डार्क हॉर्स भाग ११

अरिन लिफ्ट मधून सुखरूप बाहेर पडेल का?


भाग 11
त्या नंतर अरिन रोज राध्याला न चुकता तीन टाईम मेसेज करत होता.राध्याने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते.पण तिच्या ही मनात कुठे तरी अरिन विषयी प्रेम भावना असल्याने ती त्याच्या अशा वागण्याला प्रतिसाद देत नसली तरी ही ती मनोमन सुखावत होती.

अरिन तिला सतत भेटण्याचा प्रयत्न करत होता.कधी पुण्यात तर कधी मुंबईमध्ये तो तिला भेटत असे बोलण्याचा प्रयत्न करत असे पण राध्या त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती.त्याचे बोलणे देखील ऐकून घेत नसे.पण अरिन मात्र त्याचे प्रयत्न सोडत नव्हता.आज ही तो शनिवार असल्याने असाच तिला तिच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेला होता.रिसेप्शनिष्टला त्याने राध्याला भेटायचे आहे असे सांगीतले. आता रिसेप्शनिष्ट त्याला ओळखत असल्याने तिने लगेच इंटरकॉम वरून तिला फोन केला.

रिसेप्शनिष्ट,“मॅडम मिस्टर अरीन इनामदार आले आहेत तुम्हाला भेटायला!”

राध्या,“त्यांना सांग मला वेळ लागेल मी कामात आहे!” ती म्हणाली आणि अरीनने रिसेप्शनिष्ट कडून फोन घेतला आणि तिचे उत्तर ऐकून म्हणाला.

अरीन,“ठीक आहे मॅडम तुमचं काम होई पर्यंत मी वाट पाहीन!”

राध्या त्यावर काहीच बोलली नाही. पण तिने तिचे काम दुपार पर्यंत उरकले आणि घाईतच केबीनच्या बाहेर पडली.अरीनने तिला पाहिले आणि तिच्या बरोबर चालतच म्हणाला.

अरीन,“राध्या मला तुझी फक्त काही मिनिटं हवी आहेत! माझ्या एका चुकीची शिक्षा तू अजून किती दिवस मला देणार आहे!” तो आर्जव करत म्हणाला.

राध्या,“मी तुला कोणती ही शिक्षा दिलेली नाही! मी बोलवत नाही भेटायला तुला! तू का येतोस रे? माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही माझी खूप महत्त्वाची मिटिंग आहे!” ती लिफ्ट मध्ये जात म्हणाली आणि अरीन ही तिच्या बरोबर लिफ्टमध्ये जात बोलू लागला.

अरीन,“ राध्या ऐक ना मी किती दिवस झालं तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे!” तो म्हणाला.

राध्या,“तू एकच वाक्य किती दिवस बोलणार आहेस रे! मी किती वेळा सांगू की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही!” ती चिडून म्हणाली आणि लिफ्ट ग्राउंड फ्लोअर वर आली. राध्या त्याच न ऐकून घेताच निघून गेली.

आज देखील अरीनच्या पदरात निराशाच पडली होती. त्याने डोळ्यातले पाणी पुसले आणि तो मनात म्हणाला.

“राध्या तुला किती दिवस माझी परीक्षा घ्यायची तितके दिवस घे पण मी हार मानणार नाही!”

तो मनात निश्चय करून निघून गेला.
★★★
असेच आठच दिवस निघून गेले.अरिनला राध्याच्या ऑफिस मधून काम करणाऱ्या भोसले कडून कळले की राध्या आज चार वाजता मुंबईमध्ये येणार असून ती एका लॉजवर थांबणार आहे कारण तिचे उद्या काही तरी मुंबईमध्ये काम आहे आणि त्या लॉजचा पत्ता देखील त्याच्या कडून मिळाला.

तो संध्याकाळी तयार होऊन पाच वाजता लॉजवर पोहोचला.त्याने राध्याचे नाव सांगून तिला भेटण्यासाठी आलो आहे असे रिसेप्शनला सांगितले आणि तो तिची रूम नंबर विचारून लिफ्टने सहाव्या मजल्यावर गेला.त्याने दार नॉक केले. राध्याने दार उघडले.अरिनला पाहून ती थोडीशी चिडली.

राध्या,“तू इथे? तुला माझा पत्ता कसा मिळतो रे दर वेळी?” ती वैतागून रूमच्या दारातूनच बोलत होती.

अरिन,“इच्छा असेल तर मार्ग सापडतोच ना! मला तुझ्याशी बोलायचं आहे राध्या अजून किती दिवस तू मला शिक्षा करणार?” त्याने तिला विचारले.

राध्या,“मला तुझ्याशी काही बोलायचे नाही मी हे हजार दा सांगून झाले आहे!जा इथून!” ती चिडून म्हणाली.

अरिन,“प्लिज राध्या अग आरोपीला देखील एकदा त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते पण तू तर मला ती ही देत नाहीस!” तो म्हणाला.

राध्या,“पण मला तुला नाही द्यायची संधी जा तू!” ती म्हणाली.

अरिन,“प्लिज राध्या नको ना इतकी कठोर होऊस मी हात जोडतो!” त्याने खरंच हात जोडले त्याचा आवाज आता कातर झाला होता.

