डार्क हॉर्स भाग १५

अरिनला लग्नात कोणी ओळखेल का?


अरिन आणि राध्याच्या अशाच अधून मधून गाठी-भेटी घडत होत्या. अरिनने मात्र या सगळ्यात त्याची मर्यादा कधीच ओलांडली नव्हती.विनोद बरोबरच्या बोलण्यामुळे तर तो अजूनच राध्या पासून फटकून राहू लागला होता.राध्याला मात्र त्याचे वागणे खटकत होते तरी तिने त्याला काहीच विचारले नव्हते.

आज ही नेहमी प्रमाणे राध्या मुंबईत आली होती आणि दोघे एका रेस्टोरंटमध्ये संध्याकाळी भेटले.

राध्या,“ काय रे आज काल नीट भेटत नाहीस अरिन भेटला तरी फटकून वागतोस कुठे फिरायला जाऊ म्हणले तर काम आहे असं म्हणतोस!नेमकं काय चालले आहे अरिन तुझे!” तिने विचारले.

अरिन,“ काही नाही ग आज काल काम खूप असते आणि फिरायला जाऊयात की तू सांग कधी जाऊयात?” तो हसून म्हणाला.

राध्या,“ ठीक आहे!मी सांगते पण त्या आधी ना तुला या रविवारी माझ्या बरोबर एका लग्नाला यायचे आहे!” ती म्हणाली.

अरिन,“तुला माहीत आहे राध्या मला असं लग्नाला वगैरे यायला आवडत नाही!” तो तोंड वाकडं करत म्हणाला.

राध्या,“प्लिज ना माझ्यासाठी माझ्या एका क्लायंटचे लग्न आहे ज्याचे मॅनेजमेंट मीच करत आहे आणि लग्न मुंबईतच आहे!” ती गोड हसून त्याचा हात धरून गळ घालत म्हणाली.

अरिन,“ बरं बाई ठीक आहे येतो मी!खुश? बरं काही तरी ऑर्डर कर मी वॉशरूमला जाऊन आलो!” तो म्हणाला आणि गेला.त्याचा मोबाईल मात्र तो टेबलवरच विसरून गेला.

राध्याचे लक्ष ही नव्हते.तिने ऑर्डर दिली आणि ती अरिनची वाट पाहत बसली होती तर अरिनचा फोन वाजला आणि मोबाईलकडे तिचे लक्ष गेले.तिने फोन रिसिव्ह केला नाही. पण फोन सतत वाजत होता म्हणून तिने मोबाईल हातात घेतला तर त्यावर नाव फ्लॅश होत होते मंजिरी मॅडम!तिने नाव वाचले आणि फोन रिसिव्ह केला.तर तिने हॅलो बोलायच्या आधीच समोरची बाई बोलू लागली.

मंजिरी,“काय रे आज तर येणार आहेस का?नाही म्हणजे आज काल खूपच बिझी असतोस तू!तुझी आठवण येते रे मला!” ती लाडिकपणे बोलत होती.

तो पर्यंत अरिन तिथे आला.राध्याच्या हातात त्याचा मोबाईल पाहून तो जरा चरकला पण स्वतःला सावरत तो तिच्या समोर जाऊन बसला.राध्याने त्याचा मोबाईल त्याच्या हातात दिला आणि तो फोन कानाला लावत तिच्या पासून थोडं लांब जाऊन बोलू लागला.राध्याला मात्र त्याला अस एका बाईने लाडिकपणे बोलणे खटकले होते.ती अरिनचे लांबून निरीक्षण करत होती.तो त्या बाईला अगदी अजिजीने बोलत होता.त्याची बॉडी लँग्वेज ही बदलली होती.हे तिच्या लक्षात आले होते.

अरिन फोन संपवून राध्या जवळ येऊन बसला.राध्याने अरिनकडे डोळे बारीक करून पाहत विचारले.

राध्या,“या मंजिरी मॅडम कोण?”

अरिन,“अग त्या कंपनीच्या क्लायंट आहेत!” तो सारवा सारव करत म्हणाला.

