताच सांगावे तिला की मी कोण आहे आणि काय करतो!”तो विचार करत होता.

राध्या,“ अरीन अजून कुठे हरवलास तू?” ती त्याच्या आणखीन जवळ सरकत त्याच्या शर्टच्या बटणावर नखाने नक्षी काढत म्हणाली.

अरीन,“ आss आहे की इथेच ऐक ना राध्या मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. मला माझ्या बद्दल तुला महत्वाचे सांगायचे आहे!” तो तिचा हात धरून म्हणाला.

राध्या,“आत्ता नको माझ्याकडे वेळ खूप कमी आहे मला जायचं आहे अरीन आणि एक महिना तुझी भेट होणार नाही तर हे क्षण मला बोलण्यात वाया नाही घालवायचे! एक तर तुझी so called तत्त्व आणि all that!त्यामुळे माझी अजूनच कुचंबणा होते but you know Love you!” असं म्हणून तिने त्याच्या ओठांचा ताबा घेतला आणि अरीनचे शब्द त्याच्या ओठातच विरून गेले.


त्याने ही विचार केला की “राध्याच काम संपल्यावर महिन्याने तिच्याशी बोलावे. त्या नंतर तिने आपल्याला झिडकारलं नाकारलं तरी चालेल.” असा विचार करून त्याने तिला मिठी मारली.

राध्या ही एका मोठ्या समाजसेवकाची मुलगी आहे हे कळल्यावर तर अरीनच्या तिने त्याला स्वीकारण्याच्या उरल्या सुरल्या आशा ही आता लोप पावल्या होत्या आणि राध्या आता या नात्यात खूप पुढे गेली आहे या गोष्टीची जाणीव देखील त्याला झाली होती. त्यामुळे त्याने तिला त्याचे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण राध्याने त्याचे ऐकून घेतले नव्हते.म्हणून मग त्याने राध्याची कामे झाल्यावर एक महिन्याने तिला सत्य सांगायचे ठरवले.

राध्या मात्र आता अरीन बरोबर वेगळ्याच जगात विहार करू लागली होती. ती अरीन बरोबरच्या सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागली होती. पण या तिच्या काचेच्या स्वप्नांना सत्याची ठेच लागेल तेंव्हा काय होणार होते. राध्या अरीनला त्याच्या सत्या सहित स्वीकारेल की अरीनला वाटते तसं नाकारेल?

©स्वामिनी चौगुले

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!











🎭 Series Post

View all