ते राध्याने पाहिले आणि तिने त्याच्या तोंडावर दार लावून घेतले.खरं तर त्याला असं बोलताना पाहून तिला ही मनातून वाईट वाटलं होतं आणि ती त्याच्या अशा बोलण्याने पागळेल तिला स्वतःचीच भीती वाटली म्हणून तिने दार लावून घेतले होते.

अरिन पुन्हा निराश होऊन निघाला होता.अरीन लिफ्टमध्ये गेला आणि तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. अरीन एकटाच लिफ्टमध्ये होता. त्याने खूप वेळ वेगवेगळी बटणे दाबली पण लिफ्ट काही सुरू होत नव्हती. त्याने मदतीसाठी आवाज दिला आणि लिफ्ट उघडण्याची वाट पाहत असलेल्या एका माणसाला त्याचा बारीकसा आवाज ऐकू आला. त्या माणसाने लगेच हॉटेल मॅनेजमेंटला कळवले की तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली आहे आणि त्यात एक व्यक्ती अडकला आहे. हॉटेलची यंत्रणा अरीनला बाहेर काढण्यासाठी कामाला लागली. जवळ जवळ अर्धा तास झाला होता. हॉटेल स्टाफ आणि मेकॅनिक लिफ्टमध्ये अडकलेल्या अरीनला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण अजून त्यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते.

इकडे राध्या मात्र या गोष्टी पासून अनभिज्ञ होती. तिची मिटिंग आहे म्हणून ती तयार होऊन बाहेर पडली आणि लिफ्टकडे निघाली तर तिला हाऊस किपिंगचे काम करणाऱ्या एकाने सांगितले.

“मॅडम लिफ्ट बंद आहे गेल्या अर्ध्या तासापासून तिसऱ्या मजल्यावर एक माणूस अडकला आहे. त्याला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही जिन्याने जा!” तो म्हणाला आणि तिने घड्याळ पाहिले तर तिच्या लक्षात आले की अरीनला ही लिफ्टमध्ये जाऊन अर्धाच तास झाला आहे.तिच्या मनात शंका आली

“अरे देवा लिफ्टमध्ये अडकलेली व्यक्ती अरीन तर नसेल”

त्या सरशी भीतीने तिची गाळण उडाली आणि ती जिन्याच्या पायऱ्या उतरत सरळ तिसऱ्या मजल्यावर गेली.तिथे हॉटेल स्टाफ आणि मेकॅनिक लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करत होते. ती लिफ्टमध्ये अडकलेली व्यक्ती अरीन नसावी अशी मनोमन प्रार्थना करत लिफ्ट जवळ गेली आणि तिने हाक मारली.

“अरीन तू आहेस का आत?”

अरीनने तिचा आवाज ओळखला आणि तो ओरडला.

“ हो राध्या मीच आहे आत! आता गुदमरु लागलं आहे श्वास पण घेता येत नाही! तू प्लिज लवकर उघडायला लाव ना लिफ्ट!” त्याचा बारीक आवाज तिला आला आणि आधीच घाबरलेली राध्या अजूनच घाबरली. तिच्या मनात त्याच्या विषयीच्या असलेल्या रागाची जागा आता काळजीने घेतली.तरी ती त्याला धीर देत लिफ्टवर हात मारत म्हणाली.

“हो आहेत इथे लोक अरीन ते लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच ते उघडतील लिफ्ट तू घाबरू नकोस फक्त दीर्घ श्वास घे!” ती म्हणाली आणि तिथे हजर असलेल्या मॅनेजरला रागानेच म्हणाली.

“इतकं मोठं हॉटेल आहे तुमचं आणि मध्येच लिफ्ट कशी बंद पडते! गेल्या अर्ध्या तासा पासून एक माणूस आत अडकला आहे! त्याच्यासाठी एक एक मिनिट महत्त्वाचा आहे आणि तुम्ही अजून लिफ्टचे शटर उघडू शकला नाहीत!”

“हो मॅडम कळतय आम्हाला आत अडकलेल्या व्यक्तीसाठी वेळ किती महत्त्वाचा आहे. आम्ही उघडत आहोत लिफ्ट झालंकच!तुम्ही काळजी करू नका काही होणार नाही त्यांना आम्ही प्रिकोशन म्हणून डॉक्टरांना ही बोलवले आहे” तो अदबीने म्हणाला आणि राध्या थोडी शांत झाली पण तिचा जीव मात्र अरीनच्या काळजीने पोखरला जात होता.

अरीन लिफ्टमध्ये अडकला होता आणि राध्या त्याच्या काळजीने सैरभैर झाली होती. तिला अरीन या संकटातून कधी एकदा बाहेर येतो असे झाले होते. अरीनला लिफ्टमध्ये अडकून अर्धा तास होऊन गेला होता पण हॉटेल मधील लोक त्याला अजून बाहेर काढू शकले नव्हते. अरीनचा जीव आता लिफ्टमध्ये गुदमरत होता.

अरीनला हॉटेल मधील लोक वेळेवर बाहेर काढू शकतील का?की अरीन बाबत काही विपरीत घडणार होते? आणि या सगळ्या घटनेत अरीन-राध्याच्या नात्यावर काय परिणाम होणार होता?
©स्वामिनी चौगुले
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!









🎭 Series Post

View all