राध्या,“हो का? पण ती तर म्हणत होती की तिला तुझी आठवण येत आहे! मला कोणी क्लायंट अस म्हणत नाही रे!”असे म्हणून ती संशयाने पाहत म्हणाली.

अरीन,“अग ये बाई असं संशयाने नको पाहूस मला! ती बाई गले पडू आहे आणि माझ्या कामामुळे मला तिला टॉलरेट करावं लागतं!” तो गडबडून म्हणाला.

राध्या,“ अरे इतका पॅनिक नको होऊस!” ती हसून म्हणाली.

अरीनने मात्र सुटकेचा निःश्वास सोडला पण राध्याच्या मात्र मनातून ती गोष्ट काही केल्या गेली नाही. कारण त्या बाईचा बोलण्याचा टोन आणि तीच हक्काने बोलणे तिला कुठे तरी खटकले होते. दोघे ही जुजबी बोलून निघून गेले.
★★★


आज रविवार होता आणि राध्या बरोबर लग्नाला जायचं आहे म्हणून अरीन घरी कामाची थाप मारून पुण्याला गेला नव्हता. राध्या आधीच मुंबईमध्ये होती. लग्न रात्रीचे होते पण शनिवार,रविवार अरीन क्लायंट करत नाही तो पुण्याला घरी जातो हे सगळ्यांना आता माहीत होते त्यामुळे आज अरीनच्या मागे ती कटकट नव्हती. संध्याकाळचे पाच वाजले होते आणि तो निवांत सोफ्यावर पडून टी.व्ही पाहत होता. तेवढ्यात बेल वाजली आत्ता कोण आले या विचाराने अरीनने दार उघडले तर समोर एक माणूस उभा होता आणि त्याच्या हातात कसली तरी बॅग होती.अरीन त्या माणसाला मी काही नाही मागवले म्हणणार तो पर्यंत त्याचा फोन वाजला फोन राध्याचा होता. त्याने फोन घेतला.

राध्या,“ तुझ्या दारात एक माणूस उभा आहे त्याला मीच पाठवले आहे आधी त्याच्या हातातून ती बॅग घे!मग आपण बोलू!” ती म्हणाली.

अरीन,“ बरं!”

तो म्हणाला आणि त्याने बॅग घेतली. तो माणूस निघून गेला.अरीनने दार लावले. फोन त्याच्या कानालाच होता.

अरीन,“ काय आहे या बॅग मध्ये राध्या?” त्याने विचारले.

राध्या,“ तुझ्यासाठी सूट आहे! तो घाल आणि मी whs up केलेल्या व्हन्यूवर पोहोच!”ती म्हणाली.

अरीन,“हो मी येणारच आहे की लग्नाला पण हा सूट पाठवायची काय गरज होती. तुला चांगलच…” तो पुढे बोलणार तर राध्याने त्याचे बोलणे मध्येच तोडले आणि ती बोलू लागली.

राध्या,“ हो हो मला माहित आहे की तुला असं काही दिलेलं काय पण तुझं बिल वगैरे देखील दिलेलं चालत नाही!खूप स्वाभिमानी आहेत ना आमचे साहेब! पण ही माझ्या कडून प्रेमाची भेट आहे आता ती पण नाकारणार का तू?” ती म्हणाली.

अरीन,“ राध्या तू ना खूपच हुशार आहेस ग!बरं मी येतो घालून सूट आता खुश? आणि साहेब वगैरे काय मी काही साहेब वगैरे नाही कळलं तुला!” तो म्हणाला.

राध्या,“ बरं बाबा पण लवकर ये!” ती म्हणाली आणि फोन ठेवला

अरीनने बॅग मधील सूट काढला. लाईट ग्रे कलरचा शर्ट आणि डार्क ग्रे शेड मधील ब्लेझर आणि ट्राउझर!त्याने सूट घातला. जेल लावून केस सेट केले. परफ्यूम फवारला आणि तो राध्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. तो बाईक वरून उतरला आणि हॉटेलच्या लॉन एरियाकडे जाऊ लागला. तर त्याला तिथे असलेल्या मुली वळून वळून पाहत होत्या. तो दिसतच इतका रुबाबदार आणि कातील होता! त्याने लॉनच्या बाहेरून राध्याला फोन केला राध्या काही तरी कामात होती. तिने फोन घेतला आणि अरीनला घेऊन जायला बाहेर आली.लांबून अरीन तिला पाहत होता तिने ही ग्रे रंगाची प्लेन पण मोठी गोल्डन बॉर्डर असलेली साडी, त्यावर स्लीवलेस ब्लाऊज,त्याला साजेसा लाईट मेकअप,मोकळे केस,गळ्यात आणि कानात नाजूक सेट घातला होता.ती ही सुंदर दिसत होती. अरीन तिला पाहत होता आणि तिने अरीनला पाहिले आणि पाहतच राहिली. त्याला पाहून ती हसली आणि म्हणाली.

राध्या,“ कसला चिकना दिसतोयस रे तू! बघ एक पण पोरगी आणि बाई तुला वळून पहिल्या शिवाय जात नाहीत बघ!”

अरीन,“ तू ही सुंदर दिसत आहेस की आणि काय हे राध्या दोघांचे कपडे सेम रंगाचे!” तो म्हणाला.

राध्या,“ हो चल बरं आता!” असं म्हणून तिने त्याच्या दंडा भोवती हात घातला आणि त्याला आत घेऊन गेली.


सगळे राध्याला हे कुठे आहे? ते कुठे आहे? असे विचार होते. तसेच तिच्या बरोबर अरीनला पाहून हा मित्र का तुझा? असे ही विचारत होते. तिला इतकं आपुलकीने आसपासचे लोक बोलत होते. त्या वरून अरीनला हे कळायला वेळ नाही लागला की लग्न राध्याच्या क्लायंटच नसून तिच्या जवळच्या नातेवाईकाचे आहे आणि तो तिला नाराजीने म्हणाला.

अरीन,“ राध्या लग्न कोणाचे आहे खरं सांग बरं आता. तुमच्या नात्यातील लग्न आहे आणि तू मला खोटं बोलून बोलवलेस ना?”

राध्या,“ खरं सांगितले तर तू आला असतास का?हो माझ्या चुलत भावाचे लग्न आहे आणि मला तुझी ओझरती भेट माझ्या कुटूंबाशी घडवून आणायची होती. तू तोंड नको ना फुगवू आता प्लिज!” ती लाडीकपणे म्हणाली.

अरीन,“ पण का राध्या? मी तुला सांगितले आहे ना की मी तुला आत्ताच लग्न वगैरेचे प्रॉमिस करू शकत नाही तरी ही तू अशी वागत आहेस!” तो पुन्हा नाराजीने म्हणाला.

राध्या,“ हो हो माझ्या लक्षात आहे सगळं! मी आपल्या बद्दल कोणाला ही सांगितलेले नाही अजून; फक्त एक कॅज्युअल फ्रेंड म्हणून तुझी ओळख करून देणार आहे! आता नको ना तोंड फुगवू!” ती आर्जव करत म्हणाली.

अरीन,“ बरं!” तो हसून म्हणाला.

राध्याने त्याला एका ठिकाणी बसवले आणि ती स्टेजवर गेली. अरीन पाहत होता तिथे आसपास सगळे हाय प्रोफाईल लोक दिसत होते. त्याला भीती वाटली की त्याला कोणी इथे ओळखणार तर नाही ना! पण राध्यामुळे तो तिथून जाऊ ही शकत नव्हता. एकदाचे लग्न लागले आणि राध्या अरीन जवळ आली.त्याला घेऊन गप्पा मारत पाठमोऱ्या उभ्या असलेल्या एका व्यक्ती जवळ गेली.

राध्या,“ पप्पा! हा अरीन इनामदार! माझा मित्र मी सांगितलं होतं ना तुम्हाला त्या रात्री याने मला मदत केली होती हाच तो!” ती पप्पा म्हणाली आणि त्या व्यक्तीने तोंड फिरवले. त्या व्यक्तीला पाहून अरीन आवक झाला.

कोण असेलतील राध्याचे वडील ज्यांना पाहून अरीन आवक झाला होता? आणि अरीनला तिथे खरंच कोणी ओळखेल का?
©स्वामिनी चौगुले

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!


🎭 Series Post

View all